टायपोग्राफी डे आणि शांताराम पवार

typo04

सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अँप्लाईड आर्ट व आयडीसी-आयआयटी (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने 27 व 28 फेब्रुवारी 2010 रोजी ‘टायपोग्राफी अँड आयडेंटिटी’ या विषयावर नॅशनल कॉन्फरन्स व वर्कशॉप आयोजित केले गेले होते. शनिवारी सकाळी जे.जेच्या आवारात पसरलेल्या कागदांवर सामूहिक रीत्या विविध भारतीय लिप्यांमधील अक्षरे रंगवण्यात आली. या ‘हॅपनिंग’नंतर कॉन्फरन्सचे बीजभाषण, बोधचिन्हांसाठी प्रसिद्ध असलेले सुदर्शन धीर यांनी केले. दुपारच्या सत्रात मुद्राक्षरतज्ञ महिंद्र पटेल यांचे भाषण झाले. दोन्ही सत्रांमध्ये सादर करण्यात आलेले पेपर्स अक्षररचना, विविध लिप्यांमध्ये रूपांतर करताना येणा-या अडचणी, चिन्हात्मक आशय आणि त्याचे उपयोजन यांची चर्चा करणारे होते.

जे.जेमधील प्राध्यापक व अक्षरकलातज्ज्ञ संतोष क्षीरसागर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी ‘अक्षराय’ या अक्षररचनेशी संबंधित उपक्रमाचा शुभारंभ दृक्श्राव्य निवेदनातून सादर केला. तो लक्षवेधक होता.

दीपक घारे यांनी शांताराम पवार यांच्या लेखाचित्रांवर आधारित ‘बेसिक इश्यूज ऑफ लॅंग्वेज, स्क्रिप्ट अँड डिझाईन इन टायपोग्राफी’ या विषयावर पेपर सादर केला. त्यांतील हे काही महत्त्वाचे मुद्दे.

अक्षररचना आणि बोधचिन्हे यांचा जवळचा संबंध आहे. पवारांनी काही मोजकी बोधचिन्हे केली आहेत. त्यात व्यावसायिकतेबरोबर भाषारचनेच्या अंतस्तरांची जाणीव आणि सांस्कृतिक जाण दिसते. उदाहरणार्थ, त्यांनी MSSIDCसाठी केलेले बोधचिन्ह, महाराष्ट्र स्टेट स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यात यंत्राचे चाक आणि सूर्यांचे किरण यांचा मिलाप आहे. मानवी चेह-यामुळे उद्योजकता आणि कल्पकता सूचित होते. ‘वनाझ’ इंजिनीयरिंगच्या लोगोमध्ये एच त्रिकोणी आकार कोन फिरवून पुनरावृत्त केला आहे. निमिड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मोटिव्हेशनल अँड इन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट या संस्थेच्या लोगोवर मोडी लिपीचा प्रभाव दिसतो. देवनागरी लिपीत व्यंजन व स्वर मिळून एक अक्षर बनते, तसे NI, MI या अक्षरांना एकत्र जोडलेले आहे. आम अक्षरांवरच्या पताका डायक्रिटिकल मार्क्स म्हणून येतात, अक्षरांच्या गतीला दिशा देतात आणि वारकरी संप्रदायाच्या पताका असा एक मराठमोठा सांस्कृतिक संदर्भही सुचवतात. महाराष्ट्र फाऊंडेशनचे, वर्तुळातले ‘मम’ हे बोधचिन्ह मोडी लिपीतील गाठी आणि वळणे संवादाच्या एका लयबद्ध प्रतिमेत परावर्तित करते. तर ‘ग्रंथाली’चा लोगो आणि बोधचिन्ह हस्तलिखित पोथ्यांची आठवण करुन देतो. चार उघडी पुस्तके मिळून बनलेला आकार. ज्ञानरूपी कमळाचे, ता-याचे प्रतीक तर तो आहेच. पण सामूहिकपणे एकत्र येण्याचे आणि चहुदिशांना पसरण्याचे संकेतही त्यातून मिळतात. पवारांनी ‘ग्रंथाली’च्या ध्येयधोरणांशी सुसंगत अशी त्यांची रूपांतरेही केली आहेत. काळाची गरज दाखवण्यासाठी वाळूचे घड्याळ, ‘आपद्धर्म’ सुचवण्यासाठी हृदयाचा आकार, ‘मानाची पाने’साठी पिंपळाचे पान असा अर्थविस्तार मूळच्या बोधचिन्हातून सहजपणे होतो. पवारांच्या संकल्पनात अशी अर्थवाहकता आलेली आहे, ती त्यांच्यात भाषा, लिपी आणि सौंदर्यदृष्टी या तिन्हीबाबतच्या असलेल्या उपजत जाणिवेमुळे.

भाषा -भाषारचनेची मूळ तत्त्वे पवारांना उपजतपणे माहीत असल्यामुळे ते भाषिक चिन्हांचा – अक्षरे, विरामचिन्हे, मोकळी जागा यांचा कल्पकतेने उपयोग करतात. त्यांनी तो संवादिनीच्या मुखपृष्ठांसाठी केला आहे. त्यांनी ‘आधुनिक समीक्षा-सिद्धांत’ या पुस्तकाच्या मु्खपृष्ठासाठी गणितातली चिन्हे वापरली आहेत.

लिपी – लिपीचे रचनातंत्र पवारांइतक्या ताकदीने क्वचितच कोणी वाकवले असेल. पॉल क्ली, व्ही. एस. गायतोंडे अशा अभिजात चित्रकारांप्रमाणे पवारही अक्षररचनेत पिक्टोग्रॅम्स किंवा आयडियो-ग्रॅम्स वापरतात. उदाहरणार्थ, ऊर्जा ही अक्षरे – ‘विंदा’ पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ध्वनी आणि स्वर यांचा अनुभव देणारी अक्षररचना आहे. चित्रकार, कवी आणि भस्म या दोन्ही शब्दात र आहे. या र चा पक्ष्याचा आकार म्हणजे पिक्टोग्रॅमच की!

पवारांनी सुलेखन आणि मुद्राक्षरे या दोन्हींचा वापर करून ज्या रचना तयार केल्या, त्यात लिपीचा कलात्मक वापर दिसून येतो. या रचनांना कवितेच्या आशयात भर घालणारी एक चित्रात्मकता आहे. दया पवार यांच्या श्रद्धांजलीपर भित्तिचित्रात अक्षरे पार्श्वभूमीवर राहतात आणि जिवंत होते ते काळे अवकाश!

लेखाचित्र – पवारांचा सौंदर्यविचार भाषा आणि लिपीच्या रूपप्रधान उपयोजनात दडलेला आहे. त्याचा सारांश ‘लेखाचित्र’ या संकल्पनेत आपल्याला दिसतो. लेखाचित्रात सुलेखन आणि चित्रात्मकता यांची एकात्मता आहे. या आकृतिबंधाला संस्कृतीचे साररूप असलेला एक चिन्हार्थ प्राप्त होतो. यातच त्याचे वेगळेपण आहे. त्याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे, ‘आदिमाया’ या विंदा करंदीकरांच्या काव्यसंग्रहाचे पवारांनी केलेले मुखपृष्ठ हे आहे. त्यावरचा ॐ हे भाषिक चिन्ह आहे, चित्र आहे आणि ॐ अक्षराला आदिमातेचा वेगळा संदर्भ देणारा चिन्हार्थही आहे.

दीपक घारे यांनी सादर केलेला हा पेपर उपस्थितांना सुलेखन, मुद्राक्षररचना आणि बोधचिन्हांकन या सर्व बाबतीत कुतूहलजनक वाटला.

पवारांच्या लेखाचित्रकलेसंदर्भात उपस्थित केले गेलेले मुद्दे नंतरच्या भाषणांतही या ना त्या स्वरूपात येत राहिले. उदाहरणार्थ, महिंद्र पटेल यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे न नमुने दाखविले त्यांत मुद्राक्षरे आणि अवकाश यांची समतोल विभागणी कशी महत्त्वाची असते हा मुद्दा होता. बिटानियासारख्या बिस्किट उत्पादकांच्या विविध ब्रॅंड्सी ओळख व कंपनीची ओळख (इक्विटी) यांत समतोल कसा साधायचा किंवा एकच ब्रॅंड अथवा लोगो दुस-या भाषेत व लिपीत रुपांतरित करताना त्याच्या दृश्य आकाराशी प्रामाणिक कसे राहायचे असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.

एका विद्यार्थींनीने सादर केलेल्या लघुपटात, टाइप डिझायनर्सना, चित्रकारांना मिळते तसे सेलिब्रिटी स्टेटस् कधी मिळणार हा प्रश्न, तोही विचार करायला लावणारा होता.

आशुतोष गोडबोले,

ईमेल – thinkm2010@gmail.com

About Post Author