गोव्यातील नाताळ : ख्रिस्तजन्माचा उत्सव

carasole

मला सगळ्या भारतीय सणांत नाताळचा सण आवडतो. मी गोव्यात नाताळच्या सणापासून नव्या वर्षापर्यंत छोटीशी सुट्टी घेतो. स्थलांतरित पक्षी थव्याथव्याने यावेत तसे परदेशस्थ सगेसोयरे आणि मित्र-मैत्रिणी त्या वेळी गोव्यात परततात.

दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होण्याची ती वेळ आहे. आता रात्री छोट्या आणि दिवस मोठे होणार. आभाळ कसे नितळनिवळ झाले आहे. रात्री ते नक्षत्रांनी कुचकुचून भरून जाणार आहे. पहाटेचा सायसाखरेचा उजेड वस्त्रगाळ होऊनच क्षितिजावर पसरणार आहे. उजेडाचे दिवस येणार. पानगळ संपणार. सृष्टीचा गर्भवास संपून तिचा सृजनसोहळा सुरू होणार! इगर्जीच्या घांटी वाजल्या की न परतलेल्या इष्टमित्रांच्या आठवणी असह्य होणार. आता पाण्याचे रंग होणार. आता बोटांचे ब्रश होणार. साखर आता अधिक गोड होणार. आता शब्द मऊ-मुलायम होणार. गीतांचे संगीत होणार. आता पायांत नाच येणार आणि आता वस्त्रांचे पिसारे फुलणार. आता जीवनाचाच केक होणार. नाताळ त्याच्या नाजूक बोटांनी त्यावर आयसिंग घालणार.

येसू ख्रिस्ताचा जन्म खरेच २४ डिसेंबरला झाला की काय याबद्दल गूढच आहे. खरी गोष्ट ही, की पॅगन लोक ख्रिस्त जन्मापूर्वीपासून शेकडो वर्षें, २४ डिसेंबरला उत्तरायण सुरू होत असल्यामुळे तो उजेडाचा दिवस म्हणून साजरा करत होते. त्यामुळे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस कधी का असेना, त्याच्या जन्मदिवसाचा उत्सव त्याच दिवशी साजरा करण्याची रीत पडली असावी.

भारतीय परंपरेतही तशी उदाहरणे आहेत. गणेश चतुर्थी हा मुळात भाद्रपदात साजरा होणारा कृषिसंस्कृतीतील, शेतांमधील पिकांच्या कापणीनंतरचा गौरीचा उत्सव! त्याचा माघात जन्मलेल्या गणेशाच्या जन्माशी काहीही संबंध नाही. पुढे, पुरुषसत्ताक संस्कृतीने भाद्रपद तृतीयेला साजऱ्या होणाऱ्या गौरी उत्सवाचे महत्त्व कमी करून भाद्रपद चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करणे आरंभले असावे.

सर्व महापुरुषांच्या जन्माभोवती गूढ आहे, तसे ख्रिस्त जन्माभोवतीही आहे. महर्षी व्यास, महारथी कर्ण यांच्याप्रमाणे येशू ख्रिस्ताला माता मेरीने तिच्या कौमार्यात जन्म दिला आहे. ख्रिस्त आणि कृष्ण यांच्या नावांपासून त्यांच्या जन्माच्या कथा, बालपण यांत कमालीचे साम्य आहे.

ख्रिस्ताच्या तारुण्यातील काही काळ तो अज्ञातवासातच होता. त्या काळात ख्रिस्ताचा बौद्ध भिक्षूंशी संपर्क आला आणि बौद्ध धर्माचा ख्रिस्ताने अभ्यास केला असे म्हणतात.

ख्रिस्ती धर्मावरील बौद्ध धर्माचा प्रभाव सर्वश्रुत आहे. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर तो भारतात काश्मीरपर्यंत आला आणि तेथेच त्याचे निर्वाण झाले, अशीही एक कथा आहे.

दोन हजार वर्षांपूर्वीचे जेरुसलेम, सभोवतालचा परिसर व तेथील सामाजिक परिस्थिती याचा विचार केला; तर ख्रिस्ताने केलेला करुणा, दयाभाव, बंधुत्व, सद्भाव, त्याग यांचा संदेश युगप्रवर्तकच मानला पाहिजे. त्या दृष्टीने ख्रिस्त हा फार मोठा समाजसुधारक होता. येशू ख्रिस्ताचे महात्म्य भक्तजनांच्या हृदयी बिंबवायला येशूने पाण्याची वाईन केली, येशूने वादळांतून नौका वाचवली वगैरे चमत्कार त्याच्या नावाने खपवण्याची गरज नाही. येशू ख्रिस्ताचे जीवन आणि त्याचे मरण हाच एक चमत्कार होता.

ख्रिस्त आणि बुद्ध यांच्या प्रतिमांनी जगातील सगळ्या चित्रकारांना आणि शिल्पकारांना भुरळ पाडली आहे. त्यांतही ख्रिस्ताचे करुणार्द्र डोळे, खांद्यावर खुरीस घेऊन जाणारा ख्रिस, व्हर्जिन मेरीच्या मांडीवरील इन्फण्ट जीझस आणि माता मेरीच्या मांडीवरील ख्रिस्ताचे पार्थिव (पिएटा) ही चित्रे आणि शिल्पे यांतून युरोपमधील विविध इगर्जी, चर्चेस, कॅथेड्रल आणि बासीलिका यांत ख्रिस्तजीवन चित्रांकित व शिल्पांकित केले गेले आहे.

मी स्पेनच्या बार्सिलोना शहराला भेट दिली. मी तेथे विख्यात वास्तुरचनाकार अन्तोनी गावडी यांनी बांधलेली साग्रादा फॅमिली हे चर्च पाहिले. तेथील अनुभव वेगळाच होता. मी नास्तिक असूनही तेथील अल्तारपुढे नतमस्तक झालो.

मला कोठल्याही ख्रिस्त मंदिरातील प्रशांत निवांत शांतता नेहमीच भावते. तशी शांतता मला कोठल्याही हिंदू देवळात आढळली नाही. हिंदू धर्मात केवळ ‘ॐ शांति: शांति: शांति:’ ह्या मंत्राचा जयघोष आहे. प्रत्यक्षात मात्र भजने, कीर्तने, पारायणे यांचे ध्वनिप्रदूषण आहे.

ख्रिस्ती प्रार्थनेच्या वाद्यांचे पार्श्वसंगीत जेव्हा ख्रिस्त मंदिरातील शांततेच्या वर्तुळाचा व्यासासारखा छेद करते, तेव्हा वेगळेच धीरगंभीर वातावरण प्रसरण पावत जाते.

माझ्यावर ख्रिस्ती संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. मी ख्रिस्ती धर्मगुरूंनी ख्रिस्ती देवमंदिरात रसाळ, मधाळ, सोप्या, सुबोध, ओघवत्या कोकणी भाषेतून सांगितलेली प्रवचने तन्मयतेने ऐकली आहेत. येशू ख्रिस्ताची करुणा गौतम बुद्धाच्या करुणेइतकी अथांग आहे. ख्रिस्ताचा प्रेमभाव, मानवजातीवरील-प्राणिमात्रांवरी- वनचरांवरील दयाभाव अपार आहे. मी त्याने अनेकदा भारावून गेलो आहे. मला बायबलमधील ख्रिस्तवचने वाचून ख्रिस्ती होण्याचा मोहही अनेकदा झाला आहे.

कविहृदयाचे रेव्हरंड ना.वा. टिळक आणि कधीही विस्मृतीत जाऊ न शकणाऱ्या ‘स्मृतिचित्रकार’ लक्ष्मीबाई टिळक ह्या ख्रिस्ती का झाल्या, ते मला मनोमन कळले आहे. तसे चुंबकीय आकर्षण ख्रिस्तवचनांत आहे. कविहृदयाच्या कोणाही संवेदनशील माणसाला ख्रिस्त त्याच्या चरणाशी ओढून आणतो.

मला गोव्याच्या सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक ख्रिश्चन मित्र मिळाले, त्यामुळे माझे जीवनवस्त्र भरजरी झाले. गोव्याच्या चौदा लाखांच्या लोकसंख्येत ख्रिश्चन लोकांची लोकसंख्या केवळ पंचवीस टक्के आहे. अल्पसंख्य ख्रिश्चन समाजात किती सृजनशील कलाकार, लेखक, वास्तुरचनाकार संगीतकार असावेत! हिप्नॉटिझमचा शोध लावणारे आबे फारिया, पद्मविभूषण वास्तुरचनाकार चार्लस कुरैया, व्यंगचित्रकार मारियो मिरांडा, संगीतकार रेमो फर्नांडिस, फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिग्ज, सौंदर्यललना विश्वसुंदरी रिटा फारिया, भारतीय लष्कराचे प्रमुख सुनीत रॉड्रिग्ज, खलिस्तानी चळवळ आटोक्यात आणणारे ज्युलियो रिबेरो, साहित्यिक मारिया अरोरा कुतो, जेरी पिंटो, पर्यावरणतज्ज्ञ क्लावड अल्वारिस व नॉर्मो अल्वारिस, संगीतकार अँथनी गोन्साल्विस, व्यवस्थापनतज्ज्ञ जॉर्ज मिनेझिस, जाहिरातक्षेत्रात अमुलची जाहिरात करणारे सिल्व्हेस्टर डी’कुन्हा, संशोधक डॉ. मिलान डिमेलो, स्वातंत्र्यसैनिक क्रिस्ताव ब्रिगांझा कुन्हा, डॉ. मिनेझिस ब्रिगांझा, कामगार नेते पीटर अल्वारिस, टेनिस खेळाडू लिएंडर पेस… अशी अनेक नावे डोळ्यांसमोर येतात.

ख्रिस्ती बांधवांकडून घेण्यासारखे गुण अनेक आहेत. त्यांची आतिथ्यशीलता, शिष्टाचार, टापटीप, स्वच्छता, सौंदर्यदृष्टी, पाककलानैपुण्य, गरिबांविषयीची कणव यांसारखे गुण हिंदू समाजात अपवादाने दिसतात.

अर्थात गोमंतकीय ख्रिस्ती समाज दोषमुक्त नाही. त्या समाजाला – किंबहुना भारतीय ख्रिस्ती समाजाला – कोणीही सामाजिक पुढारी लाभलेले नाहीत. त्या समाजातून एखादा हमीद दलवाई, एखादी रझिया पटेल जन्माला येईल अशी लक्षणे दिसत नाहीत.

ख्रिश्चन धर्मात अंधश्रद्धा अनेक आहेत. माता मेरीच्या कौमार्यापासून सुरू होणाऱ्या त्या अंधश्रद्धा क्रॉसवर गुड फ्रायडेला हौतात्म्य पत्करलेल्या येशू ख्रिस्ताचे ईस्टरच्या दिवशी रिसेक्शन म्हणजे येशू जिवंत झाला, आकाशात माता मेरी दिसते, सायबिणीच्या कृपेने अनेक दुर्धर आजार बरे होतात वगैरे… या अंधश्रद्धांना कोणीही आव्हान दिले नाही. दोन समाजांतील स्वास्थ्य बिघडू नये म्हणून हिंदूबहुल ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती – गोवा शाखे’नेही त्या अंधश्रद्धांविरूद्ध मौन बाळगण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

पाश्चात्य देशांतील ख्रिस्ती धर्माचा तर गर्भपाताला विरोध, स्टेमसेलच्या संशोधनाला विरोध, डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला विरोध आहे. कधी कधी, ख्रिस्ती धर्म इस्लामपेक्षाही अधिक पुनरुत्थानवादी (फंडामेंटलिस्ट) आहे असे सखेद म्हणावे लागते.

गोमंतकीय ख्रिस्ती बांधवांत उद्योजकतेचा पूर्ण अभाव आहे. त्यामुळे नोकरीसाठी ते बांधव मध्य-पूर्व, युरोप, अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या देशांत स्थलांतर करत असतात.
माझे रेझरशार्प बुद्धीचे मित्र अॅड. राधाराव ग्रासियस म्हणूनच असे विधान करतात – ‘गोव्यातील प्रत्येक ख्रिस्ती मूल जन्मत: पासपोर्ट तोंडात घेऊन येते.’ त्यापुढे मी म्हणेन, की ‘त्या पासपोर्टवर पोर्तुगीज नागरिकत्वाचा शिक्काही असतो.’ सन २०६६ मध्ये गोव्यात ख्रिस्ती बांधव पाच टक्यां नहूनही कमी असतील.

गोमंतकीय ख्रिस्ती बांधव जे परदेशांत जाऊ शकत नाहीत, ते गोव्यातच अल्पपगारी नोकर्याय करतात. त्यामुळे ख्रिस्ती समाजात प्रचंड आर्थिक विषमता आहे. त्या विषमतेमुळे समाजात नैराश्य आणि वैफल्य आहे. ख्रिस्ती स्त्रियांचे नवरे परदेशांत असल्याने त्या अनेक मानसिक रोगांनी पछाडलेल्या आहेत. त्या सगळ्याचे प्रतिबिंब ख्रिस्ती समाज एकूणएक विकासाच्या प्रकल्पाला करत असलेल्या विरोधात दिसून येते. ख्रिश्चनबहुल ग्रामसभांत रस्त्याच्या रुंदीकरणाला, गृहबांधणी प्रकल्पाला, आयआयटीसारख्या शिक्षण संकुलाला (ज्यांत प्रदूषणाची संभाव्यता नसते), पुलांना-कारखान्यांना सरसकट विरोध असतो. ती गोव्याच्या सर्वांगीण हिताच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोव्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष यांनी ख्रिस्ती बांधवांना वेळोवेळी दुखावले आहे. कोंकणी भाषेच्या जहाल पुरस्कर्त्यांनी देवनागरी लिपीचा आग्रह धरताना सेमी लिपीतून कोंकणी लिहिणार्या  ख्रिस्ती बांधवांना विनाकारण विरोध केला आहे. यामुळे गोमंतकीय ख्रिस्ती बांधवांना तो देश त्यांचा वाटत नाही. त्यांना वाटते, ते केवळ गोवा नावाच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभे आहेत आणि लिस्बन, लंडन, पॅरिस, न्यू यॉर्क, सिडनी, जोहान्सबर्ग येथे जाणार्याव आगगाड्या येणार आहेत; त्यांची केवळ ते वाट पाहत आहेत.

पण ते सगळे कटू वातावरण नाताळच्या आठवड्यात निवळून जाते. हिंदू-ख्रिस्ती बांधव नाताळच्या सणांत एकमेकांच्या घरी जाऊन केक, बेंबिक, दोदोल यांची मिठाई देतात.

गोव्यात हिंदू-ख्रिस्ती समाजांत कधीही दंगली झालेल्या नाहीत, हे गोव्याचे वैशिष्ट्य आहे. त्या सामाजिक सलोख्याची मूळे ऐतिहासिक आहेत.

सात गोमंतकीय देवता (बहिणी) आणि देव (भाऊ) यांपैकी एक देवता ख्रिश्चन आहे. त्या बहीण – देवता आणि त्यांचा भाऊ म्हणजे केळबाय, लईराय, मोरजाय, म्हामाय, म्हालसा, अदादीपा (जी अदृस्य झाली) आणि मिलाग्रीन आणि भाऊ खेतलो!

धार्मिक सामंजस्यामुळे, ख्रिस्ती बांधव हिंदू देवळात देवाला नवस करण्यासाठी जातात आणि हिंदू मिलाग्रीन सायबिणीच्या फेस्ताला जातात.

पूर्वी, मी नाताळच्या मध्यरात्रीचे प्रवचन ऐकत असे. आता, मी नाताळच्या मध्यरात्रीनंतर पहाटे उठतो. मला पहाटेपूर्वीच्या अंधारात गोव्याच्या रम्य खेडेगावांतून फिरणे आवडते. छोटी छोटी घरे रंगीबेरंगी दिव्यांनी उजळलेली असतात. जवळच्या तळ्यात मध्यभागी होडीत येसू ख्रिस्ताचा क्रिब (गोठाक) केलेला असतो.

पहाट होत आली, की मी हिरव्यागार शेताच्या बाजूला उभा असेलला काळा कुळकुळीत खुरीस पाहून नत होतो. अवनत होतो. खुरसासारखे साधे, सोपे माणसाळलेले आध्यात्मिक प्रतीक दुसरे नाही.

ॐ आकाराची शिरवंत श्रीमंती नसेल खुरसाला; नसेल खुरसाला मशिदीवरच्या चंद्रकोरीची नजाकत! नसेल त्यावर गर्द केसरी किंवा गार हिरव्या रंगाची शिंपण! पण तरीही खुरसाचे ते नग्न, नागडे, काळे, शिसवी राजस रूप मला आवडते. खुरसाची भाषा माणूसघाणी नसते. त्याचे व्याकरण क्लिष्ट नसते, त्याची लिपीही मोडी नसते.

अद्वैताचे आणि विशिष्टाद्वैताचे तत्त्वज्ञान माझ्या डोक्यावरून नेहमीच गेले आहे. मला मानवी जीवनातील द्वैत आवडते. तेच तर मला त्या खुरसात दिसते.

जीवन आणि मरण यांचे द्वैत, प्रकृती आणि पुरुष यांचे द्वैत सृजन आणि संहार यांचे द्वैत, आनंद आणि वेदना यांचे द्वैत!

द्वैताच्या चित्रलिपीतील विरामचिन्ह म्हणजे खुरीस!

मी खुरसापुढे नतमस्तक होतो, अवनत होतो आणि पानगळीतील पानांप्रमाणे जीवनातील द्वेषाची सारी पाने गळून पडतात; मग मीही खुरसासारखाच निष्पर्ण होतो. इगर्जीची घांट वाजू लागते तसा त्या घांटीच्या अंतर्नादाने मी अंतर्मुख होतो. ख्रिस्तचरणी लीन होतो. ख्रिस्ताकडे मागणे करतो, ख्रिस्ताला गार्हाअणे घालतो.

“ख्रिस्ता, तुझ्या मरणाचे गुपित आम्हाला कळले रे! पण तुझ्या ‘आंकवार’ जन्माचे कोडे आम्हाला सुटले नाही रे!

“अनंताची संकल्पना आम्ही समजू शकतो, पण बुद्धीला ताणूनही अनादीची कल्पना आम्हाला कळत नाही रे!

“विश्वाचा विलय होईल किंवा होणारदेखील नाही. काळ जळून भस्म होईल किंवा होणारदेखील नाही. पण ज्या क्षणी काळाला कोमरी फुटली आणि अनाकारतून विश्वलोकाचा किल्ल तरारून आला… दिगंतराच्या गोव्यात, आकाशाच्या आंकवार कुसव्यात सृजनाचा जन्मसोहळा झाला, तो क्षण आम्ही कल्पनेनेदेखील पाहू शकत नाही रे!

“ख्रिस्ता, ज्याला आम्ही आजवर ज्ञानाचा गर्भवास समजत होतो, ते आमच्या अज्ञानाचे आंकवारपण होते, हेदेखील आम्हा पामर लेकरांना कळले तरीदेखील खूप झाले रे!”

टीप :  ह्या लेखात काही कोंकणी शब्द आहेत, त्यासाठी मराठी प्रतिशब्द देत आहे.
नाताळ – ख्रिसमस, खुरीस – क्रॉस, इगर्ज – चर्च, आंकवारपण – कौमार्य, कुसव्यात – गर्भात, किल्ल – कोंभ, कोमरी – अंकुर.

– दत्ता दामोदर नायक, गोवा.
9822102416, kdnaik@cdhomes.com

About Post Author

2 COMMENTS

  1. सौर उर्जा माहीती
    सौर उर्जा माहीती

Comments are closed.