ग्रामीण संस्कृतीची समृद्धी – वागदरी (Wagdari)

_vaagdari_1.jpg

वागदरीची ओळख सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीचे शांतताप्रिय गाव म्हणून आहे. ते कर्नाटक व मराठवाडा (महाराष्ट्र) यांच्या सीमेवर येते. गाव डोंगरदरीत वसलेले असून, पुरातन काळी, त्या ठिकाणी वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. म्हणून गावाला वाघांची दरी असे ओळखत होते. त्यावरून बोलीभाषेत वागदरी झाले. अक्कलकोट संस्थानचे नरेश (राजा) गावात शिकारीसाठी येत असत. दरीत शिकार केलेले रानडुक्कर अक्कलकोटच्या राजवाड्यात पाहण्यास मिळतात. गावात मराठी-कन्नड मिश्रित भाषा बोलली जाते. गावातील  ग्रामपंचायतीची स्थापना 1952 साली झालेली आहे. लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. परिसरात ज्वारी, तूर, मूग, सुर्यफूल, उडिद, हरभरा ही पीके घेतली जातात.

वागदरीची लोकसंख्या दहा हजार आहे. गावात कोष्टी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. वागदरी हे एकेकाळी हातमागाचे मोठे केंद्र होते. हातमागांचे प्रमाण कमी झाले आहे. गावात साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे नोकरदार वर्ग वाढला आहे. गावातील लोक शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, बस चालक-वाहक, पोलिस अशा प्रकारच्या कामांत अग्रेसर आहेत.

वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर हे आहे. भव्य असे परमेश्वर मंदिर गावातील डोंगरावर आहे. त्या डोंगरावर एक भलीमोठी शिळा (दगड) होती. त्या दगडावर गावातील शिरगण यांच्या घराण्यातील एक महिला दररोज शेणाच्या गोवऱ्या लावण्यासाठी येत असे. परंतु त्या बाई ज्या ज्या वेळी गोवऱ्या लावण्यासाठी जात, त्या त्या वेळी त्यांना शिळेवर सकाळी प्राजक्ताची ताजी फुले दिसून येत होती. आश्चर्य वाटून, उत्सुकतेपोटी तेथील जागा खणून पाहिली असता तेथे शिवलिंग प्रकट झाले. ते वृत्त गावात समजताच गावकऱ्यांनी शिवलिंगाची प्रतिष्ठापना करत त्यावर परमेश्वराची मूर्ती स्थापन करून, त्याचे परमेश्वर देवस्थान म्हणून नामकरण केले. श्री आणप्पा शिवराय शिरगण या भक्ताने 1840 साली तेथे मंदिर बांधून शिखराचे बांधकाम केले. ते मंदिर जुन्या वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले आहे. मंदिराला दोनशे वर्षांची परंपरा लाभली आहे. पंचक्रोशीमध्ये ‘परमेश्वरा’वर अफाट श्रद्धा आहे. परमेश्वराच्या मंदिरात दर सोमवारी, महाशिवरात्रीला व श्रावणमासात हजारो लोक दर्शनासाठी गर्दी करतात. ‘परमेश्वर’ मंदिराची महती दूरवर पसरली आहे.

‘परमेश्वरा’ची यात्रा चैत्र शुद्ध प्रतिपदा – गुढीपाडव्यापासून पाच दिवस भरते. पंचमीला मोठा रथोत्सव असतो. रथाला पंधरा फुटी दगडी चार चाके आहेत. पाच मजली उंचीचा (एक्कावन्न फूट) सजवलेला रथ व त्यावरील सुवर्णकळस असा तो रथ महाराष्ट्रात अन्यत्र कोठेही पाहण्यास मिळत नाही. त्यानंतर होणारी दुसरी यात्रा ही शेतकऱ्यांची मानली जाते. ती यात्रा उत्तरा नक्षत्राच्या आगमनानंतर येणाऱ्या दुसऱ्या गुरूवारी व शुक्रवारी भरते. त्याला ‘परमेश्वर’ आराधना (पर्व) पालखी महोत्सव असे म्हणतात. त्या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे अखंड अन्नदानाचा कार्यक्रम दोन दिवस आयोजित केला जातो. त्यात शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. त्या महोत्सवात विविध संघ कला सादर करतात. श्रींच्या पालखीची मिरवणूक गावात निघते.

_vaagdari_6.jpgआदिनाथ 1008 दिगंबर जैन मंदिर हे पुरातन असून मंदिराचे बांधकाम हिराचंद, मोतिचंद, गुलाबचंद व माणिकचंद या चार शहाबंधूंनी मिळून केले होते. ते मंदिर बांधून शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळ झाला आहे. परमेश्वर मंदिर व जैन मंदिर ही दोन्ही एकाच वेळी बांधली गेली असे जाणकार सांगतात. मंदिराच्या आतील रचनासुद्धा परमेश्वर मंदिरासारखी आहे. हिराचंद शहा व कुमारी नवलबाई हिराचंद शहा यांनी सत्तर ते ऐंशी वर्षें मंदिराची सेवा केली.

वागदरीकरांची पहाट होते सनई-चौघड्याच्या मंजुळ नादाने. ती वागदरी गावाची वैशिष्ट्यपूर्ण प्रथा आहे. रोज पहाटे साडेचार वाजता न चुकता सनई-चौघड्याचा मंजुळ आवाज सुरू होतो. तसेच, सूर्यास्तानंतर संध्याकाळी साडेसात वाजताही सनई-चौघडे वाजवले जातात. चौघडे वाजवण्याच्या वेळीच रोज ग्रामदैवत श्री परमेश्वराची महाआरती व पूजाअर्चा होते. सकट व लोंढे परिवारांची पाचवी पिढी सनई-चौघडा वाजवण्याचे काम अखंडपणे करत आहे. मंदिराचे बांधकाम 1885 मध्ये करण्यात आले. त्याचवेळी सनई-चौघडे वाजवण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण चौघडाखाना बनवला  गेला. ‘परमेश्वर’ जत्रेत सनई-चौघडा दुपारी बारा वाजताही वाजवला जातो.

गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक पहिली ते चौथीपर्यंत मराठी शाळा आहे. वागदरी गाव कर्नाटक सीमेलगत असल्यामुळे तेथे कन्नड भाषेचा प्रभाव मोठा आहे. त्याचा विचार करून इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत कन्नड माध्यमातून वर्ग सुरू आहेत. शाळेची इमारत जुनी आहे. गावातील मंडळी सांगतात, की जिल्हा परिषद शाळा ही स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या राहण्यासाठी गेस्ट हाऊस होते. तसेच, अक्कलकोट संस्थानचे तत्कालीन नरेश राजे शिकार करण्यासाठी आल्यावर इमारतीत विश्रांती घेत असत. वागदरी परिसरातील शेळके प्रशाला हे आदर्श शैक्षणिक केंद्र बनले आहे. बसवानंद स्वामी यांनी शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या दारापर्यंत माध्यमिक शिक्षणाची ज्ञानगंगा न्यावी म्हणून ती सुरू केली. प्रसिद्ध ग्रामदैवत श्री परमेश्वर देवस्थानच्या नावाने परमेश्वर शिक्षण मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. त्या घटनेला  पन्नास वर्षें होऊन गेली आहेत. त्या, 1967 साली लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाला आहे. शाळेतील माजी विद्यार्थी जगाच्या विविध देशांत पोचले आहेत; तसेच, ते देशातील विविध राज्यांत विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. शाळेचे माजी विद्यार्थी मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्यांपासून गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकापर्यंत आढळतात.

_vaagdari_9.jpgवागदरीतील प्रसिद्ध शेतकरी कुटुंब म्हणजे भीमपुरे परिवार. त्यांच्या शेतातील विहीर ही पुरातन व ऐतिहासिक आहे. शंभर वर्षांपूर्वी बांधलेली ती विहीर तशीच आहे. तिला कोठेही तडा पडलेला नाही. विहिरीचे बांधकाम शके 14/1836 मध्ये पूर्ण झाले. बांधकाम चुना व रेती यांच्या मिश्रणात केले आहे. विहिरीची बांधणी गोलाकार पद्धतीची आहे. तसे बांधकाम कोठे पाहण्यास मिळत नाही. विहिरीत दगडी कमानी आहेत. अनेक कोरीव मूर्तीसुद्धा पाहण्यास मिळतात. विहिरीत जाण्यासाठी पायऱ्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती विहीर कै. ईरप्पा शिवलिंगप्पा भीमपुरे यांनी बांधली. त्यांचे पणतू दीपक भीमपुरे यांनी ती माहिती दिली. विहिरीतील पाणी कधीच कमी झालेले नाही. एकेकाळी वागदरी गावाची तहान त्या विहिरीने भागवली आहे. त्या विहिरीत 1972 मध्ये भीषण दुष्काळातसुद्धा पाणी होते. काही वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात मात्र पाणी पूर्णपणे आटले होते. शंभर वर्षांत पहिल्यांदा त्यावेळी विहिरीतील पाणी कमी झाले होते.

वागदरीतील आठवडा बाजाराचे महत्त्व मॉल संस्कृतीतही टिकून आहे. बाजार दर रविवारी भरतो. तो सकाळी सात वाजता सुरू होतो. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू असतो. त्या दिवशी गाव गर्दीने फुलून जातो. पंचक्रोशीतील पंधरा-वीस गावांतील हजारो शेतकरी बाजारात नेहमी येतात. वागदरीची बाजारपेठ त्या भागातील सर्वात मोठी म्हणून ओळखली जाते. लहान व मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या कृषिमालाची विक्री करण्यासाठी आठवडा बाजार हे महत्त्वाचे केंद्र आहे. तेथे येणारे शेतकरी मराठी, कानडी आणि या दोन्ही भाषांची सरमिसळ असलेली भाषा बोलतात. त्यात संमिश्रतेमुळे गोडवा येतो. पथारी पसरण्यासाठी लागलेली भांडणे, मालाचा भाव सांगण्यासाठी घातलेल्या आरोळ्या, सुट्ट्या पैशांवरून चाललेला वादविवाद, वजन काटा आणि वजनांची आदळआपट ही बाजाराच्या जिवंतपणाची लक्षणे. बाजार ग्रामदैवत परमेश्वर मंदिरासमोरच्या पटांगणात भरतो. ताजी भाजी, किराणा व्यापारी, घरगुती सामानाचा विभाग, शेव-चिवडा, बेसन लाडू, गरमागरम जिलेबी, पाव, ब्रेड अशी वेगवेगळी दुकाने तेथे लागलेली असतात. त्यात धान्य बाजार, कपडा बाजार, चप्पल बाजार, शेळी बाजार असे अनेक विभाग असतात. मोठ्या शहरांतील व्यापारी तेथे खरेदी-विक्री करण्यासाठी येतात. बाजारात मोठी उलाढाल होते. अनेकांचे घर त्या बाजारावर अवलंबून असते. तेथे आठवड्याची खरेदी आणि स्थानिक मालाची विक्री होते. गावाच्या विकासात ऐतिहासिक परंपरा, गावाची पार्श्वभूमी, मूलभूत गरजा आदींना जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व आठवडी बाजारालादेखील आहे. गावकरी थेट बाजारात येऊन, मोबाईलवरून घरी फोन करून खरेदी करण्याच्या सामानाची यादी घेतात. आठवडा बाजारामध्ये एकूण विक्री होणाऱ्या मालापैकी ऐंशी ते नव्वद टक्के शेतमाल, तर दहा ते वीस टक्के माल बिगर कृषी असतो.

– धोंडप्पा मलकप्पा नंदे 9850619724 /9404735008
मु. पो. वागदरी, तालुका – अक्कलकोट, जिल्हा – सोलापूर 413218
dhondappanande@yahoo.com

About Post Author

3 COMMENTS

  1. अतिशय सखोल व सुंदर गाव माहिती
    अतिशय सखोल व सुंदर गाव माहिती

  2. वागदरी गावचे नांव सर्वदूर…
    वागदरी गावचे नांव सर्वदूर नेल्याबद्दल , गावाप्रती आपली निष्ठा , खरच आपल्याला माझ्याकडून मानाचा मुजरा सर . धन्यवाद !

Comments are closed.