जाणता राजा – हिंदीमध्ये, दिल्लीत!

_Raja_Chatrapati_1.jpg

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ‘जाणता राजा’ या महानाट्याचे हिंदीतून पहिल्यांदाच सादरीकरण झाले, तेही थेट लाल किल्ल्यावर ! नाटकाचे प्रयोग एप्रिल महिन्यात 6 ते 10 या तारखांना (2018) पार पडले. महाराजांची कीर्ती त्या प्रयोगांमुळे महाराष्ट्राबाहेरील जनसामान्यांपर्यंत पोचली!

रवींद्रनाथ टागोर यांनी ‘प्रतिनिधी’ आणि ‘शिबाजी उत्सव’ अशा त्यांच्या दोन कवितांच्या माध्यमातून शिवस्तुती केली आहे. त्यांनी शिवरायांचे समकालीन भारतातील स्थान उलगडून दाखवले आहे. लाला लजपतराय यांनीही 1896 साली शिवाजी महाराजांचे उर्दू भाषेत लिहिलेले चरित्र लाहोर येथून प्रकाशित केले. त्या लेखनामागील कारण एकच होते. शिवाजी महाराज हे समग्र भारतासाठी प्रेरणाकेंद्र आहेत हे त्या प्रभृतींनी जाणले होते. मात्र उत्तर भारतातील हिंदीभाषिक जनतेला, विशेषतः तरुणाईला शिवाजी महाराजांची स्वराज्यगाथा माहीत असण्याची शक्यता नाही. इतिहासात देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावणाऱ्या महानेत्याचा चरित्रपट ‘राजा शिवछत्रपती’च्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचे काम केले ते बाबासाहेब पुरंदरे यांनी. त्याचेच पुढे ‘जाणता राजा’ या मराठी महानाट्यात रूपांतर झाले.

आशियातील सर्वात मोठे नाटक आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे नाटक असे दोन विक्रम ‘जाणता राजा’  या नाटकाच्या नावावर जमा आहेत. भव्य रंगमंच, थेट पार्श्वसंगीत, जवळपास अडीचशे कलाकार, खऱ्याखुऱ्या हत्ती-घोड्यांचा वापर हे सारे प्रेक्षकांना शिवकालाची प्रत्यक्ष अनुभूती देते. ते नाटक प्रेक्षकांना राष्ट्रधर्म म्हणजे काय आणि नागरिकांचे समाजाप्रती कर्तव्य काय याची जाणीव करून देते. त्या नाटकाचे बाराशे प्रयोग भारतासह अमेरिका, इंग्लंड आणि अन्य देशांत झाले आहेत. ते नाटक म्हणजे हिंदवी स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या महान राजाची कथा आहे. ती नाट्यकृती उत्तम प्रशासन, असामान्य शौर्य, चांगली संपर्कयंत्रणा, भ्रष्टाचाराचा नायनाट, न्याय आणि तत्कालीन अभियांत्रिकी यांची योग्य जाण या गुणांनी युक्त असणाऱ्या शिवाजी महाराजांवर आधारलेली आहे! ‘राजा शिवछत्रपती : ऐतिहासिक गौरवगाथा’ या नावाने हिंदी भाषेत सादर झालेला तो पहिलाच महानाट्यप्रयोग होय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर नाटकाला येऊन गेले. “ऐतिहासिक कालखंडात दिल्लीत घडलेल्या घटना-प्रसंगांची माहिती नाटकाच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न होता.

दत्ताजी शिंदे यांना वीरगती 1760 मध्ये बुराडी घाटावर (सध्या उत्तर दिल्लीतील एक भाग) अफगाण नजीब खान यांच्याशी लढताना प्राप्त झाली. नजीब खानाने दत्ताजींना विचारले, ‘क्यों पाटील, और लडोगे?’ शूर पाटील यांनी त्यावर क्षणार्धात उत्तर दिले, ‘बचेंगे तो और लडेंगे’. लढवय्या मराठ्यांसाठी दत्ताजींचे ते शब्द त्यांच्या मृत्युपश्चातही प्रेरणादायी ठरले आहेत. मराठा आणि मुघल सैन्य एकमेकांना मार्च 1737 मध्ये रकबगंज येथे भिडले. प्रत्येकी चार हजार सैनिक खर्ची पडले. मुघलांनी लाल किल्ला वाचवण्याचे प्रयत्न शर्थीने केले. मात्र, पुढे 1788 मध्ये महादजी शिंदे यांनी दिल्ली ताब्यात घेऊन लाल किल्ल्यावर भगवा फडकावला.” या कार्यक्रमाचे एक संचालक प्रमोद मुजुमदार सांगत होते. लाल किल्ल्यावर दरवर्षी रामलीला सादर करणाऱ्या ‘श्री धार्मिक रामलीला समिती’ने हा नाट्यसोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष कष्ट घेतले. ‘दिल्ली मराठी प्रतिष्ठान’चाही आयोजनात मोलाचा सहभाग आहे. “चांदणी चौकातील माधव पार्क येथे नाटकाच्या जोरदार तालमी पार पडल्या. नाटकाचा आस्वाद अधिकाधिक दिल्लीकरांनी घ्यावा यासाठी वेगवेगळे चमू विविध आघाड्यांवर काम करत होते. प्रयोग मोफत असला तरी त्यासाठी ‘बुक माय शो’च्या माध्यमातून जाहिरात करण्यात आली. मेट्रोगाड्या, मेट्रोस्टेशन्स, बस स्टॅण्ड, रस्ते, विद्यापीठ संकुल, बाजारपेठा येथे फलक लावण्यात आले होते. त्या व्यतिरिक्त व्हाट्स अॅपच्या माध्यमातून व्हिडिओ संदेश पसरवण्यात आले होते. वकील, डॉक्टर, सनदी लेखापाल, प्राध्यापक अशा समाजातील प्रथितयश व्यावसायिकांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.” आयोजन समितीतील संयोजक श्याम जाजू यांनी सांगितले. मुजुमदार पुढे म्हणाले, “हे महानाट्य हिंदीत आणण्याची मूळ कल्पना होती, ती माजी केंद्रीय मंत्री कै. अनिल माधव दवे यांची. परंतु प्रयोग त्यांच्या हयातीत होऊ शकला नाही. त्यांचे निधन मागील वर्षी झाले. ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रा’चे सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी ते स्वप्न साकारण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. नरेंद्र मोदी यांनीही त्या उपक्रमाचे कौतुक केले. बाबासाहेबांनी स्वतः मोदी यांची भेट घेतली होती. महानाट्याचा महाप्रयोग त्या ऐतिहासिक कालखंडाचा अनुभव देणारा आहे. घोडे, हत्ती, उंट, बैलगाड्या, पालख्या हे सगळे रंगमंचावर येऊन इतिहास जिवंतपणे उभा करतात. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्यभिषेकापर्यंतचा काळ महानाट्यात साकारला गेला आहे.

_Raja_Chatrapati_2.jpg‘जाणता राजा’ हे महानाट्य मराठीमध्ये  15 एप्रिल 1985 रोजी प्रथम रंगमंचावर सादर झाले आणि मराठी रसिकांचे लक्ष त्या नाटकाने वेधून घेतले. शिवाजी महाराजांचे आयुष्य आणि कर्तृत्व, त्या कालखंडाच्या साक्षीने या महानाट्यात सादर करण्यात येते. नाटकाचे गेल्या तीन दशकांत बाराशे प्रयोग झाले आहेत. प्रवास आणि सादरीकरण या दरम्यान, भाषेपासून नाटकाचा अविभाज्य घटक असणारा भव्य सेट उभा करेपर्यंत नाटकाच्या चमूला अनंत अडचणींचा सामना करावा लागला आहे. एक गोष्ट नमूद करावीच लागेल, प्रयोगांच्या स्थळी स्थानिक कलाकारांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाटक सादर केले आहे. अनेकांनी केवळ शिवाजी महाराजांवरील प्रेमापोटी या नाटकात काम केले आहे.

बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, की एका जादुई शब्दामुळे या नाटकाचा एवढा यशस्वी प्रवास शक्य झाला, तो शब्द म्हणजे ‘शिवाजी!’ अत्यंत प्रेरणादायी असा तो तीन अक्षरी मंत्र आहे. आम्ही सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे पुरेसा कपडेपट नाही याचीही आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही कलाकारांनाच त्यांचे कपडे आणण्यास सांगितले आणि त्यांनीही ते ऐकले. त्यांचा शिवाजी महाराजांप्रती असणारा जिव्हाळाच त्यात दिसून येत होता. तोच जिव्हाळा त्या नात्याला उंचीवर घेऊन गेला. कलाकारांमध्ये कोणतेही मोठे नाव नाही. प्रयोगात ठिकठिकाणच्या स्थानिक कलाकारांचा सहभाग असतो. तरीही नाटकाचे यशस्वी प्रयोग वर्षानुवर्षें होतच राहिले.

जिवंत घटक मंचावर आणण्याची व नाटक नेत्रदीपक करण्याची कल्पना कशी सुचली ते सांगताना पुरंदरे म्हणाले, की “आम्हीशिवराज्यभिषेकाच्या तीनशेव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘शिवसृष्टी’ या प्रदर्शनाचे आयोजन 1974 साली केले होते. शिवकाळातील निवासस्थाने, इमारती व किल्ले यांच्या प्रतिकृती आणि शस्त्रास्त्रे प्रदर्शनात मांडण्यात आली होती. यामधून शिवराज्याभिषेकाचा गौरवशाली प्रसंग उभे करणारे कायमस्वरूपी प्रदर्शन का सुरू करू नये असा विचार मनात आला. त्या कल्पनेचे मूर्तरूप म्हणजे ‘जाणता राजा’ हे नाटक! त्या बावीस मिनिटांच्या शोचे रूपांतर तीन तासांच्या नाटकात झाले. मी संहिता तयार केली. माझी नाटकाच्या रंगमंचीय अवतरणाची कल्पना ‘शिवराय प्रतिष्ठान’ या संस्थेच्या सदस्यांना सांगितली. त्यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र तीन तासांत साकारणे आर्थिक दृष्ट्या व मनुष्यबळाचा विचार करता अशक्य असल्याचे सांगितले. पण मी हट्ट सोडला नाही. तेव्हा मी बरोबर होतो हे आज पटते.

_Raja_Chatrapati_3.jpgछत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील कर्तृत्ववान असे प्रेरणास्रोत आहेत. अत्याधुनिक, अद्ययावत स्रोतांच्या व नव्या मार्गांच्या प्रगतीशील वाटेने इतिहासात चांगले बदल नक्की होतात. शिवाजी महाराजांनी तोच दृष्टिकोन स्वराज्याची स्थापना करताना ठेवला होता. त्यांचे आयुष्य आव्हानात्मक परिस्थितीत प्रेरणा देते, दिशा देते. सावध राजकारण, शौर्य, नव्या कल्पना, उद्यमशीलता, पुढारलेपण,उदात्तता, दक्षता, समर्पित वृत्ती, प्रेम, विषयांची जाण व त्याविषयीची दक्षता या गुणांचे मूर्तरूप म्हणजे शिवाजी महाराज! त्यांच्या आयुष्याचा अभ्यास रोमहर्षक तर आहेच, परंतु ज्ञान देणारा व प्रेरणादायीदेखील आहे.”

‘जाणता राजा’ हे नाटक इतिहासापासून प्रेरणा घेऊन तयार केले असले तरी तो प्रत्यक्ष इतिहास नाही असे स्पष्ट करून पुरंदरे म्हणाले, की “लोक शिवाजी या विषयावरचा शोधनिबंध वाचतील तर ऐकतील, पण ते त्यामुळे प्रभावित होतील याची खात्री देता येत नाही. शिवाजी महाराजांचे आयुष्य हे उज्ज्वल भविष्यासाठी आणि उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रत्येक पिढीला प्रेरणा देत आले आहे. ‘जाणता राजा’ नाटक शिवाजी महाराजांना एका नायकाच्या, प्रशासनकर्त्याच्या, राजाच्या आणि दूरदृष्टी असलेल्या राज्यकर्त्याच्या रुपात उभे करते. त्यांचे आत्मसात करण्यासारखे अनेक गुण नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिसून येतात. त्यात कोठेही खोटेपणा नाही. जे आहे ते सत्य आहे. त्यांची प्रेरणादायी कथा प्रत्येक घराशी, प्रत्येक मातेशी, प्रत्येक पुत्राशी आणि देशातील प्रत्येक बालकाशी जोडलेली आहे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.”

मराठी अनुवाद – मृदुला राजवाडे

(‘वार्ताप्रसार’ १५ एप्रिल २०१८ वरून उद्धृत सुधारित व संस्कारित)

About Post Author

1 COMMENT

  1. शिवराय असे शक्तीदाता…..
    शिवराय असे शक्तीदाता…..

Comments are closed.