चित्रकार ग.ना. जाधव

1
149
_Bolkya_Rangacha_Chitrakar_2_0.jpg

चित्रकार ग.ना. जाधव यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्या-त पोचले ते ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ या मासिकांवरील त्यांच्या आकर्षक मुखपृष्ठांमुळे. त्या मासिकांचा महत्त्वाचा वाटा गेल्या शतकात महाराष्ट्रात झालेल्या परिवर्तनात होता. साहजिकच, त्या मासिकांची मुखपृष्ठे रंगवणार्याा, सजावटीसाठी कथाचित्रे काढणार्याम त्या चित्रकारांची चित्रकला, महाराष्ट्रातील परिवर्तनाशी जोडली गेली आणि त्या चित्रकारांच्या कुंचल्यातून बदलत गेलेला महाराष्ट्र चित्रबद्ध झाला! ग.ना. जाधव यांच्या मुखपृष्ठांवरील विविध प्रसंगचित्रांतून त्यांचे सूक्ष्म निरीक्षण, दृक्-कल्पकता व त्या संकल्पना चित्रांतून साकार करण्याचे सामर्थ्य प्रत्ययाला येते. तत्कालीन साहित्य, कथाचित्रे व मुखपृष्ठे यांमधून राजकीय घडामोडी, सामाजिक घटना, उत्सवांचे सार्वजनिक व कौटुंबिक स्वरूप, प्रियकर-प्रेयसींचे स्वप्नाळू जग किंवा तरुण पती-पत्नींचे हळुवार, थट्टेखार, भावुक विश्व असे अनेक विषय हाताळले गेले. ते ग.ना. जाधव यांच्या चित्रकृतींतून प्रभावीपणे व नेमकेपणाने उमटले. त्यांच्या चित्रनिर्मितीची वैशिष्ट्ये प्रभावी रेखाटन, मानवाकृतींचा सखोल अभ्यास, हावभाव व्यक्त करण्याची हातोटी व विषयानुरूप वातावरणनिर्मिती ही आहेत. ग.ना. जाधव हे अभिजात कलेची मूल्ये जोपासत वास्तववादी शैलीत निर्मिती करणारे उत्तम चित्रकार होते. त्यांच्या वास्तववादी शैलीतील दर्जेदार चित्रनिर्मितीत व्यक्तिचित्रे, प्रसंगचित्रे, निसर्गचित्रे, अभ्यासचित्रे आणि मासिकांची मुखपृष्ठे व कथाचित्रे यांचा समावेश आहे.

ग.ना. जाधव यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष 14 नोव्हेंबर 2017 पासून सुरू झाले. जाधव हे मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे कुटुंब मोठे होते. त्यांचे शालेय शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले. त्यांना चित्रकलेची आवड लहानपणापासून होती. त्यामुळे त्यांना शाळेतील चित्रकलाशिक्षक बाबा गजबर यांचे प्रोत्साहन मिळे. त्यांनी त्यांचे वडिलबंधू बंडोपंत यांच्या शिंपीकामाच्या दुकानात उमेदवारी काही काळ केली. कोल्हापूर हे कलेप्रमाणे कुस्ती करणार्याा पहिलवानांसाठीही प्रसिद्ध होते. बंडोपंत पहिलवानांचे जांगे शिवत. गजाननरावांची दोस्ती एका पहिलवानाशी, उस्तादाशी झाली. ते कुस्ती शिकले, त्यात रमलेदेखील. त्यांनी कुस्तीत बक्षिसेही मिळवली. त्यांनी एका टेलरिंग फर्ममध्ये अॅ प्रेंटिस म्हणूनही काम केले. चित्रकार गणपतराव वडणगेकरांनी चित्रकलेचा क्लास जाधव यांच्या घराच्या वरील मजल्यावर 1932 साली सुरू केला. गजाननरावांच्या वडिलांनी गजाननची चित्रकलेची आवड बघून वडणगेकरांना सांगितले, की तुम्ही भाडे दोन रुपये द्या, पण गजाननला शिकवा. अशा पद्धतीने गजानन चित्रकलेकडे वळला.

गणपतराव वडणगेकरांनी त्यांना मनःपूर्वक शिकवले. गजाननरावांनी 1934 व 1935 मध्ये चित्रकलेच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा दिल्या. त्यांची त्याच काळात ज्येष्ठ चित्रकार माधवराव बागल यांच्याशी भेट झाली. त्यांनी गजाननरावांना चिठ्ठी देऊन बाबुराव पेंटर यांच्याकडे पाठवले. तेथे गजाननरावांना त्या थोर कलावंताचा सहवास आणि त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली. पेंटर त्यांची चित्रांची, पुतळ्यांची आणि सिनेमांचीच कामे कोल्हापुरात करत. तेथे श्रीकांत सुतार, जी.आर. मिस्त्री, गोपाळ मांढरे (सिनेनट चंद्रकांत) असे काहीजण येत. त्यांना बाबुराव पेंटर कधी मार्गदर्शन करत तर कधी त्यांच्या चित्रांत सुधारणाही करून दाखवत. त्याच वेळी गजाननरावांना मॉडेलवरून चित्र तयार कसे होते हेदेखील कळले. कारण बाबुराव पेंटर त्यांच्या सिनेमात काम करणाऱ्या नट्यांना उभे करून, कधी बसवून त्यांची लक्ष्मी, राधाकृष्ण, विश्वमोहिनी (सरस्वती), वटपूजा अशी चित्रे रंगवत. त्यातून खूप शिकण्यास मिळे.

माधवराव बागल जाधव यांच्या गंगावेशीतील घरात एके दिवशी अवतरले. ते म्हणाले, ‘‘शंकरराव किर्लोस्करांनी तुला किर्लोस्करवाडीला बोलावले आहे.” त्याप्रमाणे हा वीस वर्षांचा तरुण चित्रकार किर्लोस्करवाडीत 1 ऑगस्ट 1938 ला पोचला. त्याची चित्रे बघून शंकरराव किर्लोस्करांचा ती या छोट्या मुलाने केली असतील यावर विश्वासच बसेना. मग गजाननरावांनी त्यांना स्केच करून दाखवले. ‘शंवाकि’ त्या तरुणाचे काम बघून थक्क झाले आणि त्याला नोकरी मिळाली! गजाननरावांची नेमणूक अठरा रुपये पगारावर चित्रकार म्हणून झाली. किर्लोस्करवाडीत किर्लोस्करांकडे काम करणारा तो सर्वात तरुण चित्रकार होता. त्याच्या चित्रकलेला ज्येष्ठ चित्रकारांच्या व विशेषतः ‘शंवाकि’च्या मार्गदर्शनाखाली वेगळेच वळण मिळू लागले. तेथे येणार्याय साहित्यिकांचा व कलावंतांचा सहवासही त्यांना मिळू लागला. गजाननराव समाजमंदिरात होणार्याा विविध कार्यक्रमांत उत्साहाने भाग घेत. गजाननरावांनी विविध खेळ, स्पर्धा यांसोबतच तेथे नाटकात स्त्री भूमिकाही केल्या.

गजाननरावांचा विवाह कोल्हापूरच्या इंदुमती कदम या तरुणीशी 1942 मध्ये झाला. ग.ना. जाधवांनी 1944 ते 1953 या काळात नोकरी सांभाळून, पंत जांभळीकरांकडे शिक्षण घेत पेंटिंगची जी. डी. आर्ट ही पदविका बाहेरून मिळवली. अखिल भारतीय कृषी संघाचे पहिले अधिवेशन दिल्लीतील तालकटोरा मैदानावर 1957 मध्ये भरले होते. तेथे ग.ना. जाधव यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन व्यक्त करणार्याध चित्रांचे प्रदर्शन भरवले. ते गाजले. तत्पूर्वी 1951 मध्ये ‘स्त्री’ मासिकाच्या मुखपृष्ठावर ग.ना. जाधव यांचे एक चित्र छापून आले होते. ते चित्र पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व लहानगा राजीव यांचे होते. त्यांनी ते मूळ चित्र उद्घाटनप्रसंगी पंडितजींना भेट दिले. त्यांना ते आवडले. नेहरूंनी किर्लोस्कर मासिकाच्या मुखपृष्ठावर त्यांची  स्वाक्षरी करून त्याबद्दलचा आनंद व कौतुक व्यक्त केले. त्याच वेळी जाधव यांनी काढलेले चित्र -महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘कल्याणच्या सुभेदाराची सून’ या प्रसंगाचे- भारताचे प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना भेट देण्यात आले. ते राष्ट्रपती भवनाच्या संग्रहात आहे.

किर्लोस्कर प्रेस पुण्यात 1960 च्या दरम्यान स्थलांतरित झाला. ग.ना. जाधवही पुणेकर झाले. ते सदाशिव पेठेतील नागनाथ पाराजवळच्या दळवी वाड्यात राहू लागले. ते, त्यांची पत्नी आणि पाच मुले असे त्यांचे कुटुंब दोन छोट्याशा खोल्यांत राहू लागले. त्यांचे ते घर गंमतीदार होते. बाहेरच्या बाजूस 12 × 5 फूटांची एक लांबट खोली होती. ती त्यांची बैठकीची खोली किंवा दिवाणखाना होता. आतील चौकोनी 12 × 12 फूटांची खोली म्हणजे स्वयंपाकघर कम बाथरूम होते. घरात प्रवेश करण्यासाठी मार्ग म्हणजे हमरस्त्यावर असलेली एक खिडकी! सर्वजण त्यातूनच ये-जा करत. त्यासाठी थोडी कसरतही करावी लागे. खिडकीची कडी वाजताच दार आतील बाजूस उघडले जाई. मग वाड्याच्या दगडी जोत्यावर पाय ठेवून खिडकीच्या चौकटीत दुसरा पाय ठेवून घरात प्रवेश होई. खिडकी आत लाकडी पेटी होती. तिचा पायरीसारखा उपयोग होई. ग.ना. जाधव व त्यांचे कुटुंबीयच नव्हे तर किर्लोस्कर मासिकाचे उंचेपुरे संपादक मुकुंदराव किर्लोस्कर किंवा लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबरही त्याच मार्गाने घरात जात. ती दोघे जाधव यांच्याकडून चित्रकार म्हणून जास्तीत जास्त काम करून घेत.

जाधव यांच्या त्या ‘दिवाणखान्या’त प्रवेश करताच डाव्या बाजूला रेफरन्सचे लाकडी कपाट व त्याच्या बाजूला गोदरेजचे कपाट होते. उजवीकडे कॉट व त्याच्या बाजूला भिंतीतील फडताळ होते. त्यात दाढीच्या सामानापासून ते रंग- ब्रशपर्यंतच्या सर्व वस्तू असत. बाजूला भिंतीवरील फळीवर मर्फीचा रेडिओ विराजमान असे. समोरच, जाधव यांचा एक लाकडी स्टँड व त्यावर हाफ इंपीरियलचा बोर्ड असे. जाधव चित्रे कॉटवर बसून त्या लाकडी स्टँडवरील बोर्डावर बर्यािचदा रंगवत. व्यक्तिचित्रण हा जाधव यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी पुण्यात आल्यावर, पुण्यातील विविध क्षेत्रांतील नावाजलेल्या मंडळींची समोर बसवून अनेक व्यक्तिचित्रे साकारली. त्यांत शिक्षणतज्ज्ञांपासून ते लेखक आणि गायकांपासून ते चित्रकारांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. अशा त्यांच्या चित्रांना ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कारा’सारखे प्रतिष्ठेचे पुरस्कारही मिळाले. ते निसर्गचित्रणासाठीही अधूनमधून जात. त्यांना स्केचिंगची सवय होतीच. त्यांचे स्केचबुक कायम त्यांच्या सोबत असे.

लक्ष्मणराव व रामुअण्णा या किर्लोस्कर बंधूंनी उद्योगात 1910 ते 1950 या चाळीस वर्षांत लक्षणीय प्रगती केली. जाधव यांनी शेतीचे आधुनिकीकरण व त्याला औद्योगिकतेची जोड ही वाटचाल एका चित्र चौकटीत संवेदनशीलतेने व्यक्त केली. ती व्यक्तिचित्रे शरीरवैशिष्ट्ये दाखवणारी उत्तम आहेतच; पण पार्श्वभूमीला रामायणातील राम-लक्ष्मणाची जोडी, कुंडल येथील कारखाना, मैलांचे अंतर दाखवणारे दगड अशा घटकांतून चित्रकृतीमागील व्यापक आशयही व्यक्त केला आहे. 1975 मधील ‘स्त्री’ मासिकाच्या मुखपृष्ठावर ‘मराठी स्त्री’च्या घडणीत ‘शं.वा.किचा वाटा’ हा विषय आहे. त्यासाठी जाधव यांनी शिल्पकार आधुनिक स्त्रीचा चेहरा घडवत आहे असे दृश्य पेश केले आहे. वरच्या बाजूस केवळ लाईन ड्रॉर्इंगमधून ‘स्त्री आता घराबाहेर पडली आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत वाटचाल करत आहे’ हे सूचकतेने व्यक्त केले आहे. त्यांची ह्या प्रकारची कल्पकता व कलेचे प्रभुत्व असलेली शेकडो मुखपृष्ठे असून, त्यांतील वैविध्य चकित करते. किर्लोस्कर प्रकाशनाची सुरुवातीची चित्रे कृष्ण-धवल अथवा एकरंगी होती. ती त्यांत हळूहळू बदल होत, अधिक आकर्षक व विविधरंगी झाली. त्यांच्या चित्रांतून मुद्रणतंत्रात होत गेलेले बदल व विकासही सहजतेने लक्षात येतात.

जाधव यांनी अनुभवलेले काही प्रसंग व काही ऐकीव घटना यांतील चित्रमयतेने त्यांना साद घातली. त्याचीही त्यांच्याकडून मुखपृष्ठांखेरीज अप्रतिम चित्रे निर्माण झाली. त्यांची निसर्गचित्रणात सुरुवातीला ठरावीक पठडीतील रंगहाताळणी करता करता, नंतर त्यांची मुक्त आविष्काराकडे वाटचाल झाली. मंदिर परिसराचे चित्र (1936) व झाडाची सावली पडलेले लालसर रंगाचे एकमजली घराचे चित्र (1955) ही चित्रे त्याचे द्योतक आहेत. तसेच, ‘रानातून जाणारी बैलगाडी’ ह्या चित्रांवर इम्प्रेशनिझमचा प्रभाव जाणवतो. जाधव यांनी काही निसर्ग चित्रांत एकाच वेळी पारदर्शक व अपारदर्शक रंग हाताळणी करून त्याला वेगळे आकर्षक परिमाण दिले आहे. उदाहरणार्थ, ‘पार असलेल्या मोठ्या वृक्षाच्या पार्श्वभूमीला गावाचे दृश्य’ हे चित्र. ‘पेशवेपार्क मधील तलाव’ या चित्राची रंगहाताळणी विशेष उल्लेखनीय आहे. त्या चित्राचे विशेष आत्मविश्वासाने सोडलेले जलरंग आणि जलरंग माध्यमाच्या नितळपणाचे सौंदर्य हे आहेत. ‘काश्मीर दृश्या’त सरोवर, शिकारे, दूरवरचे बर्फाच्छादित पहाड, हे रम्य दृश्य आहे. त्यात ब्रशबरोबर ब्लेडचा उपयोग करून पोताचा  चित्रांकनामधील लालित्यपूर्ण वापर केला आहे.

त्यांनी विविध कलाप्रकारांत दर्जेदार निर्मिती केली असली तरी ते जास्त रमलेले दिसतात ते व्यक्तिचित्रणात. त्यांनी विविध क्षेत्रांतील दिग्गजांपासून, सर्वसामान्यांपर्यंत आणि नवीन विधानभवन, पुणे विद्यापीठ येथील व्यावसायिक व्यक्तिचित्रे ते कुटुंबातील व्यक्ती अशी अनेक चित्रे काढली. त्यांचे व्यक्तिचित्रणातील आदर्श सा.ल. हळदणकर व एम.आर. आचरेकर हे असल्याचे जाणवते. त्यांचा त्यांच्या प्रकाशन व्यवसायातील नोकरीमुळे साहित्यिक- कलावंतांशी परिचय झाला. त्यांनी बालगंधर्व, बाबुराव पेंटर, वि.स. खांडेकर, प्र.के. अत्रे, वि.द. घाटे, शांता शेळके, इतिहासाचार्य दत्तो वामन पोतदार अशांपैकी अनेकांना समोर बसवून व्यक्तिचित्रे काढली. तांबूस दाढीवाल्या काश्मिरी व्यक्तीचे चित्र, हिमाचल प्रदेशातील वेशभूषा असणारी वृद्धा, हिरव्या लुगड्यातील त्यांची पत्नी, लाल काठाच्या निळ्या लुगड्यातील त्यांची आई इत्यादी चित्रे त्यांच्या प्रभुत्वाची साक्ष देणारी आहेत. ‘जलरंग’ हे माध्यम हाताळण्यास कठीण. त्यात सातत्य व किमया असणारे चित्रकार कमीच, पण ग.ना. जाधव जलरंग सहजतेने माध्यमाच्या संकेतानुसार वापरत. प्रसंगी, ते झुगारून देत मुक्तपणे रंगलेपन करत. पण बर्यांचदा जलरंगाची पारदर्शकता, प्रवाहीपण, चेहर्यातच्या घडणीनुसार एकमेकांवर आच्छादलेले रंगलेपन सांभाळत त्यातून अंगभूत लय निर्माण करत, आवेगपूर्ण आविष्कार करत. अर्थातच त्यासाठीचे माध्यमप्रभुत्व व शरीररचनाशास्त्राचा सखोल अभ्यास त्यांच्या ठायी होता. त्यांनी ‘आई’ ह्या चित्रात जलरंग लावण्याची किमया वेगवेगळ्या पद्धतीने करत आईच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय करून दिला आहे. तो खरोखरीच अनुभवावा असाच आहे.

त्यांच्या कारकिर्दीचा बहराचा काळ म्हणजे 1945 ते 1975. ग.ना. जाधव यांच्या कारकिर्दीचा आढावा घेता लक्षात येते, की ते स्वीकारलेल्या नोकरीत रमले. त्यांनी त्या पद्धतीच्या चित्रातही विविधता जोपासली- ब्रशप्रमाणे ब्लेड, पॅलेटनाईफ अशा साहित्याद्वारे नवनवीन तंत्रे वापरली. परिणामी, त्यांनी त्यांच्या कलेतील प्रभुत्वाने मुखपृष्ठांचा दर्जा उंचावला! त्यांना वास्तववादी शैलीतील व्यक्तिचित्रांच्या व निसर्गचित्रांच्या अभिजात निर्मितीत प्रावीण्य मिळवत परिपूर्ण होण्याचा ध्यास होता. त्यांची सुरुवातीची, तंत्राच्या मर्यादेत असणारी अभ्यासपूर्ण चित्रकला उत्तरोत्तर स्वैर, विमुक्त होत गेली. ते ती सर्व माध्यमे -पेन्सिल असो, की पेन अॅरण्ड इंक, जलरंग पेस्टल असो की तैलरंग- प्रभावीपणे व आवेगाने वापरत, पण आवश्यक तेथे हळुवारही होत. त्यांची वास्तववादी कलाप्रवाहात जे काही वेगळे, नवे बघत किंवा अनुभवत ते आत्मसात करून, त्यावर प्रभुत्व मिळवण्याची तीव्र इच्छा त्यांच्या चित्रांतून स्पष्टपणे जाणवते. मात्र ते वास्तववादी कलेच्या परिघाबाहेर कधी गेले नाहीत. त्यांना स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारतात आलेले विरूपीकरण ते अमूर्तवादी आधुनिक कलाप्रवाह यांचे भान होते, पण ते त्याकडे कधी आकृष्ट झाले नाहीत. त्याचे कारण त्यांच्यावरील कोल्हापुरातील कलासंस्कारात असावे. दलाल व ग.ना. जाधव हे समकालीन व समान क्षेत्रात काम करणारे कलावंत. दलाल हे नेहमीच जाधवांच्या चित्रांची प्रशंसा करत. पुढील पिढीतील चित्रकार रवी परांजपे यांना त्यांच्या तरुणपणी ग.ना. जाधव यांच्या मुखपृष्ठ व कथाचित्रे यांबद्दल आदरयुक्त कुतूहल असे. परांजपे यांनी त्यांच्या स्वतःच्या कलाशिक्षणात जाधव यांच्या शैलीचे संस्कार काही प्रमाणात झाल्याचे व जाधव यांनी त्यांना मुंबईला जाण्याचा सल्ला दिल्याचे नमूद केले आहे. ग.ना. जाधव यांना अर्धांगवायूचा आघात होऊन 2001 मध्ये त्यांचे हात, शरीर दुबळे झाले. तरीही ते चित्र काढण्यासाठी पेन्सील धरण्याचा शर्थींचा प्रयास करत. त्यांची प्राणज्योत 5 जानेवारी 2004 या दिवशी मालवली. त्या वेळी त्यांचे वय सत्याऐशी होते.

ग.ना. जाधव यांनी वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांचे मनोगत लिहून ठेवले आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘माझे चित्रकलेतील सात गुरू हे माझ्या कलेतील सप्तरंगी इंद्रधनुष्य होत. कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्यासारखा गुरू मिळणे ही पूर्वजन्माची पुण्याई होय. कला हे माझे परमपवित्र ईश्वरासारखे दैवत आहे. त्याची आराधना हा माझा परमेश्वर. मी दुसरा देव मानत नाही. माझ्या इच्छेप्रमाणे मला मनसोक्त शास्त्रीय पद्धतीने कलाशिक्षण घेण्याची संधी योग्य वयात मिळाली नाही याचे मला राहून राहून दुःख होते. तथापि मी अनेक प्रयत्न करून कष्टाने ते साध्य करण्याचा प्रयत्न केला, त्याचे मला उदंड समाधान आहे…”

– साधना बहुळकर

About Post Author

Previous articleऐतिहासिक संदर्भांचे नातेपुते
Next articleवसंत नरहर फेणे यांचा कारवारी मातीचा वेध
साधना बहुळकर यांनी 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट', मुंबई येथून जी.डि.आर्ट पेंटिंगमध्ये पदवी 1979 साली मिळवली. त्या 'फिल्मस डिव्हिजन'च्या, कार्टून फिल्म युनिटमध्ये 1982 ते 1991 या काळात कार्यरत होत्या. साधना यांनी विलेपार्ले येथील 'पार्ले टिळक विद्यालया'त इंग्लिश मिडीयम सेकंडरी सेक्शन येथे चित्रकला शिक्षक पदावर 1991 पासून 2006 पर्यंत नोकरी केली. त्यांनी 'चित्रकला व चित्रकार' या विषयाच्या लेखनाची सुरवात स्तंभलेखनाने 1980 पासून केली. त्यांनी लिहिलेल्या 'चित्रायन' या माधव सातवळेकरांवरील पुस्तकास 'कोकण मराठी साहित्य परिषदे'चा पुरस्कार डिसेंबर 2005 मध्ये मिळाला. त्यांना त्यांच्या चित्रकलेसंदर्भातील लेखनाच्या योगदानाबद्दल उज्‍जैच्या 'कलावर्त-कलान्‍यास' संस्थेकडून 2006 मध्ये गौरवण्यात आले. त्यांनी मराठी विश्वकोशातील नोंदी, चित्रकारावरील कॅटलॉग्स यांसाठी लेखन केले. साधना विविध नियतकालिकांसाठी लेखन करतात.साधना यांनी 2013 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'मराठीतील दृश्यकला कोशा'साठी सहसंपादक म्हणून काम केले आहे. त्या 'द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई' यांच्याकडून मिळालेल्या फेलोशिपसाठी 'बॉम्बे स्कूल परंपरेतील स्त्री चित्रकार' या विषयावर संशोधनात्मक लेखन करत आहेत.

1 COMMENT

Comments are closed.