पुण्याजवळचं जेजुरी हे महाराष्ट्रातलं महत्त्वाचं दैवत आहे. जेजुरीच्या खंडोबाला मनोकामना पूर्ण होण्यासाठी, विशेषतः पुत्रप्राप्तीसाठी नवस करतात. तो नवसाला पावतो अशी अनेकांची मान्यता आहे. दैत्यांचा पराभव करण्यासाठी शंकराने मल्हारी मार्तंड हा अवतार घेतला.
या पाय-यांवर वाद्य वाजवून देवाची आळवणीही केली जाते.चित्रात लहान मुलगी तुणतुणं वाजवते आहे.आणि टोपी घातलेला माणूस संबळ वाजवत आहे. मी लहान असताना माझ्या आतेभावाच्या लग्नानिमित्त्य घातलेल्या गोंधळात तुणतुणे आणि संबळ ऐकली होती. तेव्हा या वाद्यानं वेड लावलं होतं.आजही ती कोणी
वाजवत असलं तर तिथ थांबल्याशिवाय चैन पडत नाही. मी नंतर तबला वाजवायला शिकलो. तबला ऎकतोही खूप! संबळ वाजवायला शिकायची इच्छा आहे पण तिचे क्लास नसतात. सनईबरोबर वाजवला जाणारा चौघडा तिच्यापेक्षा मोठा असतो.तो बसून वाजवावा लागतो. संबळ गळयात अडकवून वाजवता येते.
गळयात घालून वाजवण्याची वाद्ये अनेक राज्यांत आढळतात. केरळातील कालीकतला पाहिलेले हे ‘चेंडा‘ नावाचे वाद्य वाजवणारे वादक. वाद्य खोल आणि मोठे असल्याने ताशापेक्षा गंभीर वाजते.
कोणी तीच ती गोष्ट सांगत असला तर ‘काय तुणतुणं लावलंयस’ म्हणून हेटाळणी केली जाते. पण तुणतुण्याची तार खुंटीनं पिळून एका बोटाने गाणा-याच्या सुरात वाजवायला लागलं की याचा अवर्णनीय संतत नाद ऐकत राहावासा वाटतो. अवर्णनीय! प्रकृतीनं लहान वाटणारं हे गुणी वाद्य आहे.एकच तार असल्यानं इतर तंतुवाद्यांप्रमाणे यातून वेगवेगळे आवाज काढता येत नाहीत. ती त्याची मर्यादा आहे.
दीपमाळ आणि हळद म्हणजे भंडारा. त्याची उधळण हे जेजुरीचे वैशिष्टय. तसं दुसरीकडे पाहायला मिळत नाही. काळा दगड आणि हळद यांच्या संगतीत झेंडूची फुले आणि दैत्याची लाल मूर्ती डोळयांत भरतात. चिरेबंदी कमानीतून दिसणारे मंदिराचे रूप.
जेजुरीचे दुसरे महत्त्व असे, की तेथे शिवाजी व शहाजी यांची भेट झाली होती. तेव्हा त्यांनी मोगलांच पारिपत्य कस करावे याबाबत खल केला होता. मुसलमानही या दैवताला मानतात. मंदिराच्या मुख्य घुमटाच्या चार बाजूंना असलेल्या लहान घुमटींमध्ये विजापूर शैलीची छाप दिसते.खंडोबा हा देव, विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील लोकांना जवळचा वाटतो. दर्शनासाठी जाऊ पाहाणा–या भक्तांच्या लांबलचक रांगेची झलक.
जेजुरीला जाऊन आल्यावर .फक्त हळद .भव्य दगडी दीपमाळा. वाटेवर बसलेले लोक आणि डोंगरावरून दिसणारा परिसर इतक्याच गोष्टी लक्षात राहातात. खंडोबा आठवत नाही. याचं कारण त्याच्या दर्शनासाठी लावलेली लांबलचक रांग. त्यानंतर झालेलं ओझरतं दर्शन. ते झाले, की जो तो पायऱ्या उतरून परततो. देवाचं तसंच असतं .गर्दीत देव नसतो.मग तुम्ही तिरूपतीला जा नाहीतर पंढरपूरला जा.
‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ आपल्यासाठी नसतं.ते सुंदर ध्यान पाहायला सवड मिळत नाही. देव म्हणजे गौडबंगाल आहे देव आहे हे सांगणारे त्याला दाखवू शकत नाहीत. नाही म्हणणारे पटवून देऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही आम्ही देव आहे की नाही या फंदात न पडलेलं बरं. मग आपल्या हाती काय उरतं? तो आहे असं मानणारे त्याला अशा स्वरूपात उभा करतात की वाटतं कल्पनांमधे का होईना देव आहे. रम्य आविष्कारात तो इथे तिथे भेटतो.मग तो खंडोबा असो की वेरूळचा कैलास.
– प्रकाश पेठे pprakashpethe@gmail.com
Last Updated On 04 April 2019
लेख आवडला.गर्दीत देव भेटत…
लेख आवडला.गर्दीत देव भेटत नाही,निरीक्षण शंभर टक्के खरे आहे,मी पण अनुभवले आहे.
Comments are closed.