चांगली कविता समोर यायला हवी

0
34

चांगली कविता समोर यायला हवी

– अंजली कुलकर्णी, पुणे

‘कवितेचं नामशेष होत जाणं…’ हा ज्ञानदाचा लेख (बृहत्कथा) वाचला, लेख केवळ अप्रतिम, डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आणि परिस्थितीचं अचूक विश्लेषण करणारा आहे! कवितासदृश कविता लिहिली जाण्यापाठचं तिचं विश्लेषण वाचकांना/कवींना अंतर्मुख करायला लावणारं आहे. मी ‘कवितेसारखी कविता’ या नावाचा एक लेख ‘सत्याग्रही’च्या जुन्या अंकात लिहिला होता, परंतु त्याची मुळं अशी व्हर्च्युअल अस्तित्वामध्ये लपलेली असतील याची दुखरी जाणीव मात्र ज्ञानदानं नेमकी करून दिली आहे.

या अशा, तुकड्या तुकड्यांत विखुरलेल्या जगण्यात उत्कटपणे जगता येण्याएवढी सवड/ अवकाशच दुर्लभ होऊन बसलं आहे. कुठल्याही भावनेला ताबडतोबीची परंतु वरवरची प्रतिक्रिया देऊन माणूस त्यातून मोकळा होण्याची धडपड करतो. त्यामुळे आतपर्यंत काही झिरपत जाण्याची शक्यता मावळत चाललीय. केवळ प्रतिक्रियांना कवितारूप देण्याची घाईही वाढत आहे. अनुभूतीचा आवाका न समजणे, स्वत:च्याच शैलीच्या प्रेमात पडून तिचे अनुकरण करणे, रूपबंधाचा अवाजवी पगडा बसणे, प्रत्यक्ष जीवनाऐवजी जीवनसंकेतांचा अनुभूतीसाठी स्वीकार करणे, निव्वळ प्रतिक्रियांना अनुभूती मानणे किंवा कविसंमेलनासाठी भडक, टाळ्याखाऊ रचना करणे यांच्यामधून कवितेसारखी कविता निर्माण होते.

ज्ञानदाशी थोडे differ होताना असे वाटते, की तुकड्यातुकड्यांतून जगताना किंवा एकाच वेळी अनेक तुकड्यांतून जगताना माणूस उत्कटपणे जगण्याचे विसरला आहे हे खरे, पण म्हणून कवितासदृश कविता समोर येत आहे हे शंभर टक्के खरे नाही. खरी गोष्ट अशी आहे, की कवितेसारखी कविता ही सर्वच काळात लिहिली जात होती. तो काही पोस्ट मॉडर्न काळाचा विशेष नाही. संत काळातही अडीच हजार लोक काव्यरचना करत होते – परंतु त्यांतले दहा-पंधरा लोकच कवी या पदाला पोचले!

नामदेव ढसाळांच्या कवितेच्या पातळपणाचे उघड कारण त्यांच्या वयात, आजारपणात आणि त्यांच्या राजकारणी नेतेपणात आहे. पण ठीक आहे ना!

‘ज्ञानेश्वर तुकाराम सार्त्र काफ्का गटे

या सर्वांना गटाराचे मेनहोल उघडून

सलिंग सडत ठेवावे….’

अशी प्रचलिताची मोडतोड करून नंतरची एक सुंदर व्यवस्थाही जो कवी देतो…

‘माणसाने माणसाकडे माणसासारखे वागावे’ असे लिहितो, याउपर आणखी काय हवे?

ज्ञानदा म्हणते तशी आजची कविता वैराण झाली आहे असे म्हणण्यापेक्षा ती बदलत आहे असे म्हणता येईल. कवितेच्या भाषेला नेहमीच अनेक वाटा असतात. सरळ सोपी वाट, व्यामिश्र आणि अधिक व्यामिश्र. जगणे जेव्हा सरळसोपे होते तेव्हा त्यात सरलता होती. प्रासादिकता हा कवितेचा गुण मानला जाई. ‘मला भीती वाटली’, ‘मला दु;ख झालं’ इतके ते व्यक्तीकरण थेट आणि स्पष्ट होते. नंतर जगणे कॉम्प्लेक्स होऊ लागले तेव्हा कवितेतही कॉम्प्लेक्सिटी आली. कोलटकर

‘आपले दात आपलेच ओठ खाल्ले

मोकळ्यानं हसलो’

असा गुंतागुंतीचा अनुभव व्यक्त करू लागले. आज, नव्वदोत्तरी काळामध्ये जगणे अधिक गुंतागुंतीचे, गतिमान आहे. इतके की ते कवितेतून, भाषेतून पकडणेही मुश्किल आहे. ते वेगळ्याच नव्या दिशांकडे ओढत नेत आहे. गोंधळात टाकत आहे. नुसतीच परिस्थिती बदलत आहे असे नाही, तर माणसेही बदलत चाललीत. या सगळ्या बदलांचे नीट आकलन करून, त्यातून एकच एक सार काढून लिहिणे हे मोठेच आव्हान काळाने समोर ठेवले आहे.

समकालीन प्रवाहातले कवी हे आव्हान चांगल्या त-हेने पेलण्याच्या प्रयत्नात आहेत. काळाशी स्वत:ला सतत सुसंगत ठेवणे ही फार अवघड गोष्ट आहे. फार कमी लोक स्वत:ला शेवटपर्यंत contemporary ठेवू शकतात. पण नवीन कवींच्या कवितांत ती शक्ती दिसते. अनुभवाला थेट पकडणारी, गुंतागुंतीला नीट उलगडत जगण्याच्या गाभ्याशी थेट पोचणारी कविता कवी लिहीत आहेत. विशेष म्हणजे केवळ महानगरांत नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून, ग्रामीण भागांतून लिहिणा-या या सगळ्या कवींच्या कवितांचे मिळून घट्ट, आतून जोडलेले आणि हळुहळू स्पष्ट होत जाणारे चित्र तयार होत आहे. तोंडवळाच नसलेल्या मराठी कवितेला चेहरा प्राप्त होत आहे. कमी आहे ती तिकडे जाणकारीने आणि खुल्या दिलाने बघण्याची. त्यांची दखल घेण्याइतकी सवड काढण्याची. चांगल्या कवितेचा शोध घेण्यासाठी सवड काढण्याची कोणते प्रकाशक/संपादक धडपड करतात हा खरा प्रश्न आहे.

स्वत: ज्ञानदा देशपांडे एक चांगली, संवेदनशील कवयित्री आहे. तिच्या पत्रकारितेत संवेदनशीलता आहे आणि तिच्या कवितेत बहुश्रुतत्त्व आणि आकलनाची मोठी झेप दृष्टोत्पतीस येते. १९९५-९६ च्या आसपासपर्यंत ‘अभिधानंतर’सारख्या नियतकालिकांत तिच्या अप्रतिम कविता वाचायला मिळत होत्या. जगणे समजल्याच्या खुणा त्यात सापडतात. Trying to cut nearer the aching nerve हे तिचे वैशिष्ट्य आहे. मात्र नंतर तिच्या कविता कुठे गायब झाल्या? तिच्या कवितांचे एकत्रित collection मला तरी आढळलेले नाही. पत्रकारितेच्या गलक्यात त्या हरवल्या तर नाहीत?

चांगली कविता, खरी कविता समाजासमोर यायला हवी हा अट्टहास आपण सर्वांनीच धऱला पाहिजे.

अंजली कुलकर्णी, पुणे

भ्रमणध्वनी : 9922072158

About Post Author

Previous articleकरूणार्द्र कातळ : शंकरराव पापळकर
Next article‘थिंक महाराष्ट्र’
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.