जुन्या पुस्तकांची अद्भुत दुनिया (Lost World in Old Books)

2
47

संपादकलेखक अरुण टिकेकर मनाने, विचाराने एकोणिसाव्या शतकात राहत. पत्रकारलेखक अशोक जैन त्याला म्हणे, की अमिताभ बच्चन, दत्ता सामंत यांच्यासारखे ‘फिनॉमिनन’ एकोणिसाव्या शतकात झाले असते तरच तू त्यांच्याकडे लक्ष दिले असतेस! आमचा तेवढाच जुना मित्र रामचंद्र ऊर्फ मुकुंद वझे याची अवस्था निवृत्तीनंतर टिकेकर याच्यासारखीच झाली आहे. तो पुस्तक जुने असल्याखेरीज विचारातच घेत नाही. त्याने बँक ऑफ इंडियात नोकरी निष्ठेने केली. त्याने त्या काळात फुटकळ लेखन वर्तमानपत्रांत केले – दोन कादंबऱ्या लिहिल्या, पण त्याला निवृत्तीनंतर जुनी पुस्तके वेगवेगळ्या वेबसाईटवर धुंडण्याचे ‘खूळ’ लागले आणि तो त्यात दिवसरात्र रमू लागला. त्याला भाषांतर करण्याचेही वेड लागले. त्याने जुन्या पुस्तकांची ओळख करून देणारा ‘कॉलम’ वर्षभर ‘लोकसत्ते’त लिहिला. त्याला केव्हाही फोन केला, की जुन्या पुस्तकांची अद्भुत दुनिया खुली होते.

        सध्या सारे जग कोरोनामग्न असताना, त्याला पुस्तकांचा खजिना रोज नवनवीन सापडतो. विवेकानंदांचे गुरुबंधू अभेदानंद हे काश्मीरला गेले होते व त्यांनी तेथील प्रवासाच्या नोंदी वर्तमानपत्रांत लिहिल्या. त्यातून काश्मीरचे गेल्या शतकारंभीचे वेगळेच दर्शन घडते आणि अनेक शंका मनात निर्माण होतात. वझे यांनी त्या एका टिपणात मांडल्या व मजकडे पाठवल्या. ते टिपण पुढे प्रसिद्ध केले आहे.

          वझे यास या पुस्तकाचा पत्ता कसा लागला ती मौजेची गोष्ट आहे. तो ‘अननोन लाइफ ऑफ जीझस ख्रिस्त’ हे पुस्तक वाचत होता. त्या पुस्तकात ख्रिस्त भारतात आल्याचे, लडाख-काश्मीरमध्ये गेल्याचे, तेथील हिमिस नावाच्या मठात राहिल्याचे उल्लेख आहेत. ते वाचून अभेदानंद यांचे कुतूहल जागे झाले. ते काश्मिरात गेले व त्यांनी तेथून वार्तापत्रे लिहिली. त्याचे पुस्तक बनले. ते पुस्तक दुर्मीळ असल्याने त्या दीडशे रुपये मूळ किमतीच्या पुस्तकाची विक्रीकिंमत ॲमेझॉनवर नऊशेनव्वद रुपये लागली. वझे यांनी ते पुस्तक मागवले.

 

          वझे याला याच काळात वेड लागले ते भाषांतराचे. तो त्याला पुस्तक जरा वेगळे वाटले, की भाषांतर करून टाकतो. त्याची तशी पुस्तके ‘साधना’, ‘राजहंस’ वगैरेने प्रसिद्ध केली, परंतु त्याचा झपाटा कोणा प्रकाशकाला झेपणारा नाही. तेव्हा त्याला कोल्हापूरचे कृष्णा पब्लिकेशन म्हणून कोणी भेटले. त्यांचा झपाटा वझेच्या पुढील वाटतो. त्यांनी वझे याचे राजमोहनची बायको (मूळ लेखक-बंकिमचंद्र) प्रसिद्ध केले. दुसऱ्या दोन – ‘साके दीन महोमेत‘ आणि ‘अननोन लाईफ ऑफ जिझस क्राईस्ट’ या पुस्तकांचा अनुवाद प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. साकेचे पुस्तक हे त्याचे छोटेखानी चरित्र आणि हिंदुस्थानी माणसाने (साके दीन  महोमेत) इंग्रजीत लिहिलेले पहिले प्रवासवर्णन आहे. त्याचा तो अनुवाद आहे. कृष्णा पब्लिकेशनचा उत्साह वझे याच्यापेक्षा अधिक असावा. त्यांचे संपादकीय प्रतिनिधी चेतन कोळी यांनी वझे याच्याकडेच भाषांतरासाठी आणखी एक इंग्रजी पुस्तक पाठवले आहे! वझे यानी पाठवलेले टिपण –
             अभेदानंदांची काश्मीर निरीक्षणे  
          स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू स्वामी अभेदानंद यांना विवेकानंदांनी अमेरिकेतील कार्यात मदत करण्यासाठी 1896 मध्ये बोलावून घेतले. अभेदानंद सुमारे 25 वर्षे अमेरिका आणि युरोपात काम करून हिंदुस्तानात परतले. ते 1922साली अमरनाथ, काश्मीर व तिबेटमध्ये गेले. त्या प्रवासाच्या त्यांनी तपशीलवार नोंदी ठेवल्या होत्या. तेथून परतल्यावर त्यांचे प्रवासवर्णन बंगाली भाषेत एका नियतकालिकातून क्रमवार प्रसिद्ध झाले. अनुस्पती दासगुप्ता आणि कुंजविहारी कुंडू यांनी ते इंग्रजीत आणले. ते पुस्तक 1987 साली प्रकाशित झाले. त्या पुस्तकात वाचकाला विचार करायला लावतील अशा काही गोष्टी वाचायला मिळाल्या.
          पृष्ठ 21 वर स्वामीजी सांगतात – शहराच्या दक्षिणेला शुपियन भागात मोठी रेशमाची फॅक्टरी आहे, ती राजपुत्र हरी सिंग यांची आहे. ती हिंदुस्तानातील सर्वात मोठी फॅक्टरी आहे. काश्मीरमधील कोणालाही रेशमाचा व्यापार करण्याची परवानगी नाही, राजपुत्राकडे संपूर्ण मक्तेदारी आहे. सुमारे चार हजार स्त्री-पुरुष त्या फॅक्टरीत काम करतात. त्यांची रोजची मजुरी चार आणे ते आठ आणे एवढी असते. सुमारे दीड लक्ष – स्त्री, पुरुष आणि मुले या व्यवसायात गुंतली आहेत.
          पृष्ठ 37 वरही अशीच माहिती मिळते – “(अमरनाथ) गुंफेमध्ये काही मुस्लिम खडूची पावडर विकताना दिसले. त्यांच्या म्हणण्यानुसार ती शंकराची रक्षा होती. मुस्लिमांनाही या गुंफेत येण्याचा अधिकार आहे, कारण सुमारे शंभर वर्षांपूर्वी एका मुस्लिम धनगराने या जागेचा शोध प्रथम लावला आणि हिंदूंना ती माहिती दिली.
          स्वामी पृष्ठ 43 वर सांगतात – सर्व जातींची माणसे हिंदुस्तानच्या सर्व प्रांतांत राहतात. काश्मीर हा अपवाद आहे. तेथे फक्त ब्राह्मण (काश्मिरी पंडित) आणि मुस्लिम राहतात. ब्राम्हण लोक मुस्लिमांना नोकरीस ठेवतात. शूद्र (भंगीकाम करणारे) अपवादात्मक. मुस्लिमांनी आणलेले पाणी ब्राह्मण दैनंदिन धर्मकृत्यांसाठी, स्वयंपाकासाठी आणि पिण्यासाठी वापरतात; पण त्यामुळे त्यांची जात बुडत नाही.

          काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लिमांत तेढ दिसते असे म्हणतात, त्याचे मूळ नक्की कशात? हरिसिंग यांच्या मक्तेदारीत? मुस्लिमांची संस्कृती वेगळी म्हणायची तर अमरनाथ गुंफेत मुस्लिम कसे? ब्राह्मणांना कनिष्ठ जातींच्या माणसांचा विटाळ होत होता मग काश्मिरात ते का गुण्यागोविंदाने राहत होते? प्रश्न आणि प्रश्न ! उत्सुकता जागृत झाली असेल तर पुस्तक जरूर वाचा.

रामचंद्र ऊर्फ मुकुंद वझे 98209 46547vazemukund@yahoo.com
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)

——————————————————————————————————————

मुकुंद वझे यांची प्रकाशित पुस्तके
१. शेष काही राहिले
२ क्लोज्ड सर्किट
३. शब्दसुरांच्या पलीकडले
४. टिळक ते गांधी मार्गे खाडिलकर  
५. प्रवासवर्णनांचा प्रवास
६. अशी पुस्तके होती
अनुवादित पुस्तके
१. ज्याच्या हाती फासाची दोरी (राजहंस प्रकाशन)
२. गुलामगिरीतून गौरवाकडे  (साधना प्रकाशन)
३. राजमोहनची बायको (कृष्णा पब्लिकेशन)

——————————————————————————————————————-

मुकुंद वझे यांची पुस्तके 

 

 

 

 

 

About Post Author

Previous articleराजुल वासा यांची विद्या (Vasa concept for CP Children)
Next articleवुहान खुले झाल्याचा आनंद (Shanghai resident tells Wuhan Experience)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

2 COMMENTS

  1. श्री.वझे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.त्यांच्या चिकाटीची दाद द्यावी तेवढी थोडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here