छदाम

1. छोटे नाणे

छदाम म्हणजे एक क्षुद्र किमतीचे नाणे हा अर्थ सर्वश्रुत आहे. ‘मी तुझा एक छदामही देणे लागत नाही’ या वाक्प्रचारात तो येतो. दाते–कर्वे कोश, मराठी व्युत्पत्तिकोश आदी कोशांमधून आणि हिंदी कोशांमधूनही हाच अर्थ सामान्यत: दिलेला असतो. क्‍वचित छदाम म्हणजे दोन दमड्यांचे नाणे, वा पैशाचा पाव भाग असेही अर्थ दिलेले आढळतात; पण ते कशाच्या आधारावर ते कळत नाही.

2. महदाईसांचे वस्त्र श्रीचक्रधरप्रभूंचे वास्तव्य भडेगाव (तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव) येथे असताना त्यांची भक्त महदाइसा हिला स्वामींना एक वस्त्र अर्पण करावे अशी इच्छा झाली.’ तिच्याजवळ सोळा दाम होते. तिने आपले मनोगत आपले पूर्वीचे गुरू रामदेव दादोस यांना सांगितले. रामदेव दादोस याने यात कोलदांडा घातला. (अशा रामदेवाचे मुकुंदराजांचे गुरू रघुनाथ अथवा रामचंद्र – ज्याला मुकुंदराज ‘समदृष्टि महेशानु’, ‘निष्कलंक चंद्र’ असे गौरवतात – याच्याशी ऐक्य कल्पणे हा संशोधनक्षेत्रातील मोठा विनोद होय.) दादोसाने महदाइसेला स्वामींचे ठायी उपहार कर असे उचकावले. शेवटी तिने स्वामींनाच विचारले. त्यांनी ‘वस्त्रच घ्या’ असे सांगितले. स्वामींच्या कृपाप्रसादाने तिला एक आसू किमतीचे वस्त्र सोळा दामांत मिळाले. ते तिने स्वामींना अर्पण केले. स्वामी ते वस्त्र पांघरून बसले होते. तो दादोस आले. स्वामींनी वस्त्राचा पदर त्यांच्याकडे टाकत त्यांना त्या वस्त्राची किंमत विचारली. दादोसांनी चटकन ती सोळा दाम सांगितली; कारण महदाइसांजवळ सोळा दाम होते हे दादोसांना ठाऊक होते. नंतर स्वामी आणि दादोस यांच्यात झालेला संवाद अस    

सर्वज्ञे म्हणितले, ‘सोलें दामें आणुनि देयाल : बाइ : देया सोळा दास:’  

'जी: जी: पाऊणा आसू लाहे:’ सर्वज्ञे म्हणितले, ‘पाऊणा आसू आणुनि

 

द्याल: बाइ: देया पाऊण आसू:’ ‘जी: जी: तरि एकि आसु लाहे’ सर्वज्ञे

 

म्हणितले तरि एकि आसु आणुनि द्याल: बाइ: दया एकि आसु:

 

याप्रमाणे दादोस वस्त्राचा भाव वाढवत होते. स्वामी त्यांचा उपहास करत होते.

येथे –

16 दाम – पाळण आसु – एक आसु असा क्रम दिसतो.

डॉ.शं.गो.तुळपुळे संपादित लीळाचरित्रात (2) हा क्रम

सोळा दाम – अठरा दाम – वीस दाम

असा येतो; तर ह. ना. नेने संपादित लीळाचरित्रात(3) हाच क्रम

सोळा दाम – अठरा दाम – वीस दाम

असा येतो. यातून आसू आणि दाम यांचे कोष्टक मांडता येईल. वीस दाम म्हणजे ‘पाऊण आसू’ म्हणता येणार नाही; कारण वीस या संख्येला तीनचा भाग जात नाही. वीस दाम म्हणजे एक आसू होणार नाही; कारण मग पाऊण आसु म्हणजे पंधरा दाम होतील आणि ते महदाइसांच्या गाठी असलेल्या मूळ रकमेपेक्षाही कमी होतील. तेव्हा वरील तिन्ही निर्देशांचा विचार करता.

अठरा दाम = पाऊण आसु

हे कोष्टक नीट जुळते; आणि

24 दाम = 1 आसु

असे ठरवता येते. याचाच अर्थ सहा दाम म्हणजे पाव आसु असा होतो. पाव आसूचे पूर्वीच्या पावली (अथवा चौव्वल) प्रमाणे छोटे नाणे असावे. आणि त्यालाच ‘छदाम’ म्हणत असावेत. मी तुझे चार चौव्वल देणे लागत नाही असाही वाक्प्रचार आहेच.

3. थामोके आणि चिंचोके

स्वामी एकांक वडनेर (वडनेर भुजंगाचे, तालुका आणि जिल्हा अमरावती) येथे असताना ते गोपाळांसह दुसी – ग्राहिक खेळले.(4) दुस म्हणजे छोटा तंबू. त्यात बसून विक्रय करणारा तो दुसी अथवा दोसी. स्वामींनी बाभळीच्या बियांचे दाम केले आणि चिंचोक्यांचे आसू. येथे बाभळीच्या बियांना ‘दामोटे’ असेच म्हटले आहे. तेव्हा दाम गोल आणि आसु चौकानी होटल हे उघड दिसते. आजही मराठवाडा – विदर्भ भागात बाभळीच्या बियांना धामोके म्हणतात. ते दामपासूनच आले आहे.

आक्षेप-परिहार

या सर्व विवेचनावर एक आक्षेप असा की छदाम हा शब्द हिंदी भाषेतही आहे. दाम हे नाणे हिंदी प्रदेशात होते तसे आसु हे नाणे हिंदी भाषी प्रदेशात होते का? आसु नाणे हिंदी प्रदेशात प्रचलित होते याचा स्पष्ट पुरावा सापडतो. पंचराज देवाच्या तहंकपार (जिल्हा काकेर, छत्तीसगढ) शिलालेखात(5) सराहगडाम आछु (सराहगड अथवा सारंगगढ येथील टाकतीळीतील आसु) असा निर्देश आहे. मध्यप्रदेश भागातील इतर अनेक प्राचीन शिलालेखांत आसु नाण्याचे उल्लेख सापडतात.

नेवासे येथे ज्या खांबाला टेकून श्रीज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबावर लेख आहे. त्यात कुणी आपल्या पितामहाने (वीरेश्वरदेवाच्या?) अखंड दीपासाठी तेल मिळावे म्हणून ‘षटकं दत्तं’ असा निर्देश आहे. यात षटक म्हणजे छदाम असावे काय? (6)

संदर्भ:

1) म्हाइंभट, लीळाचरित्र, सं.वि.भि. कोलते, तिसरी आवृत्ती, पूर्वार्ध लीळा क्रमांक 400 2) लीळाचरित्र, सं. शं.गो.तुळपुळे, पूर्वार्ध, भाग पहिला, लीळा क्रमांक 190 3) लीळाचरित्र, सं. ह.ना.नेने, भाग तिसरा, पूर्वार्ध, खंड दुसरा, लीळा क्रमांक 10. 4) वि.भि.कोलते, उपर्युक्त, पूर्वार्ध लीळा क्रमांक 78 5) V.V. Mirashi, Corpus Inscriptionum Indicarum, IV, part ll, p.598 6) IA., IV., pp 353-355  

ब्रह्मानंद देशपांडे – ‘ऐतिहासिक’, 14, अनुपम वसाहत, औरंगाबाद 431 005,

(0240) 233 6606, 09923390614

Last Updated On – 16th Nov 2016

About Post Author