चंद्रपुर येथील इतिहासलेखक दत्ता तन्नीरवार (Datta Tannirwar)

-sahitya-

दत्ता तन्नीरवार हे अपघातानेच इतिहासाचे लेखक झाले. त्यांचे शिक्षण फारसे नाही, पण प्रेरणेतून निर्माण झालेली आवड त्यांना लेखनप्रवृत्त करती झाली. त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल दीडशेच्यावर नामांकित नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके व त्रैमासिके यांतून लेखन केले. ते सारे ऐतिहासिक संशोधनपर आहे.

दत्ताजींचा जन्म 23 ऑगस्ट 1931 रोजी चंद्रपूर येथे झाला. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण चंद्रपूर येथेच झाले. ते नोकरीच्या शोधात असताना शेजारी राहण्यास आलेले अन्नाजी जयराम राजूरकर यांच्याकडे आकर्षित झाले. अन्नाजी हे न्यू इंग्लिश हायस्कूलमधील शिक्षक. ते ‘चंद्रपूरचा इतिहास कसा उज्वल आहे’ हे तळमळीने सिद्ध करण्यासाठी विविध स्थळी जाऊन त्यावर संशोधनपूर्ण लेखन करत. त्यांना मदतनिसाची गरज होती. दत्ताजींना नोकरी नव्हती. म्हणून त्यांनी दत्ताजींना मदत करण्याचे ठरवले.

-datta-taannirvarदत्ताजींचा राजूरकर गुरूजींसोबत दर रविवारचा प्रवास सुरू झाला. ते गुरूजींसोबत गड, किल्ले, समाध्या पाहत फिरायचे; कोणी एखादी वास्तू, ठिकाण सुचवले तेथे जाऊन बघायचे. कोणाकडे काही पुरातन कागदपत्रे असल्याचा सुगावा लागला की चौकशी करून यायचे. त्यांना त्या धडपडीत कधी छान माहिती मिळायची तर कधी त्यांची हेटाळणीही व्हायची.

राजूरकर गुरूजींनी त्यांच्या जवळील रियासती दत्ताजींना वाचण्यास दिल्या. दत्ताजींना इतिहास हा कंटाळवाणा विषय वाटे; पण त्यांनी रिकामा वेळ आहे तर करमणूक म्हणून त्या वाचून काढल्या. गुरूजींनी त्यांना त्यांची वाचनाची ओढ पाहून नगरपरिषदेच्या वाचनालयाचे सदस्यत्व मिळवून दिले. त्यांच्या स्वत:जवळची पुस्तकेदेखील वाचण्यासाठी दिली.

दत्ताजी ग्रामसेवक प्रशिक्षणाकरता अमरावतीला 1955 साली गेले. गुरूजींनी त्यांना तेथेही वाचनालयातून ऐतिहासिक माहिती संकलन करण्याची सूचना दिली. दत्ताजी प्रशिक्षणातून वेळ काढून वाचनालयातून ऐतिहासिक खंडांमधून माहिती संकलन करत असत. त्यांना नोकरीच्या निमित्ताने सिंदेवाही, ब्रह्मपुरी, राजुरा, चंद्रपूर येथील ग्रामीण भागात राहण्याचा योग आला. त्यांना दूरस्थ जंगली भागात करमणुकीची इतर सोय नसल्याने त्यांचा पुस्तकवाचनाचा छंद त्यांच्या कामी आला. त्या काळात त्यांनी

इतर साहित्याबरोबर ऐतिहासिक साहित्याचेही भरपूर वाचन केले. ते ओघाओघाने जमेल त्या व कोणी सुचवलेल्या स्थळांना भेटी देत राहिले.

-maharani-pustakराजूरकर गुरूजींच्याकडे जाणेयेणे सुरू होतेच. गुरुंजींनी त्यांना लेखन करण्यास सुचवले व प्रोत्साहन दिले. तेव्हा दत्ताजींनी ‘चंद्रपूरच्या गोंडराज सत्तेशी मराठ्यांचा संघर्ष’ हा लेख लिहिला व गुरूजींच्या हाती सुपूर्द केला. गुरूजींनी लेखात थोडीफार दुरूस्ती सुचवली व दादरच्या ‘इतिहास संशोधन मंडळा’कडे पाठवण्यास सांगितले. तो छापून आला तेव्हा गुरुजींनी ‘चंद्रपूरचा गोंडराजवंश देवगडच्या गादीवर’ हा लेख लिहिण्याची सूचना केली. राजूरकर गुरूजींचे देहावसान त्यानंतर काही दिवसांनीच झाले. पण गुरूजींच्या आज्ञेनुसार दत्ताजींनी लेखनप्रपंच प्रसंगानुरूप चालू ठेवला.

दत्ताजींना अन्नाजी जयराम राजूरकर आणि श्रीपाद केशव चितळे या गुरूतुल्य मार्गदर्शकांमुळे ऐतिहासिक साहित्य वाचण्याचा आणि प्राचीन मंदिरे, शिल्पे व गुंफा पाहण्याचा व अभ्यासण्याचा छंद जडला. त्यांनी त्याशिवाय नाणी व डाक तिकिटे संकलन, छायाचित्रण आदी छंदही जोपासले आहेत. ते ग्रामसेवक व विस्तार अधिकारी या पदांवर काम करून 1989 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतरही त्यांचे वाचन आणि संशोधनपर लेखन अविरत चालूच आहे. त्यांचा त्या साहित्यप्रवासात अनेकांशी संबंध आला, अनेक मित्रही जुळले. दत्ताजी तन्नीरवार यांनी चंद्रपुरातून इतिहास संशोधक तयार व्हावेत व त्यांनी केवळ स्वतःपुरता अभ्यास न करता ‘चंद्रपूरचे ऐतिहासिक वैभव’ सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करावा अशी इच्छा आणि तळमळ व्यक्त केली.

ऐतिहासिक विषयावरील लेख :- भारतीय इतिहास संस्कृती – त्रैमासिक, विदर्भ संशोधन मंडळ नागपूर, लोकशाही माझा, जनमतरक्षक, चंद्रपूर समाचार आणि इतर वर्तमानपत्रे.

प्रकाशित साहित्य :- विदर्भातील अष्टविनायक (2003), चंद्रपूरची महाकाली (2006), अंचलेश्वर महात्म्य (2008), कर्तृत्वशालिनी महाराणी हिराई (2016), चिमूरची मोकासेदार मैनाबाई (2018)

इतिहास संशोधकांच्या अधिवेशनातील सहभाग :- अकोला, भोपाळ, म्हैसूर, यवतमाळ, नाशिक, ठाणे येथील अधिवेशनात उपस्थिती व संशोधनपर निबंधाचे वाचन.

गोपाल शिरपूरकर 7972715904, gshirpurkar@gmail.com

About Post Author