Home अवांतर छंद छंदोमयी प्रसाद देशपांडे!

छंदोमयी प्रसाद देशपांडे!

मी लेखक-कवी, गायक, संगीतकार, दिग्दर्शक, क्रीडापटू, समाजसेवक, कलाकार अशा मान्यवरांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या स्वाक्षरी गेल्या वीस वर्षांपासून जमवत आहे. मला वाचनाची आवड. त्यामुळे मी लेखकाला त्याच्या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया पाठवत असे. काही लेखकांची उलट पत्रे येत. त्यातून माझ्या छंदाचा प्रवास सुरू झाला. मी माझ्या स्वतःच्या लेखनासाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून त्यांचे विचार, मनोगते ऐकण्यासाठी व्याख्यानादी कार्यक्रमांना, नाटकांना जात असे. तेथेही त्यांच्या स्वाक्षरी जमवत गेलो.

मी त्या विविध व्‍यक्‍तींच्‍या जीवनाची -कार्याची माहिती जाणून घेण्यासाठी नेटवर शोध घेत असे. मी त्‍या माहितीच्‍या आधारे त्‍या त्‍या व्‍यक्‍तींची संक्षिप्‍त जीवनचरित्रेदेखील संग्रहित करण्‍यास सुरूवात केली. मी त्‍या टिपणांसोबत त्या व्‍यक्‍तीचा फोटो आणि त्‍या व्‍यक्‍तीची स्‍वाक्षरी जोडली. अशा त-हेने माझ्या संग्रहास माहितीचा आधार लाभला. मी त्‍या संग्रहास ‘जीवन संग्रहासह स्वाक्षरी’ असे नाव दिले.

आमच्या नाशिकचे आणि साऱ्या महाराष्ट्राचे साहित्यदैवत तात्यासाहेब शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या स्मारकामध्ये साहित्यिक मेजवानीचे कार्यक्रम नेहमीच सुरू असतात. मी त्या सर्वाना तेथेही भेटून स्वाक्षरी जमवत गेलो. ते माझ्या संग्रहाचे वैशिष्ट्य ठरले.

माझ्या पत्नीने आणि एका मित्राने या छंदवेडाला दिशा दिली. त्यांनी सुचवले, की मुलांसाठी आणि सर्वांसाठी प्रदर्शने भरवून, त्यांना हा खजिना उपलब्ध करून दिला तर त्यांनाही सर्व जुन्या व्यक्तींची ओळख होईल; त्यांनाही साहित्यकलांची आवड निर्माण होईल. त्यांना त्यातून स्फुरण मिळू शकेल. त्यामुळे पहिले प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकात भरवावे असे माझ्या मनी आले.

_Prasad_Deshpande_2.pngदैनिक ‘दिव्य मराठी’ने माझ्या संग्रहाला प्रतिसाद देऊन २०१५ मध्ये त्यांच्या ‘किड्स कॉर्नर’ या मुलांच्या सदरात रोज ‘एका व्यक्तीचे जीवनचरित्र- तिच्या स्वाक्षरीसह’ हा कॉलम सुरू केला. त्याला छान प्रतिसाद मिळाला. नंतर त्यांनीच कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे पहिला ‘मराठी लिटरेचर फेस्ट’ नोव्हेंबर २०१६ मध्ये भरवला, तेव्हा त्यांनी स्वतःहून त्या संग्रहाचे प्रदर्शन भरवले. ते प्रदर्शन प्रथम कुसुमाग्रज स्मारकात व्हावे ही माझ्या मनातील इच्छा अशी पूर्ण झाली. त्यानंतर राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन नाशकात झाले. तेथेही मला प्रदर्शन भरवण्याची संधी मिळाली. यापुढे ते प्रदर्शन शाळाशाळांतून भरवण्याचा माझा मानस आहे.

मी एका खासगी कंपनीत व्‍यावसायिक पर्यावरण आणि सुरक्षा व्‍यवस्‍थापक पदावर कार्यरत आहे. तो माझा केवळ ‘जॉब’ म्‍हणून नाही, तर ‘पॅशन’ आहे. मी त्‍या विचारातून नाशिकमधील गंगेच्‍या प्रदूषणावर आधारित ‘गंगा माँ का दर्द’ हा लघुपट तयार केला. त्‍यास महाराष्‍ट्र राज्‍य शासनाकडून ‘उत्‍कृष्‍ट लघुपट’ पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. त्या लघुपटला ‘अंकुर चित्रपट महोत्सव’, ‘NIFF चित्रपट महोत्‍सव’ अशा ठिकाणीदेखील पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत. मी पर्यावरण आणि सुरक्षा या विषयीच्या सामाजिक कार्यात सहभाग होत असतो. माझा मी करत असलेल्‍या व्यावसायिक सुरक्षेच्‍या कामासाठी आणि रस्ता सुरक्षेसाठी राज्‍य शासनाकडून दोनवेळा गौरव करण्‍यात आला आहे.

मला या छंदामधून एकच उद्देश आणि हेतू साध्य करायचा आहे, की मुलांमध्ये वाचनाची आणि छंदाची आवड निर्माण व्हावी! वेगवेगळी प्रदर्शने नाशिकमध्ये बऱ्याच वेळा भरवली जातात. माझ्या मनात त्यांना भेट देताना एक विचार आला, की नाशिक आणि महाराष्ट्रातील अशा छंदवेड्या छांदिष्टांना एकत्र करूया, जेणेकरून नवनवीन लोकांच्या ओळखी होतील आणि त्यांचे छंदही पाहण्यास मिळतील. त्यातून ‘छंदोमयी’ या ग्रूपची निर्मिती झाली आहे. ते नावही कुसुमाग्रजांच्या पुस्तकावरून घेतले आहे. त्या ग्रूपमध्ये स्वाक्षरी संग्राहकांच्या सोबतीने नाणी (चलन), चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार, सूक्ष्म शिल्पकार, पुरातन वस्तू संग्राहक, पेन संग्राहक, अक्षर संग्राहक अशा विविध छंदवेड्या व्यक्ती आहेत. महाराष्ट्रातील छंदवेडी माणसे यामुळे एकत्र व्हावीत ही इच्छा.

छंद म्हणजे निखळ आनंद !
छंद म्हणजे अभ्यासपूर्ण रिकामटेकडा उद्योग !
छंद म्हणजे नवनवीन नाती जोडणारा दुवा !
त्यापेक्षा दुसरा आनंद तो काय हवा?

– प्रसाद देशपांडे

About Post Author

Previous articleमी आणि माझे जलसंवर्धनाचे प्रयोग
Next articleथिएटर ऑफ रिलेवन्सची पंचवीस वर्षें
प्रसाद देशपांडे हे नाशिकचे राहणारे. त्‍यांना नामवंत, प्रसिद्ध व्‍यक्‍तींची हस्‍ताक्षरे आणि स्‍वाक्ष-या जमा करण्‍याचा छंद आहे. ते खासगी कंपनीत व्‍यावसायिक पर्यावरण आणि सुरक्षा व्‍यवस्‍थापक पदावर कार्यरत आहेत. ते त्‍यांच्‍या कामाकडे केवळ 'जॉब' म्‍हणून नाही, तर कर्तव्‍य म्‍हणून पाहतात. त्‍या विचारातून त्‍यांनी 'गंगा माँ का दर्द' हा लघुपट तयार केला. त्‍यास महाराष्‍ट्र राज्‍य शासनाकडून 'उत्‍कृष्‍ट लघुपट' पुरस्‍कार प्राप्‍त झाला. तो लघुपट इतर काही चित्रपट महोत्‍सवांमध्‍ये पुरस्‍कारांनी गौरवण्‍यात आला. प्रसाद देशपांडे यांचा पर्यावरण आणि सुरक्षा या विषयीच्या सामाजिक कार्यात सहभाग असतो. त्‍यांना ते करत असलेल्‍या व्यावसायिक सुरक्षेच्‍या कामासाठी आणि रस्ता सुरक्षेसाठी राज्‍य शासनाकडून दोनवेळा गौरवण्‍यात आले आहे. प्रसाद यांना त्यांच्‍या छंदामुळे महाराष्‍ट्रातील विविध छंदवेड्या व्‍यक्‍तींना एकत्र करण्‍याचे वेध लागले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9762262691

1 COMMENT

Comments are closed.

Exit mobile version