टेकड्या बेरंगी होऊ नयेत म्हणून

0
29

 

1990 साली हनुमान टेकडीवर हिरवळीचा मागमूसही नव्‍हता. तिच हनुमान टेकडी आज हिरवीगार दिसू लागली आहे.चतु:शृंगीच्या टेकडीला मूळ रंग पुन्हादेण्यासाठी चार वर्षांपूर्वी ग्रीन हिल्स ग्रूपच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले.टेकडीवर जगू शकतील अशी रोपं, पाण्यासाठी चर, दर रविवारी त्यांची विचारपूसअसं सगळं रीतसर. दर रविवारी आणि गुरूवारी, मंडळी टेकडीवर एकत्र जमत, झाडं लावत, त्यांना पाणी घालत. बघता बघता, रोपं वर दिसू लागली.

येत्या नवरात्रात चतु:शृंगीला जाल तेव्हा मागे टेकडीवर चढून माणसाने स्वप्रयत्‍नांनी घडवलेला हा पराक्रम पाहून घ्या.

टेकड्या बेरंगी होऊ नयेत म्हणून… चतु:शृंगी
 

‘ग्रीन हिल्स ग्रूप’जगात तशा अनेक टेकड्या असतील; त्या वेगवेगळ्या रंगांच्याही असतील. पण तूर्तास आपल्याला ज्याबद्दल बोलायचंय ती टेकडी पुणे विद्यापीठाजवळ आहे. चतु:शृंगी देवीच्या मंदिरामागे असणारी – म्हणून चतु:शृंगीची टेकडी असंच नाव पडलेली. ह्या टेकडीचा मूळ रंग होता हिरवा. म्हणजे टेकडीवर घनदाट झाडी होती. ती झाडी हिरवी म्हणून मग टेकडीचा रंगसुद्धा हिरवा. पण मग हळुहळू माणूस नावाच्या प्राण्याने विकास नावाच्या बाबीखाली अशी झाडं वाट्टेल तशी तोडली नि मग हिरवा रंग संपत, संपत शेवटी, ही टेकडी रिकामी झाली; स्वतःचा हिरवा रंग हरवून बसली. असा एकूण गोष्टीचा शेवट.
 

मग काही मंडळींना वाटलं, की टेकड्यांना हे असं बेरंगी करणं काही बरं नाही. झाडांना असं संपवणं चुकीचं आहे. आता आपल्या हातात काय, तर आपण ह्या टेकड्यांना त्यांचा मूळ रंग पुन्हा मिळवून देऊ. म्हणून मग त्यांनी ‘ग्रीन हिल्स ग्रूप’ची स्थापना केली. अशी एकूण दुस-या गोष्टीची सुरुवात.
 

धनगरांनी केलेल्या सहकार्याबद्दल मुंडासं आणि कडं देताना..चतु:शृंगीच्या टेकडीला मूळ रंग पुन्हा देण्यासाठी चार वर्षांपूर्वी ‘ग्रीन हिल्स ग्रूप’च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले. टेकडीवर जगू शकतील अशी रोपं, पाण्यासाठी चर, दर रविवारी त्यांची विचारपूस असं सगळं रीतसर. दर रविवारी आणि गुरूवारी, मंडळी टेकडीवर एकत्र जमत, झाडं लावत, त्यांना पाणी घालत. बघता बघता, रोपं वर दिसू लागली. अरे, खरोखरच, टेकडीचं डोकं हिरवं दिसणार की असं वाटू लागलं. बाजूच्या पोलिस ठाण्यातील मंडळींची मदत लाभली. कंपन्यांची मदत मिळू लागली. पाण्याची टाकी उभी राहिली. देशातले पाहुणे टेकडीवर येऊ लागले. कार्यकर्तेही नवनव्या आयडिया काढू लागले.
 

चार वर्षांत, रोपांनी चांगलीच उभारी घेतली. झाडं कमरेपेक्षा उंच वाढली. पुण्यात विमानांनी येणा-यांना जाणीव झाली, पुण्यातल्या एकूणच टेकड्या हिरव्या होऊ शकतात, की …! संस्थेची, उपक्रमांची अधिक माहिती. www.greenhillsgroup.org

पण ग्रीन हिल्स ग्रूपसमोर एक छोटीशी अडचण होती. ती निवारण्याच्या प्रयत्नांतून कार्यकर्त्यांच्या मनातील अभिनवता कळते; व्हायचं असं, की पुण्याबाजूच्या पाटस वगैरे भागातली धनगर मंडळी त्यांच्या मेंढ्यांना ह्या टेकडीवर चरायला घेऊन येत. ‘ग्रीन हिल्स’च्या कार्यकर्त्यांनी लावलेली ताजी रोपंच मग ह्या मेंढ्यांचं खाद्य ठरू लागली. त्यामुळे कार्यकर्त्यांचे प्रयत्न वाया,  रोपांना घालण्यासाठी टेकडीवर आणावं लागणारं पाणी वाया,  त्यासाठी लागणारे स्वयंसेवकांचे श्रम वाया,  वेळ नि पैसा वाया!
 

ह्यावर उपाय म्हणून कार्यकर्त्यांनी धनगर मंडळींशी चर्चा केली आणि त्यांना मेंढ्यांच्या चरण्यामुळे होत असलेला गोंधळ समजावून दिला; टेकडीवर मेंढ्यांना चरण्यासाठी आणू नये अशी विनंती केली. मूळातूनच पर्यावरणाजवळ असणा-या धनगर मंडळींनी तत्काळ ह्या गोष्टीला होकार दिला. त्यामुळे घडली ती चांगली गोष्ट म्हणजे, चतु:शृंगीच्या टेकडीला तिचा हिरवा रंग परत मिळाला. ह्या सर्व प्रयत्नांना साहाय्य करणा-या धनगरांचा सत्कार नुकताच ‘ग्रीन हिल्स ग्रूप’च्या वतीने समाजसेवक- लेखक गिरीश प्रभुणे व स्थानिक नगरसेवक विकास मठकरी यांच्या हस्ते टेकडीवरतीच एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला. या वेळी धनगरांचे, त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मुंडासं आणि कडं देऊन आभार मानण्यात आले. कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रभुणे म्हणाले, की धनगर समाज हा मुळात निसर्गाला हानी पोचणार नाही अशी जीवनशैली असलेला आहे. त्यामुळे हा सत्कार म्हणजे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची शहरी लोकांनी पकडलेली संधी आहे. ते पुढे म्हणाले, की कोणतेही नियोजन नसलेले शहरीकरण व पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारी तथाकथित आधुनिक जीवनशैली ही पर्यावरणाच्या -हासाची महत्त्वाची कारणे आहेत. शहरी समाजाच्या पिढ्यानपिढ्यांनी हा -हास घडवलेला आहे. त्यामुळे पर्यावरणरक्षणाचे शहरी लोकांचे प्रयत्न हे मुख्यत्त्वे पापक्षालन आहे.

***

 

26 जानेवारी 2010 रोजी ग्रिन हिल्‍स ग्रुपचे कार्यकर्ते चर्तुःश्रृंगी टेकडीवर झाडांभोवती ओला कचरा टाकत असताना. या कामासाठी पुणे महापालिकेकडून 10 टन ओला कचरा उपलब्‍ध करून देण्‍यात आला होता.

दहा वर्षांपूर्वी एक छोटा गट म्हणून वृक्षारोपण व जलसंधारणाच्या कामांना सुरुवात केल्यानंतर चार वर्षांपूर्वी ‘ग्रीन हिल्स ग्रूप’ची ट्रस्ट म्हणून नोंदणी करण्यात आली. श्रीकांत परांजपे हे संस्थेचे संस्थापक असून सचिव म्हणून रवी पुरंदरे व अध्यक्ष म्हणून संजय आठवले काम बघतात. इतर वेळी वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी ही पन्नासेक मंडळी दर रविवारी पुण्यातील हनुमान टेकडी, चतु:शृंगी टेकडी अशा टेकड्यांवर जाऊन वृक्षारोपण व संवर्धनाचे काम करतात. मुळात, शीर्षकात म्हटलंय तसं, टेकड्या बेरंगी होऊ नयेत या हेतूने ही संस्था काम करत आहे.

***

– प्रतिनिधी.

About Post Author