चैत्र शुद्ध त्रयोदशीला श्री खंडेराव महाराज यांच्या नावानं कडगावची जत्रा भरवण्याची परंपरा जुनी आहे. जत्रेचं खरं आकर्षण म्हणजे बारा गाड्या ओढण्याचा मान. आपल्यावरचं संकट टळावं म्हणून खंडेरावाला नवस मानलेल्या माणसाला पाच वर्षं बारा गाड्या ओढण्याचा मान मिळतो.
खंडेराव महाराज हे कडग़ावचं ग्रामदैवत. चैत्र त्रयोदशीच्या दिवशी दुपारी चार वाजता ब्राम्हणाच्या घरी असलेली ‘देवकाठी’ स्वच्छ धुऊन, काठीला हळदीचा लेप लावून मंदरा गुंडाळला जातो. देवकाठीच्या वरच्या टोकावर विविध झेंडे लावले जातात. त्याला फराडे म्हणतात. त्या ठिकाणी असलेल्या देवतांची पूजा व आरती होते. बारा गाड्या ओढणार्यास ‘भगत’ असा संबोध आहे. भगताची पूजा आणि तयारी ब्राम्हणाच्या घरी केली जाते. त्याच्या डोळ्यांत काजळ, अंगाला-तोंडाला हळद लावून पायांच्या पंजावर स्वस्तिक काढलं जातं. त्याचं पुन्हा औक्षण कीरून वाजत- गाजत गावातल्या नाभिकाकडे नेलं जातं. बारा गाड्या ओढण्यासाठी लागणारे आकोडे दोन्ही खांद्यांमध्ये अडकावून भगत बारा गाड्या ओढतो. आकोडे म्हणजे सुतापासून बनलेला दोरखंडच असतो. त्यानंतर धनगरवाड्यातून बोकड ताब्यात घेऊन वहरानिशी वाजतगाजत मारुतीच्या देवळात जातात. मारुती हे ग्रामदैवत शक्तीचं प्रतीक असल्यानं बारा गाड्या ओढण्यासाठीची शक्ती मिळावी म्हणून सामुहिक आराधना केली जाते. मग मातंग आपली वाद्य बदडवतो. देवकाठी, भगत, भगताला बगल देणारे ‘बगले’, धनगराचं जोडपं, ब्राम्हण जोडपं, वहरातील चादर धरणारे चार जण तलवारीनं चादरीच्या मधोमध उभं जोडपं, खंडेरावासाठी बळी जाणारा बोकड घेतलेला धनगर, बारा गाड्यांमधील महत्त्वाची ‘दुसर’ तयार करणारा सुतार, न्हावी अशी सर्व बारा बलुतेदार–आलुतेदार, कारू-नारू ही ग्रामव्यवस्थेतली सर्व मंडळी या सोहळ्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहमागी असते.. देवकाठी सर्व गावाला प्रदक्षिणा घालून गतीनं खंडेरावाच्या मंदिराजवळ पोचते. प्रचंड गर्दी मागे घेऊन. खंडेरावाच्या मंदिराला पाच प्रदक्षिणा मारून मंदिरातल्या मूर्तीला अंघोळ घातली जाते. पाच सुवासिनींकडून नंतर सर्वांगाला हळदीनं माखलं जातं. नवीन वस्त्र नेसून पूजाअर्चा होते काठीची पुन्हा पूजा होऊन खंडेरावाची आरती सामुहिक होते. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’, ‘खंडेरावाच्या नावानं चांगभलं’ असा जयघोष होतो. खंडेरावाचं वाहन म्हणजे घोडा.. यावेळी भगत व पाच सुवासिनी लाकडी घोडे खंडेरावाला बहाल करतात. पूर्वी खंडेरावापुढे बोकडाच्या मानेवर तलवारीचा वार करून बळी दिला जायचा. सध्या बोकडाच्या कानाला तलवारीन जखम करून, रक्ताचा थेंब काढून सुताराला बोकड सन्मानाने देऊन टाकतात.
बारा गाड्यांना पाच फेर्या पूर्ण करून पूजा केली जाते. पहिल्या स्थानावर असलेल्या गाडीला ‘लढं’ असं म्हणतात. लढ्याचा ‘हाड्या’ आणि ‘दुसर’ सुताराकडून खास कलाकुसरीनं बनवलेलं असतं… लढ्याच्या हाड्यावर नारळ फोडून, दुसरची पूजा केली जाते. पूजेच्या दुरळीत धान्य, लिंबू, कापूर, उडीद, अंडी, कुंकू, शेंदूर, हळद, अगरबत्ती, धूप आदीचा समावेश असतो. दुरळी लढ्याच्या हाड्यावर अर्पण केली जाते. ब्राम्हणाकडून विधिवत भगताच्या खाद्यामध्ये सुताचा गळ म्हणजेच अकोडा अडकावला जातो व मोठ्या दोरखंडाने लढ्याला जोडले जाते. लढ्यावर वहरातलं जोडपं, ब्राम्हण जोडपं आणि धनगराचं जोडपं…. जयघोष करत चढतात. मोठ्यानं ‘यळकोट यळकोट….जय मल्हार’ … ‘खंडेरावाच्या नावानं चांग- भलं….’ म्हणत भगत बारा गाड्या ओढायला सुरुवात करतो….जयघोषाच्या नादानं सबंध गावातले तरुण बाराही गाड्यांना जोर लावत ढकलतात… ठरलेल्या अंतरापर्यंत गाड्या पोचवून बारा ग़ाड्या ओढण्याचा कार्यक्रम पूर्ण होतो. देवकाठी रात्रभरासाठी खंडेरावाच्या मंदिराबाहेर ठेवली जाते…
गावकरी दर्शन घेऊन…… खेळण्यांच्या दुकानातून बालगोपाळांना हवं ते घेतात, जिलेबी-शेव-चिवडा, कुल्फी आदीची पालं गर्दीत बुडून जातात. रात्री तमाशा पाहत गाव सकाळपर्यंत जागतं…. कडगांवची जत्रा म्हणजे गावकर्यांच्या आनंदाला उधाण.
टीप: बारा गाड्या ओढण्याचा मान– आपल्यावर आलेल्या संकटातून मुक्तता व्हावी म्हणून भक्त खंडेरावाला साकळे घालतो, की जर मी संकटातून मुक्त झालो तर पाच वर्षे बारा गाड्या ओढेन. त्या व्यक्तीला मग पाच वर्षे बारा गाड्या ओढण्याचा मान मिळतो.
मंदरा – हे लाल रंगाचे खादीसारखे कापड असते. त्यास खणंही लावलेला असतो. देवांच्या मूर्ती, जुने ग्रंथ-पोथ्या बांधून ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
माहिती संकलन: गोपीचंद धनगर, मोघे
प्रा. नामदेव कोळी,
कडगाव, ता.जि. जळगाव,
भ्रमणध्वनी : 9404051543,
इमेल : pranaammarathi@gmail.com