ज्याचा त्याचा विठोबा

सातार्‍यातील तीन खेडी-त्यांनी ग्रामविकासाचा आणि सामाजिक एकात्मतेचा आदर्श उभा केला आहे… उदयगिरीच्या तरुण शार्मिष्ठाची धावत्या दौर्‍यानंतरची संवेदनाशील नोंद

संस्थाजीवन

शर्मिष्ठा भोसले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवभारत युवा आंदोलनाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्याप्रदेशांना तरुणांनीपरस्पर भेटी देण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचा भाग म्हणून मराठवाड्यातील शर्मिष्ठाने पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचा सात दिवसांचा दौरा केला. त्यातून तिच्या मनावर झालेली नोंद.

ज्याचा त्याचा विठोबा

– शर्मिष्ठा शशांक मिना भोसले

बैलगाडीऐवजी
बाप मर्सीडीज बेंझमधून शेतात येत आहे..
एसी गोठ्यातील बैलांना पाणी पाजून,
ट्रॅक्टरनं नांगर मारतो आहे.
‘ऊसाला पाणी दे’ असा एसएमएस गड्याला करून
मोबाइलवरून ‘भाकर घेऊन ये’
असं आईला सांगत आहे…
सालं नको म्हटलं तरी
वारंवार हेच स्वप्न
मला का पडत आहे?
 

कवी बालाजी इंगळे यांनी लेखणीतून उतरवलेली ही उपरोधपूर्ण ‘फॅण्टसी’ थोडीफार का होईना सातारा जिल्ह्यातल्या काही खेड्यांत मी अनुभवली. काल-परवापर्यंत खेडं म्हटलं की डोळ्यांसमोर चित्र यायचं ते विजेशिवाय अश्मयुगातला काळोख घेऊन जगणारी घरं…तांड्यातांड्यावर पाण्यासाठी लागणार्‍या कोसो मैल दूर रांगा…मातीला मोल देता देता मातीमोल होणार भुमिदास…अन् पदवीधर झाल्यावर ‘सुशिक्षित बेकाराचं’ लेबल लावून ‘नोकरी की शेती?’ या प्रश्नात घुसमटणारं तारुण्य…
 

इंडो जर्मन प्रोजेक्‍टपण ‘धामणेर’, ‘निढळ’ आणि ‘लोधवडे’… ग्रामस्वच्छता अन् निर्मल ग्राम अभियानात रोल मॉडेल ठरलेल्या या खेड्यांमध्ये, किंबहुना, ढोबळ बोलायचं तर सार्‍या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, शिवाराच्या पंढरीतला हिरवा विठ्ठल पाण्यावाचून करपला म्हणून मरणाची वारी करणारा बळीराजा मला दिसला नाही!….उलट, इथं मस्कतला डाळींब निर्यात करणारा निरक्षर साधाभोळा शेतकरी भेटला… घोटभर पाण्यासाठी पाखरागत वणवण हिंडणार्‍या लेकीबाळी भेटल्या नाहीत … उलट, इंडो-जर्मन प्रकल्प अन् जलस्वराज्य योजनेतून तंत्रशुद्धपणे घालून दिलेले पाणीव्यवस्थापनाचे आदर्श भेटले… एरवी शाहरुखचा ‘स्वदेस’ थिएटरमध्ये बघताना भारावलेला अन् प्रत्यक्षात उच्च शिक्षण घेऊन फॉरेनला त्यातल्या त्यात शहरात जायची स्वप्नं बघणारा तरुण इथं भेटला नाही…उलट, इथं भेटला शहरात DMLT करून गावात सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब उघडणारा ‘रिअल लाइफ हिरो’…. जाता-येता ‘भावना अन् अस्मिता दुखावली’ चा जोहार करत भगव्या अन् हिरव्या ज्वाळांनी मनं-माणसं पेटवणारे हात भेटले नाहीत…उलट, रहिमतपूरसारख्या मुस्लिमबहुल गावात दर्ग्याच्या नुतनीकरणाच्या कार्यासाठी उन्हातान्हात फिरून वर्गणी गोळा करणारे आणि कार्यपूर्तीनंतर झालेल्या उत्सवात ‘आज माझ्या स्वप्नातला दर्गा पूर्ण झाला’ असं म्हणणारे पाटीलमास्तर भेटले… जातीसाठी माती
 

चंद्रकांत दलवाई यांचे गावखाणारं इथं मला कुणी भेटलं नाही… उलट, मला इथं भेटले ते सारे मातीची जात सांगणारे, मातीला जागणारे…
 

धामणेरचे सरपंच क्षीरसागर असोत, लोधवडेचे चव्हाण असोत की कुकुडवाडचे पवार असोत… सार्‍यांनी ग्रामदैवताची आराधना केली, सतीचं वाण घेतल्यागत गावकुसाच्या विकासाचं वाण घेतलं, तरुणांच्या सामर्थ्याचं स्फुल्लिंग चेतवून कर्तृत्त्वाच्या मशालीनं अवघा गाव उजळून टाकला. ग्रामस्वच्छता अभियान काळात तर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पैसा उभा केला. वेळप्रसंगी तरुणांनी शेतात राबून मिळालेल्या रोजंदारीतून कामं पार पाडली. गावागावात सुसज्ज व्यायामशाळा उभारल्या अन् एरवी, व्यसनाच्या गर्तेत झोकून देणारा तरुण समर्थांनी दाखवलेली बलोपासनेची तेजस्वी वाट चालू लागलेला दिसला.
 

कृषी, बालसाहित्य, सौंदर्यशास्त्र, पाकशास्त्र, नाट्य, काव्य अशा सार्‍या साहित्यप्रकारांनी समृद्ध सुसज्ज ग्रंथालये उभारली अन् आबालवृध्दांपर्यंत सार्‍यांतच नकळत वाचनसंस्कृती रुजत गेली… गटशेतीच्या व्यापक संकल्पनेतून फुललेली शेतं अन् उन्हाळ्यातही हिरवेगार असणारे मळे, सुव्यवस्थित बायोगॅस प्रकल्प (चालू स्थितीतले), सौरदीप, व्यसनमुक्तीची संघर्षगाथा, साध्याभोळ्या-अडाणी महिलांनी चालवलेले बचत गटाचे अभिनव उपक्रम, गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी घेतलेले कष्ट अन् साध्यासोप्या तरीही प्रभावी कल्पनांची केलेली उपाययोजना (उघड्यावर शौचास बसणार्‍या कुटुंबप्रमुखाचं नाव ग्रामपंचायतीच्या फलकावर लिहीलं जायचं), कृषी वार्ता फलक, हरीतगृहांच्या माध्यमातून काढलेलं निर्यातक्षम उत्पादन, शाळकरी पोरांना बरोबर घेऊन गुरुजींनी गावभर अन् डोंगरदर्‍यांत रुजवलेली अन् वाढवलेली झाडं… उन्हाळ्याच्या तापल्या हवेत पेटून घराघरासमोर फुललेला गुलमोहर, दरवळणारा चाफा अन् असं बरंच काही गंधित, देखणं अन् सुवासिक वास्तव तुमच्या-आमच्यासारख्या जित्याजागत्या माणसांनी तिथं साकारलंय!

Kshirsagar at Dhamnerदंतकथा वाटावेत असे क्रांतिकारी प्रयोग इथल्या प्रत्येक गावात केले गेलेत. यात मला धामणेरचा उल्लेख प्रामुख्यानं करावासा वाटतो. भारतात मंदिर-मशिदीच्या जागासंदर्भातली प्रकरण उग्र रूप धारण करत असताना धामणेरमध्ये मात्र मुस्लिम बांधवांनी ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी जागा हवी म्हणून स्वखुशीनं मशिदीचं स्थलांतर केलं अन् नवीन जागेत हिंदू-मुस्लिमांनी एकत्र श्रमदान करून नवी देखणी मशिद बांधली. विश्वास बसणार नाही पण यापुढचं नाजूक तरीही कणखर पाऊल टाकत अशिशित मुस्लिम समाजानं दफन पद्धतीची दहन पद्धती करून प्रेत पुरण्याची जागा क्रीडासंकुल बांधण्यास मोकळी केली. गोसावी समाजानं राहत्या घरात मृतदेह पुरण्याची परंपरा नाकारून दहनपद्धत स्वीकारली. दहा दिवस सुतक पाळण्याचा कालावधी कमी करून, सर्वानुमते, तो तीन दिवसांचा केला गेला. सार्‍या गावानं जॉईंट प्रॉपर्टीचं तत्त्व अंगीकारलं. एरवी, शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामित्वाचा वसा अन् वारसा नुसता भाषणात सांगून टाळ्या घेणार्‍यांच्या गर्दीत हे साधेभोळे अशिक्षित गावकरी, मला वाटतं, सच्च्या सुधारकतेचे शिलेदार ठरले. दूरदृष्टी, मुत्सद्दीपणा, विवेक अन् तर्कशुध्दतेचा जज्बा इथं सरपंचापासून सामान्यांपर्यंत, सार्‍यांत मौजूद आहे.
 

दिवसभर काळ्या मातीत राबणार्‍या, हातावर पोट असणार्‍या सामान्य माणसांनी रात्र-रात्र जागून एका सच्च्या तळमळीनं उपसलेल्या कष्टांचा इतिहास ऐकला, ‘एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार’चा ध्यास प्रत्येक ग्रामस्थाच्या डोळ्यांत मी बघितला अन् मन नकळत विचार करू लागलं, की हे सारं माझ्या मराठवाड्यात का शक्य नाही? संत गाडगेबाबा पुरस्कार प्राप्त लोधवडे है – कृषी आयुक्त प्रभाकर देशमुखांचं गाव. निढळ – पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवींचं गाव. आज उच्चपदावर विराजमान झालेल्या या व्यक्तींनी गावाचा, गावमानाचा सर्वार्थानं विकास करून मातीचं ऋण फेडलं… गाडगेबाबा अन् तुकडोजी महाराजायांचा वसा घेतला अन् तितक्याच समर्थपणे तो पेलला. हे असं सारं मराठवाड्यातल्या किती नेत्यांना अन् उच्चपदस्थांना जमलं? मराठवाड्यातील आदर्श गाव पुरस्कृत खेडी खरोखरीच अभियानकाळात होती तशीच राहिली आहेत का? ‘जलस्वराज्य’, ‘आमच्या गावात आम्ही सरकार’, ‘गटशेती’ यांसारख्या अभिनव योजना आमच्याकडे मराठवाड्यात फक्त कागदावर राहिल्या गावं टँकरमुक्त झाली नाहीत. ‘माती अडवा पाणी जिरवा’ असं पुढचं पाऊल टाकत धावडशी, लोधवडे, निढळ यांसारख्या गावात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी इंडो-जर्मन प्रकल्प राबवले गेले.
 

कर्‍हाडचे माजी खासदार अन् माजी आय.ए.एस. आधिकारी श्रीनिवास पाटील यांची मोहिमेअंतर्गत भेट झाली. कृषी क्षेत्रातल्या पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत सांगताना ते सहज बोलून गेले, की ‘माझा शेतकरी शेतात राबतो, काळ्या आईच्या कुशीत पंढरी पाहतो अन् कमरेवर हात सदैव ठेवून उभ्या विठोबाला पुजण्यापेक्षा काळ्या आईला भजणं जास्त पसंत करतो… तोच त्याचा विठोबा…’
 

मला वाटतं, हा ‘विठोबा’ आज ज्याला-त्याला प्रत्येकाला स्वत:च्या कर्तव्यात अन् कर्तृत्त्वात सापडायला हवा… मूठभर मावळ्यांना घेऊन शिवरायांनी स्वराज्य घडवलं तसं आज तुम्ही-आम्ही या लोकचळवळीतले मावळे बनून ‘ग्रामस्वराज्य’ घडवायला हवंय…..

हे सारं साक्षात ‘याचि देहिं याचि डोळा’ बघून माझ्या जाणिवा समृध्द झाल्या. चार भिंतींपलीकडच्या या शाळेत पुस्तकांऐवजी माणसं वाचायला मिळाली. मराठवाड्याच्या मागासलेपणाचं खापर पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीवर फोडणार्‍या, उठताबसता अनुशेषाच्या नावावर गोंधळ घालणार्‍या ‘कल्चर’मध्ये मी वाढले, पण गावं फिरताना, माणसांना भेटता-बोलताना क्षणाक्षणाला जाणवत गेलं, की हे सारं एका रात्रीत उभं राहिलेलं नाही. या सार्‍याची किंमत यांनी मोजलीय अन् अक्षरश: शून्यातून विश्व उभं केलंय. परतीच्या प्रवासात सार्‍याच गैरसमजांचं अन् पूर्वग्रहांचं मळभ दूर झालं होतं. जिथं गेलो तिथं पाठराखण करणार्‍या भक्कम सह्याद्रीचं पहाडीपण, निळ्या आभाळाचं असीमपण, हिरव्या निसर्गाची निरामयता अन् जित्याजागत्या सामान्य माणसांची जिगर…अशी ‘पाठवणी’ घेऊन परतीचा प्रवास करताना मला आठवत होती ती दुष्यंतकुमारांची गझल…

‘‘हो गई है पीर परबतसी पिघलनी चाहीए
इस हिमालयसे कोई गंगा निकलनी चाहिए’’
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक्सद नही
मेरी कोशिश है के ये सूरत बदलनी चाहीए…

– शर्मिष्ठा शशांक मिना भोसले

भ्रमणध्वनी – ९८२२२३२९५२

About Post Author