जागतिक दर्ज्याच्या तोडीस तोड वाबळेवाडीची ओजस शाळा (Ojas School of Wabalewadi)

2
133
-vablevadi-school

जिल्हा परिषदेच्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून यंदा चार हजार विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते. भारतातील पहिली आणि जगातील तिसरी ‘झिरो एनर्जी स्कूल’ म्हणून वाबळेवाडीच्या शाळेचा उल्लेख केला जातो. वाबळेवाडी येथील दत्तात्रय वारेगुरुजींनी गावकऱ्यांच्या मदतीने गावाचा व शाळेचा विकास घडवून आणला आहे…

वाबळेवाडी हे पुणे शहराच्या जवळ शिरूर तालुक्यात शिक्रापूरपासून उत्तरेस अडीच किलोमीटर अंतरावर आहे. वारेगुरुजींनी तेथे देशातील पहिले ‘झिरो एनर्जी स्कूल’ उभे केले आहे. त्यामुळे शिरूर तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोचले आहे. दत्तात्रय वारे हे प्रयोगशील शिक्षक आहेत. वारे यांना तेथे सक्षम साथ लाभली ती खैरे गुरुजींची.

दत्तात्रय वारे हे गृहस्थ अफाटच आहेत. ते मूळ जातेगाव बुद्रुकचे. ते गाव वाबळेवाडीजवळ चार-पाच किलोमीटरवर आहे. वारे यांनी वाबळेवाडीची शाळा मुळातून बदलण्याचा चंग बांधला आणि त्यांनी एकेक खोली नवी बांधत नवी शाळा उभी केली. तेथे मूळ शाळेतील अडचणी राहिल्या नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांचा विश्वास संपादन झाला. त्यामुळेच त्यांना नवी शाळा उभारण्यासाठी प्रथम अडीच कोटी रुपये किंमतीची दीड एकर जमीन गावकऱ्यांनी देऊ केली. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्ज्याची शाळा उभी राहिलेली पाहून ग्रामस्थांनी शाळेसाठी पुन्हा दीड एकर जमीन दिली. अशा तऱ्हेने, शाळा व परिसर अशी तीन एकरांची जागा झाली आहे. वारेगुरुजी म्हणतात, ‘शिरूर-हवेली तालुक्यात आठ-दहा लाख रुपये गुंठा असे जमिनीचे भाव आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा हा दिलदारपणा विशेष उठून दिसतो.’

वाबळेवाडीत पन्नास ते साठ घरे व साडेतीनशे लोकसंख्या आहे. शेतीकाम हा तेथील लोकांचा उद्योग. सहा वर्षांपूर्वी शाळा दोन खोल्यांच्या गळक्या व पडक्या भिंतींत भरत असे. मुलांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागे. दत्तात्रय वारे गुरुजी तेथे जुलै २०१२ मध्ये जानेगाव येथून बदली होऊन आले. वारेगुरुजींची वृत्ती आव्हाने अंगावर घेण्याची आणि काही तरी नवीन करून दाखवण्याची. त्यांची ख्याती ते जेथे जातील तेथे मुलांसाठी नवीन काहीतरी स्वप्रयत्नांतून उभे करतात अशीही होती. वाबळेवाडीची शाळा म्हणजे मोडकळीस आलेल्या दोन वर्गखोल्या, पडलेले शौचालय, पावसाळ्याच्या दिवसांत वर्गाच्या छतावरील पत्र्यांतून जलाभिषेक व बत्तीस मुले अशी अवस्था होती. वारेसर खचले नाहीत. त्यांनी मुलांवर गुणवत्ता व संस्कार या दोहोंचे बीजारोपण करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले. त्यांनी शाळा व मुले यांच्यासाठी भविष्यात काय करता येईल याचे चित्र पालकांसमोर ग्रामसभेत (१५ ऑगस्ट २०१२)  मांडले. पालकांचा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यानंतर बदलू लागला. त्यांनी कृती आराखडा बैठकीत ठरवला. तो प्रयत्न, मुलांना शहरी वातावरणयुक्त व जागतिक स्पर्धेशी तुलना करणारे शिक्षण गावातच कसे देता येईल यासाठी, होता. त्यानुसार कामाला सुरुवात झाली, गुणवत्ता दिसू लागली. दोन पडक्या खोल्यांच्या जागी अडीच कोटी रुपयांची इमारत उभी राहिली आहे. शाळेत दोनशे मुले शिकत आहेत. शाळा स्वत:चे नाव जागतिक परिप्रेक्ष्यात उंचावण्यास सज्ज झाली आहे. एकदा विश्वास निर्माण झाला, की निधीची अडचण येत नाही. वारेगुरुजींना तोच अनुभव येत गेला.

गावात २०१२ साली एकोणीस महिला बचत गट होते. त्या सर्व बचत गटांनी त्यांना मिळालेला नफा शाळेच्या विकासासाठी सलग तीन वर्षें दिला. गावातील तरुणांनी नवरात्रोत्सव व गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरे केले. त्यातून वाचलेला निधी शाळेला दिला. वाबळेवाडी प्रसिद्ध आहे, ती तेथील यात्रेसाठी. गावकऱ्यांनी सव्वा लाख रुपये जत्रेतील तमाशासाठी ठेवून पाच हजार रुपये मंडळास दिले होते. मात्र वारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यात्रा कमिटीला भेटून त्यांच्या कानावर शाळेची अवस्था घातली, त्यांच्या योजनांची माहिती दिली. यात्रा समितीलाही मनोरंजनापेक्षा गावाच्या ज्ञानमंदिरातील विद्यार्थ्यांची प्रगती अधिक महत्त्वाची वाटली. तमाशाच्या एक लाख वीस हजारांतून वीस ‘टॅब’ खरेदी केले गेले. त्यातून वाबळेवाडीची शाळा राज्यातील पहिली टॅब स्कूल म्हणून जगासमोर आली.

वाबळेवाडीची शाळा उभी राहिली ती गावकऱ्यांच्या परिश्रमातून व श्रमदानातून. गावातील प्रत्येक नागरिकाने श्रमदान शाळेसाठी केलेले असल्यामुळे नागरिकांत आस्था निर्माण झाली. नागरिक शाळेचे कोठलेही काम करणे असेल तर पुढे येतात. त्यांचे शाळेसोबत वेगळे नाते तयार झाले आहे. वारे व खैरे गुरुजी यांनी प्रत्येक मुलावर काम सुरू केले. दोन शिक्षक व दोनशे विद्यार्थी अशी शाळेची अवस्था झाली होती. त्या दोघांनी गुणवत्ता संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली. त्यातील महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजे एकत्रित गटचर्चा पद्धत (इंटिग्रेटेड करिक्युलम). त्यानुसार दहा दहा मुलांचा एक असे गट करण्यात आले. गटांनी झाडाखाली बसून अभ्यास करायचा. त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी सहावी व सातवीतील दहा मुलांना ‘विषयमित्र’ म्हणून नेमून दिले गेले. विषयमित्रांनी गटात कोठल्याही विषयाची अडचण आल्यास ती सोडवायची. त्यातून त्या मुलांचे वाचन वाढले; नकळत त्यांच्यात त्या विषयाचा अभ्यास अधिक करण्याची जिज्ञासा निर्माण झाली व समाधीटपणा हा गुण विकसित झाला.

शाळेत मुलांची संख्या वाढू लागली, मात्र शिक्षक दोनच. अशा वेळी त्या दोघांनी उपक्रमाधिष्ठित शिक्षणपद्धतीचा अवलंब केला. त्यात शिक्षकांनी मुलींसाठी विणकामावर आधारित विविध वस्तू बनवण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी बिंबवले. मुलांना त्यांच्या आवडत्या प्रतिकृती बनवण्यासाठी प्रवृत्त केले. प्रयोगशाळा हा शब्द फक्त विज्ञान विषयासंबंधी उपयोगात आणला जातो. वाबळेवाडीला विविध विषयांच्या प्रयोगशाळा तयार झाल्या. त्यातून त्या त्या विषयातील मूलभूत संबोधाचे दृढीकरण घडून येऊ लागले. मुलेसुद्धा प्रयोगशाळांत जाऊन विविध भाषिक खेळ, गणिती आकार, भौगोलिक रचना, इंग्रजी शब्द यांचा अभ्यास दररोज करू लागली.

-varesir

आज, पर्यावरणाच्या ऱ्हासाची चिंता सर्वत्र तयार झाली आहे. मनुष्य विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आहे. नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर सर्वत्र वाढला आहे. वाबळेवाडीचे ग्रामस्थ व शिक्षक यांनीही पर्यावरणपूरक शाळेची इमारत कशी उभी राहील याचा विचार केला. त्यातून ‘झिरो एनर्जी स्कूल’ नावाची इमारत उभी राहिली आहे. जगात तशा प्रकारच्या दोनच इमारती आहेत- एक जपानमध्ये आणि दुसरी नेदरलँडमध्ये. वाबळेवाडीने जगातील तिसरी आणि भारतातील पहिली ‘झिरो एनर्जी स्कूल’ बनवण्याचा बहुमान मिळवला आहे.

शाळेच्या इमारतीतील आठही खोल्यांना काचेच्या स्लायडिंगच्या भिंती आहेत. प्लास्टिक रिसायकल करून त्यापासून तयार झालेले साहित्य तेथे वापरण्यात आले आहे. पॉलिकार्बोनेट व टेन्साईल मेम्ब्रेनचा (निरुपयोगी प्लॅस्टिकपासून बनवलेले साहित्य) उपयोग त्या खोल्यांमध्ये केला गेला आहे. छतासाठी ‘टफन ग्लास’ वापरली आहे. त्यामुळे उष्णता परावर्तित होते (टफन ग्लास या काचेचे मजबुतीकरण पंधराशे अंश सेल्सिअस तापमानाला केले जाते). मुलांना ती झाडाखाली बसून निसर्गाच्या सान्निध्यात शिकत आहेत याचा अनुभव मिळतो. त्या इमारतीसाठी ग्रामस्थांकडून अडीच कोटी रुपये किंमतीची जमीन बक्षिसपात्र करून शाळेच्या नावे घेतली गेली आहे. 

त्यातील तीन खोल्यांच्या खाली पावसाचे पाणी साठवण्यासाठी एक लाख लिटरच्या टाक्या बांधल्या आहेत. त्या पाण्याचा मुलांच्या स्वच्छतेसाठी व त्यांना पिण्यासाठी उपयोग केला जातो. इमारतीसाठी ‘बँक ऑफ न्यू यॉर्क’ या अमेरिकेतील बँकेचा दीड कोटी रूपयांचा निधी मिळाला. वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी २०१८ साली केले. 

वारेगुरुजी यांनी सांगितले, की ‘बँक ऑफ न्यू यॉर्क’चे प्रतिनिधी देणगी देण्यासाठी स्वत: होऊन आले. ते जगभर अशा प्रयोगशील शाळांचा शोध घेत असतात. त्यांना आम्ही बांधलेल्या शाळेच्या खोल्या आणि खुले वातावरण पसंत पडले. त्यामुळे ते खूश झाले व त्यांनी देणगी देऊ केली. तेव्हाच त्यांनी आम्हाला विचारले, की आम्हाला कोणत्या प्रकारची शाळा हवी? आम्ही जे डिझाइन दिले ते त्यांना पसंत पडले. ते आंतरराष्ट्रीय दर्ज्याशी मिळतेजुळते होते. मग त्यात सुधारणा होऊन आमची शाळा व जपानमधील शाळा एकाच प्रकारच्या झाल्या आणि जगात त्या वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या.

-school-progress-wablewadi-school

मुलांना केवळ शिक्षणात अडकावून न ठेवता सर्व क्षेत्रांत यशस्वी करण्यासाठी तेथील शिक्षक कार्यतत्पर असतात. शिक्षकांनी एक उपक्रम दिवाळीच्या सुट्टीत राबवला. मुलांना जवळच्या ओढ्यावर नेऊन पोहण्यास सांगितले. त्यावेळी केवळ दहा मुलांना पोहता आले. मग खैरनार गुरुजींनी तब्बल एकशेअठ्ठ्याऐंशी मुलांना पोहण्यास शिकवले. तेथील पहिलीतील लहान चिमुकलीदेखील तीस फूट उंचीवरून पाण्यात उडी मारताना बघून पालकांना मनस्वी आनंद झाला नसता तरच नवल! मुलांच्या विकासासाठी कला, कार्यानुभव व संगीत या तीन विषयांना तेथे महत्त्वाचे स्थान आहे. मुले अभ्यास करताना, शास्त्रीय संगीत लहान आवाजात त्या ठिकाणी सुरू असते. त्यातून मुलांची अभ्यासातील गती वाढते असे शिक्षक आवर्जून सांगतात.

सलग दोन वर्षांच्या कामाने, तेथील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे संपवला गेला आहे. ते निर्मलग्राम झाले आहे. बागेवाडीच्या पंचक्रोशीतील गावांमध्ये एक एक लाखाहून अधिक झाडे लावली व पंचवीस बंधारे बांधले आहेत. सौरऊर्जेवरील सोलर पथदिवे (स्ट्रीट लाइट) सर्वत्र बसवले गेले आहेत. सर्व ओढ्यांचे खोलीकरण करून एकूण पंचवीस बंधारे बांधले गेले आहेत. गाळमुक्त तलाव व बांधबदिस्ती यांमुळे गाव परिसरातील भूजल पातळी वाढली आहे. ‘अमुल डेअरी’च्या दूध संकलन केंद्रांची साखळी तयार करून शिक्षकांनी दूध व्यवसाय वाढीस मदत केली आहे. शाळेसाठी लागणारी वीज ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होते.

राज्य सरकारच्या ‘ओजस शाळा’ या उपक्रमात वाबळेवाडी शाळेची निवड २०१८ मध्ये झाली. त्यामुळे त्या शाळेत इयत्ता आठवीचा वर्ग सुरू झाला. तेथे टप्प्याटप्प्याने बारावीपर्यंतचे वर्गही सुरू करण्यात येणार आहेत. त्यावेळी वाबळेवाडी ही राज्यातील इयत्ता बारावीपर्यंतचे वर्ग असणारी पहिली जिल्हा परिषद शाळा ठरणार आहे. ‘ओजस’ शाळेचा विशेष म्हणजे त्या शाळेतील शिक्षकांची बदली होत नाही आणि त्यामुळे शिक्षकांना शिक्षणासंबंधात प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य राहते. सरकारने वाबळेवाडीच्या शाळेत जून २०१९ पासून आणखी दहा शिक्षकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षकांची संख्या बारा झाली आहे. शाळेत सध्या सहाशे विद्यार्थी-विद्यार्थिनी असून प्रवेशासाठी प्रतिक्षायादीमध्ये चार हजार मुलांची नावे आहेत. शाळा मराठी माध्यमाची आहे.

जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने मनात आणले तर काय होऊ शकते, याचे उदाहरण वारेगुरुजींनी दाखवून दिले आहे.

-wablewadischoolवारेगुरुजी शेतकरी कुटुंबातील असून, त्यांचे वडीलही शिक्षक होते. ते निवृत्तीनंतर जातेगावला शेती करतात. वारेगुरुजींचे कुटुंब आईवडील, पत्नी, एक मुलगा – हेमराज आणि दोन मुली – धरती व धनश्री असे आहे. हेमराज एम टेकला पुण्यात शिकत आहे. धरती डॉक्टर झाली असून, सध्या इंटर्नशिप करत आहे. दुसरी धनश्री पुण्यातच काँप्युटर इंजिनीयरिंग शिकत आहे.

– दत्ता वारे 08668515224
dattajiware@gmail.com 

– संतोष मुसळे  santoshmusle1983@gmail.com
9763521094

मूळ प्रसिद्धी ‘पुण्यनगरी’, लेखविस्तार – टीम थिंक महाराष्ट्र

About Post Author

2 COMMENTS

  1. खूपच वेगळी कल्पना खूप खूप…
    खूपच वेगळी कल्पना खूप खूप अभिनदन

Comments are closed.