गिरिमित्र जीवनगौरव सन्मानार्थींना सलाम!

0
41

गिर्यारोहकांचा अवकाश विस्तीर्ण आहे, पण त्यात हरवून जाणा-या गिर्यारोहकांनी वर्षातून एकादातरी कोठेतरी एकत्र यावे म्हणून जुलै २००२ पासून गिरिमित्र संमेलन सुरू झाले. नववे गिरिमित्र संमेलन मुलुंडला जुलै महिन्यात पार पडले. तिस-या संमेलनापासून गिर्यारोहकांनी गिर्यारोहकांचे कौतुक करण्याचे ठरवले आणि सन २००४ मध्ये संमेलनाध्यक्ष हरीष कपाडिया यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. पण पुढच्या वर्षी, २००५ मध्ये हा पुरस्कारप्राप्त शरद ओवळेकर यांनी असे उद्गार काढले, की “पुरस्कार मिळावा म्हणून कोणी कार्य करत असेल तर ते त्याचे योगदानच नाही. आपण आजपर्यंत जे काही उद्योग केले ते पुरस्कारासाठी अजिबात नाहीत. त्यामुळे गिर्यारोहकांच्या या कौतुकाला पुरस्कार न म्हणता सन्मान म्हणावे”. तेव्हापासून ह्या पुरस्काराला सन्मान असे म्हणतात. ह्या सन्मानांचा आर्थिक भार महाराष्ट्रातील संस्था उचलतात. त्यामुळे गिर्यारोहणाचे ध्येय आपोआप जोपासले जाते.

गिरिमित्र जीवनगौरव सन्मान हा आपल्या जीवनकाळात गिर्यारोहण क्षेत्रासाठी मोलाचे योगदान करणा-या गिर्यारोहकांना दिला जातो. आतापर्यंतच्या सन्मानप्राप्त गिर्यारोहकांबद्दलचे हे संक्षिप्त आलेखन.

२००४ साली, तिस-या संमेलनात ज्याना हा सन्मान देण्यात आला त्या हरीष कापडियांचे कर्तृत्व विदीत करण्यासाठी ग्रंथच लिहावा लागेल. ते जगन्मान्यताप्राप्त आणि जागतिक पुरस्कारांचे धनी असलेले ज्येष्ठ व श्रेष्ठ गिर्यारोहक आहेत. गेली पन्नासएक वर्षे, ते हिमालयात मोहिमा आखणे, इतरांना मार्गदर्शन करणे, नवनवीन मार्ग शोधून द-याखो-यांत भटकंती करणे हे काम अव्याहतपणे करत आहेत. त्यांनी हिमालयाच्या सर्व रांगांमध्ये भ्रमंती केली आहे. एकशेतीस खिंडी पार करून द-याखो-यांत पदभ्रमण केले आहे. ह्यात परदेशी गिर्यारोहकांबरोबरच्या मोहिमांचा समावेश आहे. ते सतत नवनवीन क्षितिजे धुंडाळत राहिले आहेत, ते स्वभावत: अतिविनम्र आहेत.

'हिमालयन जर्नल' ह्या हिमालयांतील मोहिमांची खात्रीशीर, विश्वासार्ह नोंद करणा-या जर्नलचे संपादक, एक अनुभवी नेता, अनुभवी लेखक अशी त्यांची कामगिरी बहुआयामी आहे.

२००५ साली, दिल्या गेलेल्या दुस-या जीवनगौरव सन्मानाचे मानकरी होते, शरद ओवळेकर. ओवळेकर हे गिर्यारोहकांचे गुरू आणि मार्गदर्शक. सरांनी काही पिढ्या घडवल्या आहेत. त्यांची भटकंती १९५० च्या दशकात सुरू झाली. ओवळेकरसरांच्या पुढाकाराने १९५५ मध्ये गिरिविहार ह्या संस्थेची स्थापना झाली. त्या संस्थेच्या माध्यमातून लहान मुलांसाठी शिबिरे, प्रस्तरारोहण शिबिरे ह्यांचे सातत्याने आयोजन हे सरांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय. महाराष्ट्राच्या पहिल्या नागरी हिमालयीन मोहिमेला आणि नंतर एव्हरेस्ट व कांचनगंगा ह्या मोहिमांना सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. ह्या सर्व मोहिमांचे सभासद सरांचे विद्यार्थी होते. सरांच्या प्रयत्नांनी गिर्यारोहणाचा वृक्ष बहरत गेला.

त्याच वर्षी, म्हणजे २००५ साली गिरिमित्र जीवनगौरव सन्मान (मरणोत्तर) स्व. बापुकाका पटवर्धन ह्यांनाही देण्यात आला. ते १९२५ च्या काळात धुळे परिसरात भटकंती करत होते, जेव्हा गिर्यारोहण वगैरे पारिभाषिक शब्द उदयाला आलेले नव्हते तेव्हा त्यांच्या गिरिभ्रमणाला सुरुवात झाली. त्यांनी पन्नासच्या दशकात सह्याद्रीत खूप सराव करून हिमालयाच्या मोहिमा पार पाडल्या. पुढे, ७० साली त्यांनी स्वत: गिरिभ्रमण ही संस्था स्थापली. गढवाल, हिमालयातील गंगोत्री परिसर त्यांनी अक्षरश: पिंजून काढला आणि जे काही केले व पाहिले त्याचे समीक्षणात्मक विवेचन, लेखन, नकाशे, रेखाटन, पत्रव्यवहार, पर्यांवरणाचा अभ्यास व त्यास सुसंगत भटकंती अशा विविध अंगांनी घेतलेल्या अनुभवांचा संग्रह केला. प्रचंड व्यासंग व पत्रव्यवहार यांमुळे बापुकाका म्हणजे चालतेबोलते ग्रंथालयच होते.

२००६ साली, पाचव्या गिरिसंमेलनात जगदीश नानावटी ह्यांना गिरिमित्र जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आला. नानावटी ह्यांचे सर्वांत मोठे योगदान हे आहे, की त्यांनी तंत्रशुद्ध गिर्यारोहणाचे बीज महाराष्ट्रात रोवले. सर्वांना प्रस्तरारोहणाचे शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी मुंब्रा येथे प्रस्तरारोहण शिबिरांची सुरुवात केली. मुंबईमध्ये Climbers Club स्थापण्यात त्यांचा पुढाकार होता. 'क्लाइंबर्स बुलेटिन' संपादनाद्वारे त्यांनी गिर्यारोहण साहित्यात भर घातली. ते ‘द हिमालयन क्लब’चे अध्यक्ष होते. 'अल्पाईन क्लब –लंडन'चे सभासद आहेत. त्यांचे उल्लेखनीय कार्य म्हणजे 'माऊंटेनिअरिंग क्लेमस'चे व्हेरिफिकेशन, त्यांनी तब्बल पन्नासएक मोहिमांचे व्हेरिफिकेशन केले आहे. त्यांचा गिर्यारोहणाबरोबर विविध सामाजिक कार्यातही सहभाग असतो.

२००६ मध्येच, गिरिमित्र जीवनगौरव (मरणोत्तर) हा सन्मान मिळवणारे स्व. अरुण सामंत ह्यांनी तीस वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल त्रेचाळीस हिमालयीन मोहिमांत भाग घेतला होता. त्यांनी सव्वीस छोटीमोठी शिखरे सर केली आणि सात शिखरांवर चढाईचे प्रयत्न केले. अरूण ह्यांनी त्या मोहिमांमध्ये अभ्यास करून सतत नवनवीन प्रयोग करण्यावर भर दिला. त्यांनी गिर्यारोहणाबरोबर विपुल लिखाण केले आहे. त्यांनी सह्याद्रीतही प्रचंड भटकंती केली. 'ट्रेक द सह्याद्री' च्या पहिल्या काही आवृत्यांमध्ये असणारे, त्यांनी रेखाटलेले नकाशे फार उपयुक्त आहेत. त्यांनी हिमालयन क्लबमध्ये विविध पदांवर काम केले होते. तेही अल्पाईन क्लब-लंडनचे सभासद होते.

गिरिमित्रच्या सहाव्या संमेलनात प्रा. आनंद चांदेकर हे जीवनगौरव सन्मानाचे मानकरी होते. मूळ ठाण्याचे असलेले प्राध्यापक पार्ल्यांत गेल्यावर गिर्यारोहणात आणि त्यासाठी क्लब स्थापण्यात सक्रिय झाले. १९५४ च्या दरम्यान, चांदेकरसर आणि महाविद्यालयांतील इतर प्राध्यापक यांनी मिळून इंटरकॉलेजिएट हायकर्स क्लबची स्थापना केली. ह्याच क्लबचे १९६४ मध्ये युनिर्व्हसिटी हायकर्स अॅण्ड मॉऊंटेनिअर्स सोसायटीत रूपांतर झाले. त्यांनी १९६६ मध्ये हनुमानशिखर ह्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व केले होते. ते पार्ल्यातील हॉलिडे हायकर्स ह्या क्लबचे अध्यक्ष होते. ह्या संस्थेने सह्याद्रीत अनेक महत्त्वाचे उपक्रम यशस्वी केले, ‘महाराष्ट्राची निसर्ग लेणी’ या पुस्तकाची निर्मिती हा एक य़शस्वी उपक्रम. यात चांदेकरसरांचा मोलाचा वाटा होता.

त्याच वर्षी गिरिमित्र जीवनगौरव (मरणोत्तर) सन्मान स्व. सोली मेहता यांना देण्यात आला. मेहता हे ‘हिमालयन जर्नल’ च्या अनेक मान्यवर संपादकांपैकी एक होते. ‘हिमालयन क्लब’चे मुख्य ऑफिस कोलकात्याहून मुंबईमध्ये हलवण्यात ते यशस्वी झाले. सह्याद्रीच्या रांगांमुळे महाराष्ट्रात गिर्यारोहणाचे वेड वाढले आहे आणि त्यामुळे हिमालयाची ओढही वाढली आहे.
‘हिमालयन जर्नल’ची विश्वासार्हता आणि लौकिक वाढवून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे महत्त्व वाढवण्यात सोली मेहता ह्यांचे योगदान महत्त्वाचे होते. १९८८ मध्ये ‘बेस्ट सेलर’ ठरलेले पुस्तक ‘Exploring Hidden Himalaya’ हे सोली ह्यांचेच होते. ते उत्तम संपादक होते. ते पदभ्रमणाची माहिती Slide शोज करून देत असत. ते उत्तम पियानो-वादक होते.

सन २००८ मध्ये, प्रा. मोतीराम व्ही. माळी हे ‘गिरिमित्र जीवनगौरव सन्मान’ प्राप्तकर्ते झाले. १९५३-५४च्या दरम्यान, माळीसरांची भटकंती सुरू झाली. त्यांनी स्वत: प्रशिक्षित होऊन प्रस्तरारोहणाची शिबिरे आयोजित केली. कॉलेजच्या क्लबप्रमाणे, ‘गिरिविहार’ ही संस्था स्थापण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. ते हनुमान शिखर मोहिमेचे उपनेते होते. त्या मोहिमेनंतरच महाराष्ट्रातील गिर्यारोहकांना हिमशिखरांचे वेड लागले. माळीसरांनी अनेक पिढ्यांना गिर्यारोहणाचे धडे दिले. महाराष्ट्रात गिर्यारोहणाचा पाया रचणा-या मोजक्या मंडळींमध्ये सरांचा समावेश होतो.

२००९ मध्ये, प्रा. रमेश देसाई हे जीवनगौरव सन्मानाचे मानकरी होते. चांदेकर व माळी ह्यांच्याप्रमाणे क्लब स्थापण्यात देसाईसरांचा पुढाकार होताच, पण त्यांनी स्वत: भटकंतीच्या, गिरिभ्रमणाच्या सविस्तर नोंदी केल्या व भेट दिलेल्या सर्व परिसरांचे नकाशे तयार केले. सरांनी हायकर्स सोसायटीच्या माध्यमातून १९६४ ते १९६८ दरम्यान तयार केलेल्या माहितीपुस्तकांमध्ये अथक परिश्रमाने तयार केलेले नकाशे, डोंगररांगांची विस्तृत माहिती देणारे तक्ते यांचा प्रामुख्याने समावेश केला होता. डोंगरांचे हे पहिले अधिकृत दस्तऐवजीकरण म्हणावे लागेल. त्यांनी अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. त्यानंतरच्या काळात, सरांनी मुख्यत: अभ्यास, व्यासंग व लिखाणावर भर दिला; सलग दहा वर्षे देशविदेशांतील गिर्यारोहण विषयावरील अनेक पुस्तकांचे परीक्षण Times of India मध्ये चिकित्सकपणे केले आहे. त्यांनी पर्यावरणासंबंधी सखोल अभ्यास करून अनेक लेख लिहीले. त्याचीच परिणती ‘वाघ आणि माणूस’ ह्या पुस्तकात झाली. त्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. त्यांचे. ‘तिसरा ध्रुव’ हे एव्हरेस्टवरील अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक वर्षांपूर्वी प्रकाशित झाले आहे. एव्हरेस्टबरोबर संपूर्ण हिमालयाची साद्यंत माहिती असणारे मराठीतील हे एकमेव पुस्तक आहे.

नवव्या गिरिमित्र संमेलनात नारायण महाजन हे वय वर्षे नव्वद असलेले पण सर्वात तरुण असल्यासारखे जगणारे उत्साही गिर्यारोहक गिरिमित्र जीवनगौरव सन्मानपात्र ठरले. कणखर व्यक्तिमत्त्वाच्या महाजनसरांचे गिरिभ्रमण लहानपणापासून चालू झाले. ते १९५५-५६ पासून क्लाइंम्बर क्लबचे सदस्य बनले. त्यांनी मुंबईच्या गिर्यारोहण प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला होता. त्यांनी १९६४ मध्ये पुण्यात ‘भारत आऊटवर्ड बाऊंड पायोनिअर्स’ ही संस्था स्थापन केली. पुण्यातली ही पहिली संस्था. त्यांनी अनेक मोहिमाही पार पाडल्या. पण स्वत:च्या वैयाक्तिक मोहिमांपेक्षा जास्तीत जास्त लोकांना डोंगरांकडे वळवणे हे त्यांनी आपले ध्येय मानले. १९७८ मध्ये सरांनी पुणे माऊंटेनीयर्स या संस्थेची स्थापना केली. १९७९ साली बालक वर्ष, १९८० साली अपंग वर्ष असे औचित्य साधत त्यांनी विशेष मोहिमा आखल्या. गिर्यारोहणाबरोबर बालवीर संघटना, महाराष्ट्र हॉकी संघटना, मुष्टीयुद्ध संघटना, व रेडक्रॉस संस्थेत सरांचे मोलाचे योगदान आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी केलेला गिर्यारोहणाचा प्रसार. वयाच्या ८३व्या व ८७ व्या वर्षी पॅरासेलिंग करून त्यांनी आपले नाव 'लिमका बुक्स ऑफ रेकॉर्ड'मध्ये समाविष्ट करून धाडसाला आणि उत्साहाला वयाची मर्यादा नाही हे सिद्ध केले. आता नव्वदी पार करूनही त्यांना मागे वळून बघायला वेळ नाही. त्यांना अजूनही पर्वताचे शिखर गाठायची आस आहे.

अशा ध्येयवेड्या, डोंगरवेड्या, भ्रमंतीने झपाटलेल्या अनेक व्यक्तींनी आयुष्यभर आपला छंद, आवड सतत जपत स्वत:चे आयुष्य तर समृद्ध केलेच, पण महाराष्ट्रात गिर्यारोहणाचा पाया भक्क्म करत हे वेड पसरत नेले. त्यांच्या या परिचयातून, अनेकांना पडणा-या ह्या प्रश्चाचे उत्तर मिळेल, की महाराष्ट्रात ह्या अर्धशतकात गिर्यारोहण का आणि कसे बहरत गेले? या क्षेत्रात प्रवेश केलेल्या नवीन पिढीला मार्गदर्शनही मिळेल आणि अजून आपण किती नवीन क्षितिजे पार करू शकतो याचाही शोध घेता येईल.

– ज्योती शेट्ये

About Post Author

Previous articleहळदीचा रंग…..
Next articleवैकुंठवासी
ज्योती शेट्ये या डोंबिवलीच्‍या राहणा-या. त्‍यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्‍यानंतर त्‍या ‘वनवासी कल्‍याणाश्रम‘ या संस्‍थेत काम करू लागल्या. ईशान्‍य भारतातील वनवासी समाजात जाऊन राहणे, त्‍यांच्‍यासाठी काम करणे, तेथील मुलांना शिकवणे हा त्‍यांच्‍या आयुष्‍याचा भाग होऊन गेला आहे. त्‍यांनी ईशान्‍य भारतातील अनुभवांवर आधारित ‘ओढ ईशान्‍येची‘ हे पुस्‍तक लिहिले आहे. त्या सध्या अंदमानात कार्य करत आहेत.