ग्रामदैवत खंडेराव महाराज

carasole

श्री खंडोबाराय हे लोकदैवत आहे. खंडेराव हे साळी, माळी, कुणबी, कोळी, सुतार, सोनार, महार-मांग, धनगर, ब्राह्मण, मराठा, लोहार, कहार, चांभार, मेहतर या अठरापगड जातींचे लाडके दैवत, जातिनिर्मूलन झाले असले तरी संबंधित सर्व जाती-पोटजातींचे भाविक श्री. खंडेरायाचे कुळधर्म, कुळाचार करताना दिसतात. मुसलमानदेखील त्या दैवताला भजतात. अहमदनगर जिल्‍ह्यातील कोपरगाव तालुक्यात खंडेराव महाराजाचे मंदिर आहेत. कोपरगाव रेल्‍वेस्‍टेशन महामार्गावर महात्‍मा गांधी जिल्‍हा चॅरिटेबल ट्रस्‍ट लगत असलेले ते देवस्‍थान तेथील ग्रामदैवत म्‍हणून ओळखले जाते. खंडोबा देवस्थानातील रूढी गेल्या दोनशेवीस वर्षांपासून अस्तित्वात असल्याची नोंद आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत कोपरगाव तालुक्‍यातील मंदिरात गंडेदोरे, अंगारेधुपारे, देव अंगात येणे असे प्रकार चालत. नंतर मात्र त्या प्रथा शिक्षणाचा प्रसार व लोकजागृती यांमुळे मागे पडल्या.

पूर्वी, तो भाग ‘बाभुळबन’ म्हणून ओळखला जाई. विठोजी देवजी देवरे यांनी त्या माळरानात १९४० साली एका साध्या चबुतऱ्यावर खंडेरावमूर्तीची स्थापना केली. त्या देवस्थानाची व्यवस्था सहाव्या पिढीतील व्यवस्थापक नारायण, रामकृष्ण व त्यांची भगिनी शांताबाई सयाजी देवरे ही तिघे पाहतात. त्या पुरातन मंदिरात १७९० ते १९९० या दोनशे वर्षांच्या काळात समाधी घेईपर्यंत जंगली महाराज, उपासनी महाराज, शिर्डीचे साईबाबा, रामदासी महाराज, जनार्दन स्वामी, नारायणगिरी महाराज या संतविभूती आवर्जून येत व धार्मिक विधी करत असत. साकुरीचे उपासनी महाराज यांनी ३ ते ५ जुलै १९११ या कालावधीत मंदिर जीर्णोद्धारासाठी तेथे निरंकार उपोषण केले होते. साईबाबांनी एक दिवस खंडेराव मंदिरात मुक्कामी राहून उपासनी महाराजांच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता. उपासनी महाराजांच्या संकल्पनेनुसार जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले. त्यावेळी सागवानी चौरस अवशेष जसे होते तशाच स्वरूपात ठेवण्यात आलेले आहेत.

विजयादशमी, चंपाषष्ठी, चैत्रपौर्णिमा, सोमवती अमावस्या, महाशिवरात्र हे यात्रोत्सव; तसेच, धार्मिक उत्सव खंडेराव मंदिरात साजरे केले जातात. त्या उत्सवांच्या वेळी खंडेरायाची पूजा बांधली जाते, जसे महाअभिषेक, तळीभंडार, सत्यनारायण महापूजा, मार्तंड महात्म्य, पोथी पारायण, शस्त्रपूजन, होलापकाठी मिरवणूक पूजा; तसेच, परिसरातून आलेल्या वाघ्या-मुरळी यांची सेवा हे कार्यक्रम होतात. दसऱ्याला धार्मिक व राष्ट्रीय उत्सव साजरा केला जातो. दसऱ्याला व चंपाषष्ठीला मंदिरासमोर होणाऱ्या रहाडीच्या विस्तवातून भक्तगण चालत जातात व नवसपूर्ती करतात, ती परंपरा गेल्या दोनशेतेवीस वर्षांपासून चालत आलेली आहे.

साईभूमीतून साई-बालाजी पालखी साईबाबांची आरती आटोपल्यावर दोनशे-अडीचशे भाविकांसह दर रविवारी खंडेराव मंदिरात येते. त्यानंतर सुमारे सव्वा तास खंडेराव मंदिरात धार्मिक सोहळा चालतो. या पालखी सोहळ्याचे प्रवर्तक संजय काळे, संजय जगताप, अमृतकर, चव्हाण हे या पालखी सोहळ्याचे नेतृत्व करत आहेत.

खंडोबा महाराज देवस्थानाच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता व बलोपासना या भावनेतून गरीब मुला-मुलींसाठी व्यायामशाळा फी न घेता सुरू आहे. तेथे दररोज पन्नास-साठ व्यायामपटू बलोपासना करत असतात.

खंडेराव मंदिराच्या वतीने २००७ साली ‘लोककला व कलावंत उत्कर्ष मंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. मंडळाचे नऊशे सभासद आहेत. मंडळाद्वारे कलावंताना दिलासा मिळतो. मंडळाचे नारायणराव देवरे, मन्साराम पाटील व डी.के. सोनवणे यांच्या प्रयत्नांतून लोककलावंतांना सरकारी सवलतींचा लाभ मिळत आहे. पुरुषोत्तम पगारे सर, भारूडसम्राट भानुदास बैरागी, ह.भ.प. दत्तोबा जोर्वेकर यांचे सहकार्य मंडळाला मिळत आले आहे.

खंडेराव देवस्थानासाठी इंग्रज सरकारने तीस एकर जमीन देवस्थान इनाम म्हणून दिली. तो भाग ‘बाभुळबन’ वा ‘खंडोबाचा माळ’ म्हणून ओळखला जाई. कालांतराने खंडोबा देवालयाची ही इनाम जमीन इंग्रज सरकारने कोपरगांव येथील ‘महात्मा गांधी शेती व औद्योगिक जिल्हा प्रदर्शन’ भरवण्यासाठी दिली. प्रदर्शन सुरुवातीची पंचवीस वर्षें भव्य-दिव्य स्वरूपात भरवले जाई. सध्या असलेली ‘म. गांधी प्रदर्शना’साठीची ही जागा खंडोबा देवस्थानाकडून काढून घेऊन खंडोबा देवस्थानासाठी मुर्शतपूर शिवारात देवस्थानाला इनाम दिलेली आहे. तेथे देवरे कुटुंबीय शेती करत आहेत. खंडोबा देवस्थानासाठी सध्या जे मंदिर दिसते ते साधारण २२ x ३० आहे. लोकसंख्येच्या मानाने मंदिराची जागा अपुरी आहे.

– श्रीमती बी. एम. मराठे
नारायण सयाजी देवरे, व्‍यवस्‍थापक पुजारी
शिवाजीरोड, मशिदीसमोर
स्‍नेहांकीत कोपरगाव, अहमदनगर – 423 601

(‘असे होते कोपरगांव’ पुस्‍तकामधून)

Last Updated On – 22nd Jan 2017

About Post Author