गौरीश तळवळकर – ध्यास घेतला रचिण्याचा पाया

0
33
_GaurishTalwalkar_DyasGhetla_3_0.jpg

मी शास्त्रीय गायक आहे. संगीतविद्या शिकवणे हा माझा ध्यास आहे. मी स्वत:ला सरकारी नोकरी सोडून पूर्ण वेळ संगीताला वाहून घेतले आहे. संगीतात उत्तम कलाकार घडावे हा माझा मनोदय आहे. आजचे जग हे खूप धावते आहे. कोणालाच कलेसाठी जास्त वेळ खर्च करणे जमण्यासारखे नाही. लोकांना सर्व काही लवकर पाहिजे असते, त्याला संगीतसुद्धा अपवाद नाही. आम्ही जे विद्यार्थी चांगला रियाज करतात व मनापासून संगीत शिकतात, त्यांना ते सादर करता यावे म्हणून ‘रागमंथन’ व ‘खासगी बैठक’ हे दोन कार्यक्रम आयोजित करतो.

मी स्वतः ‘खासगी बैठकी’मध्ये गातो. ती आयोजित करण्यामागील कारण हे आहे, की मुलांना शास्त्रीय संगीत ऐकावे कसे हे कळावे. आम्ही संगीत संमेलने आयोजित करतो, पण त्या संमेलनांना प्रेक्षकांची उपस्थिती अत्यंत कमी असते. फक्त वयस्कर लोक तशा संमेलनांना येतात. मुलांना जे टीव्ही-रेडिओवर ऐकायला मिळते तेच संगीत समजते व आवडते. मुलांना शास्त्रीय संगीत ऐकावे कसे? तेदेखील कळणे आवश्यक आहे. त्यासाठी मी प्रयत्नशील असतो. त्यासाठी ‘खाजगी बैठकी’चे आयोजन करतो. त्यात मी शास्त्रीय संगीताबरोबर, नाट्यगीत, भावगीत, ठुमरी यांसारखे उपशास्त्रीय प्रकार सादर करतो. त्यामुळे संगीत श्रवण सुगम होते. अनुभव असा आहे, की दोन तास गाणे ऐकल्यामुळे मानसिक दृष्टीने गाणे आवडण्यास सुरुवात होते. तशी आवड निर्माण झाली तरच पुढे त्यात झोकून देण्याचा विचार येऊ शकतो.

_GaurishTalwalkar_DyasGhetla_2.jpgमी ‘रागमंथन’ हा कार्यक्रम तीन महिन्यांनी एकदा ठेवतो. त्यात मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना गाण्याची संधी देतो. मुले स्वतः जेव्हा गाणे सादर करतात तेव्हा त्यातील बारीकसारीक गोष्टी त्यांच्या लक्षात येतात. पण त्याबरोबर त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. मैफिलीमध्ये संगीत योग्य प्रकारे सादर करण्यासाठी आत्मविश्वासाची गरज फार असते. मी माझ्या विद्यार्थ्यांना त्यासाठी तयार करतो. तसेच, अन्य गायकांसमोर गाताना व त्यांचे ऐकताना विद्यार्थ्यांना त्यांच्यातील त्रुटीदेखील लक्षात येतात. त्यांना त्या दुरूस्त करण्याची संधी तशा कार्यक्रमांमुळे मिळते.

शास्त्रीय संगीत हा जगभरातील सर्व संगीताचा पाया आहे. ज्या मुलांना गायनामध्ये करिअर करायची आहे, त्यांनी ही गोष्ट लक्षात घेणे फार आवश्यक आहे. एखादी सुंदर आकर्षक इमारत मोहक जरी वाटली तरी तिचा पाया भक्कम नसेल तर ती ऊन, पाऊस, वादळ, वारा यांचा सामना करू शकणार नाही; कोसळून जाईल. त्यामुळे तरुण गायकांनी झटपट मिळणा-या प्रसिद्धीसाठी न गाता त्यांना ज्या कलेची आवड आहे ती कला त्यांच्या अंगी आधी फुलवायला हवी. तरच त्यांचे  संपूर्ण व्यक्तिमत्त्व त्या कलेबरोबर खुलून उठेल आणि त्यापासून त्यांना आनंद मिळेल.

मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची घडणदेखील संगीतातून होते. मुलांवर संस्कार संगीतातून आपोआप होत असतात. संगीत शिकणा-या मुलांची संवेदना सूक्ष्म असते असा माझा अनुभव आहे. त्यांना कोणत्याही गोष्टीचे आकलन अधिक चांगल्या प्रकारे होते. संगीताने एकाग्रता वाढते. मी गोवा गव्हर्नमेंट शाळेत संगीत शिक्षक होतो. परंतु मी त्या नोकरीत खरे संगीत मुलांपर्यंत पोचवू शकत नव्हतो. कित्येक लोकांना संगीत म्हणजे काय आहे याची जाणच नसते. सरकारी शाळेमध्ये संगीताचा मुख्य उद्देश शाळेत कार्यक्रम असला तर मुलांना स्वागतगीत म्हणण्यास शिकवणे हा असतो. त्यापेक्षा अधिक काही करावे किंवा संगीताचा चांगला काही उपयोग होऊ शकतो असे तेथे कोणाला वाटत नाही. परंतु मुलांचे मन सक्षम करण्यासाठी संगीत हे अतिशय उत्तम माध्यम आहे. संगीताला ‘नादब्रह्म’ असे म्हणतात. म्हणजे माणूस त्या माध्यमातून स्वतःच्या अधिक जवळ येतो. त्यामुळे त्याला त्यातून अमूल्य असा आनंदाचा ठेवा गवसतो. त्याची तुलना अन्य कशाशीही करता येणार नाही.

_GaurishTalwalkar_DyasGhetla_1.jpgआम्हा शिक्षकांसमोर एकदा प्रभाकर पणशीकर यांचे बंधू पंडित दिनकर पणशीकर यांचे भाषण होते. त्या भाषणाने माझ्या आयुष्यात आमुलाग्र फरक आणला. ते संगीत शिकले होते. परंतु ते चरितार्थासाठी पुस्तक विक्रेत्याची नोकरी करत होते. अचानक आयुष्यात काही प्रसंग घडला आणि त्यांनी स्वतःला संगीताला पूर्णपणे वाहून घेण्याचे ठरवले. त्यासाठी ज्या नोकरीवर घर चालत होते, ती नोकरी सोडावी लागणार होती. त्यांच्या पत्नीनेपण त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला आणि ते उत्तम गायक म्हणून नावारूपाला आले. त्यांच्या भाषणात ते म्हणाले, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी संगीताच्या जवळ आलो. ज्यासाठी मी जगत होतो ती गोष्ट मला करता येत होती. त्यांनी आम्हा संगीत शिक्षकांना आवाहन केले, की तुम्ही नोकरीच्या बंधनातून मुक्त व्हा आणि ख-या संगीताचा प्रसार करा.

मी त्यानंतर विचार करून नोकरी सोडली. मला मुलांना संगीत शिकवण्यात अतिशय आनंद मिळतो. मी माझ्या विद्यार्थ्यांना संगीताच्या दुनियेत रमताना पाहतो. मी ‘गीत महाभारत’चे अनेक प्रयोग केलेले आहेत. उद्देश हा आहे, की मुलांना कृष्ण, राम, सीता, अर्जुन यांविषयी काहीही माहिती नसते. त्या गीतांमधून त्यांच्यासमोर त्या व्यक्ती साकारल्या जातात. भगवद्गीता जीवनाचे सार सांगते. जगभर तिची थोरवी मान्य झालेली आहे. युरोपीयन, अमेरिकन मंडळी भारतीय संस्कृती जाणण्यासाठी संस्कृत शिकतात. पण भारतीय मुलांना त्यांच्या संस्कृतीविषयी तितकी माहिती नसते. त्यामुळे त्यांचा जीवनाचा पाया कच्चा राहतो. मी तो पाया घडवण्याचे काम करत आहे. सर्वेश फडके, चिन्मय कर्वे यांसारखे माझे काही विेद्यार्थी आहेत. त्यांनी संगीतात करियर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा त्यापाठचा उद्देश चित्रपटांमध्ये गाण्यास मिळावे किंवा स्टेज शो करायला मिळावे हा नाही, तर संगीताला त्यांचे जीवन वाहवे आणि संगीताच्या माध्यमातून ते फुलवावे हा आहे. बाकी गोष्टी दुय्यम आहेत. मी हे विद्यार्थी जेव्हा पाहतो तेव्हा वाटते, की माझी साधना सफल झाली! मी सरकारी नोकरी सोडली त्याचे चीज झाले. जी माझी संगीत शिकवण्यामागची भावना आहे, जो संगीताचा ध्यास आहे तो माझ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जगभर पोचला जाईल!

– गौरीश तळवळकर

About Post Author

Previous articleमानवमुक्ती
Next articleअनामिकाची आकाशी झेप…!
गौरीश प्रभाकर तळवळकर यांनी पूर्ण वेळ संगीत शिक्षणाला वाहून घेतले आहे. ते घरी तसेच प्रतिभा संगीत विद्यालय व सम्राट संगीत विद्यालय येथे गायन वर्ग घेतात. त्यांचे सध्या वास्तव्य फोंडा, गोवा येथे आहे. त्यांनी गोवा विद्यापीठातून बी.एची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी संगीत अलंकार, गांधर्व महाविद्यालय, मिरज येथून संगीताचे शिक्षण पूर्ण केले. तळवळकरांनी अनेक प्रतिष्ठित संमेलनात शास्त्रीय गायन केले आहे; तसेच, त्यांनी 'गीत महाभारत' या निवेदन व गीते असलेल्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. त्यांनी समर्थ आणि गोंदवलेकर महाराज यांच्या अनेक अभंगांना स्वरबद्ध करुन त्याचे सादरीकरण केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9860410997