जाणता राजा अशोक (King Ashoka The Emperor)

[youtube=https://www.youtube.com/watch?v=HhworEKA97o&w=320&h=266]
भारतातील मौर्य साम्राज्यातील काही कर्तबगार राजांपैकी अशोकाची राजवट प्रदीर्घ व अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. पण अशोक इतिहासात खूप काळ दुर्लक्षित राहून विस्मृतीत फेकला गेला होता. आधुनिक इतिहासकारांचेत्याच्याकडे लक्ष गेले. विशेष म्हणजे अशोकाने शिलालेख व स्तंभलेख यांच्याद्वारे जारी केलेल्या असंख्य सविस्तर आज्ञांच्या द्वारे, त्याच्या कारकिर्दीबाबतचा ऐतिहासिक पुराव्यांचा अफाट खजिनाच इतिहासकारांच्या हाती लागला.
          अशोक हा मौर्य घराण्यातील तिसरा राजा. मौर्य राजवटीची सुरूवात चंद्रगुप्त मौर्य याच्या मगधाचे राज्य जिंकण्यापासून सुरू झाली. चंद्रगुप्त राजाने त्याचे साम्राज्य नंद घराण्यातील धनानंद राजाचा पराभव करून, विस्तारून बळकट केले. धनानंदाने आर्य चाणक्याचा अपमान दरबारात केला. तेव्हा, चाणक्याने धनानंदाचा समूळ नाश करीन, तेव्हाच शेंडीला गाठ बांधीनअशी प्रतिज्ञा केली. चाणक्याने चंद्रगुप्ताला शोधून त्याला घडवले आणि धनानंदाचे राज्य जिंकून देऊन त्याला राजा बनवले. त्याने त्याचा पण अशा तऱ्हेने पुरा केला; मात्र या कथनाला ऐतिहासिक पुरावा मिळालेला नाही.
          चंद्रगुप्तअफगाणिस्तानच्या उत्तर सरहद्दीवरील तक्षशीला प्रांतातील छोट्याशा राजघराण्यातील होता. त्याचे बालपण, शिक्षण, सैनिकी प्रशिक्षण त्याच प्रदेशात झाले. त्याचे मगध राज्यात काही घनिष्ट नातेसंबंध होते. सिकंदराने अफगाणिस्तानवर केलेल्या स्वारीत चंद्रगुप्ताच्या वडिलांचे राज्यही गेले. सिकंदर मोहीम अर्धवट टाकून परत गेला. मात्र त्याने त्याचे राज्यपाल जाताना जिंकलेल्या प्रदेशावर नेमले होते. सिकंदर मरण पावला तेव्हा सिकंदराने नेमलेले राज्यपाल प्रदेश सोडून निघून गेले. काही राज्यपालांना पराभूत राजांनी हाकलून लावले. त्या धामधुमीत चंद्रगुप्त सक्रिय झाला. त्याने वडिलांचे राज्य तर मिळवलेच; शिवाय, त्याचा अंमल आसपासच्या अनेक छोट्या राज्यांचे एकत्रीकरण करून त्यावर बसवला. सरन्यायाधीश जमवले. बलाढ्य सैन्याच्या जोरावर एकेक राज्य जिंकत त्याने त्याच्या राज्याचा विस्तार केला. त्याने धनानंद राजाचा पराभव करून मगधाचे राज्य ताब्यात घेतले. धनानंदाच्या राज्याचाही विस्तार मोठा होता. मौर्य साम्राज्याचा भौगोलिक विस्तार चंद्रगुप्त व बिंदुसार या राजांच्या राजवटीत झाला. अशोकाच्या राजवटीत फक्त कलिंग देश मौर्य साम्राज्याला जोडला गेला. मौर्य राजवटीने अती दक्षिणेचा भूप्रदेश सोडल्यास जवळ जवळ संपूर्ण भारतावर राज्य केले. राजघराण्याचा एकछत्री अंमल इतक्या मोठ्या प्रमाणात विस्तारित होण्याचा तो पहिलाच प्रसंग. त्यामुळे काही जमातींच्या टोळ्या साम्राज्यात किंवा साम्राज्याच्या सीमेवर स्वायत्तपणे राहत असण्याची शक्यता आहे. कंबोज, लिच्छवी, व्रज, पांचाळ या जमातींच्या टोळ्यांची स्वतंत्र राज्ये अस्तित्वात होती. पण त्यांना मौर्य राजांसारखा दर्जा नव्हता. त्यांची स्वायतत्ता मौर्य साम्राज्याच्या प्रशासनाला अडथळा होणार नाही इतपत मान्य केली गेली असावी.
          मौर्य घराणे हलक्या जातीतून आलेले असल्यामुळे पुराणांमध्ये त्याची अंधुकशी दखल घेतली आहे. नंद राजे शूद्र घराण्यातील होते. त्यांचा पराभव करून मौर्य घराणे स्थिर झाले. मौर्यांचे मूळ अचूक शोधता येत नाही. मौर्य घराण्याच्या उगमस्थानाबद्दल बरेच प्रवाद आहेत. काहींच्या मते, नंद राजाच्या मुरा नावाच्या बायकोपासून मौर्य हे नाव प्रचलित झाले. पण पुराणांच्या मते, नंद व मौर्य या घराण्यांत संबंध कोणतेही नव्हते. बौद्ध परंपरेत मौर्य राजांचा संबंध शाक्य घराण्याशी जोडून दाखवला गेला आहे. मौर्य मूळचे वैश्यही असावेत.
          मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र ही होती. ते साम्राज्य चार प्रमुख प्रांतांत विभागले होते. तक्षशीला ही उत्तर प्रांताची, उज्जैन ही पश्चिम प्रांताची, तोसाली ही पूर्व प्रांताची तर सुवर्णगिरी ही दक्षिण प्रांताची राजधानी होती. ते प्रांत प्रशासकीय विभाग होते व त्यांचे प्रमुख राज्यपाल म्हणजे राजाने नेमलेले प्रतिनिधी असत. शक्यतो ते प्रतिनिधी राजांची मुले, जावई किंवा फार जवळचे नातेवाईक असत. राजपुत्रांना त्यातून प्रशासकीय प्रशिक्षण मिळे. बिंदुसाराने अशोकाला उज्जैनचा राज्यपाल म्हणून नेमले होतेबिंदुसाराच्या निधनानंतर त्याच्या वारसदारांमध्ये चार वर्षें संघर्ष झाला. अशोक हा थेट वारस म्हणजे सर्वात मोठा मुलगा नसल्याने व त्याला राजा बनण्याची महत्त्वाकांक्षा असल्याने भावांच्यात भांडणे झाली. अशोकाने त्याच्या चार भावांपैकी तीन भावांना ठार मारल्याचा उल्लेख येतो. त्या घटनेचे ऐतिहासिक पुरावे नसले तरी ती घटना खरी असण्याची शक्यता खूप आहे. एकंदरीत, अशोकाने त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करून राज्याभिषेक करवून घेतला.

         

अशोक

अशोकाचे प्रेमसंबंध तो राजा होण्याआधी, उज्जैनचा राज्यपाल असताना विदिशा नगरातील एका व्यापा-याच्या महादेवी नावाच्या मुलीशी जुळले होते. त्यातून त्यांना महिंद्रा हा मुलगा व संघमित्रा ही मुलगी झाली. (संघमित्रा ही अशोकाची मुलगी आहे याला ऐतिहासिक पुरावे नाहीत असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे.) महादेवी, महिंद्रा व संघमित्रा विदिशा येथेच राहिले. महादेवीचे अशोकाशी लग्न झाले नाही. अशोकाचे लग्न राजघराण्यातील स्त्रियांशी झाले. त्याच्या तीन राण्यांचा उल्लेख मिळतो – असंधिमित्रा, तिस्सरखा म्हणजेच करूवकी व पद्मावती.

          भारताचा व्यापारउदीम मौर्यकाळात अती पश्चिमेकडे असलेल्या बाबिलोनपर्यंत वाढला होता. त्यामुळे भारत व पश्चिमी देश यांच्यामधील दळणवळण वाढण्यास मोठी मदत झाली. परिणामी,त्यांच्यातील समुद्री वाहतुकीचा मार्ग खुला राहिला. भारताचे ग्रीकांबरोबरचे संबंध व दळणवळणही सिकंदरच्या स्वारीअगोदरच प्रस्थापित झाले होते. योन किंवा यवन हा ग्रीकांसाठी वापरला जाणारा शब्द इराणमार्गे आला. सिकंदर येण्याअगोदरच सिंधू नदीच्या पलीकडे आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर ग्रीकांच्या वसाहती निर्माण झाल्या होत्या. त्या सरहद्दीवर विखुरल्या होत्या. मौर्य साम्राज्याचे त्या वसाहतींशी मित्रत्व अथवा शत्रुत्व असणे हे तक्षशीलेच्या मौर्य राज्यपालाचे त्या वसाहतींबरोबर असलेले संबंध कसे आहेत त्यावर ठरत होते. मौर्य साम्राज्याचे त्या वसाहतींवर थेट नियंत्रण बऱ्यापैकी असावे. मात्र भारतीय जनता ग्रीक संस्कृतीशी परिचित सिकंदरच्या स्वारीनंतर झाली असली पाहिजे. अशोकाच्या आज्ञांमध्ये योन प्रदेश असे उल्लेख आढळतात. त्या वेळेस वायव्येच्या सरहद्दीवर राज्याच्या सीमा पक्क्या रीतीने आखल्या नव्हत्या.
          काश्मीरचा प्रदेश जरी मौर्य साम्राज्याच्या प्रत्यक्ष अधिपत्याखाली नसला तरी काश्मीरमधील खासा प्रांतावर मौर्य साम्राज्याचा अंमल होता. अशोकाच्या साम्राज्यात आताच्या नेपाळमधील काही प्रदेश होता. अशोकाचे नेपाळशी संबंध सौहार्दाचे होते. अशोकाने नेपाळच्या बऱ्याच प्रदेशांना भेट दिल्याचे उल्लेख आढळतात. नेपाळचा क्षत्रिय राजा देवपाल याच्याशी अशोकाच्या चारूमती या मुलीचे लग्न झाले होते.
        पूर्वेकडील वंग प्रदेश मौर्य साम्राज्यात अंतर्भूत होता. वंगमधील ताम्रलिप्ती हे समुद्री मार्गाने दळणवळण करण्याचे मुख्य केंद्र होते. भारताच्या प्रतिनिधी मंडळांची श्रीलंकेकडे येजा ताम्रलिप्ती मार्गे होत होती. अशोकाने कलिंग देश जिंकून घेतल्यामुळे मौर्य साम्राज्याची पूर्वेकडील प्रदेशावर पकड घट्ट झाली. मौर्य वसाहतींचे अवशेष गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील उत्खननात मोठ्या प्रमाणावर सापडले आहेत. अशोकाच्या आज्ञा असलेले शिलालेख व स्तंभ दक्षिणेकडे गव्हिमठ, पल्लकीगुंडू, ब्रह्मगिरी, मस्की, येरागुडी, सिद्धपुरूष आणि जातिंगारामेश्वर या ठिकाणी सापडले आहेत. त्यावरून मौर्य साम्राज्याच्या दक्षिणेकडील राज्यविस्ताराची कल्पना येते. दक्षिणेकडील श्रीलंका हा देश मैत्रीपूर्ण शेजारी म्हणूनच अशोकाच्या कारकिर्दीत राहिला. श्रीलंकेचा उल्लेखतांबपण्णीअसा अशोकाच्या आज्ञांमध्ये केला आहे. तसेच महिंद्रा श्रीलंकेत जाण्याअगोदर बौद्ध धम्म श्रीलंकेत पोचलेला होता. महिंद्राच्या भेटीचे महत्त्व यात आहे, की त्याने श्रीलंकेचा राजा तिस्स याचे बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी मन वळवले. त्यामुळे बौद्ध धम्माला श्रीलंकेत राज्याचा अधिकृत धर्म म्हणून दर्जा मिळाला. अशोकाचे श्रीलंकेशी असलेले संबंध केवळ राजकीय स्वरूपाचे नव्हते; तर श्रीलंकेचा राजा तिस्स व अशोक यांच्यात वैयक्तिक मित्रत्वाचे संबंध होते. तरुण तिस्स राजा बनण्याअगोदर अशोकाने पाठवलेल्या धम्ममहामंत्र्यांच्या संपर्कात आला असावा. त्याने अशोकाचा आदर्श त्यावरून घेतला असावा. तिस्स याच्यावर अशोकाचा राजा म्हणून विशेष प्रभाव होता. तिस्स याने बौद्ध धम्मही स्वीकारला. मात्र त्यांचे नाते तिस्स हा अशोकाचा मांडलिक राजा असे नव्हते. श्रीलंका हे राज्य कायम स्वतंत्र व सार्वभौम राहिले. श्रीलंका व भारत यांच्यामधील व्यापार खूपच वाढला. सांस्कृतिक देवाणघेवाण आणि राजकीय व धार्मिक शिष्टमंडळांची येजा ही मोठ्या प्रमाणात चालू राहिली. दोन्ही देशांतील राजकीय संबंध खूपच घनिष्ट झाले.

 

          अशोक हा कोणी स्वप्नाळू, अफाट कल्पनाशक्ती असलेला किंवा खास साक्षात्कार झालेला प्रेषित नव्हता. त्याच्या कल्पना किंवा त्याची दृष्टी त्याच्या काळाच्या फार पुढे पाहणारी नव्हती. अशोकाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण तो जन्मला तेव्हाच्या मौर्य साम्राज्याच्या परिस्थितीनुसार झाली. बौध्द धम्माचा उगम व विकास झाला होता. बौद्ध धम्माची तत्त्वे व अशोकाच्या समाजाबद्दल असलेल्या कल्पना यांत साम्य होते. त्यामधून अशोकाची वाढ होत गेली.
          मौर्य घराण्याने तत्कालीन अनेक तात्त्विक व वैचारिक विचारधारांमध्ये स्वारस्य दाखवल्याचे दिसून येते. चंद्रगुप्त मौर्य याने त्याच्या अखेरच्या काळात जैन धर्म स्वीकारला; तो जैन निर्ग्रंथी बनून भटकू लागला आणि शेवटी, जैन धर्माच्या रीतीप्रमाणे संथारा व्रत करून मरण पावला. त्यामुळे अशोकाचा जैन धर्माच्या तत्त्वांशी परिचय होता. चंद्रगुप्ताच्या दरबारात सर्व धार्मिक पंथांचे अधिकारी होते. अशोकाचा पिता बिंदुसार याने जैन धर्म स्वीकारला होता की नाही त्याचा ऎतिहासिक पुरावा मिळत नाही. मौर्यकाळाच्या अगोदरच जातिव्यवस्थेची गुंतागुंत असलेली बाह्मण परंपरा समाजात स्थिरावलेली होती. त्या परंपरेला आव्हान देणारे, त्यातील वेदांचा प्रतिवाद करणारे जैन, बौद्ध व आजीवक हे तीन पंथ उदयाला आले होते. पॆकी बौद्ध पंथाने स्वतःचे तत्त्वज्ञान सनातनी ब्राह्मण परंपरेच्या विरूद्ध उभे राहून सर्वसामान्यांमध्ये पसरवण्याची मोठीच मोहीम उघडली. बौद्ध तत्त्वज्ञान सोपे होते. त्यातील क्रियाकर्म साधे होते. ते सर्वसामान्यांना त्यांच्या भाषेत समजत होते. अशोकाची कारकिर्द गौतम बुद्धाच्या निधनानंतर दोनशे वर्षांनी सुरू झाली. व्यापारी व तळागाळातील जनता यांनी बहुसंख्येने पाठबळ दिल्याने बौद्ध धम्म जनसमुदायात मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्या सर्व परिस्थितीचा परिणाम अशोकाच्या विचारसरणीवर झाला असणार.
          मौर्य साम्राज्याची नवी शासकीय व्यवस्था केंद्रशासित झाली. त्या अगोदर संघशासन व्यवस्था होती. ती अनेक छोट्या राज्यांचे मिळून बनलेली होती. ती व्यवस्था नंद राजाच्या काळात बदलून सत्ता केंद्रस्थानी एकवटण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला अंतिम स्वरूप मौर्य राजवटीत मिळाले. मौर्य साम्राज्य हे संघराज्य नव्हते; मौर्य साम्राज्यात कायम राजाचा एकछत्री अंमल होता. अशोकाची प्रशासनावर मजबूत पकड होती. साम्राज्याचे प्रशासन कार्यक्षम नोकरशाही, त्यांना जोडणारी चांगली दळणवळण व्यवस्था  व सामर्थ्यशाली राजाच्या हातात एकवटलेली मध्यवर्ती सत्ता या तीन घटकांवर चालवले जात होते. धर्मशास्त्राप्रमाणे राजाला अनभिषिक्त अधिकार मिळाले होते. जर धर्मशास्त्र व राजाचे न्यायशास्त्र यांत मतभेद निर्माण झाले तर राजाचे न्यायशास्त्र अंतिम मानले जाईल असे संकेत होते. दैनंदिन कामकाजात मात्र ब्राह्मणांचे स्थान वरचे होते. प्रधानमंत्री व राजा चर्चा करत असताना पुरोहितांना तेथे हजर राहण्याचा अधिकार होता. याप्रमाणे पुरोहितांना धार्मिक अधिकारांबरोबर राजकीय निर्णयप्रक्रियेतही अधिकार होते. ते चित्र अशोकाच्या राजवटीत पालटलेले दिसते. पुरोहितांचा उल्लेख शिलालेखांमधील अशोकाच्या आज्ञांमध्ये कोठेच आढळत नाही. त्यामुळे ब्राह्मणांचे स्थान अशोकाच्या राज्यव्यस्थेमध्ये व राजकीय निर्णयप्रक्रियेत नाहीसे झाल्याचे संकेत मिळतात.
[youtube=https://www.youtube.com/watch?v=PlCP4yEn-pg&w=320&h=266]
          बौद्ध परंपरेत, अशोक सुरूवातीला खूप क्रूर व दुष्ट राजा होता. तो बौद्ध धम्माच्या उपदेशाने पूर्णपणे नंतर बदलला असे चित्र रंगवले जाते. ते अतिशयोक्तीपूर्ण आहे . त्याला ऎतिहासिक पुरावा नाही. त्याने बौद्धधम्म कलिंग युद्धात झालेल्या प्रचंड मनुष्यहानीने पश्चात्ताप पावून स्वीकारला असाही समज पसरलेला आहे. काही इतिहासकारांच्या मते, त्याने बौद्धधम्म कलिंग युद्धाच्या अगोदरच स्वीकारला होता. त्या बाबतीत ठोस ऎतिहासिक पुरावे कोणत्याच बाजूने नसल्याने ते मतभेद कायम राहिले आहेत. अनुमान इतकेच काढता येते की त्याने बौद्ध धम्म तडकाफडकी स्वीकारला नाही. त्यासाठी त्याने प्रदीर्घ वेळ घेतला. अशोक बौद्धधम्मीय होता म्हणजे नक्की काय होता? अनेक इतिहासकारांच्या मते, तो बौद्ध संन्यासी किंवा भिक्खू नव्हता. तसे होण्यासाठी घरादाराचा सर्वसंगपरित्याग करावा लागतो व प्रवज्जा घ्यावी लागते. त्याने तसे केले नव्हते. कोणालाही त्रिशरण प्रतिज्ञा घेतली की बौद्ध उपासक होता येत असे. त्यासाठी त्याला संसार, व्यवसाय किंवा घर सोडावे लागत नसे. उपासक व भिक्खू यांच्यामध्ये भिक्खूगतिक हे एक पद आहे. ज्या उपासकाला काही काळ मठात जाऊन राहण्याची परवानगी असते त्याला भिक्खूगतिक म्हणतात. अशोक तसा भिक्खूगतिक असावा, कारण त्याला बौद्धमठात जाऊन काही काळ राहण्याचे अधिकार होते असे दिसते.
          अशोकाची धम्मनीती व बौद्ध धम्म यांत फरक आहे. अशोक धम्माची मूल्ये नैतिकतेने वागणे व तशा वागण्यातून सामाजिक फायदे मिळवणे या उद्देशाने समाजात रूजवण्याचा प्रयत्न करत होता. ती मूल्ये बौद्ध धम्माच्या शिकवणुकीशी समांतर असली तरी अशोकाची धम्मनीती व बौद्ध धम्मतत्त्वे यांत बराच फरक होता. अशोकाने धम्माची मांडणी उच्चनीचतेचा भेद मानणाऱ्या विविध जनसमुहांनी एकमेकांशी नैतिकतेने वागावे अशी केली आहे. तो वर्ण किंवा जात यांचा अजिबात उल्लेख करत नाही. तो जातीजातींतील संबंधांचा उल्लेख करत नाही. तो समाजातील सर्व घटकांमध्ये सुसंवाद असावा यावर भर देतो. तो पालकपाल्य, नातेवाईकमित्र, शिक्षकविद्यार्थी, कामगारमालक, ब्राह्मणश्रमण अशा परस्परविरूद्ध समाजघटकांचा उल्लेख करतो. तो भर प्राण्यांना व मनुष्यमात्रांना इजा करू नये, सत्याची कास धरावी, दया व क्षमाशीलता दाखवावी या मूल्यांवर देतो. अशोक परिस्थिती पाहून अहिंसा तत्त्वाला मुरडही घालतो. तो सर्व जाती-पंथांतील लोकांची प्रगती व्हावी म्हणून सर्वांनी एकमेकांप्रती आदराची वागणूक द्यावी असा आग्रह धरत होता. त्याचे प्रतिपादन दुसऱ्या पंथाच्या विचारांचा आदर राखल्यानेच व्यक्ती स्वपंथाच्या विचारांचा आदर राखू शकते असे होते.
          कोणत्याही धर्माची सैद्धांतिक तत्त्वे व त्यांचे प्रत्यक्ष आचरण यांत तफावत असतेच. ती तफावत प्रत्येक व्यक्ती तिच्या तिच्या पद्धतीने स्वतःच्या गरजा व सभोवतालची सामाजिक परिस्थिती यांचा विचार करून दूर करण्याचा प्रयत्न ठेवते. अशोकाने म्हणूनच बौद्ध धम्माची तत्त्वे व आचरण यांत फरक केला असावा. त्याच्या आज्ञांवरून दिसते की तो स्वतःला लोकांनी निवडून दिलेला सर्वश्रेष्ठ प्रेषित समजत नव्हता. अशोकाच्या कल्पनेत विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या देवदेवतांच्या प्रतिमा अस्पष्ट व अंधुक आहेत. अशोक त्याची सारी प्रजा ही त्याची मुले आहेत असे सांगून त्याच्यात व प्रजेत वडिलांचे व मुलांचे नाते प्रस्थापित करतो. बापाने सर्व मुलांच्या हिताची, सुखाची व कल्याणाची जशी काळजी घेतली पाहिजे तशी तो प्रजेची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. राजा व प्रजा यांमधील अशा प्रकारचे नाते प्रस्थापित करण्याचा हा नवीन व वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणता येईल.
          अशोकाने बौद्ध व ब्राम्हण परंपरांतील विचार उसने घेतले असले तरी अशोकाचा धम्म ही त्याची खास निर्मिती आहे. अशोकाच्या धम्माचे वर्णन एका राजाने बहुसंख्य जनता तत्त्वज्ञानाच्या पातळीवर सैद्धांतिक चिंतन, मनन करू शकत नाही हे ओळखून त्यांच्यासाठी व्यवहार्य, अनुसरण्यासाठी सोयीचा, उच्च नीतिमानतेने जगण्याचा सांगितलेला मार्ग असे करता येईल. त्याच्या  ते स्पष्ट होते. अशोकाच्या धम्माने त्यावेळेस प्रचलित असलेल्या धार्मिक कर्मकांडांच्या तत्त्वांचा पुरस्कार केलेला नाही. अशोकाचा धम्म हे केवळ धार्मिक धोरण नसून आर्थिक, राजकीय व सामाजिक जीवनाचा अंतर्भाव असणारे शासकीय धोरण होते. त्याने स्वतः बौद्ध धम्म स्वीकारला होता. त्याचे बौद्ध धम्माशी नाते व्यक्ती म्हणून वेगळे होते. तर त्याचे साम्राज्याचा राजा म्हणून बौद्ध धम्माशी नाते वेगळे होते. तो त्या दोहोत अंतर जाणीवपूर्वक ठेवत होता. त्याच्या आज्ञांचे दोन भाग पडतात. एक – प्रमुख आज्ञा, दोन – इतर आज्ञा. प्रमुख आज्ञा या साम्राज्यातील संपूर्ण जनतेला उद्देशून आहेत, तर इतर आज्ञा फक्त बौद्ध धर्मियांसाठी आहेत. दोन्ही आज्ञा एकमेकांपासून भिन्न आहेत. अशोकाच्या धम्मधोरणाचा अत्यंत महत्त्वाचा पैलू हा आहे की त्याने जनतेचे सक्तीने सामूहिक धर्मांतर व्हावे असा प्रयत्न केला नाही. त्याने बौद्ध धम्म हा राजधम्म आहे असे घोषित केले नाही. त्याने बौद्ध धम्माचे धोरण विशाल मानवतेच्या दृष्टिकोनातून राबवले.
          अशोकाच्या राजवटीत समाजातील सर्व घटकांसाठी एकाच प्रकारची कायदेशीर कारवाई होत असे; कायदेशीर शिक्षाही एकसारख्या होत्या. म्हणजे शिक्षा जाती किंवा धर्म यांच्या उतरंडीप्रमाणे किंवा व्यक्तीच्या सामाजिक महत्त्वाप्रमाणे कमी जास्त होत नसत. शिक्षा दंडाच्या द्वारे होत असत. जे दंड आर्थिक परिस्थितीमुळे देऊ शकत नसत त्यांना स्वतःला गुलाम किंवा दास म्हणून विकून दंड भरावा लागत असे. अशोकाने बौद्ध धम्म स्वीकारला व अहिंसा तत्त्वाचे पालन केले, म्हणून त्याने फाशीची शिक्षा रद्द केली नाही. ती प्रचलित होती. फक्त त्यात त्याने किंचित सूट दिली. गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याचे ज्या दिवशी नक्की झाले आहे तेव्हापासून तीन दिवसांचा जादा अवधी त्याला दिला जात असे. गुन्हेगार त्या मुदतीत पुन्हा अपील करू शकत असे. तो अपिलाद्वारे दावा पुन्हा चालवण्याची मागणी एकतर करू शकत असे किंवा मुक्ततेसाठी मोठी खंडणी देऊ शकत असे. त्यांतील काहीच शक्य नसेल तर नातेवाईकांना त्याच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करण्याची परवानगी देऊन गुन्हेगाराला फाशी देण्यात येत असे. अशोक फाशीच्या शिक्षेवर नाखूश होता, पण तो व्यावहारिकतेलाही धम्मतत्त्वाइतकेच महत्त्व देत होता. अशोकाने अहिंसेचे तत्त्व स्वीकारले असले तरी तो त्याचा अतिरेक करत नाही. तो विनाकारण प्राण्यांची शिकार करू नये, उपयुक्त असलेल्या प्राण्याची शिकार करू नये हे सांगतो. तो अन्न म्हणून प्राण्यांना मारून खाण्यास प्रतिबंध करत नाही. त्याला लोकांना मांसाहारापासून पूर्णपणे परावृत्त करता येणार नाही याचे भान होते.
          अशोकाच्या प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्या प्रशासकीय कार्यात धम्मतत्त्वांचा पुरस्कार करावा लागत असे. मात्र ती धम्मतत्त्वे बौद्धधम्म प्रसाराची धम्मतत्त्वे नव्हती. अशोकाच्या धम्मतत्त्वात दास( गुलाम), नोकर, ब्राह्मण, श्रमण, पालक, वृद्ध माणसे यांच्याप्रती आदर दाखवणे, प्राण्यांची हत्या टाळणे, कॆद्यांची नीट व्यवस्था ठेवणे या गोष्टी अपेक्षित होत्या. अशोक धम्मतत्त्वासाठी केवळ सरकारी अधिकाऱ्यांवर अवलंबून राहिला नाही. त्याने धम्मतत्त्वांचा प्रसार करण्यासाठी खास धम्म महामंत्री नेमले. त्या धम्म महामंत्र्यांवर धम्मतत्त्वे राज्यभर प्रसारित करणे, लोकांना त्याचा अर्थ समजावून देणे, त्याच्या पालनाचे फायदे व महत्त्व पटवून देणे ही विशेष जबाबदारी होती. तशा प्रकारचे प्रशासकीय अधिकारी भारतात प्रथमच नेमले गेले. त्यांचे काम सुरुवातीला जनतेचे हित साधणे, राजाच्या जनकल्याणकारी योजना राबवणे हे जरी असले तरी नंतर त्यांना धार्मिक तत्त्वांचा प्रचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्वरूप आले.
          त्याने धम्माचा वापर लोकांनी सदाचारी असावे आणि राज्याची कायदा व सुव्यवस्था उत्तम राहवी, संकुचित धार्मिक दृष्टिकोन बदलावा, दीनदलितांचे धनदांडग्यांपासून संरक्षण व्हावे आणि साम्राज्यामध्ये सामाजिक व सांस्कृतिक एकोपा राहवा यासाठी केला. अशोकाने धम्म महामंत्र्यांची संस्था संपूर्ण साम्राज्यात उभी केली. समाजातील दुर्दैवी व दुर्लक्षित घटकांसाठी कल्याणकारी व्यवस्था निर्माण करणे ही त्यांची जबाबदारी होती. अशोकाने अधिकाऱ्यांच्या व दूतांच्या व्यवस्थित यंत्रणेद्वारे साम्राज्यावर परिणामकारक केंद्रवर्ती नियंत्रण ठेवले. त्याचा संपर्क साम्राज्याच्या सर्व भागांत होता. त्याने धम्मयात्रा ही पद्धत त्यासाठी सुरू केली. अशोकाच्या आधीचे राजे शिकारीच्या किंवा युद्धाच्या मोहिमा काढत. त्याने त्या प्रकारच्या मोहिमा बंद केल्या.
          अशोकाने धम्मयात्रा केवळ धार्मिक स्थळांना, तीर्थस्थानांना भेटी देण्याच्या उद्देशाने काढल्या नाहीत. त्याचे अनेक हेतू त्यामागे होते. श्रमण व ब्राह्मण यांना भेटणे, त्यांना दानधर्म करणे, वृद्ध लोकांना भेटून – त्यांना सोने दान देऊन आर्थिक आधार देणे, इतर जनतेला भेटून त्यांना उच्च नीतिमत्तेविषयी अवगत करणे, जनतेच्या समस्या समजावून घेणे, प्रशासनिक कार्यालयांना भेट देऊन तेथील कामकाजाची, अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीची तपासणी करणे, स्थानिक अधिकाऱ्यांवर वचक ठेवणे, अधिकाऱ्यांच्या समस्या समजावून घेणे असे विविध हेतू धम्मयात्रांमागे होते. अशोकाने धम्मयात्रा धार्मिक कारणांसाठी केल्या असे बौद्ध परंपरेत सांगितले जाते; पण ते बरोबर नाही. अशोकाच्या धम्मयात्रांमागे प्रशासकीय पकड घट्ट करणे व जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोचणे हे महत्त्वाचे हेतू होते. अशोक हा खेड्यापाड्यांतील ग्रामीण जनतेला प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणारा भारतातील पहिला राजा होय. अशोक धम्माचा विस्तार स्वतःच्या वर्तनाने आणि समाजातील इतर सर्व पंथांच्या लोकांशी सौहार्दाचे संबंध ठेवून करतो व सहिष्णुतेचे उदाहरण घालून देतो.
          अशोकाच्या कारकिर्दीचे ऐतिहासिक पुरावे मिळतात; पण त्याच्या मृत्युकाळापासून पुढे ठोस ऎतिहासिक पुरावे मिळणे दुरापास्त होते. त्याच्यानंतरच्या मौर्य साम्राज्याचा इतिहास अनुमानांवर आधारित समजून घ्यावा लागतो. बौद्ध परंपरेत अशोकाचा मृत्यू व त्यानंतरचे वारस या संबंधात बऱ्याच दंतकथा आहेत. इतिहासकारांच्या मते, अशोकाने त्याच्या मृत्यूच्या काही काळ अगोदर त्याच्या साम्राज्याची विभागणी दोन भागांत केली असावी. वायव्येकडील प्रदेश, गांधार आणि काश्मीर हा भाग त्याचा मुलगा कुणाल  याच्याकडे सोपवला तर पूर्वेकडील सर्व प्रदेश त्याचा नातू दशरथ याच्याकडे सोपवला.
इतिहासकारांनी मौर्य साम्राज्याचा कालावधी साधारणपणे पुढीलप्रमाणे निर्धारीत केला आहे.
राजा      इसवी सनपूर्व    ते     इसवी सनपूर्व       वर्षे
चंद्रगुप्त            321                  297            24
बिंदूसार          297                  272             25
निर्नायकी काळ 272                   268              4
अशोक            268                   233           36
                                                     एकूण   89
अशोकानंतरचे राजे
दशरथ.                                                             8
संप्रती                                                               9
साळीशुक                                                         13
देववर्मन                                                              7
सत् धवन                                                            8
बृहदरथ                                                              7
                                                             एकूण 52
          अशोकाचा मृत्यू इसवी सनपूर्व 233232 मध्ये झाला. त्यानंतर मौर्य साम्राज्य केवळ बावन्न वर्षे टिकले. शेवटचा मौर्य राजा बृहदरथ याचा खून कटकारस्थान करून ब्राह्मण परंपरेतील पुश्यमित्र शुंग याने इसवी सनपूर्व 181180 साली केला. तो बृहदरथाचा सेनापती होता. या प्रकारे मौर्य साम्राज्य एकूण एकशेएकेचाळीस वर्षें टिकून लयाला गेले.
          अशोकाच्या धम्मधोरणाचा प्रयोग त्याच्या मृत्यूनंतर लगेच संपुष्टात आला. अशोकाला त्याची धम्मधोरणे राबवणारा, कुशल आणि सामर्थ्यशाली वारस तयार करण्यात अपयश आले. साम्राज्याचे विभाजन झाल्यामुळे राजकीय व प्रशासकीय ताकद दोन प्रदेशांत विभागली गेली. अशोकानंतरचे सगळे राजे दुबळे निघाले. त्यामुळे प्रतिस्पर्धी राजांनी मौर्य साम्राज्यावर आक्रमणे केली. साम्राज्याची शकले अंतर्गत बंडाळी होऊन झाली. मौर्य साम्राज्याची राजसत्ता आक्रसत गेली. ती चंद्रगुप्ताने जेथून सुरूवात केली त्या मगध प्रदेशाभोवतीच सीमित झाली. शेवटी त्याचाही अस्त झाला. मौर्य साम्राज्याचे नियंत्रण चंद्रगुप्त, बिंदुसार व अशोक यांच्या राजवटीत राजांच्या हातात पूर्णपणे एकवटलेले होते. ते राजे कुशल, सक्षम व सामर्थ्यशाली होते. त्यांच्यानंतरचे राजे तसे नसल्याने साम्राज्याचे प्रशासन खिळखिळे झाले हे साम्राज्याच्या नाशाचे प्रमुख कारण आहे.
          अशोकाच्या छत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील तीस वर्षांचा काळ(कलिंगाचे युद्ध सोडून) युद्धविरहित गेला हे लहानसहान साध्य नव्हे! त्या दीर्घ सामाजिक व राजकीय स्थैर्यामुळे साम्राज्यात व्यापारउदीमातील भरभराट इतकी झाली, की मौर्य साम्राज्याच्या लयानंतरही ती खूप काळ तशीच चालू राहिली.
(या लेखाचा आधार: Asoka and the Decline of the Maurays–   third edition—Publisher- Oxford India Perennials….. ROMILA THAPAR) छायाचित्रे – इंटरनेटवरून
विद्यालंकार घारपुरे 9420850360
vidyalankargharpure@gmail.com
विद्यालंकार घारपुरे यांचा जन्म 26 सप्टेंबर 1960 मध्ये झाला. त्यांनी बी. कॉम. पदवी मिळवली आहे. त्यांनी भारतीय स्टेट बँकेतून उपप्रबंधक (डेप्युटी मॅनेजर) या पदावरून स्वेच्छानिवृत्ती 2007 साली घेतली. ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ता म्हणून 1986 ते 1997 या काळात काम करत होते. त्यांना बालसाहित्यात विशेष रुची आहे. त्यांचे बबडूच्या गोष्टी‘ ‘वनशाहीच्या कथाबेटू आणि इतर कथाहे बालकथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. तसेच छोटा डॉनआणि लिंबू तिंबूहे बालकविता संग्रह आणि बदलही बालकादंबरीही प्रकाशित झाली आहे.

About Post Author

Previous articleग्रामगीतेचा आमगावातील प्रत्यय (Aamgav Uses Gramgeeta In Practice)
Next articleकलिंगाची लढाई : सम्राट अशोक (Ashoka’s Battle of kalinga)
विद्यालंकार घारपुरे यांचा जन्म 26 सप्टेंबर 1960 मध्ये झाला. त्यांचे शिक्षण बी. कॉम. झाले आहे. त्यांनी भारतीय स्टेट बँकेतून उपप्रबंधक (डेप्युटी मॅनेजर) या पदावरून स्वेच्छानिवृत्ती 2007 साली घेतली. ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे सक्रिय कार्यकर्ता म्हणून 1986 ते 1997 या काळात काम करत होते. त्यांना बालसाहित्यात विशेष रुची आहे. त्यांचे 'बबडूच्या गोष्टी' 'वनशाहीच्या कथा' व 'बेटू आणि इतर कथा' हे बालकथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. तसेच 'छोटा डॉन' आणि 'लिंबू तिंबू' हे बालकविता संग्रह आणि 'बदल' ही बालकादंबरीही प्रकाशित झाली आहे. त्यांना 'चालनाकार अरविंद राऊत पुरस्कार' 2015 सालासाठी मिळाला आहे. सध्या त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ हा लेखन व सामाजिक कामासाठी दिलेला आहे. लेखकाचा दूरध्वनी 9420850360

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here