चूल – ग्रामसंस्कृतीचा स्पर्श

1
247
carasole

‘चूल’ ग्रामसंस्कृतीतील महत्त्वाचा घटक आहे. चुलीला प्राचीन इतिहास आहे; मानवाला अन्न‍ शिजवून खाण्याची सवय लागली ती चुलीमुळे तीन दगडाची, मातीची, सिमेंटची, पत्र्याची, विद्युत अशा प्रकारे चुलीच्या; रचनेत व आकारात काळानुरूप बदल होत गेला, पण ग्रामसंस्कृतीत मातीच्या चुलीचे महत्त्व कायम  दिसते.

चुलीस खानदेशात ‘चुल्हा’ असे म्हणतात. चूल हे चुलीसाठीचे स्त्रीलिंगी संबोधन असून ‘चुल्हा’ हे पुरूषवाचक संबोधन आहे. चुलीला हिंदीत ‘चुला’ आणि गुजरातीत ‘चुल्हो’ असे म्हटले जाते. चुलीचे खानदेशात ‘उलचूलचा चुल्हा’, ‘सडा चुल्हा ’ किंवा ‘एकोरा चुल्हा’ हे दोन प्रमुख प्रकार असून त्याशिवाय चुलीच्या रचनेनुसार मानण्यात येणारे ‘भोंग्याचा चुल्हा’, ‘पाटीचा चुल्हा’, ‘विटांचा चुल्हा’, ‘दोतोंडी चुल्हा‘, ‘उभा चुल्हा’, ‘डाखोरा चुल्हा,’ व ‘जेवणा चुल्हा’ हे उपप्रकार आहेत.

‘उल्हा’ किंवा ‘उल’ म्हणजे उपचूल. चुलीतून जिच्या आत ज्वाला जातात व ज्यावर दुसरे भांडे ठेवून अन्न पदार्थ शिजवणे शक्य होते अशी उपचूल म्हणजे ‘उलचूल’. अहिराणी भाषेत त्यास ‘उलचुनना चुल्हा’ असे म्हणतात. कुटुंबातील सदस्य संख्येनुसार घरात विविध आकारांच्या चुलींची स्थापना होते. मोठ्या कुटुंबात शक्यतो मोठी चूल म्हणजेच ‘उलचूल’ दिसून येते. छोट्या कुटुंबात ‘सडा’ किंवा ‘एकोरा’ चुल्हा दिसतो. काही ठिकाणी दोन ‘सडे’ चुल्हे एका ठिकाणी स्थापून मोठी चूल बनलेली असते. त्यास ‘दातोंडी चुल्हा’ म्हणतात.

चुलीवर तवा तसेच इतर भांडी व्यवस्थित बसावीत व ज्वालांची आच नीट लागावी म्हणून चूल व उलचुलीवर मातीचे उंचवटे बनवले जातात. त्यांना ‘टोने’, ‘बाहुले’ किंवा ‘थानं’ म्हणतात. उंचवटे मुख्य चुलीवरच्या‍ काकणीवर तीन व उल्ह्यावर चार अशा संख्येने असतात. ते स्तनांच्या आकाराचे असल्याने त्यांना ‘चुल्याचे थाने’ असे म्हणतात. चुलीसमोर विस्तव ओढून भाकरी शेकण्यासाठी जो छोटा पसरट ओटा असतो त्याला ‘वटली’, ‘परोटी’, ‘भानस’ किंवा ‘भानसी’ असे म्ह्टले जाते.

चुलीस हवा लागू नये म्हणून चुलीच्या मागे छोटी भिंत उभी केली जाते. तो ‘भानवसा’ किंवा ‘भानोसा’. भानवशात आगपेटी, चिमणी, मीठ आदी आवश्यक सामान ठेवण्यासाठी ‘गोखला’ तयार केलेला असतो. सांडशी (पकड), फुकणी (फुंकणी), लाटणे, सराटा (उलथनं), कडची (चमचा) या वस्तूही भानोशालगत ठेवलेल्या आढळतात. चुली गावात रोख पैशांनी विकल्या जातात. पूर्वी चुली धान्याच्या बदल्यात कुंभाराकडून मिळायच्या. काही गृहिणी घरी स्वतः मातीच्या चुली बनवतात. मात्र गृहिणींनी घरी तयार केलेल्या चुलीत ब-याचदा दोष राहण्याची शक्यता असते. कधी चुलीचे तोंड आकाराने मोठे झाल्यास सरपण भराभर जळते तर कधी चुलीच्या तोंडाचा आकार लहान झाल्याने सरपण कोंबले जाऊन खूप धूर होतो. अथवा काही ठिकाणी, घरी चूल बनवण्यासाठी कुंभारणीला बोलावले जाते. चूल जुनी अथवा नादुरुस्त  झाल्यास गृहिणी घरच्या घरी पिवळ्या व पांढ-या मातीचा लेप लावून दुरुस्त करू शकते.

चुलीसाठी पिवळी माती, ‘लिद’ म्हणजेच घोडा किंवा गाढवाची विष्ठा व राखेचा वापर होतो. पिवळ्या मातीचा चिखल पायाने मळून, त्यातील मातीचा चिकटपणा कमी करण्यासाठी गाढवाची वा घोड्याची लिद वापरली जाते. मातीला टणकपणा येण्यासाठी राखेचा वापर केला जातो. चूल तयार करताना घरातल्या शेर, आस्तोरे, सारोटा, ताटली या वस्तूंचा उपयोग होतो. चूल घरच्या घरी बनवताना डाव्या हाताने काम करणारी स्त्री  ‘डाखोरा चुल्हा ’ व उजव्या, हाताने काम करणारी स्त्री ‘जेवत्या अंगाचा चुल्हा’ बनवताना काळजी घेते. चूल ही अग्निदेवता असल्याने सूर्यनारायणाकडे चुलीचे मुख असावे व दक्षिण दिशा अशुभ असल्याने चूल दक्षिणमुखी स्था‍पू नये असा संकेत आहे. साधारणतः, चुलीची मांडणी तिचा धूर घराबाहेर सहज निघेल अशा ठिकाणी केली जाते. म्हणून गावांमध्ये घरोघरी चुली घराबाहेरच्या ओसरीत आढळून येतात. ज्यांना शक्य असते त्या  घरी सिमेंट पाईपच्या‍ आधारे चुलीचा धूर बाहेर फेकण्याची व्यवस्था केली जाते. त्यासाठी धाब्यातून चुलीपर्यंत पाईप जोडला जातो. अशा चुलीस ‘भोंग्याचा चुल्हा’ असे म्हणतात.

नवी चूल शक्य तो दिवाळी, आखाजी (अक्षय तृतीया), गुढीपाडवा, रोट या सणांचे औचित्य साधून घरी आणतात. याखेरीज लग्न, कर्णछेदनाचा कार्यक्रम, भाऊबंदकीचे देव, मानता आदि शुभप्रसंगी नवी चूल घरात आणण्याची प्रथा आहे. लग्नघरी चूल वाजत-गाजत आणली जाते.

‘चूल’ उर्जेचे प्रतिक आहे. ‘चूल’ सर्जनशील असून ते नवनिर्मितीचे प्रतिक मानले जाते. पूर्वी चूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र/जगणे आहे असे मानले जायचे. चुलीचे गुणधर्म स्त्रीमध्ये व स्त्रीचे काही गुणधर्म चुलीत आहे. उदाः चुलीचे थाने (स्तन), चुलीची आग (नवसृजनाची क्षमता) शरीरशास्त्र व भौतिक शास्त्रानुसार स्त्रीच्या.शरीरानुसार चुलीची निर्मिती झाली असल्याचे मानले जाते. ‘चूल’ या शब्दाची व चुलीची उत्पत्ती स्त्री योनीशी म्हणजेच नवनिर्मितीशी संबधित आहे. मोकळे बोलण्याचे स्वातंत्र्य बोलींमध्ये असल्याने ‘चूल’ हा शब्द ‘चूत’ म्हणजे स्त्री योनी पासून निर्माण झालेला असल्याचे मत आढळते. कारण बोली भाषेत हे शब्दं उघड-उघड बोलले जातात.
चूल आणि स्त्री दोघी अन्नदाता आहेत. चूल फुलली अथवा तवा फुलला अथवा हसला, या शब्द‍प्रयोगांचा अर्थ ‘पाहुणे येणार किंवा भांडण होणार’ असा मानला जातो. चुलीच्या दुरुस्ती संबंधीची कामे स्त्री करते. मुख्य काकणीतला एक उंचवटा म्हणजेच थाना तुटला असेल तर भांडे व्यवस्थित बसावे म्हणून ‘शिकोरी’ (उलटी पणती) लावून समतोल साधला जातो. चुलीसाठी सरपणाची आवश्यकता असते. तुराट्या, पह्यकाट्या, तरोड, रूचकीन, तिळकाड्या हे सरपण हलके असून ते लवकर पेट घेते. त्यांचा चुलीमध्ये जळण म्हणून उपयोग करतात. सुबाभूळ, एलार तुर, बोर, भोकर, कडू‍लिंब, सोंदड, हिव्वेर, आंबा या झाडांचे व फुलझाडांचे कोरडे सरपणही चुलीसाठी वापरले जाते. वड, पिंपळ, उंबर ही झाडे हिंदू संस्कृतीत पुजनीय असल्याने हिंदू धर्मीय घरातील चुलीत या झाडांच्या लाकडांचा सरपण म्हणून वापर होत ना‍ही. चुलीसाठी सरपण म्हणून गोव-या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. गाईगुरांची विष्ठाच सुकवून त्यापासून तयार केलेल्या गोव-या चुलीत वापरल्या जातात. या गवरीची राख व लाकडांचा कोळसा दात घासण्या साठी वापरला जातो.
चुलीवर अन्न मंदगतीने शिजत असल्याकारणाने चुलीवरील स्वतयंपाक रूचकर व चविष्ट लागतो. शहरात स्थलांतरित झालेली कुटुंबे गॅस, इलेक्ट्रॉनिक्स शेगडी, सौरचूली आदींच्या साह्याने स्वयंपाक बनवतात. पण सणासुदीच्या, दिवशी तसेच रोट, गोंधळ, देवांचा कार्यक्रम आदी प्रसंगी आवर्जून चुलीवर स्वायंपाक तयार केला जातो. चुलीवर ठेवलेल्या भांड्यात अन्न, शिजत असताना चुलीच्या तोंडातून (सरपण सारण्याची जागा) बाहेर पडणा-या उष्णतेचाही वापर करून घेतला जातो. त्या, ठिकाणी भाक-या-पापड भाजले जातात. सांबारात आवश्यक असलेला कांदा लांब तारेमध्ये अडकवून पेटत्या चुलीत भाजतात. भरीत करण्यासाठी वांगे चुलीत टाकले जाते. तर आंब्याची कोय चुलीमध्ये भाजून फोडून खाल्ली जाते. चुलीत भाजलेली कच्ची केळी, बटाटे, बोंबिल, मासे, अंडी, मांस चविष्ट लागते. सतत पेटत्या चुलीवर असलेल्या तव्याचा काळा बुरसा (काळी कल्हई) जखमेवर लेप म्हणून लावतात.
चूल ही कुटुंबाची अन्न्दाता असल्याने चुलीचे स्थान आद्य आहे. गृहिणी घरादाराची सारवण, पोतारा करताना सर्वप्रथम चुलीला पोतारा करते. पाहुणचार अथवा सणासुदीच्या तळणीतला पहिला घास चुलीत टाकला जातो. आखाजीदिवाळीचा फराळ करण्याआधी चुलीचे पुजन केले जाते. चूल हा घर या संकल्पनेचा कणा मानला जातो. घरातली चूल म्हणजे अवघे कुटुंब म्हणून खानदेशात एखाद्या कुटुंबास जेवण्यास आमंत्रित करण्यासाठी ‘चुल्ह्या ले निवतं’ म्हणजेच ‘चुलीस निमंत्रण’ असे म्हणण्याची प्रथा आहे.

जेवताना चुकून तोंडातून खाली पडलेला घास पेटत्या चुलीस अर्पण केला जातो. दृष्ट काढताना ओवाळलेले मिठ-मिरची चुलीत टाकले जाते.

त्यांची तडतड ऐकू आली म्हणजे दृष्ट काढलेल्या व्यक्तीवरील वाईट सावली नष्ट झाली असे मानले जाते. खानदेशात एखादा अविवाहित मुलगा मरण पावला तर त्याला रडायला येणा-या महिला ‘लगन हुईसन गेल्हाय आस्ता  तं… चुल्ह्या -उल्ह्यात आला असता.’ अशा त-हेच्या रूदनातून त्या तरुणाची चूल न मांडली गेल्याची खंत व्यक्त करतात.

लग्नाच्या आदल्या दिवशीच्या संध्याकाळी, स्वयंपाकापूर्वी लग्नघरी हळदकुंकु-अक्षतांनी चुल्ह्याची पूजा केली जाते. चुलीवर तयार झालेल्या अन्नाचा घास चुलीस अर्पण करून, अग्निदेवतेची पूजा करून पुढील गाणे म्हटले जाते.

चुल्हा म्हणे मी चूलदेव, चुल्हा् चंदन कपाटी|
चंदन बये गाडोगंती, कोन करीन सोभनं ||१||
नवरदेवचा बाप दुन्यादारी, चारी पंगता देल्ह्या भारी|
आन शिजे सव्वादखंडी, ह्या आनाची किरती मोठी||२||
लोकं जेवती लाखोगंती, लोकं तिरपती होती|
लोक घरोघरी जातीन, चांगला आशिर्वाद देतीन||३||

लग्नात नवरदेव-नवरीचे तेलन पाडण्याची प्रथा आहे. त्या प्रसंगी नवरदेव नवरीच्या कुलदैवत, गोत्र, आदींचा उल्लेजख या प्रकारच्या गीतांमधून करतात. त्यात चुलीचाही निर्देश असतो.

लग्नाच्या विधीने दोन कुटुंबे एकत्र येतात. ग्रामीण भागात मात्र वधूची आई नवरदेवाच्या घरी शक्यतो जात नाही. लग्नानंतर लगेच वरमाय विहिणबाईला मुलीचे वैभव पाहण्या‍साठी सन्मानपूर्वक बोलावते. खानदेशात या प्रथेनुसार ‘चुल्याही ले पाय लायाले या’ असे म्हणून वधूच्या आईला बोलावतात. चुल्ह्यास पाय लावणे म्हणजे घराला पाय लावणे, म्हणजेच मुलीचे वैभव पाहायला येणे असा अर्थ होतो. ‘घर म्हणजे ‘चूल’ आणि ‘चूल’ म्हणजेच ‘घर’ ही संकल्पना गावाकडे आहे. पूर्वी सार्वजनिक जेवणावळींच्या वेळी अन्न शिजवताना चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला जाई.

चुलीस देव्हा-याप्रमाणे पवित्र स्थान मानले जाते. म्हणून मांस शिजवल्यावर दुस-या दिवशी अथवा रात्री पोतेरा करून चूल स्वच्छ केली जाते. तसेच स्त्रीला पाळी येणे हा विटाळ मानला जात असल्याने पाळी जाण्याच्या कालावधीत स्त्रीने चुलीस स्पर्श करू नये असे मानले जाते. चुलीत पाण्याची गुळणी अथवा थुंकी टाकणे, अथवा चुलीस पायाने स्पर्श करणे अशुभ मानले जाते. नवीन बाळ जन्मलेल्या घरात चुलीवर पदार्थ तळले जात नाहीत, तसेच फोडणी देऊन भाजी केली जात नाही. नागदिवाळीच्या दिवशी चुलीवर तवा ठेवत नाहीत, कारण पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर असून नागदिवाळीला जर तवा (शेषाच्या फण्याच्या आकाराचे भांडे) चुलीवर ठेवले तर अनर्थ होईल असा समज आहे. म्हणून नागदिवाळीच्या दिवशी भाकरी-पोळ्यांऐवजी कणकेचे दिवे उकडून खिरीसोबत खाल्ले जातात. दिवाळीच्या दिवशी शेतकरी त्याच्या जगण्यातल्या आवश्यक व आराध्य असणा-या शेत, गोठा, उकिरडा, मुळदैवत-ग्रामदैवतांच्या देऊळ अशा ठिकाणांवर दिवा लावतो. चूल ही कुटुंबातली आराध्य देवता, अग्नीदेवता असल्याने त्या दिवशी सर्वप्रथम चुलीवर दिवा लावला जातो. कडाक्याची थंडी, पावसाच्या झडी असताना जेवण आटोपून कुटुंबातली सर्व लहान-सहान मंडळी चुलीभोवती जमून अंग शेकत गप्पा करतात.

चुलीचा प्रभाव स्वयंपाक घराबाहेर जसा सांस्कृतिक क्षेत्रात जाणवतो; तसाच तो भाषेतही दिसून येतो. अनेक शिव्या, म्हणी, वाक्यप्रचारांमधून चूल आणि तिचा घर-माणसांशी असलेला स्पर्श व्यक्त होतो.

चुलीला अक्षता लागणे – घरातल्या माणसांना दुसरीकडे जेवावयास जायचे असल्याने चुलीने न पेटता राहणे. कोणतेही धर्मकृत्य संपले म्हणजे ब्राम्हण अक्षता टाकून ते संपले असे सूचित करत असतात. त्यावरून हा वाक्यप्रचार मराठीत आला.

चुलीतून निघून वैलात पडणे – आगीतून निघून फोपाटयात पडणे.

चुलीजवळचा वशिला असणे – घरमालकीणीशी जवळीक असणे.

चुलीवरचा संसार – गरिबी असणे, हातावरचा संसार.

चूल मांडणे – वेगळा संसार थाटणे.

चूल विझणे – घर उध्वस्त. होणे.

चुलीत जा (असे म्हणणे) – तिरस्कासर करणे.

चुल्या भानोश्या  – बाईच्या अधीन असलेला पुरूष.

चुलीस पाय लावणे – घरदार पाहायला येणे.

घरोघरी मातीच्या चुली – सगळीकडे सारखी परिस्थिती.

अशा अनेक वाक्यप्रचारांमध्ये चुलीचा उल्लेख आढळतो. नवविवाहीत पुरूष पत्नीच्या मागेमागे जाऊ लागला अथवा तिच्याजवळ सारखा असू लागला तर त्यास ‘काय चुलीला पाय लावून बसलाय, चुल्या भानोश्या’ असे चिडवले जात असे.

चुलीचा उल्लेख असलेल्या अनेक म्हणीदेखील आढळतात.

चुलीनं लाकुड चुलामाच बयसं – चुलीचे लाकुड चुलीतच जळते.

चुलाना मांगे भानचीन, भानवसा – सतत सोबत असणे, सोबत असतेच.

चुल्ह्याची माटी आगीन खाये – दुस-यासाठी सतत झिजणे.

‘माझे खाणे चुलीत’ – बाहेरून निरिच्छा- दाखवणा-र्यांची लबाडी दाखवण्यासाठी ही म्हण वापरतात.

तवा खातो भाकरी, चुल्हान भुकेला – जो परिश्रम करतो त्या‍च्या  वाटेला उपासमार किंवा एकाच्या  परिश्रमाचे फळ दुस-याला मिळणे.

आग्या, काजवा टाकीसनी, चुल्हात पेटत नाही – वरवरचे दिखाऊ कृत्य  केल्या‍ने कार्यसिध्दी होत नाही.

सयपाकी भारी अन् चुल्हाज मागच्या दारी – मुद्दाम अडचण निर्माण करणे.

सुली सांगे बुलीले अन् दोन्ही पाय चुलीले – दुस-यास तत्वज्ञानाचे डोस पाजणे.

नट मोगरी, चुलानी गवरी – नखरेल बाई इतरांना लगेच मोहित करते.

मनाले नाही पटलं अन् मीठाचं गाडगं चुल्ह्या वर फोडलं – त्रागा करणे.

चुलीची जागा हळुहळू गॅस, शेगडीने घेतली असली तरी चुलीप्रमाणे त्यांना सांस्कृतिकतेचा स्पर्श लाभलेला नाही. कदाचित पुढील दशकभरात चूल दैनंदिन वापरातून हद्दपारही होईल. मात्र तिने प्रत्येकाच्या मनात आणि आठवणीत जे स्थान मिळवले आहे ते कायम राहील.

संदर्भः

१. डॉ. सुर्यवंशी रमेश – खानदेशातील कृषम जीवन सचित्र कोश, म.रा.सा.आ.वी.सां.म. मुंबई प्रथमावृत्ती- २००२ डिसें. पृष्टज क्र.१६ व १७
२. ग्रामीण बोलीचा शब्दकोश – द.ता. भोसले
३. अहिराणी वाग्वै भव – पाटिल अभिमन्यू
४. ‘घरोघरी नाहीत आता मातीच्या चुली’ – प्रा. राजन गवस (सकाळ सप्तारंग दि- २४-१-२०१०)
५. बहिणाबाईंची गाणी – चौधरी सोपानदेव
६. संपुर्ण विधीसह लग्नातील गाणी – डॉ. देसाई वापुराव
७. ‘अहिराणीनी नई पिढी, इसरत चालली जुनी रूढी’ – पाटील कृष्णास (लोकमत दिवाळी अंक २०११) ८. महाराष्ट्रातील समग्र बोलींचे लोकसाहित्य शास्त्रीय अध्ययन – डॉ. देसाई बापुराव
८. मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी– वा.गो. आपटे

टिप –
वाइल – चुलीचा वैल
अवेला – चुलीचा महत्वाचा भाग
वैल – चुलीला जोडून असलेली अवेल
वरधणी – चुलीवरच्या भांडयावरचे आच्छादन
भानोसी/भानवसी – चुलीच्या पुढील छोटा ओटा
भानवस/भानवसा – चुली मागचा ओटा/वरंडी
चूल – चु+उल म्हणजेच उल्ह्याच्या. बाजुला व उल्ह्यासह असलेली ती चूल.

नामदेव कोळी,
कडगाव, ता.जि. जळगाव,
९७६६०८९६५३, ९४०४०५१५४३,
kolinamdev@gmail.com

Last Updated On – 17 June 2016

About Post Author

1 COMMENT

  1. चुलीबद्दल सुंदर परिपूर्ण
    चुलीबद्दल सुंदर परिपूर्ण अप्रतिम माहिती .धन्यवाद !

Comments are closed.