जाती जातींतील ब्राह्मण शोधा!

5
32
_Chala_Brahananno_EkVha_Kashasathi_1.jpg

ब्राह्मणांचा संबंध ज्ञानाशी परंपरेने जोडला जातो. नवा जमानाच ज्ञानाचा आहे! त्यामुळे त्यामध्ये ब्राह्मणांचे स्थान अनन्य असायला हवे. ते तसे आहे का? या प्रश्नाचे उत्तर ज्या त्या ब्राह्मणाने शोधायचे आहे, पण सार्वजनिक रूपात तरी ब्राह्मणांचे स्थान जगात, भारतात, महाराष्ट्रात अग्रभागी असल्यासारखे दिसत नाही. कर्तबगार ब्राह्मण मंडळी अनेक आहेत, पण समूह वा जातजमात म्हणून ना त्यांना समाजात स्थान आहे, ना त्यांचा समाजावर प्रभाव जाणवतो. जो प्रभाव आहे तो त्यांना इतिहासक्रमाचा झालेला लाभ आहे.

ब्राह्मणांची उत्पत्ती ज्यू, पारशी, आर्य अशा सर्वांशी सोयीने जोडली जाते. ऋषी व गोत्रे यांच्या कथा व्हॉट्सअॅपवर सर्व ब्राह्मण मंडळींत प्रसृत होत असतात. ब्राह्मणांनी त्यांचा देव व निर्माता म्हणून पुराणकथेतील परशुराम सध्या मानला आहे. अक्षयतृतीयेच्या आदल्या दिवशी गावोगावची ब्राह्मण मंडळी परशुराम जयंती साजरी करतात, मिरवणुका काढतात. परशुरामाचे चित्र कुलवृत्तांतांच्या ताज्या आवृत्त्यांमध्ये अग्रभागी असते. ब्राह्मण लोक त्यांच्या ताब्यात परशुरामाला अशा तऱ्हेने घेत असताना, तो देव सर्व जातीजमातींचा कसा आहे ते चिपळूणजवळच्या टेकडीवरील परशुरामाच्या मंदिरात ठळकपणे नमूद केले गेले आहे! अशा गोष्टी कालानुरूप घडत असतात; एकेका देवाचे एकेका काळात चलन असते. सत्य एवढे जाणवले आहे, की भारतातील प्रत्येक खेड्यात एके काळी एक मारवाडी व एक ब्राह्मण कुटुंब असेच असे. मारवाडी गावकऱ्याच्या जगण्यासाठी तरतुदी करून देणारा आणि ब्राह्मण त्या जगण्याचा अर्थ लावून देणारा. त्या काळी जीवनार्थ धार्मिक परंपरांत, कर्मकांडात, अध्यात्मादि स्वरूपाच्या ज्ञानात मांडला जाई.

धर्माने माणसाच्या जगण्याला अर्थ दोन हजारांहून अधिक वर्षें पुरवला. भारतात धर्माचे प्रवक्ते ब्राह्मण होते. धर्म कोणते? – वैदिक, सनातन, हिंदू अशा शब्दच्छलात जाऊया नको, पण त्या परंपरेतून भारतात जे ज्ञान निर्माण झाले ते काही क्षेत्रांपुरते तरी, विशेषत: खगोल, कृषी, आरोग्य वगैरे अपूर्व होते. ज्ञान निर्माण करणारे ब्राह्मणच होते असे नव्हे (वराहमिहीर हा शक वंशाचा होता असे एक निरीक्षण आहे.) – परंतु ब्राह्मणांकडून ज्ञानाचे जतन भाषेच्या माध्यमातून झाले.

_Chala_Brahananno_EkVha_Kashasathi_3_0.jpgअनुभवाचे आकलन म्हणजे ज्ञान अशी सोपी व्याख्या ध्यानी घेतली तर इतिहासक्रमात जीवनानुभवाची समजूत बदलत गेली व त्याप्रमाणे माणूस संचितात भर टाकू लागला आणि तितकाच तो प्रगल्भही होत गेला. जगभर वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये ते घडत होते. भारतात ते काम तेथील व्यवस्थेने ब्राह्मणांकडे सोपवले असल्याने ती जबाबदारी ब्राह्मणांनी निभावली. ते काम ढोबळपणे, इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकात, म्हणजे एक हजार सालापर्यंत निर्वेध चालत आले असावे, कारण तो भारतातील सुवर्णयुगाचा काळ समजला जातो. गोची दुसर्याल सहस्रकात झाली. ब्राह्मणांना पैशांचा व सत्तेचा मोह सुटला, बहुधा. त्यातून सामाजिक विकृती तयार झाल्या, अंधारयुग पसरले. भारतातील विद्वत् परंपरा बाराव्या शतकानंतर लोपली. त्यामधून सावरण्यासाठी संत परंपरा निर्माण झाली, पण त्यामधून भक्तीचे, जीवनापासून पळण्याचे वेगळेच तत्त्वज्ञान रूढ होत गेले! समर्थ रामदास हा एकच त्यांतील व्यवहारपुरुष. त्यांनी खणखणीतपणे ‘जय जय रघुवीर समर्थ’ म्हणत असताना माणसाला जीवन जगण्याचे, त्यासाठी लढण्याचे बळ दिले. त्यांच्या कथा बलोपासनेच्या आहेत. तो गृहस्थ लंगोटी लावून फिरला, पण त्याने अंधारयुग पालटण्याचा मंत्र दिला.

पेशव्यांच्या शे-सव्वाशे वर्षांतील काही वर्षें अफाट पराक्रमाची आहेत. दिवेआगर-श्रीवर्धनचे भट पुण्यास येतात व दोन पिढ्या सर्वत्र दरारा निर्माण करतात, हे घडले कसे? भटभिक्षुकांनी तलवारी तडफेने परजल्या कशा? त्याचा शोध ‘ग्रंथाली-ज्ञानयज्ञा’तील स्थानिक इतिहासाच्या पुस्तकात (लेखिका : निर्मला गोखले) घेतला गेला आहे. तो एक तर्क झाला, पण त्याचा खोलवर अभ्यास व्हायला हवा. जयराज साळगावकर यांनी पहिला बाजीराव हा नेपोलियनशिवायचा जगातील एकमेव अजिंक्यवीर असे दाखवून दिले आहे. पहिला बाजीराव एकही लढाई हरला नाही!

ब्राह्मणांचे कार्य एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन काळात फार मोठे आहे. ते विसाव्या शतकातील पूर्वार्धातदेखील दिसून येते. राजकारणात टिळकांची तोफ धडधडली. त्यास राजवाडे-केतकर यांच्या अभ्यास संशोधनाची आणि कर्वे-केतकर (अनाथ विद्यार्थीगृह) यांच्या समाजकार्याची जोड मिळाली. मी ही अग्रणी नावे नमुन्यादाखल नोंदली. परंतु त्यावेळी जिल्ह्या जिल्ह्यात असे अपूर्व काम ब्राह्मणांकडून घडत असावे. तसे ते अन्य समाजांकडून धातुशाळा, यंत्रशाळा अशा स्वरूपात झालेले दिसते. त्याची तपशीलवार नोंद होणे गरजेचे आहे. ते प्रत्यक्ष क्षेत्री जाऊन ओढीने व चिकित्सेनेही करण्याचे काम आहे. ते काम विद्यापीठांतील पढतशहाणे करू शकणार नाहीत.

नथुराम गोडसे यांनी म. गांधी यांची हत्या केली आणि ब्राह्मण समाज एकदम अपराधग्रस्त झाला, त्याच्यातील न्यूनगंड बळावला. त्याच सुमारास स्वातंत्र्योत्तर विकासाचे वारे देशात वाहू लागले, वेगवेगळे उद्योग सुरू झाले, व्यावसायिक अभ्यासक्रम आले. ब्राह्मणांनी ती संधी साधली. ब्राह्मण समाजाला शिक्षणाची पार्श्वभूमी होती. त्याने गांधीहत्येनंतर अंतर्मुख होण्याऐवजी कोशात जाणे पत्करले. समाज स्वांत सुखाच्या मागे लागला. ब्राह्मण समाज त्याची व्यवस्थादत्त ज्ञानोपासनेची जबाबदारी विसरला. आमसमाज मूढ होताच, त्यास दिशा सुचवण्याऐवजी ब्राह्मण समाजही मूढत्वात विलीन झाला! त्याचे ब्राह्मण्य आन्हिके आणि कर्मकांड एवढ्यापुरते आणि जगणे नॉस्टॅल्जिया (जुन्या काळच्या आठवणी) पुरते उरले.

महाराष्ट्रात गेल्या पन्नास वर्षांत विशेष नोंदवावे असे काही घडलेले नाही, त्याची प्राथमिक जबाबदारी ब्राह्मण समाजावर टाकायला हवी. माधवराव चितळे यांना नोबेलच्या प्रतिष्ठेचा जलक्षेत्रातील पुरस्कार मिळाला, तसे आणखी काही अपवाद असावेत. पण एकूण, त्या समाजात जी पन्नास-शेकडो-हजारो असाधारण माणसे घडली, ती त्यांच्या व्यक्तिगत गुणविशेषांवर. त्यामध्ये समाजाने अभिमान बाळगावा अशी कोणतीही व्यवस्था व पद्धत दिसून आलेली नाही. चित्पावनांचा पहिला मोठा मेळावा पुण्यात भरला. लाखभर ब्राह्मण जमले. निधी उत्तम जमला असे म्हणतात. त्यातून कोणत्याही प्रकारची ज्ञानात्मक नवी व्यवस्था तयार झालेली नाही. पुण्याजवळ शिक्षण संस्था काढण्याची टूम निघाली होती. जागीच पाच-दहा लाख रुपये जमा झाले, पण शेकडो शिक्षणसंस्था असताना व त्याचाच लाभ घेऊन तरुण ब्राह्मण मुले अमेरिकेस जात असताना आणखी संस्था कशाला म्हणून तो बेत त्या एका बैठकीतच बारगळला. ब्राह्मण पेशवाईच्या रमण्यात दानधर्मावर सुखवस्तू झाले. त्यांनी बाकी समाजाचा वगळाच स्वत:च्या गरीब बांधवांचादेखील विचार केला नाही. तेच ब्राह्मण नव्या जमान्यात नोकर्याळ करून पैसा जवळ बाळगू लागले आणि पूर्वजांनी लावलेल्या आंबे-नारळांच्या बागांवर, कापसाच्या शेतीवर आणि पिढीजात जमिनी विकून धनवान होऊन गेले. त्यांना लाभलेली श्रीमंती त्यांच्या कर्तृत्वाची नाही, ती भारताच्या स्वातंत्र्योत्तर पंचवार्षिक योजनांच्या विकासक्रमात त्यांच्यापर्यंत सर्वांत प्रथम पोचली आहे.

मंडल आयोगानंतर भारतातील जातीजमातींची अस्मिता जागृत झाली, तशी ती ब्राह्मणांचीदेखील झाली. त्यांच्या संघटना सबळ झाल्या, त्यांचे कुलवृत्तांत सचित्र, देखणे व ऑनलाइनदेखील होऊ लागले, पण तो सारा इतिहासाचा बडेजाव आहे. ब्राह्मण समाजातील वर्तमानातील दृश्य कुटुंबवत्सल आहे; कुटुंबांत रमलेल्या मनुष्यसमुदायाचे आहे. त्यात व्यावसायिक यशाच्या काही कहाण्याही वाचण्यास मिळतात, एवढेच.

_Chala_Brahananno_EkVha_Kashasathi_2.jpgसावरकर सर्वसामान्यांचा संसार कीडामुंगीचा असे म्हणतात, ते स्वातंत्र्यलढ्याच्या उदात्त ध्येयाच्या संदर्भात. तशी छोटीमोठी ध्येये बाळगून असलेल्या व्यक्ती समाजात दिसतातही, त्या व्यक्ती उपजीविकेपेक्षा जीविका-जीवनोद्देश महत्त्वाचा मानतात. पण एक समाज म्हणून ब्राह्मणांकडे जे इतिहासदत्त कर्तव्य आले आहे ते ज्ञानार्जनाचे. डॉ. रविन थत्ते यांच्या ‘प्रपंचाचे ज्ञान ते विज्ञान’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात चैतन्य महाराज देगलूरकर यांनी ज्ञान व विज्ञान या विषयांना स्पर्श केला आणि ज्ञान हे सर्वश्रेष्ठ मूल्य होय असे सांगितले. त्यांना ते ज्ञान आध्यात्मिक स्वरूपाचे अभिप्रेत असावे. तसाच समज सर्वांचा असतो, पण ज्ञानसंकल्पनेचे पारंपरिक पदर पूर्णत: बदलून गेले आहेत. नव्या संदर्भात, ज्ञान म्हणजे काय व त्याचे विविध पैलू यांचा, भारतीय संदर्भात अभ्यास करण्याची व तो मांडला जाण्याची गरज आहे. त्याचा तत्त्वज्ञानात्मक शब्दच्छल करून उपयोगी नाही, तर मांडणी वैज्ञानिक पद्धतीने, तर्कशुद्ध रीत्या आणि बुद्धीला सहज उमगेल अशी असायला हवी. आध्यात्मिक व भौतिक ज्ञान यांचा वेगवेगळेपणा स्पष्ट स्वरूपात मांडला गेला पाहिजे. धर्म वेगळा, अध्यात्म वेगळे, भक्ती वेगळी, कर्मकांड वेगळे, आन्हीके वेगळी… त्या सर्वांचा मिळून धर्म व अध्यात्म असे काही गाठोडे लोकांच्या मनात असते. त्याचा मनुष्यावर होणारा संस्कार व त्यामधून घडत जाणारे त्याचे व्यक्तिमत्त्व याची मांडणी व्हायला हवी. सध्या ते अद्भुत स्वरूपात व क्लिष्ट पारिभाषिक शब्दांत मांडले जाते. ब्राह्मणांच्या विविध संस्थांनी ‘ज्ञान’ संकल्पनेची विज्ञानयुगातील मांडणी करण्याच्या दृष्टीने प्रयास ठेवायला हवा. तो मोठा खटाटोप होईल व दीर्घ काळ चालू राहील. पण केवळ जुन्या संचितावर जगण्यापेक्षा काळानुरूप काही पुढाकार घेतल्याचे श्रेय व समाधान, दोन्ही आजच्या ब्राह्मणांना मिळेल.

कदाचित, त्यामधून ब्राह्मण या संज्ञेची व्याप्ती विस्तारेल. ब्राह्मणत्व केवळ जन्माने न लाभता कर्तृत्वाने मिळू शकते अशी काही व्यवस्था करता येईल आणि नव्या समाजासाठी कालबाह्य वर्णव्यवस्थेच्या पुढील टप्पा सुचवला जाईल. कर्तबगार शेतकरी, धडाडीचे उद्योजक व तत्सम स्थायी असाधारण कामगिरी करणाऱ्या मंडळींना मुंबईच्या ‘ब्राह्मण सेवा मंडळा’ने (मला ती संस्था ठाऊक आहे, संस्थेने वर्षांपूर्वीच शंभरी पार केली, म्हणून त्या संस्थेचे नाव घेतले) व अन्य ब्राह्मण संस्थांनी सन्माननीय सदस्यत्व द्यावे. आम्ही ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’साठी राज्यातील कर्तबगार मंडळींची व अन्य माहिती तालुकावार संकलित करत असतो. तेव्हा ध्यानात असे येते, की तालुक्या तालुक्यात उपक्रमशील व संशोधनपर काम करणाऱ्या मंडळींची संख्या वेगवेगळ्या समाजस्तरांत झपाट्याने वाढत आहे. उदाहरणार्थ, नाशिकच्या खडकमाळेगावात ग्रामविकासाचा वसा घेतलेले योगेश रायते, सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यात जमिनीत प्लॅटिनमचा शोध लावणारे आणि त्यातून उद्योगाची उभारणी करणारे सुभाष कदम, दोन हजारांपेक्षा अधिक छोटे शोध लावणारा जव्वाद पटेल, कोल्हाटी समाजाला शिक्षणाच्या वाटेवर घेऊन येणारी साताऱ्याची शैला यादव, शिक्षकांमध्ये चेतना निर्माण करणाऱ्या लातूरच्या तृप्ती अंधारे, गाई-बैलांना ‘नॅशनल ब्युरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसोर्सेस’ या संस्थेमार्फत ओळख प्राप्त करून देण्यासाठी धडपडणारा नागपूरचा सजल कुलकर्णी, ऐतिहासिक नाण्यांचा शोध घेत वयाच्या सतराव्या वर्षी ‘पश्चिम क्षत्रपांची नाणी’ हे पुस्तक लिहिणारा औरंगाबादचा आशुतोष पाटील, चार लाख लोकांना नेत्रदान करण्यास उद्युक्त करणारा अमरावतीचा स्वप्नील गावंडे, उद्योगाची कास धरत सामाजिक बांधिलकी जपणारे पुण्यातील सुभाष चुत्तर, तांड्यावरील मुलांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडणारी उस्मानाबाद येथील रणजिता पवार अशी कितीतरी माणसे! … त्यामुळे तालुक्या तालुक्यामध्ये वेगळे चैतन्य जाणवते. ही मंडळी ‘ओपिनियन मेकर’च म्हणायची. ब्राह्मण संस्थांनी पुढाकार घेऊन अशा व्यक्तींना सदस्यत्व दिले तर समाजात एक नवी प्रथा सुरू होईल. पुन्हा, क्रांतिकारक समाज सुधारणेचा पुढाकार ब्राह्मणांकडून घेतला जाईल! ‘ब्राह्मणांनो, एक व्हा’ अशी नुसती हाक देण्यापेक्षा अमुक कारणासाठी एकत्र या हे सुचवणे अन्वर्थक ठरेल.

– दिनकर गांगल
dinkargangal39@gmail.com

About Post Author

Previous articleगणितप्रेमींचे नेटवर्क
Next articleज्ञानभाषा मराठीकडे
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

5 COMMENTS

  1. हा विचार अगदी नविन आहे…
    हा विचार अगदी नविन आहे.ब्राह्मणत्वाचा असा नव्याने विचार करणे गरजेचे आहे.जातींची बंधनं शिथील होण्याला हातभार लागेल

  2. कर्माने ब्राह्मण zalelyancha…
    कर्माने ब्राह्मण zalelyancha समावेश ब्राह्मण संस्थामध्ये करावा हा विचार क्रांतिकारी आहे

  3. क्षमस्व,पहिल्या दोन…
    क्षमस्व,पहिल्या दोन छायाचित्रांच्या खालील मजकुरात ब्राह्मण शब्दात म्ह पडला आहे.म्हशीचा.लेखावरील मत म्हणून या नोंदीकडे पाहू नये.विचार नवा नाही.वाढत्या धृवीकरणाने त्याची गरज वाढली.ती लेखात अधोरेखित होते.गांगल यांची प्रगल्भता हरळीसारखी पसरेल का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here