‘जोक’पाल विधेयक

0
25

अण्णा हजारे यांच्या चळवळीतील एक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी लोकपाल विधेयकाच्या सरकार पक्षाने केलेल्या मसुद्याची ‘जोक’पाल विधेयक अशी संभावना केली आहे. सरकार पक्ष आणि हजारे पक्ष यांच्यामध्ये सोळा बैठका झाल्यानंतरची ही टिप्पणी आहे. यावरून लोकशाही प्रक्रियेचाच उपहास चालला आहे असे नाही वाटत?

दुसर्‍या बाजूला, गोपीनाथ मुंडे यांची भाजप पक्षातील केविलवाणी अवस्था! ती सगळ्या जगासमोर उघड करून दाखवल्यावर त्यांना पक्षात सन्मानाचे स्थान मिळणार आहे. हे घरातले भांडण. मिडियाने ते दारात मांडून हास्यास्पद बनवले आणि आता, मुंडे देशामध्ये प्रमुख स्थाने भूषवण्यास मोकळे!
 

अण्णा हजारे मंडळींचे म्हणणे काय आहे ते तरी ठाऊक आहे. त्या संबंधात मतभिन्नता असू शकते. पण त्यातील व्यवहार्यतेचा मुद्दा दोन्ही पक्षांनी प्रथम मोकळा केला पाहिजे आणि तेथेच खरे घोडे अडले असावे. सध्या देशातील कारभार यंत्रणा पूर्णत: खिळखिळी झाली आहे आणि वातावरण अराजकसमान आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिलेला नाही. अशा वेळी, (सुदैवानेच!) देशाची आर्थिक परिस्थिती बरी आहे आणि बरीच उपलब्धता (विपुलताच!) आहे. त्यामुळे सुजाण वर्गात असंतोष नाही. तो मिडियातून चाललेला लोकशाहीचा हा खेळ मनोरंजन पध्दतीने पाहत आहे. गरीब बिचार्‍या (मानवी हक्क संरक्षणाच्या युगात तसे (दुर्दैवाने) म्हणावे लागत आहे) वंचित वर्गाला सुखाची जाणीवच नाही, मग ईर्षा कोठून तयार होणार?
 

मुंडे यांना काय हवे आहे? आणि त्यांचे पक्षातील विरोधक काय इच्छितात? त्याबाबत वर्तमानपत्रांत तर्कवितर्क येतात तेवढेच. त्यामुळे ते लोकशाही नाट्य नव्हे, मानापमान नाट्य आहे, एवढाच अंदाज करता येतो. मुंडे यांचा अपमान झाला तर जनतेचा काय संबंध?

देशात उपलब्ध कायदेकानून आहेत. त्यांचा नीटपणे अंमल झाला तरी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सुखी ठेवता येईल अशी देशाची परिस्थिती आहे. अक्षरश:, अन्न-वस्त्र-निवारा या गरजांची सहा महिन्यांत देशातील दूरच्या कोपर्‍यापर्यंत पूर्तता करता येईल अशी सोय आहे. पण कारभारयंत्रणा प्रभावी नाही. त्या प्रश्नावर बुद्धिवंतांनी, विचारवंतांनी मांडणी केली पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी तोडगा राबवून पाहिला पाहिजे. पाणी -पर्यावरण–शिक्षण-संस्कृती हे मुद्दे घेऊन विचारमंथन व कृती व्हायला हवे.
 

लोकशाहीत मतभिन्नता असणार… ती दैनंदिन प्रश्नांबाबतही व्यक्त होणार… त्यातून ‘चर्चेचे गुर्‍हाळ’ सुरू होणार … त्याचा शेवट कधी न होणार…. लोकशाही व्यवस्थेतील हे नवे कर्मकांडदेखील धर्मातील जुन्या कर्मकांडाइतकेच जाचक होऊ लागले आहे. त्यातून उदभवणार्‍या निष्क्रियतेमुळे माणसांची मने मुर्दाड, संवेदनाशून्य बनत चालली आहेत. मिडियाच्या ‘करमणूक तंत्रा’च्या या गंभीर परिणामांची वेळीच दखल घेतली पाहिजे. मिडियाची गरजच गावगप्पांची आहे; पण गावातल्या (शिळोप्याच्या) गप्पा या फावल्या, विश्रांतीच्या वेळी असत. मिडियाचा तो चोवीस तासांचा उद्योग आहे!

दिनकर गांगल
thinkm2010@gmil.com

About Post Author

Previous articleविरोधाभास!
Next articleउपवासाचे राजकारण
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.