घटस्थापना ते अक्षय्य तृतीया: पाणी, पाणी !

0
225

नवरात्रीत कुंभाची म्हणजे घटाची स्थापना केली जाते. त्या दिवशी तलावांची पूजा असते, तलावांच्या पाण्याचे हिशोब लावले जातात. ते पाणी येथील सजीव सृष्टीसाठी वर्षभर वापरणे आहे याची ती आठवण असते. त्याला अनुसरून पाण्याचे व्यवस्थापन ठरते. अक्षय्य तृतीयेला घटाचे दान करण्यास सांगितले आहे. ज्या समाजाजवळ भरलेला घट दान करण्याइतके पाणी शिल्लक असेल, तो समाज समृद्ध राहतो. आश्विन महिन्यातील घटस्थापनेच्या दिवशी समाजाच्या हाती असणारे पाणी काटकसरीने वापरत वापरत वैशाख महिन्यातील अक्षय्य तृतीयेपर्यंत शिल्लक ठेवावे असा तो संकेत आहे…

भारतीय संस्कृतीत लौकिकांचे, कर्तबगारीचे असे अनेक संकेत आहेत. संस्कृती जर विजयी, जगज्जेती, समृद्धी-प्रवण व अभिमानास्पद अशी करण्याची असेल तर त्या दिशेने सक्षम, कर्तबगार असा वर्ग समाजात उभा राहिला पाहिजे. त्यांच्यावर समाजाचे सौख्य, आरोग्य, स्थैर्य आणि समृद्धी अशा सगळ्या गोष्टी टिकवून ठेवण्याची जबाबदारी राहणार आहे. त्याच्याही पलीकडे एक पाऊल पुढे जाणे आहे. तेथपर्यंत इतर जग कदाचित बरोबर येईल, पण भारतीयांनी पाण्याला त्याही पलीकडे नेऊन उन्नत असे सांस्कृतिक स्थान दिले आहे. भारतात कोणत्याही धार्मिक विधीनंतर, पूजेनंतर, ज्यावेळी प्रसाद वाटतात, त्यावेळी हातावर ‘तीर्थ’ देतात – त्याला ‘पाणी’ दिले, ‘जल’ दिले असे म्हणत नाहीत. भारतात पाण्याला तीर्थता लाभलेली आहे, त्याला मांगल्य दिलेले आहे. नदीकाठच्या धार्मिक ठिकाणांना तीर्थक्षेत्रे म्हटले आहे. वडीलधाऱ्या मंडळींबद्दल आदर व्यक्त करताना त्यांनासुद्धा तीर्थस्वरूप म्हणतात.

भारतीय समाज पाण्याबाबत मंगलमयता निर्माण करणारा, पाण्याला मंगल स्थान देणारा आहे. पाण्याचे मांगल्य पुण्याच्या जवळच अहिल्यादेवींनी बांधलेला संगमावरील घाट आहे, तेथे गेल्यानंतर जाणवते का? तेथील पाणी हे तीर्थ आहे असे वाटू शकेल का? भारताची ही जी प्रदीर्घ सांस्कृतिक परंपरा आहे, त्या परंपरेचे जर विद्यमान भारतीय आणि मराठी लोक वारसदार असतील, तर त्यांनाही त्या संकेतांच्या प्रकाशामध्ये भविष्याचा मार्ग शोधावा लागेल. तशी प्रेरणा सतत कोणाकडून मिळणार आहे? तर संस्कृतीमधूनच ! परशुराम जयंती अक्षय्य तृतीयेला येते. त्यातील अक्षय्य हा शब्द कोठून आला? भारतीय संवत्सराची जी व्यवहार रचना ठरवली गेली आहे, त्यात पाण्याच्या व्यवस्थापनासाठी काही दिवस महत्त्वाचे आहेत. ते त्या अर्थाने प्रत्यक्ष जीवनामध्ये गेल्या पाच-सहा शतकांमध्ये नीट वापरात आणले गेलेले नाहीत.

भारतीय खरी जीवनपद्धत काय होती ते पाहण्यासाठी पाच-सहा शतके मागे जावे लागते. त्यांतील दोन दिवस विशेष महत्त्वाचे आहेत – एक घटस्थापनेचा व दुसरा अक्षय्य तृतीयेचा. त्यातील घट शब्द कोठून आला? नवरात्रात माळा करणे, देवीची पूजा करणे असे सर्व सोपस्कार केले जातात. नवरात्रीत कुंभाची म्हणजे घटाची स्थापना केली जाते. त्या दिवशी तलावांची पूजा असते. तलावांच्या पाण्याचे हिशोब लावले जातात. ते पाणी येथील पशुजीवनासाठी, दुग्ध व्यवसायासाठी, प्राणी जीवनासाठी, मानवी जीवनासाठी, शेतीसाठी वर्षभर वापरणे आहे याची ती आठवण असते. त्याला अनुसरून पाण्याचे व्यवस्थित असे लोकानुवर्ती व्यवस्थापन ठरते. पुढे, अक्षय्य तृतीयेला घटाचे दान करण्यास सांगितले आहे. ज्या समाजाजवळ भरलेला घट दान करण्याइतके पाणी शिल्लक असेल, तो समाज समृद्ध राहणार. जैन परंपरेमध्ये अक्षय्य तृतीयेला महावीर जैन यांना पाण्याचा मस्तकाभिषेक केला जातो, पाण्याचे घडे भरभरून त्यांच्या मस्तकावर ओतले जातात. पाण्याची अशी विपुलता जो समाज अक्षय्य तृतीयेपर्यंत टिकवू शकतो, त्या समाजाची समृद्धी अक्षय्य टिकते असा तो संकेत आहे. आश्विन महिन्यातील घटस्थापनेच्या दिवशी समाजाच्या हाती असणारे पाणी काटकसरीने वापरत वापरत वैशाख महिन्यातील अक्षय्य तृतीयेपर्यंत शिल्लक ठेवण्याचे असते.

– माधव चितळे 9823161909

( ‘जलसंवाद’, डिसेंबर 2017 वरून उद्धृत. मूळ शीर्षक – भारताची जलसंस्कृती)

——————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here