चिमणी वाचवण्याचा संकल्प

1
37
_ChimaniVachavnyacha_Sankalp_3.jpg

आमची जुनी पिढी भाग्यवानच म्हणावी लागेल! आम्ही चिमण्यांना अंगणात दाणे वेचताना पाहिले आहे. झाडांवर, रस्त्यांच्या कडांवर, टेलिफोनच्या वायरीवर समूहाने मुक्त विहार करताना, कधी चिवचिवाट तर कधी नुसताच लपंडाव. शाळकरी मुलांना तर चिमण्यांचा फारच लळा असे. बांबूच्या कामटीने टोपली तिरकी उभी करायची. कामटीला दोरी अडकवायची. टोपलीखाली ज्वारी-बाजरीचे दाणे टाकायचे. चिमण्या दाणे वेचत असताना दोरी ओढून टोपली खाली पाडायची. मग हळूच हात घालून एकेक चिमणी बाहेर काढायची व निळ्या, काळ्या, लाल रंगाच्या शाईंनी त्यांचे पंख रंगवायचे. मुलांनी त्यांची त्यांची चिमणी रंगानुसार ठरवायची व चिमण्यांना उडवून द्यायचे. आमचा हा खेळ थोडासा विक्षिप्त वाटत असला तरी त्यात चिमण्यांचा घातपात हा हेतू नव्हता. मुलांचे मानस चिमण्यांशी जवळीक साधण्याचे असायचे. चिमण्या हा आमच्या बाल जीवनाचा अविभाज्य घटकच होता म्हणा ना!

पूर्वी, अंगणात वाळवणे घातलेली असायची. धान्य निवडताना त्यातील अळ्या लिलया बाहेर फेकल्या जात. चिमण्या त्या वेचून फस्त करत. वळचणीला घरटे करून राहणाऱ्या चिमण्यांना अळ्या, कीडे, पाली इत्यादी खाद्य भरपूर उपलब्ध असायचे. चिमण्यांना सूर्यप्रकाश, पाणी आणि माती अंगावर घेण्यास खूप आवडे. शहरात सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे राहिल्यामुळे त्यांचा निवाराच नष्ट झाला आहे. त्या बेघर झाल्या आहेत. मोबाईल टॉवर्सच्या किरणोत्सर्गामुळे आणि कावळे व कबुतरे यांच्या सुळसुळाटाने तो चिमुकला जीव बेघर होऊन परागंदा झाला.

चिमण्यांची संख्या कमी होत असल्याची खंत जगभरात सर्वच देशांना जाणवू लागली आहे. चिमण्यांची संख्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी वाढणे गरजेचे आहे. त्या कीटकभक्ष्यी असल्याने शेतकऱ्यांना त्या मित्र म्हणून हव्या आहेतच. जागतिक चिमणी दिवस 20 मार्च हा घोषित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत वनविभाग नॅचरल हिस्टरी सोसायटी अशा संस्था पुढे सरसावले. शालेय शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संकल्प इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापक ज्योती परब त्यात सामील झाल्या! संस्थाचालक श्री. राज परब त्यांच्या प्रत्येक कल्पनेला मूर्तरूप देण्यास सदैव तत्पर असतातच. शाळेचे शिक्षक, कर्मचारी व सर्वात महत्वाचे म्हणजे उत्साही विद्यार्थी सेना व त्या पाठोपाठ पालक मंडळी या ‘चिमणी बचाव’ मिशनमध्ये सहभागी झाली.

“चिमण्यापाखरांचे चिमणे गं घरकुल
चिमणे पंख मऊ, चिमणी गं किलबिल.”

_ChimaniVachavnyacha_Sankalp_5_0.jpg‘चिमण्या वाचवा’ ही मोहीम संकल्प शाळेच्या मंडळींनी पूर्वीपासूनच कार्यान्वित केली होती. शाळेने गत वर्षी ‘एक विद्यार्थी एक घरटे’ हा मंत्र मुलांना दिला. वानरसेनाच ती. शाळेच्या सुमारे हजार विद्यार्थ्यांनी हजारच्या ठिकाणी पंधराशे घरटी तयार केली. प्रत्येकाच्या घरी एकेक घरटे लावण्यात आले. शाळेच्या दर्शनी भागात शेकडो घरटी लावण्यात आली. पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मुलांनीच मूठमूठ ज्वारी-बाजरी-तांदळाच्या कण्या गोळा केल्या. कित्येक किलो धान्य गोळा झाले! मुलांच्या समित्या गठित करून चिमण्यांना दाणा-पाणी देण्याची जबाबदारी आलटून पालटून त्यांच्यावर सोपवण्यात आली. हे करत असताना विद्यार्थ्यांचा उत्साह व त्यांना मिळणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता.

खरी गंमत तर तेव्हा घडली जेव्हा ती घरटी बोलू लागली! घरट्यांना कंठ फुटला. एक आली, दुसरी आली, मग तिसरी नी चौथी! चिमण्या आल्या, निवांतपणे घरट्यात विसवल्या आणि काही दिवसांतच नवागतांची चाहूल लागली. इवल्या चोची आ वासून उभ्या आणि मग माताही त्यांच्या चोचीत अळ्या, किडे भरवताना किती किती आनंदी दिसू लागल्या.

बालमनातही त्यांचा हातभार चिमण्यांच्या त्या आनंदाला लागला आहे. या भावनेने कर्तव्यपूर्तीचे भाव अंकुरले. संकल्प शाळेच्या मुलांनी 2018 यावर्षीही पन्नास नवी घरटी तयार केली. पाचवी ते दहावीचे विद्यार्थी त्यात सहभागी झाले. शाळेसोबतच येऊर व उपवन परिसर या ठिकाणी घरटी लावण्यात आली. शाळेने तो अवलंबल्यामुळे समाज जीवनावर याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे जाणवू लागले. कोणत्याही सत्कर्माचा प्रारंभ हा स्वतःपासून व्हायला हवा. म्हणूनच ‘Charity begins from home’ असे म्हटले जाते. चिमणी संरक्षण व संवर्धन कसे करावे याचे बाळकडू मुलांना यातून मिळाले असल्याने संकल्पसिद्धी होतांना दिसली. एका हिंदी बालगीतात म्हटले आहे,

“चू चू करती आता चिडिया
दा
ना चुग, उड जाती चिडिया ।”

मनुष्य सिमेंटच्या घरात राहत असला तरी प्राणीमात्राविषयीची त्याची आस्था कमी झालेली नाही. घराच्या भिंतीवर चिमण्यांचे फोटो, कलाकृती, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या चिमण्यांच्या प्रतिकृती लावलेल्या आपण पाहतो. ही या प्राण्यांविषयी रक्तातील ओढच नाही का! आणि आता तर घरट्यांच्या निर्मितीमुळे चिमण्यांची किलबिल कानी पडू लागली तर कोणाला बरे आनंद होणार नाही? कवी ग्रेस यांनी ‘चिमण्या’ या ललित लेखात लिहिले आहे – घरात चिमण्यांनी उच्छाद मांडला म्हणून त्यांची घरटी खरडून काढून अंगणात जाळून टाकली तेव्हा त्यांना शांत वाटू लागले. पण घरात चिमण्या नाहीत, ही गोष्ट त्यांना असह्य झाली. त्यांनी खराट्याच्या काड्यांचे डबे भरून ठेवले. इच्छा अशी की चिमण्या येतील व पुन्हा घरटी बांधतील, पण तसे झाले नाही. चिमण्या याच महाशयांनी आमच्या कुळाचा सर्वनाश व्हावा म्हणून अंगणात घरटी जाळली. हे विसरू शकल्या नाहीत. बोध असा, की दुखावणे सोपे असते सुखावणे कठीण. साने गुरुजी म्हणायचे, “दुखावू नका या सौंदर्याला!” Beauty is only to see not to touch हेच खरे.

_ChimaniVachavnyacha_Sankalp_2.jpg‘चिमणी वाचवा’ हा संदेश घराघरात पोचवण्यात नियोजनकर्ते यशस्वी झाले. संकल्प शाळेचा प्रयत्न मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्याकडे नेहमीच असतो. त्या निमित्ताने एक नवी कल्पना सुचली. मुलांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित केला तर? मुलांना तसे आवाहन करण्यात आले. पर्यावरणविषयक कविता जमा झाल्या. ज्योती परब व राज परब या गोडजोडीने ‘चिमुकली चिऊताई’ या नावाचा कविता संग्रह संपादित करून प्रकाशितही केला. परबसरांनी सर्वच क्षेत्रातील माणसे स्नेहाच्या धाग्यात बांधली आहेत. ‘चिमुकली चिऊताई’ या कवितेला प्रस्तावना हवी होती. कवी अरुण म्हात्रे यांनी ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली. दुग्धशर्करा योग जुळून आला. मुळात विषय नाजूक व जिव्हाळ्याचा त्याला स्पर्श झाला सिद्धहस्त हळव्या हाताचा! त्या कवीला शुभ्र उन्हाचा पहिला पंचम गाणाऱ्या चिमण्या जिवाभावाच्या वाटतात. ‘चिमणी ही त्या हिरव्यागार निसर्गाचे चिवचिवणारे, गाणारे प्रतीक आहे, या वाक्यात सर्व काही आले. म्हात्रे यांनी हे पुस्तक चिमण्यांच्या चिवचिवाटासारखे रुमझुम होवो. अशा शुभेच्छा दिल्या. म्हात्रे यांनी “संकल्प शाळा पर्यावरणाच्या कामात भरारी घेवो”, अशी सदिच्छाही व्यक्त केल्या आहेत.

‘चिमणी वाचवा’ या अभियानात सहभागी झालेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान-परिक्षेत्र येऊरचे वनाधिकारी संजय वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, ‘चिमण्यांचे जैवविविधतेमध्ये असलेले महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचावे व यासाठी असा दिवस मोठ्या प्रमाणात व मोठ्या संख्येने साजरा होण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन केले.

ठाणे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे कौतुक दरमले यांनी “पर्यावरणासाठी काही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे”, असे मार्गदर्शन कार्यक्रमात सांगितले.

आंग्ल कवींनी व्यक्त केलेले भाव सर्वांना जगता यावे, ते असे

“The flitter of your tiny wings
What a joy to my heart it brings
I long to see you fly
Joining friends, wishing mi goodbye.”

– डॉ. राम नेमाडे

About Post Author

1 COMMENT

  1. खूप सुंदर भावस्पर्शी…
    खूप सुंदर भावस्पर्शी शब्दांकन.चिमणी वाचवण्यासाठी मीही सतत प्रयत्नशील असते आणि या प्रयत्नातूनच आज चिमणी विषयी माहिती शोधत असताना आपला लेख वाचावयास मिळाला.निसर्ग संवर्धनासाठी आज प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे.प्रत्येकाने आपला छोटासा वाटा उचलला तरी खूप मोठे काम होणार आहे.खूप सुंदर लेख आणि तितकेच महत्वपूर्ण कार्यही.. सलाम आपल्या कार्याला???

Comments are closed.