बालगंधर्व व गोहराबाई यांच्या संबंधावर रवींद्र पिंगे यांनी १९७१ साली सविस्तर माहिती मिळवून लिहिले, ते मूळ कन्नड लेखक – रहमत तरीकेरी (मराठी अनुवाद – प्रशांत कुलकर्णी) यांच्या कथनाला छेद देणारे आहे.
गोहराबाई-बालगंधर्व संबंधावर वेगळा प्रकाश..
प्रशांत कुलकर्णी यांनी सादर केलेला गोहराबाई यांच्यासंबधीच्या मूळ कन्नड लेखाचा मराठी अनुवाद वाचकांना बराच रूचला. तथापि त्यांनी काही गोष्टी निदर्शनास आणल्या आहेत. त्यांतील प्रमुख संदर्भ ‘माणूस’ च्या १९७१ सालच्या दिवाळी अंकातील रविंद्र पिंगे यांच्या लेखनाचा आहे. पिंगे यांनी त्यावर्षी बरेच संशोधन करून बालगंधर्व यांच्यावर ‘चंद्रोदय व चंद्रास्त’ अशी दोन भागांतील प्रदीर्घ पुरवणी सादर केली आहे. त्यातील ‘चंद्रास्त’ या सुमारे सोळा ते अठरा पानी भागात गोहराबाईचे प्रकरण येते. त्यात पिंगे यांनी या बाईचे वर्णन केले आहे ते असे: गोहराबाईचा जन्म १९०८ सालचा असावा. ती रंगानं सावळी, रूपानं सामान्य, आवाजानं असामान्य-उत्तम-म्हणजे काळी दोनच्या पट्टीत गाणारी, वृत्तीनं भयानक महत्त्वाकांक्षी आणि देहयष्टीनं पुरुषांना भुरळ घालणारी अशी जिभेवर साखर घोळवणारी होती.
पिंगे नमूद करतात, की गोहराबाई नानासाहेब चाफेकरांच्या सहकार्याने मुंबईत आली, चाफेकर-चोणकर यांच्या पाठिंब्याने मुंबईत स्थिरावली. ती बालगंधर्वांप्रमाणे गायची, परंतु आरंभी बालगंधर्वांना ती आवडायची नाही आणि त्या दोघांचं एक भांडण कोर्टातही गेले होते.
पिंगे यांनी असेही नमूद केले आहे, की बालगंधर्वांनी मिरजेला जाऊन सुंता केली ती दाम्पत्यसुखासाठी. त्यामध्ये धर्मबदलाचा संबंध नाही. गोहराबाईंनी १९४७ साली ‘बालगंधर्व नाटक मंडळी’ नावाची नवी नाटक कंपनी निर्माण केली होती. त्या सुमाराला गोहराबाईंनी पंचवीस हजार रूपयांमध्ये माहीमला एक घर विकत घेतले, मात्र ते त्यांना लाभले नाही. उत्तरायुष्यात बालगंधर्वांचे बरेच सत्कार झाले. त्याचे वर्णन पिंगे ‘सत्कार पर्व’ असेच करतात. गोहराबाईंच्या मृत्यूनंतर आपले सर्वस्वच वाहून गेले अशी बालगंधर्वाची भावना झाली होती.
रविंद्र पिंगे यांच्या या पुरवणीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये बालगंधर्वांचे आत्मकथन समाविष्ट आहे. पिंगे यांनी या लेखनाच्या वह्या मिळवल्या. त्यामध्ये बालगंधर्वांच्या जीवनाचा आरंभकाळ येतो. बालगंधर्वांनी बेळगावचे मधुकर विश्वनाथ पै यांना २१ जानेवारी १९६४ ते ११ एप्रिल १९६४ या तीन महिन्यांच्या काळात आत्मनिवेदन केल्याची नोंद पिंगे यांनी केली आहे.
प्रशांत कुलकर्णी