Home वैभव गावांच्‍या अंतरंगात गुढीपूर – काल आणि आज

गुढीपूर – काल आणि आज

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना कुडाळमध्ये पिंगुळी हे छोटे कलाग्राम आहे. या पिंगुळी गावात गुढीपूर नावाची ठाकर लोककलाकारांचीची वाडी आहे. ठाकर लोककलाकारांमध्ये पिंगळी, पांगुळ, गोंधळी व बावलेकर असे लोककलाकार आहेत. हे सगळे एकच समूहाचा भाग असले तरी त्यांना लोककलेच्या सादरीकरणामधली त्यांची कामे आणि साधने वेगवेगळी आहेत.

जागतिकीकरणाचा, शहरीकरणाचा रेटा आणि जातीव्यवस्थेच्या जाचातून सुटण्याच्या धडपडीतून अनेक लोककलाकारांनी त्यांची मूळ गावे सोडून स्थलांतर केले. परंपरेला नकार आणि परंपरेचा डोळस आणि सन्मानजनक स्वीकार या दुविधेतून हे लोककलाकार जात असताना कोविडसारख्या महासाथीने पुन्हा त्यांना त्यांच्या गावी जाणे भाग पडले. उपजीविकेकरता कलेच्या आश्रयाला जावे लागले. या बिकट परिस्थितीतून वाट काढत अनेक कलाकारांनी त्यांच्या कलेला नवे रूप दिले, वर्तमानकाळाशी जोडून घेतले.

गुढीपूर वाडीविषयी, तिथल्या लोककलाकारांविषयी, त्यांच्या कलेविषयी आणि जगण्याच्या धडपडीविषयी आत्मियतेने सांगताहेत पिंगुळी, चित्रकथी या लोककलेच्या अभ्यासक डॉ.माणिक वालावालकर.

मोगरा फुलला या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

-सुनंदा भोसेकर

गुढीपूर – काल आणि आज

पूर्वार्ध

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना कुडाळमध्ये पिंगुळी हे छोटे गाव आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने याला गाव म्हटले तरी एक मोठा इतिहास असलेले हे दुर्लक्षित कलाग्राम आहे ! याचे एक वैशिष्टय म्हणजे या कलाग्रामाची स्थापना कुणा एका व्यक्तीने केली नाही. हे गाव सतरा ते एकोणिसाव्या शतकातील कोकणातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत घडलेल्या स्थित्यंतरांतून निर्माण झाले. इथे अनेक लोककला रुजल्या आणि त्यांचा क्षय देखील होत गेला.

पिंगुळी या गावाला पिंगळा, पांगुळ इत्यादी लोककलांचे संदर्भ आहेत. चित्रकथी या लोककलेचा अभ्यास करताना लक्षात आले की संपूर्ण भारतात पिंगल गाम, पिंगल, पिंगळ, पिंगाली, नया पिंगळा अशी नामसाधर्म्य असलेली अनेक गावे आहेत. यातील काही गावांमध्ये लोककला परंपरा आजही पाहता येतात. यावर एक स्वतंत्र अभ्यास होऊ शकतो. पण यातील लोककलेचा दुवा लक्षात घेण्यासारखा आहे हे नक्की. तर या पिंगुळी गावात गुढीपूर नावाची वाडी आहे. या वाडीमध्ये ठाकर लोक राहतात. या ठाकर समूहाच्या वैशिष्टयपूर्ण चालीरीती, परंपरा आहेत. या परंपरांचे कोकणातील इतर काही परंपरांशी साधर्म्य आहे तर काही परंपरा अगदी वेगळ्या आहेत. अनेक संस्कृती, परंपरांचा संगम हे भारतीय लोकसमूहांचे अविभाज्य अंग इथेही दिसते.

या गुढीपूर नावाच्या देखील कथा आहेत. यातील एक दंतकथा म्हणते की वनवासात असताना श्रीरामानी येथे गुढीपाडव्याला गुढी उभारली. तर दुसरी एक कथा म्हणते की सावंतवाडीचे राजे पहिले खेम सावंत यांनी त्यांचा विजयोत्सव येथे गुढी उभारून साजरा केला म्हणून हे गुढीपूर ! गुढीपूरमधील अनेक कलापरंपरांमध्ये कळसूत्री बाहुली परंपरासुद्धा समाविष्ट आहे म्हणून गुढीपूर मधली ‘गुड्डी’ म्हणजे बाहुली. या बाहुलीमुळे याला गुडीवाडी किंवा गुढीपूर म्हटले गेले असावे अशी समजूत आहे. या भागामध्ये सतरा ते एकोणिसाव्या शतकाच्या काळात ‘गुडीगर’ कारागीर होते. आजही कोकण, गोवा, कर्नाटक या भागात हे कारागीर आहेत. यांचा संबध देखील गुढीपूर या वाडीशी असावा. तत्कालीन गुडीगर, चितारी, ठाकर इत्यादी अनेक लोकसमूहांची दखल गॅझेटियरनी घेतली आहे. त्याचप्रमाणे आर.ई. इन्थोव्हन, गोविंद मंगेश कालेलकर यांनी लिहिलेल्या ग्रंथात देखील याविषयी नोंदी आहेत. ना.बा. रणसिंग आणि मोहन रणसिंग यांच्या अभ्यासात्मक लेखनातून देखील ठाकर लोकसमूहाच्या विविध सांस्कृतिक अंगांची ओळख होते. डॉ. महेश केळुसकर आणि रामचंद्र वरक यांनी लिहिलेल्या पुस्तकातून ठाकर लोककलेविषयी जाणून घेता येते.

लोककला असा उल्लेख होत असला तरी कोणतीही लोककला ही केवळ कलानिर्मिती नसते तर त्या समूहाच्या उपासना आणि श्रद्धांचा ती भाग असते. ठाकर लोककलाकारांमध्ये पिंगळी, पांगुळ, गोंधळी व बावलेकर असे लोककलाकार आहेत. हे सगळे एकाच समूहाचा भाग असले तरी त्यांना वाटून दिलेली अथवा त्यांनी स्वीकारलेली कामे वेगवेगळी आहेत. म्हणजेच त्यांच्या कलानिर्मितीचे हे एका अर्थाने कप्पे आहेत. ठाकर लोकसमूहात पिंगळी आणि पांगुळ आहेत. पिंगळी आणि पांगुळ महाराष्ट्रात इतरत्र देखील आढळतात. पिंगळा हा ठिपके असलेला घुबड पक्षांपैकी एक छोटा पक्षी आहे. तो मानवी वस्तीजवळ रहातो आणि पहाटेच्या वेळी साद घालतो. पिंगळी लोककलाकार देखील पहाटेच्या वेळी गाणे म्हणत फिरतो. ठाकर पिंगळी कलाकाराची वैशिष्टयपूर्ण वेशभूषा असते आणि हातात काठी, कंदील, डवूर व नेवरा अशी वाद्ये असतात. पांगुळ कलाकार शृंगार केलेल्या बैलाला घेऊन त्यांची कला सादर करतात. पिंगळी व पांगुळ हे दोन्ही कलाकार कुळी वाचून दाखवतात. कुळी वाचणे म्हणजे, ते ज्या घरासमोर उभे राहातात त्यांच्या कुळाचा इतिहास वाचणे. ठाकर लोकसमूहात गोंधळ घालणारे कलाकार आहेत. या धार्मिक कार्यात वेगवेगळे विधी केले जातात ज्यात नृत्य, गायन, कथावाचन इत्यादींचा समावेश असतो. ठाकर लोकसमूह पोवाडे गातो. तमाशा, सोंगा, स्त्रियांची फेरनृत्ये आणि पारंपरिक गाणी अशा अनेक समृद्ध कलापरंपरा या लोक समूहाकडे आहेत. इथला पोवाडा, तमाशा हा महाराष्ट्रातील शाहिरी पोवाडा किंवा फडाच्या तमाशासारखा नाही आणि हेच त्याचे वैशिष्टय आहे.

ठाकर लोकसमूहाची आणखी एक महत्त्वाची कला परंपरा म्हणजे ‘बावलेकर’. हे बावलेकर चित्रकथी, कळसूत्री, छाया बाहुली यांचे सादरीकरण करतात. या सादरकर्त्या लोककलाकारांची नावे कोकण परिसरात अनेकांना माहित नसतात ते त्यांना बावलेकर म्हणून ओळखतात. चित्रकथी म्हणजे पोथी वाचन असते. या कलाकारांना वंशपरंपरेने कोकणातील काही मंदिरे दिलेली आहेत. तेथे ते ठराविक तिथीला पोथी वाचन करतात. पण या पोथीवर वाचन करण्यासाठी अक्षरे नसतात तर चित्रे असतात. या चित्रांच्या आधारे रामायण, महाभारताच्या कथा गाऊन सांगितल्या जातात. अर्थातच त्याला टाळ, वीणा, हुडूक अशा वाद्य संगीताची साथ असते. एकेकाळच्या चित्र साक्षरतेचे हे उत्तम उदाहरण आहे. चित्रकथीच्या मौखिक आणि दृश्य परंपरेमध्ये लोकतत्त्वाची अनेक सौंदर्यस्थळे अभ्यासता येतात.

राजस्थानी कळसूत्री बाहुली अनेकांना माहीत असेल. महाराष्ट्राची कळसूत्री त्याच परंपरेतली. पण त्यांची ठेवण मात्र राजस्थानी बाहुलीपेक्षा वेगळी आहे. बावलेकरांकडे कळसूत्री बाहुल्यांचे संच असतात. त्याला ठाकरी भाषेतील शब्द म्हणजे ‘दायति’. या बाहुल्या हलक्या वजनाच्या पांगारा, पळस अशा लाकडापासून बनवतात. बाहुल्या रंगवून कपडे, माळा इत्यादींनी त्यांना सजवले जाते. पौराणिक कथांवर आधारित कळसूत्री नाट्य या बाहुल्यांच्या आधारे सादर केले जाते. अलीकडे सरकारी योजनांच्या जाणीव – जागृती कार्यक्रमांसाठी देखील याचा उपयोग केला जातो. ठाकर लोकसमूहाकडे ‘कळबाहुली’ देखील असते. याला सूत्र नसतात. तिला साळू म्हणतात. ही साळू छोटी आणि गोड दिसते. ठाकर कलाकार भिक्षा मागायला जाताना हिला घेऊन जातात. तिला घेऊन गाणी म्हणतात. या समूहाकडे छायाबाहुली देखील आहे. ती चामडे वापरून करतात. या बाहुल्या म्हणजे चामड्याच्या तुकड्यावर कथेतील प्रतिमा कापून रंगवल्या जातात. त्यावर वेगवेगळ्या आकाराची छोटी भोके असतात आणि बाहुलीला काठी असते. अंधारात दिव्याच्या साहाय्याने सावल्या पाडून या बाहुलीचा खेळ दाखवला जातो. या बाहुली परंपरेचे साधर्म्य आंध्रप्रदेश, कर्नाटक मधील छाया बाहुलीशी आहे. असे साधर्म्य असणे हा तत्त्कालीन अखिल भारतीय कलाजगताशी जोडलेले असण्याचा भाग आहे.

असे हे गुढीपूर. कोकणातील ठाकरवाडी. इतरवेळी दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवण्यात ती व्यग्र असणारी सर्वसामान्य माणसे. पण त्यांचे असामान्यत्व सुरू होते जेव्हा ते लोकउपासक किंवा लोककलाकार म्हणून आपल्या समोर येतात.

उत्तरार्ध

लोककलाकारांचा संघर्ष मोठा आहे. लोककलाकारांचे हे समूह देवता उपासक आहेत. त्यांना समाजजीवनात एकेकाळी स्थान होते. कोणत्याही काळात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा स्वीकार अपरिहार्यपणे तरी काही अटींवर करत असते. तत्कालीन समाजाने काही अटींवर लोकउपासकांचा स्वीकार केला होता. परस्पर संबंधातून एक विशिष्ट समाज व्यवस्था निर्माण झाली होती. ठाकर लोकसमूह सुद्धा याच स्थित्यंतरांतून गेला. ठाकर कलांचे साधर्म्य दक्षिण आणि उत्तरेच्या विविध कला परंपरांशी आहे. ठाकर आज जरी कोकणात पूर्ण स्थायिक असले तरी पूर्वी ते गोवा, कर्नाटकपर्यंत फिरून भिक्षा गोळा करत आणि स्वतःची उपजीविका सांभाळत. या भिक्षा गोळा करण्यामुळे ब्रिटीश काळात त्यांचा उल्लेख भिकारी असा केला गेला. परिणामी समाजाचा या उपासकांकडे बघण्याचा दृष्टीकोन हळूहळू बदलत गेला. अस्पृश्यतेचे संदर्भ याला होतेच. लोककला ‘कला’ म्हणून टिकवण्यापेक्षा त्यातील केवळ श्रद्धा ‘उपचार’ म्हणून उरली. साहजिकच कला क्षीण होत गेली. पुढे माणसांच्या जगण्याला जागतिकीकरणाचे संदर्भ आले. शाळाकॉलेजमधली शिक्षणपद्धती आली. पुन्हा काही पातळीवर अस्पृश्यतेचे संदर्भ पुसले जाऊ लागले. वैचारिक क्रांती म्हणता येणार नाही पण या सगळ्यातून घुसळण झाली इतके नक्की. या घुसळणीने लोकांना स्वतःचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले.

काळाबरोबर सरकताना परंपरा प्रवाही होतात. समाजव्यवस्थेमध्ये टिकून राहायचे आहे आणि त्यासाठी परंपरा सांभाळायची आहे. लोकउपासक म्हणून स्वतःची ओळख त्या परंपरेशी निगडीत आहे. पण त्या परंपरेत असणाऱ्या नकोशा गोष्टीतून सुटका सुद्धा हवी आहे. या मानसिक गोंधळातून जाताना लोकउपासकांनी अनेक मार्ग शोधले. काहींनी परंपरांचे हे जोखड नाकारले. स्वतःची त्यातून सुटका करून घेतली. इतर व्यवसाय स्वीकारले. त्यासाठी शहरामध्ये स्थलांतर केले. शहरात आल्यावर लोकउपासक म्हणून गावात काम नाकारण्यासाठी सबळ कारण मिळाले. काहींनी परिसरातच नोकरी, व्यवसाय स्वीकारला. त्यातून स्थैर्य मिळवले आणि जमेल तितकी परंपरा सांभाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सरकारी ऑफिसर, बँक ऑफिसर म्हणून नोकरी केली आणि त्याचवेळी वर्षातून एकदा चित्रकथी वाचली किंवा पिंगळी म्हणून भिक्षा मागितली. काहींनी याही पलीकडे जाऊन संघर्ष केला. वेळोवेळी पडेल ती काम केली पण त्यातले कलातत्त्व समजून घेतले आणि स्वतःला त्याच्याशी वेगवेगळ्या प्रकारे जोडून ठेवले.

सुरेश नाना रणसिंग हे त्यापैकी एक. ते गुढीपूरमध्ये आबा या नावाने परिचित आहेत. आबांना अलीकडे महाराष्ट्र शासनाने राज्य पुरस्काराने गौरवले आहे. ठाकर लोकसमूहातील कलेचा चालताबोलता कोश म्हटले तर वावगे ठरू नये असे हे अवलिया व्यक्तिमत्त्व. वास्तविक त्याचे घर पोवाडे गाणारे, पण लहानपणापासून अनेक कला अवगत असल्यामुळे त्यांना चित्रकथी, बाहुली याची कथानके मुखोद्गत आहेत. आबांचे घर, लोककलावंताचे मोकळेढाकळे घर आहे. इथल्या ओसरीत आबा मासेमारीची जाळी विणताना दिसतात. ठाकर लोकांचा हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. ते जाळी विणताना आबा रामायणातली गोष्ट सांगत कधी महाभारतात घेऊन जातात कळत नाही ! हे बोलताना समकालीन राजकारणाची अनेक उदाहरण येतात. ते त्यातच दोनचार अभंग आणि एखादे साळूचे गाणे किंवा पोवाड्याच्या दोनचार ओळी  सुद्धा ऐकवतात. उपजत शहाणपण, उत्तम निरीक्षणशक्ती आणि लोककथा वाचकाचा बोलघेवडेपणा याचे बेमालूम मिश्रण आबांमध्ये आहे. आबा हल्ली सादरीकरण करायला फार जात नाहीत. पण जर गेलेच तर मात्र धोतर, शर्ट, जाकीट, टोपी अशी पूर्ण पारंपरिक वेशभूषा करण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. वास्तविक केवळ वेशभूषेमुळे कुणी लोककलावंत ठरत नाही पण रंगमंचावरील ‘आहार्य’चं भान त्यांना आहे. वयामुळे गात्र थकलेल्या आबांसारख्या लोककलावंतानी परिस्थितीचा स्वीकार करण्याची श्रद्धा देखील याच लोककलेतून मिळवलेली आहे. लोककला किंवा कलेचे मानवी जीवनातले उपयोजन इथे सामोरे येते.

गुढीपूरमधल्या ज्या कलाकारांनी इथल्या लोककलेला नवीन आयाम दिले यामध्ये एक महत्त्वाचं नाव आहे पद्मश्री परशुराम गंगावणे. त्यांना ठाकर समाजातील विविध कला आणि परंपरा याचं ज्ञान अर्थातच सुरुवातीच्या काळात वडिलांकडून मिळाले. मणी कौल यांची दूरदर्शन निर्मित चित्रकथी ही फिल्म 1978 मध्ये प्रदर्शित झाली. त्यात विश्राम गंगावणे यांच्या कलेचे डॉक्युमेंटेशन आहे. विश्राम गंगावणे यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर घराची जबाबदारी सांभाळतानाही परशुराम गंगावणे यांनी त्यांच्यातील कलाकार जिवंत ठेवला. मणी कौल यांच्या डॉक्यूमेंटरीच्या सुमारास, प्रसिद्ध चित्रकार, कला अभ्यासक बाबुराव सडवेलकर यांनी चित्रकथीवर आधारित महाराष्ट्र शासनाची दिनदर्शिका प्रकाशित केली. ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांनी या कलासंस्कृतीवर आधारित लेख लिहिला. याचा परिणाम म्हणून ठाकर लोककलाकारांना विविध ठिकाणी निमंत्रित केले जाऊ लागले. यातूनच कलाकार म्हणून परशुराम गंगावणे यांची पिढी बहुश्रुत झाली. त्यांनी वेगवेगळ्या राज्यांमधील कलाकारांना भेटल्यावर स्वतःची संस्कृती कशी संग्रहित केली आहे हे परशुराम गंगावणे यांनी समजून घेतले आणि ठाकर संस्कृतीचे कलादालन असण्याचे स्वप्न पाहिले. कोकणात बहुतेक घरांना मांगर किंवा गोठा असतो. त्यांनी पैनपै जोडत घराजवळच्या गोठ्याचे रुपांतर ‘ठाकर आदिवासी कला आंगण’ या संग्रहालयात केले. या संग्रहालयाचे उद्घाटन 3 मे 2006 रोजी झाले. संग्रहालयात प्रवेश करताना एक छोटी झोपडी दिसते. जी ठाकर आदिवासी लोकांच्या पूर्वीच्या घराची प्रतिकृती आहे. या घरात पारंपरिक भांडी आहेत. कावेने रंगवलेल्या भिंतींवर ठाकर घरांचे वैशिष्टय असलेली बोटांचे ठसे उमटवून काढलेली रांगोळी आहे, पांगुळबैलाची प्रतिकृती आहे आणि त्यापुढे आहे ते ‘ठाकर आदिवासी कला आंगण’ संग्रहालय.

या संग्रहालयात चित्रकथी चित्र, कळसूत्री बाहुली, पांगुळ बैलाची साधने, विविध पारंपरिक वाद्ये प्रदर्शित केलेली आहेत. पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे सुपुत्र एकनाथ गंगावणे आणि चेतन गंगावणे या संग्रहालयाचे काम बघतात. एकनाथ गंगावणे शासकीय नोकरीत आहेत पण चित्रकथी शैलीचे खास भारतीय वळण त्यांच्या रेखाटनांमध्ये दिसते. चेतन गंगावणे कळसूत्री बाहुली नाचवतात. या संग्रहालयाच्या आवारात असलेल्या पपेट थिएटरमध्ये आणि भारतात इतरत्र देखील ते पारंपरिक ठाकर कळसूत्री बाहुलीचे प्रयोग करतात. केवळ लोककलेवर उपजीविका होणे कठीण असल्याने ते ‘सुंदर होम स्टे’ हा जोडव्यवसाय करतात. संग्रहालयाच्या आवारात चित्रकथी, बाहुली निर्माण करण्याच्या कार्यशाळा होतात. चेतनदादा वास्तविक इंजिनीयर आहे. पण त्यांना कलेमध्ये रमायला जास्त आवडते म्हणून त्याने हेच करायचे ठरवले. एका मुलाखतीत तो म्हणाला, की ‘लहान होतो तेव्हा सादरीकरण करायला जायला आवडायचे नाही. कारण सादरीकरण केले की भिक्षा मागावी लागणार. म्हणजे आपल्या शाळासोबत्यांच्या घरासमोर उभे राहायचे. पण आता तसे होत नाही. आता लोक संग्रहालयात येतात. आपसूकच त्याला लागून असलेल्या घरी येतात. आमच्याकडे जेवतात. राहतात. त्यांचे पैसे आम्हाला सन्मानाने मिळतात. त्याने एक प्रकारची बरोबरीची भावना निर्माण होते.’ चेतन दादाची भावना खरी आहे. इथे लोककलेचे पारंपरिक स्वरूप बदलते आहे.

गुढीपूरमध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित गणपत मसगे यांचे ‘ठाकरवाडी आदिवासी कलाग्राम’ हे आणखी एक महत्त्वाचे कलासंग्रहालय आहे. गणपत मसगे यांना त्यांचे वडील सखाराम मसगे यांचा सहवास आणि मार्गदर्शन मिळाले. गणपत मसगे यांच्या सादरीकरणात वडिलांकडून आलेले कथनाचे पारंपरिक कौशल्य अनुभवता येते. गणपत मसगे यांचे सुपुत्र शिवदास मसगे हे शिक्षक आहेत. त्यांच्या सादरीकरणात देखील चित्रकथी कथन परंपरेची वैशिष्टये दिसतात. त्यांचे दुसरे सुपुत्र कृष्णा मसगे उपयोजित चित्रकार आहेत. कृष्णादादाचे कलाशिक्षण सर जे. जे. स्कूल ऑफ अप्लाईड आर्ट मधून झाले. त्यामुळे दृश्यकला शिक्षणातून निर्माण झालेली सौंदर्यदृष्टी त्याच्या कामामध्ये दिसते. कला महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर कृष्णादादाने मुंबईत फिल्म, सिरीयल यासाठी कला दिग्दर्शन केले. दरम्यान कोविड काळात ही कामे ठप्प झाली त्यामुळे तो कोकणात परत गेला. त्याच काळात मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू होते. त्यात त्यांची काही जागा गेली. या सगळ्या अडचणीतून मार्ग काढताना त्यांनी त्यांचे संग्रहालय नव्याने बांधले. कृष्णादादा स्वतः दृश्य कलाकार असल्याने त्याने ठाकर संस्कृती या कलादालनात मांडण्याचा प्रयत्न केला. त्याने ठाकर समाजजीवनातली भांडी, अवजारे, गोधड्या, वस्त्र इत्यादी परिसरातून जमवल्या. परिसरातल्या घरांमध्ये अडगळ झालेल्या या वस्तू आणि अर्थातच चित्रकथी, कळसूत्री, साळू याची अभ्यासपूर्वक मांडणी त्याने या संग्रहालयात केली आहे. कृष्णादादा आणि त्याचे सहकारी पारंपरिक बाहुलीबरोबर नवीन नाट्यप्रयोग कळसूत्री, छायाबाहुली यामधून करून पाहतात. याच्या संहिता ते लिहितात. त्याला ऐतिहासिक किंवा समकालीन कथांचा आधार असतो. कृष्णादादाची तरुण पिढी सारासार विचार करणारी आणि परखड मते मांडणारी आहे. कृष्णादादा बरोबर बोलताना एकदा तो म्हणाला की ‘ठाकर किंवा कोणत्याही समाजाला जर शिक्षण, नोकरी यामध्ये सरकार सवलत देत असेल तर त्या शिक्षण किंवा नोकरीच्या स्थैर्यानंतर ज्या व्यक्तीला सवलत मिळते ती समाजाला काय योगदान देते? याचा लेखाजोखा घेणं आवश्यक नाही का?’ लोककलाकारांचे विचारविश्व इथे बदलताना दिसते आहे. अर्थातच या सगळ्याचा परिणाम लोककलेच्या भविष्यावर होणार आहे.

गुढीपूरमधली ही प्रातिनिधिक उदाहरणे. गुढीपूरमधल्या वर्तमानात असे अनेक लोककलावंत आहेत. लोकदेवतांचे उपासक म्हणून त्यांचे धार्मिक महत्त्व मर्यादित झाले आहे. वर्तमानकाळात अनेक पातळ्यांवर व्यक्ती आणि कलाकार म्हणून त्यांचा संघर्ष सुरू आहे. लोककलाकारांनी परिसरातल्या लोकांच्या घरी किंवा मंदिरात जायचे आणि कलेचे सादरीकरण करायचे अशी या लोककलांची रचना होती. थोडक्यात कलाकार तुमच्या दारी ! इथल्या सर्वेक्षणादरम्यान लक्षात आले की वय वर्ष पंचावन्न ते साठच्या पुढच्या प्रेक्षकांना हे ‘बावलेकर’ नेमके कोण, त्यांची आडनावे काय, ते कोठे राहतात हे माहित नाही पण तरुण प्रेक्षकांना मात्र त्यांचे नेमके ‘लोकेशन’ माहित आहे. ठाकर लोककलेची संग्रहालय आहेत हे माहित आहे. हे अर्थातच इंटरनेटमुळे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून होणाऱ्या प्रसिद्धीमुळे ही संग्रहालये आणि संस्कृती लोकांपर्यंत पोचली. संग्रहालये कलासंस्कृतीची माहिती देण्याचे काम चोख करतात. तेथील प्रकल्प, कार्यशाळा यामधून कलासंस्कृती, कलाकार समजून घ्यायला मदत होते. एका अर्थाने पुन्हा कलाकार तुमच्या दारीच नाही तर हातात आले. पण संग्रहालयाला भेट देणे म्हणजे केवळ पर्यटन नाही तर तो कला – कलाकार आणि रसिक प्रेक्षक यांच्या मधला सजग सहप्रवास आहे. सहजपणे आपल्यापर्यंत पोचणाऱ्या या माहितीला प्रतिसाद देताना आपली नेमकी जबाबदारी काय याचा विचार आपण पुरेशा संवेदनशीलतेने करतो का? या पार्श्वभूमीवर कलाकार – रसिक नातेसंबंध कसे निर्माण झाले? किंवा होत आहेत ? लोककलेचे स्वरूप नेमके काय आयाम घेऊन बदलत आहे याचा निरंतर अभ्यास उद्बोधक आहे.

डॉ. माणिक वालावलकर-गावकर 9821231767 manikwalavalkar@gmail.com

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version