गुढीपाडवा – परंपरा आणि आधुनिकता

1
67
carasole

गुढीपाडवा आणि शोभायात्रा या दोन गोष्‍टींचे समीकरण गेल्या सतरा वर्षांत अधिकाधिक बळकट होत गेलेले दिसते. पूर्वी ठाणे-डोबिवली परिसरातून काढल्‍या जाणा-या शोभायात्रा राज्‍याच्‍या अनेक भागांमध्‍ये प्रकट होऊ लागल्या आहेत. शोभायात्रा हे लोकांच्‍या एकत्र येण्‍याचे, आनंद साजरा करण्‍याचे नवे सांस्‍कृतिक निमित्‍त होऊन गेले आहे. काहीशा याच विचाराने लोकमान्‍य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता. त्‍यामागे लोकांना एकत्र आणून काही गोष्‍टी साधण्‍याचा हेतू होता. तसा हेतू या शोभायात्रांना नाही. म्‍हणून शोभायात्रांच्‍या निमित्‍ताने लोक एकत्र आल्‍यानंतर त्‍यातून ‘काही घडण्‍याची’ चिन्‍हे नाहीत. टिळकांच्‍या गणेशोत्सवाची आज जी अवस्‍था आहे तीच शोभायात्रांची होत चाललेली दिसते. कृतीमधला हेतू हरवला की त्‍यातला अर्थही हरपतो. दरवर्षी होणारी ही सांस्‍कृतिक घडामोड सार्वजनिक स्‍तरावरचा दुसरा सत्‍यनारायण होण्‍याच्‍या मार्गावर आहे. याबद्दलची दोन मते वाचकांसमोर मांडत आहोत. शोभायात्रांची सुरुवात करणारे डोंबिवलीचे आबासाहेब पटवारी यांची ‘दैनिक सकाळ’मध्‍ये प्रसिद्ध झालेली मुलाखत आणि ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’चे मुख्‍य संपादक दिनकर गांंगल यांनी लिहिलेल्‍या ‘स्‍क्रीन इझ द वर्ल्‍ड’ या पुस्‍तकातील निवडक उतारा येथे उद्धृत करत आहोत.

 

 

नववर्ष स्वागतयात्रा सर्वधर्मीय व्हायला हवी!

 

डोंबिवली शहरात सतरा वर्षांपूर्वी गुढीपाडव्याला नववर्ष स्वागतयात्रा निघाली आणि नंतर सगळीकडेच या यात्रा सुरू झाल्या. या स्वागतयात्रेत दिवसेंदिवस बदल होत गेले. ती काळाप्रमाणे बदलायलाच हवी, असे तिचे प्रवर्तक आबासाहेब पटवारी यांना वाटते. कसे बदलायला हवे तिचे स्वरूप? पटवारी यांच्याशी संवाद…

नववर्ष स्वागत शोभायात्रेत या वर्षी काय वेगळेपण आहे?

संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे. ‘स्वच्छ डोंबिवली… सुंदर डोंबिवली’ हा संदेश या वर्षी शोभा यात्रेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यात दीडशे संस्था सहभागी होणार आहेत. यात्रेच्या वेळी प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये खाद्यपदार्थ दिले जातात. प्लॅस्टिकच्या ग्लासात सरबत दिले जाते. यात्रेत प्लॅस्टिकचा वापर करता येणार नाही. शक्य तो काचेच्या ग्लासाचा वापर करण्याची सक्ती केली आहे. यात्रेदरम्यान अनेक संस्था पत्रके वाटतात. यात्रा संपल्यावर यात्रामार्गावर कचरा साचतो. पत्रकेही वाटण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शहरातील रस्ते विकासकामासाठी खोदण्यात आल्याने, चित्ररथाचे ट्रक न करता लहान टेम्पोचा वापर करून सहभाग घ्या असे आवाहन सगळ्याच संस्थांना केले आहे. शहरातील सर्व चौक स्वच्छ करून त्या ठिकाणी गुढी उभारली जाणार आहे. त्याचबरोबर महिला सबलीकरण हा विषय महत्त्वाचा असल्याने यात्रा संयोजन समितीचे प्रमुख पद दीपाली काळे यांच्याकडे दिले आहे. महिलांचा मोठा सहभाग आहे.

शोभायात्रेने शहराला व नागरिकांना काय दिले?

शोभायात्रेने शहराला गावकीची भावना दिली. त्यातून एकीची व एकसंघतेची भावना विकसित झाली. शहरातील दोनशेपेक्षा जास्त विविध संस्था एकत्रित आल्या. त्यांचा कार्यक्रमही मग एकच झाला. सध्याच्या जीवनरहाटीत माणसं एकमेकांना भेटत नाहीत. स्वागतयात्रेतून भेटीचा उद्देश साध्य झाला. संवादाला वाव मिळाला. अनेक उद्योजक, कलाकारांनाही वाव मिळाला.

शोभायात्रा दीर्घकाळ त्याच पद्धतीने सुरू आहे. त्यात नवे काही बदल, सुधारणा कराव्यात असे तुम्हाला वाटते का?

यात्रा सुरू केली तेव्हा प्रौढांचा सहभाग जास्त होता. तो आता कमी कमी करत नेला आहे. तरुणांचा सहभाग वाढवला आहे. तरुणांकडे नेतृत्व सोपवणार आहोत. गणेश मंदिर संस्थानाने यात्रेसाठी वक्रतुंड ढोलपथक तयार केले आहे. त्या पथकात साडेतीनशे उच्चशिक्षित तरुण-तरुणींचा सहभाग आहे. उत्सवात गुलाल उधळला जात नाही. उत्सवाचे पावित्र्य जपले जाते. स्वागतयात्रा हा केवळ धार्मिक उत्सव नसून त्यात संगणकीय संस्था, मेडिकल संस्था, सामाजिक संस्था सहभागी होत असल्याने हा उत्सव सामाजिक अभिसरणाचा उत्सव या दृष्टीने पुढे आणला आहे.

कोणते नवे प्रवाह सामावून घ्यायला हवेत?

हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा असे जरी आपण म्हणत असलो तरी त्यात शीख, जैन धार्मिक संस्थांनी त्यात भाग घेतला पाहिजे. अनेक पंथ व धर्म सहभागी होणे अपेक्षित आहे. आम्ही ते सामावून घेण्यास तयार आहोत. पंथ व धर्म कोणताही असला तरी आराधना ही परमेश्वराचीच असते. काही मंडळी सहभागी होण्यास इच्छुक आहेत. त्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

– मुरलीधर भवार

(पूर्वप्रसिद्धी ‘दैनिक सकाळ’, 11 मार्च 2015)

शोभा मिरवणुकींचे भविष्य काय?

ठाणे-डोंबिवलीत निर्माण झालेली चैत्री पाडव्याच्या शोभा मिरवणुकीची टूम चांगली फोफावत आहे. ठाणे-डोंबिवली-गिरगाव-बोरिवली पादाक्रांत करून शोभा मिरवणुकींची प्रथा महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात पसरेल अशी चिन्हे आहेत. त्यात हिंदू राजकारण आहे असे कोणी म्हणतात. हिंदू परंपराभिमान्यांनी शोभा मिरवणुकींना आरंभ करून दिला हे खरेही आहे. पण लोकांनी तो उपक्रम उत्साहाने उचलून धरला हे अधिक महत्वाचे वाटते. लोक घोड्यांवरून व मोटारसायकलींवरून, स्त्रिया नऊवारी साड्या नेसून व जीन पॅण्टस् घालूनही छानपैकी मिरवत असतात. उत्साह ओसंडून जाताना दिसतो. रांगोळ्या-भुईनळे वगैरेची आरास असते. स्त्रिया फुगड्या घालून नाचत असतात. पुरुषांची लेझीम पथके तालबद्ध पुढे जात राहतात. मिरवणुकीत अजून तरी पारंपरिक सात्विकता असते. पण मिरवणुकी शोभेच्या पलीकडे काही संस्कार करण्याच्या दृष्टीने फारशा पुढे जात नाहीत; फारतर त्यात सहभागी होणा-या सर्वांना परंपरा राखल्याचा अभिमान वाटत असेल!

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात करून दिली, त्यावेळी त्यांचा त्यामागे प्रबोधनाचा हेतू होता. म्हणून मेळे अर्थपूर्ण झाले. त्यामधून संस्कारित झालेली माणसे आता आतापर्यंत त्या रम्य आठवणी सांगत. चैत्री पाडव्याच्या मिरवणुकांमागे तशी काही योजना नाही. आरंभ करून देणा-यांना आणि सहभागी होणा-यांना भारतीय उज्‍ज्‍वल परंपरेचे पाईक असल्याचा गौरव वाटत असेल, एवढेच! पण ती कोणती परंपरा? ती कशासाठी राखायची? याबद्दल कोणी विचार केलेला नाही. तशा प्रकारच्या अभ्यासपूर्ण चर्चेत मिरवणूकवाल्यांना गम्य नाही! एक मोठी सांस्कृतिक घटना – उद्देशाविना! असे या शोभा मिरवणुकींचे वर्णन करता येईल. लोकांना उत्तम टाईमपास! टिळकांनी उद्दिष्ट ठेवून सुरु केलेल्या गणेशोत्सवाची आजची परवड सर्वांनाच त्रस्तच करत असते. पण आता त्या उत्सवाची व्याप्ती एवढी झाले आहे की, तो संयोजकांच्या‍देखील हाती राहिलेला नाही. या स्थितीत शोभा मिरवणुकींचे भविष्य काय? एवढी मानवी ऊर्जा विनाकारण वापरताना संयोजकांना त्रास होत नसेल? हिंदू परंपरेच्या‍ अभिमान्यांनी तेवढा विचार करायला नको?

(दिनकर गांगल लिखित ‘स्क्रीन इझ द वर्ल्ड’ या पुस्त‍कातून उद्धृत)

 

 

About Post Author

1 COMMENT

  1. या लेखाचे प्रयोजन काय?
    या लेखाचे प्रयोजन काय?

Comments are closed.