गुरुदेव रानडे व त्यांचे तत्त्वज्ञान

carasole

निंबर्गी-संप्रदायाने सर्व संप्रदायांतील नाम-भक्तीचा समन्वय साधून नाम-स्मरण हाच परमार्थ असा सिद्धांत मांडला आहे. नवनाथांपैकी रेवणनाथांपासून काडसिद्ध (सिद्धटेक); श्रीनारायणराव भाऊसाहेब ऊर्फ श्रीगुरुलिंगजंगम (निंबर्गी); श्रीभाऊसाहेब महाराज देशपांडे (उमदी); श्रीगुरुदेव रा.द. रानडे (निंबाळ) अशी गुरुपरंपरा आहे.

श्रीगुरुदेवांनी पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचाही तौलनिक अभ्यास केला आणि त्यातील साक्षात्काराच्या स्वरूपातील एकवाक्यता प्रतिपादित केली. त्यांनी तत्त्वज्ञानाचा पडताळा साधनमार्गाद्वारे स्वानुभूतीने घेतला आणि नंतर त्यांच्या ग्रंथांतून साक्षात्कारशास्त्राचा पाठपुरावा केला.

गुरुदेवांचा जन्म (जमखंडी) 3 जुलै 1886 चा. त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई यांनी त्यांचे गुरू श्रीशंभुलिंगस्वामी यांच्या पायावर गुरुदेवांना घातले, त्या वेळी गुरुदेवांचे वय पाच वर्षें होते. तेव्हा शंभुलिंगस्वामी म्हणाले, हा मुलगा पुढे मोठा सत्पुरुष होईल! गुरुदेवांनी 1901 मध्ये श्रीभाऊसाहेब महाराज उमदीकर यांची भेट झाल्यावर त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. त्यांना घेतला. त्यांना 1902 मध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत ‘जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप’ मिळाली. त्यातून त्यांची गुरुनिष्ठा वाढली.

ते 1907 मध्ये बी.ए.ला गणित विषय घेऊन द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांनी सद्गुरुंना 1913 मध्ये लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की शरीर, मन आणि बुद्धी आत्मज्ञानाच्या प्रसारार्थ खर्च व्हावी’. त्यांनी तो संकल्प व भक्तिविषयीची तितकीच तळमळ बालवयातच प्रकट केली. त्यांना 1907 ते 1909 ही तीन वर्षें डेक्कन कॉलेज, पुणे येथे फेलोशिप मिळाली. ते 1913 मध्ये एम.ए.ला संस्कृत विषय घेऊन प्रथम श्रेणीत नि सर्वप्रथम उत्तीर्ण झाले. त्यांनी 1914 ते 1920 फर्ग्युसन कॉलेज (पुणे) येथे व 1920 ते 1924 पर्यंत विलिंग्डन कॉलेज (सांगली) येथे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी 1926 मध्ये ‘उपनिषद्ररहस्य’ ग्रंथ लिहिला. त्यातील प्रस्तावनेत, निंबाळचे घर ‘आश्रम’ असल्याचा उल्लेख करून आत्मसाक्षात्कारासाठी, साधना करण्याकरता साधकांनी निंबाळ येथे यावे असे नमूद केले आहे. त्याच जागी श्रीगुरुदेव रानडे मंदिर व समाधी आहे. पुढे त्यांनी वचनामृते लिहिली.

त्यांनी 1927 ते 1946 पर्यंत अलाहाबाद येथे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले व पुढे, त्यांनी तेथेच कुलगुरुपदही भूषवले. त्यांना 1947 मध्ये डी.लिट. पदवी दिली गेली. त्यांचा 1956 मध्ये जमखंडी (जन्मगाव) येथे अमृतमहोत्सव झाला. त्यांचे महानिर्वाण 6 जून 1957 मध्ये निंबाळ येथे झाले. त्यांना अपार गुरुनिष्ठा आणि अविरत नामस्मरण या योगे गुरुपदवी प्राप्त झाली. त्यांनी 1935 पासून अखेरपर्यंत म्हणजे 1957 पर्यंत अनेकांना ‘नामोपदेश’ देऊन आत्मोद्धाराचा मार्ग दाखवला.

श्रीगुरुदेवांनी श्रीज्ञानेश्वरांच्या ज्ञानदेवी ग्रंथातील अनुभूतीविषयक चिंतन ‘’ज्ञानेश्वरवचनामृत’’ या ग्रंथात समग्र‘पणाने केले आहे, पण ते करत असतानाही त्यांची दृष्टी सर्व संप्रदायांविषयीची समन्वयाची असल्याचे स्पष्ट होते. ते म्हणतात, आम्हास “कोणत्याच संप्रदायाचा अभिनिवेश नाही व मधमाश्यांप्रमाणे मिळेल तेथून अध्यात्ममध गोळा करण्याचा आमचा उद्देश आहे.”

आत्मज्ञानाच्या विचारात नीतिविचारही आला. तेथेही केवळ नैतिक शुद्धी चालत नाही. नीतीला भक्तीची जोड हवी. ‘भक्तिहीन नीती ही अनीतीच होय’ असे श्रीगुरुदेवांनी नमूद करून ठेवले आहे. परमार्थ हा संतकाव्याचा गाभा किंवा आत्मा आहे असे म्हटले तरी चालेल. साक्षात्काराला गूढत्वाचे वलय देण्याचेही कारण नाही. उलट, आत्मसाक्षात्कार ही प्रकट विद्या आहे. ‘सबीज नाममंत्राचे अखंड स्मरण झाल्यास देवाचा साक्षात्कार याच जन्मी होणे शक्य आहे असे संतांचा परमार्थमार्ग सांगत असून, त्यांचे ते सांगणे अंधश्रद्धेचे नसून प्रचीतीयुक्त आहे अशी श्रीगुरुदेवांची भूमिका आहे.

त्यांची ती केवळ तात्त्विक भूमिका नाही. ते स्वतः ती भूमिका जगले आहेत. त्यामुळेच त्यांची लेखणी अधिकारवाणीने चालते. ‘आत्मप्रत्यय हीच पारमार्थिक अनुभवाची सर्वात मोठी कसोटी होय. स्वतःचे संपूर्ण समाधान होऊन अनुभव आचरणात उतरला व देवापायी सर्वस्वार्पण झाले म्हणजे तो स्वानुभव खरा असे म्हणण्यास हरकत नाही अशी आत्मानुभवाची भाषा ते बोलतात.

श्रीगहिनीनाथांनी श्रीनिवृत्तिनाथांना उपदेश केला आणि श्रीनिवृत्तिनाथांनी श्रीज्ञानेश्वरांना उपदेश केला. त्या उपदेशातही ज्ञानदेवाविषयीची श्रीज्ञानेश्वरांची दृष्टी स्पष्ट होते. ती दृष्टी श्रीगुरुदेवांनाही महत्त्वाची वाटते, कारण त्यांच्याही सद्गुरूंनी आत्मज्ञानाचा प्रसार लोकांच्या दुःखमुक्तीसाठी केला.

गुरुदेवांनी जेव्हा ‘ज्ञानेश्वरवचनामृत’ ग्रंथ लिहिला, तेव्हा पहिल्या आवृत्तीत त्यांनी फक्त ज्ञानदेवी ग्रंथाचा विचार केला होता. परंतु दुस-या आवृत्तीच्या वेळी त्यांनी ‘अमृतानुभव’ आणि ‘चांगदेवपासष्टी’ यांतीलही उतारे घेऊन त्यांच्या मूळ ग्रंथास परिपूर्णता आणली. ज्ञानदेवीच्या आकलनाला त्या दोन ग्रंथांच्या अनुपस्थितीने उणीव राहील असे त्यांना वाटत होते. गुरुदेवांच्या दृष्टीने भक्तिमार्गात सद्गुरुकृपेचे जे विशेष महत्त्व आहे, ते त्या दोन ग्रंथांतही विपुल प्रमाणात असल्याने त्या उल्लेखाशिवाय ज्ञानदेवी ग्रंथातील श्रीज्ञानेश्वरांची सद्गुरुविषयक भूमिका पूर्णत्वास जाणार नाही असे त्यांना वाटले असावे.

– डॉ. नरेंद्र कुंटे, सोलापूर

(‘आदिमाता’वरून उद्धृत)

About Post Author

Previous articleग्रामदैवत खंडेराव महाराज
Next articleअनुराधा प्रभुदेसाई यांचे कारगिल ‘लक्ष्य’
प्रा. डॉ. नरेंद्र सदाशिव कुंटे यांचा जन्म सोलापूरच्या जमखंडी गावातला. त्यांनी एम.ए. पीएच. डी पूर्ण करताना 'चिं. त्र्यं. खानोलकरांची कविता कादंबरी' या विषयावर प्रबंध लिहीला. कुंटे हे १९७१ ते १९८० या काळात अक्कलकोट महाविद्यालयामध्ये शिक्षक होते. त्यानंतर त्यांनी १९८० ते २००५ पर्यंत सोलापूरच्या 'दयानंद कला व शास्त्र' या महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख पदावर काम केले. नरेंद्र कुंटे यांनी १९६३ ते १९७० या काळात दैनिक 'संचार' आणि दैनिक 'समाचार'मध्ये पत्रकारिता केली. ते वृत्तपत्रांतून सातत्याने लेखन करतात. ते संतवाङ्मावर लेखन करण्यासोबत व्याख्याने व प्रवचने देतात. कुंटे यांना 'देवर्षि नारद' पुरस्कार, 'डॉ. मु.श्री. कानडे' पुरस्कार, 'अनुबंधी' पुरस्कार, 'श्रीदत्तरत्न' पुरस्कार, 'गांधी फोरम'चा 'समाजसेवा' पुरस्कार, 'चरण प्रसाद' पुरस्कार असे सन्मान प्राप्त झाले आहेत.

7 COMMENTS

  1. Nice article..pathway of God
    Nice article..pathway of God ya pustakache namollekh tari hava hota. salute to great philosopher gurudev Ranade.

  2. Param pujaniya Gurudevanche
    Param pujaniya Gurudevanche Thodkyat pan Mahitipurana Charitra.Farch chan…khup Avadle.

  3. गुरुदेवांच्या सर्व पुस्तकांची
    गुरुदेवांच्या सर्व पुस्तकांची नावे द्यावीत अशी विनंती आहे.

  4. VERY NICE ARTICLE, REQUEST…
    VERY NICE ARTICLE, REQUEST IS I WISH TO PURCHASE BOOKS OF SHRI GURUDEO RANADE,WHERE I WILL GET ALL BOOKS,PL GIVE MR CONTACT NO.THANKS

  5. गुरुदेव रानडे यांचे धर्म आणि…
    गुरुदेव रानडे यांचे धर्म आणि गुढवाद विषयक विचार द्यावेत. अशी विनंयी

  6. या ठिकाणी येऊन मार्गदर्शन…
    या ठिकाणी येऊन मार्गदर्शन घेण्याची खुप इच्छा आहे.

Comments are closed.