जगातील सर्व देशांचे झेंडे एका घरी!

_jagatil-sarv_deshanche_zende_eka-ghari_5_0.jpg

पुण्याचे ध्वज संग्राहक श्रीकांत जोशी यांच्याकडे एकशेदहा देशांचे मूळ ध्वज आहेत. त्यांना ध्वजसंग्रह करण्याचा छंद 1990 पासून जडला. जोशी बालपणी रा. स्व. संघाच्या शाखेत जात. शाखेत ध्वजारोहण आणि ध्वजावतरण ही दोन्ही कामे त्यांच्याकडे असायची. त्यामुळे त्यांना ध्वजासंबंधी आकर्षण वाटू लागले. त्यांना शालेय जीवनातच परदेश, तेथील स्वातंत्र्यलढे आणि राज्यक्रांती यांची माहिती जाणून घेण्याची आवड लागली. जोशी यांना वाचनाची आवड. त्यांनी इतिहास व राज्यशास्त्र या विषयांत एम.ए. केले. त्यांनी वकिलीचे शिक्षणही घेतले आहे.

त्यांना एम.ए.ला राज्यशास्त्रात ‘पश्चिम आशियातील प्रशासन व राजनीती’ हा एक विषय होता. त्यांना त्या विषयाचा अभ्यास करेपर्यंत इस्रायल देशासंबंधी काहीच ठाऊक नव्हते. त्यावेळी त्यांनी नाना पालकरलिखित ‘इस्रायल – छळाकडून बळाकडे’ हे पुस्तक वाचले आणि त्यांच्या मनी इस्रायल हा विषय अभ्यासण्याची इच्छा निर्माण झाली. मुंबईत डॉक्टर गोपाळराव देशमुख मार्गावर (त्यावेळी) इस्रायलचे व्यापारी कार्यालय होते. जोशी यांनी त्या कार्यालयाला, इस्रायलचा अधिक अभ्यास करण्यासंबंधी साहित्य हवे आहे असे पत्र पाठवले. इस्त्रायलची माहिती देणारे पुस्तक, नकाशा, राष्ट्रगीत आणि इस्त्रायलचा टेबल मॉडेल आकाराचा राष्ट्रध्वज आठवड्यानंतर मिळाला. त्यांना त्यांनी स्वतः केलेल्या मागणीला लगेच प्रतिसाद मिळाला हे पाहून कुतूहल वाटले. त्यावेळी त्यांनी ठरवले, की जगातील प्रत्येक राष्ट्राचा राष्ट्रध्वज मिळवायचा आणि त्यासंबंधीची माहितीही संग्रही ठेवायची. त्यांनी परदेशातील स्वातंत्र्यदिन, तेथील राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आदींचे वाढदिवस हेरून त्यांना ध्वजमागणी संदर्भात पत्र पाठवण्याची पद्धत सुरू केली.

अमेरिकेतील ‘नॅशनल फ्लॅग फाउंडेशन’ आणि ‘फ्लॅग रिसर्च सेंटर’ या केवळ दोन संस्था ध्वजांविषयी संशोधन करणाऱ्या आहेत. ‘ध्वजांसाठी आणि ध्वजांकरता काम करणारी संस्था’ अशा नावाने जोशी परदेशांशी पत्रव्यवहार करतात.

_jagatil-sarv_deshanche_zende_eka-ghari_2.jpgध्वजसंग्रहाविषयी जोशी त्यांचा एक चांगला अनुभव सांगतात. सोव्हिएत युनियनचे विसर्जन झाले आणि रशियन फेडरेशनचा ध्वज मिळत नव्हता. तेव्हा जोशी यांनी माजी परराष्ट्र राज्यमंत्री सलमान खुर्शीद यांना पत्र पाठवले. विशेष म्हणजे खुर्शीद यांनी रशियाचाच नव्हे, तर जपान, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन व अमेरिका यांचेही ध्वज पाठवले. जोशी यांना त्याचा फार आनंद वाटला. तसेच, त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती बजाज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छापर पत्र लिहून युनोच्या ध्वजाची मागणी केली. ती गोष्ट 1998 सालची. राहुल बजाज यांनी तो ध्वज जोशी यांना मिळवून दिला.

संग्रहित केलेल्या ध्वजांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावी म्हणून ते स्वतः राष्ट्रध्वजांविषयी व्याख्याने देतात. त्यांनी पहिले व्याख्यान पुण्याच्या जिल्हा परिषद शाळेत ऑक्टोबर 1991 ला दिले. जोशी यांनी ‘विविध राष्ट्रध्वजांचा परिचय’ या विषयावर साडेचारशे व्याख्याने दिली आहेत. ते नेत्यांविषयी स्फूर्तिदायी गोष्टी विद्यार्थ्यांना व्याख्यानात सांगतात. ते प्रत्येक राष्ट्राच्या ध्वजाचा अर्थ आणि ध्वजाविषयी अचूक माहिती सांगतात. ज्या ज्या राष्ट्रांनी ध्वज पाठवले त्यासोबत त्यांनी ध्वजांविषयीची नियमावलीही पाठवली. ध्वजाचा कोठल्याही प्रकारे अवमान होता कामा नये हा त्यातील महत्त्वाचा नियम असतो. तितकी काळजी जोशी आणि त्यांच्या पत्नी, स्मिता घेतात. जोशी बाहेर व्याख्यानाला जाताना सोबत काही ध्वज नेतात आणि एकेका ध्वजाची मुलांना माहिती करून देतात. स्मिता ह्या व्याख्यान संपल्यानंतर सर्व झेंड्यांची घडी घालून व्यवस्थित ठेवतात. जे खराब झाले असतील ते धुऊन त्यांची इस्त्री करून स्वच्छ ठिकाणी ठेवतात.

त्यांच्या संग्रही संयुक्त राष्ट्र संघटना (युनो), युरोपीयन युनियन, ऑस्ट्रेलिया, कंबोडिया, कॅनडा, चीन, सायप्रस, इजिप्त, फ्रान्स, जर्मनी, मॉरिशस, मंगोलिया, आयर्लंड, जपान, नेपाळ यांव्यतिरिक्त भारतीय सेनादल, वायुदल आणि नौदल यांचेही ध्वज आहेत. जोशी पुण्याच्या ‘भारतीय चित्रपट संस्थे’त अधीक्षक पदावर नोकरीला होते. तेथे त्यांनी पस्तीस वर्षें सेवा केली. ते नोकरीतून 2001 साली सेवानिवृत्त झाले.

जोशी राष्ट्रध्वजांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येणाऱ्यांना आवडीने माहिती सांगतात. संयुक्त राष्ट्र संघटनेची एकशेत्र्याण्णव सभासद राष्ट्रे आहेत. जोशी एकशेत्र्याण्णव राष्ट्रांच्या ध्वजांवर मराठीत पुस्तक लिहीत आहेत. जोशी यांची इच्छा आहे, की ध्वजांचा संग्रह आणि त्या ध्वजांविषयी व राष्ट्रांविषयी माहिती सगळ्या लोकांपर्यंत पोचावी. म्हणून ते पुण्यात ‘ध्वजभवन’ निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत.

_jagatil-sarv_deshanche_zende_eka-ghari_3.jpgत्यांच्या पत्नी सासवड येथे कृषी विभागात नोकरीला होत्या. कार्यालयीन कामात असताना, जेवणाची सुट्टी झाली, की स्मिता सासवड भागातील शाळांना भेट देत. तेथे श्रीकांत जोशी यांच्या ध्वजांच्या संग्रहाविषयी सांगून त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यासंबंधी त्या शाळांशी बोलणे करत.

भारताच्या राष्ट्रध्वजाविषयी बोलताना जोशी सांगतात, 22 जुलै 1947 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय ध्वज घटना समितीत सादर केला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ध्वजांविषयी व त्यावरील रंगांचे महत्त्व सांगितले –  ध्वज धर्माशी संबंधित नसून केसरी रंग त्यागाचे प्रतीक, पांढरा रंग पवित्र आणि शांत, तर हिरवा रंग जमिनीशी असलेले नाते दर्शवते. त्यावरील जे चोवीस आऱ्यांचे चक्र आहे. ते चक्र गतिमान, कृतिप्रवण करते असा त्याचा अर्थ होतो.

– श्रीकांत हरी जोशी (02024251023)
नीलांबरी सोसायटी, नवश्या मारुती जवळ,
सिंहगड रोड, पुणे

– शैलेश दिनकर पाटील, patilshailesh1992@gmail.com

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.