गाणारे घर!

2
91
विश्वास पाटणकर
विश्वास पाटणकर

विश्वास पाटणकरदेव काही घरांवर कलेचा असा वर्षाव करतो की गंमत वाटते! विश्वास पाटणकर यांचे घर अशांपैकी आहे. त्यांची आई इंदुमती पाटणकर या शास्त्रोक्त गायिका. त्या आपल्या छोट्या घरात शिष्यांना गाणे शिकवत असताना त्यांचे चिरंजीव विश्वासराव आपोआप गाणे शिकले. माणसाला आयुष्याच्या सुरुवातीला झालेले संस्कार आयुष्यभर पुरतात. विश्वासराव म्हणतात की, संगीताशिवाय जीवन कसे असते, याचा मला अनुभवच नाही. संगीत व मी यांचा विरह असे घडलेच नाही.

विश्वास पाटणकर म्हणतात की, त्यांच्या संगीत शिकण्यामागे त्यांच्या घराण्यातील वारसाच कारणीभूत ठरला. पाटणकरांच्या आई इंदुमती यांना लहानपणापासून गाण्याची आवड होती. ती आवड निर्माण होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या वडिलांना, विश्वास पाटणकरांच्या आजोबांना असलेला गाण्याचा छंद. पाटणकरांच्या आजोबांनी छंदापोटी शास्त्रीय गाणे शिकवण्यास सुरुवात केली. त्यांच्यामुळे पाटणकरांच्या घराण्यात संगीताचे सूर घुमू लागले. विश्वास पाटणकरांचे दोन्ही मामा संगीत शिकत होते. त्यांनी गायक-वादक म्हणून आपली कारकीर्द केली. आजोबा आणि मामांच्या छंदामुळे घरात गाणे सुरू झाले, सूरपेटी आली आणि इंदुमतींनाही गाण्याचा छंद जडला. त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी कल्याणच्या गायनसमाजात शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. काही वर्षांनंतर त्या संगीत विशारद झाल्या.

त्या नंतर इंदुमतींनी डोंबिवलीत गाण्याचे क्लास घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या शिष्यांमध्ये स्त्रियांची संख्या जास्त होती. इंदुमतींकडे शिकलेल्या अनेक स्त्रियांनी संगीत विशारद ही पदवी मिळवली. इंदुमती यांचे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. पाटणकर म्हणतात की, आईचा रियाझ आणि तिचे क्लास यामुळे घरात संगीतास पोषक वातावरण निर्माण झाले. त्यातून अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या.

पाटणकरांना वाद्य वाजवण्याची विशेष आवड. ते दहा वर्षांचे असल्यापासून तबला शिकू लागले. डोंबिवलीला पंडित गजाननबुवा जोशी राहत असत. तेथे सूरांचा झरा पाझरत होता. त्या झर्‍यामध्ये विश्वासराव यथेच्छ डुंबले. त्यांचे चिरंजीव मधुकर जोशी व नारायण जोशी यांच्या‍कडून संगीताची तालीम घेतली. त्यांनी नारायण जोशींकडे तबल्याचे धडे गिरवले, तर मधुकर जोशींमुळे त्यांना गाण्याची दृष्टी मिळाली. विश्वासरावांनी त्यांच्या संगतीत राहून बघता बघता तबला, व्हायोलीन व मेंडोलीन या वाद्यांवर हुकूमत मिळवली.

संगीताच्या वारशाने संपन्न पाटणकर कुटुंब. पाठीमागे विश्वास पाटणकरांसोबत त्यांच्या पत्नी रजनी. पुढे मिथिलेश पाटणकर पत्नी आणि मुलगा विदितसोबत.पुढे पाटणकर शंकर जयकिशन या संगीतकाराकडे मेंडोलीन वाजवू लागले. ते प्रसिद्ध गायक महमद रफी, मन्ना डे, शारदा यांच्या गाण्याला शंकर जयकिशनकडे मेंडोलीनची साथ करत असत. जयकिशन यांनी वादकांच्या ताफ्यात पाटणकर यांचे मेंडोलीन ऐकून ‘अच्छा मेंडोलीन बजाते हो’ असा आशीर्वाद दिला. त्यानंतर पाटणकर यांनी यशवंत देवांकडे आकाशवाणीवर उमेदवारी केली. संगीताचे व्याकरण समजावून घेतले. विश्वास पाटणकरांचे व्यक्तिमत्त्व त्या सर्व अनुभवांनी संपन्न होत संगीतकारासाठी तयार होत गेले. त्यांनी आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात अनेक नवीन गाण्यांना चाली लावून पद्मजा फेणाणी, उत्तरा केळकर अशा अनेक गायकांकडून गाणी गाऊन घेऊन आकाशवाणीवरून सादर केली. पुढे चरितार्थासाठी नोकरी व संगीताचा व्यासंग दोन्ही जोरात चालू होते. कारण, वडील दत्तात्रेय पाटणकर यांना संसाराचे व्यावहारिक गणित माहीत होते. (निव्वळ संगीतावर प्रपंच चालणे कठीण, असे वाटत असे.) त्यांच्या संगीताच्या वाटचालीकडे पाहिले, की वाटते एक प्रतिभासंपन्न व व्यावसायिक चित्रपट संगीतकार असूनही त्यांना भरपूर म्हणावे असे काम का नसते? पाटणकरांकडे चित्रपटांतील प्रसंग आणि शब्दांप्रमाणे स्वत:च्या चालीचा मुड बदलण्याचे सामर्थ्य आहे. आतापर्यंत ‘निष्पाप’ व ‘शेजारी शेजारी’ या दोन चित्रपटाचे संगीत त्यांनी दिले. तसेच आकाशवाणीसाठी काही विशिष्ट गीतांना संगीत दिले. ‘ई टी.व्ही.’वर प्रसारित झालेल्या ‘स्पंदन’ या मालिकेचे शीर्षकगीत पाटणकरांचे होते. तरीही त्यांच्याशी बोलले, की त्यांच्याकडे शांत व तृप्त वृत्ती उपजत असल्यासारखे वाटते. ते म्हणतात, ‘‘संगीत हे सागरासारखे विशाल आणि अथांग आहे. मी त्यातला आनंद घेतो. माझी कोणाशीही स्पर्धा नाही.’’

पाटणकरांच्या घरचा वाद्यांचा मेळा.पाटणकरांकडे असलेली विविध वाद्ये पाहिली, की आपण थक्क होतो. दिलरुबा , सारंगी , व्हायोलीन , तबला , मेंडोलीन , ऑर्गन, सिंथसायझर की-बोर्ड! त्यांच्या घरामध्ये बहुधा वाद्ये पहिली राहतात आणि उरलेल्या जागेत पाटणकर कुटुंब राहते. त्या सगळ्या बोलक्या वाद्यमेळ्यात ते अहोरात्र बुडून गेलेले असतात. त्यांना त्यामध्ये वेळ कोठे जातो ते कळत नाही. त्यांचा संगीत हा धर्म आहे. आचार्य अत्रे म्हणतात, ‘धंद्याला धर्माचे स्वरूप द्यावे – पण धर्माचा धंदा करू नये.’ विश्वासराव हे अक्षरश: जगतात, कारण त्यांच्या जीवनाचे प्रयोजन संगीत व वाद्य आहेत. एकदा माणसाला जगण्याचे प्रयोजन किंवा ध्येय कळले की तो दिवसाचे चोवीस तास त्याचाच विचार करतो. त्यांना वाद्य वश असावीत. कारण, पन्नास वाद्यांवरील सरगम त्यांना कळली आहे. जशी एखादी तरुणी प्रियकरावर फिदा असते, तशी त्यांच्यावर वाद्य फिदा असावीत. अशी माणसे गुप्त खजिन्यासारखी असतात. ‘तिळा तिळा दार उघड’ असे त्यांनी म्हटले, की दार उघडले जाते. संगीताचा अपूर्व खजिना त्यांच्यापुढे हात जोडून उभा राहतो. तुकारामाची गाथा त्यांनी वाचण्यासाठी उघडली, की त्यांना नेमका प्रथम रूपाचा अभंग सापडतो आणि मग अध्यात्म्याची एक एक पायरी ओलांडत शेवटी मोक्षाचा अभंग दिसतो. त्यांना अशा अभंगांबरोबर त्याची चाल सुचते. त्यातून अध्यात्माद्वारे आपल्या संत कवयित्रिंनी त्यांच्या काव्यात मोक्षाच्या बारा पायर्‍या उलगडण्यात त्यांची बरोबर गाठ पडते. त्या सर्व अभंगांचे संगीत त्यांच्या मनी आधीच स्फुरलेले असते. त्यांना वाटते हा दैवी योग आहे, पण प्रतिभावंतांसोबत नेहमी असेच घडत जाते. सुदैवाने पत्नी रजनी पाटणकर यांनी हा मनस्वी कलावंत सर्व प्रकारची साथ देऊन जपला आहे. त्यांचे दुर्मीळ सहजीवन अनेकांनी अनुभवले आहे. त्या यजमानांची गुणांतील रसिकता, हळूवारपणा जपताना आतिथ्यशीलता सांभाळून आल्या-गेल्याची खातरजमा करत असतात. वास्तविक त्यांनी शाळेत पस्तीस वर्षे नोकरी केली. पण, आपल्याला मिळालेले धन त्यांनी यजमानांच्या वाद्याच्या दरबारासाठी वापरले. वास्तविक या वाद्यांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत.

सुदैवाने आता नव्या पिढीचा संगीतकार – तसेच वाद्यवृंद रचनाकार सुपूत्र ‘मिथिलेश’ अगदी तरुण वयातच वाद्य हाताळता हाताळता संगीत देऊ लागला. तो वडिलांच्या गुणांचा वारसा घेऊन जन्माला आला आहे असे मला वाटते. संगीतकाराचा मुलगा त्यांच्याहून गुणी संगीतकार, असे उदाहरण श्रीधर फडके नंतर मिथिलेश हेच असावे. अर्थात मुलाला घडवण्यात त्यांच्या आईचा, रजनी यांचा वाटा जबरदस्त आहे. ती माणसे छोट्या व्यावसायिक यशाने नाराज न होता, दैववशात दिलेल्या देणगीच्या जोरावर समाधानी, शांत आणि तृप्त जीवन जगतात ते बघितले, की कौतुक वाटते. आपण उगाच पैशाच्या मागे लागतो. खरे जीवन हे शांत, तृप्तपणे जगावे असा जणू धडाच ही कलावंत मंडळी देत असतात.

नुकताच विश्वास पाटणकरांचा नातू विदित पाटणकर याने गायलेली बालगीते ऐकण्याचा योग आला. एक आठ वर्षांचा मुलगा स्टेजवर उभे राहून सुंदर खड्या आवाजात बालगीत म्हणतो (त्यातसुद्धा विविधता आहे) सर्व सभा शांतपणे ऐकते. वडिलांनी दिलेल्या संगीतरचना मुलगा निर्भयपणे सुरेल आवाजात गातो. ती गोष्ट किती समाधानाची आहे हे आजोबा/ वडिलांच्या भूमिकेत गेल्यावर कळते. चौथ्या पिढीत उतरलेली संगीत परंपरा पुढे निश्चितच काहीतरी भव्यदिव्य घडवेल याची साक्ष पटते. असे सांगतात, की कोणार्कचे चोविस चाकांचे (घोड्याचे) सूर्यमंदिर आजोबांनी बांधण्यास सुरुवात केली व ती कला पिढ्यांमध्ये पाझरत नातवाने ते मंदिर पूर्ण केले. आता त्याचा जो काही थोडा फार भाग शिल्लक आहे ते बघितले, की वाटते हे मंदिर जगातील उत्तम कलाकृती असावी. ते बनविण्याकरता कलाकार जन्मावाच लागतो. कलेचा परमोच्च बिंदू साधण्याकरता कला पुढील पिढ्यांत पाण्यासारखी पाझरावी लागते. भले त्यांना व्यावसायिक यश कमी असेल, पण खर्‍या प्रतिभावंतांना व्यवसाय, पैसा या गोष्टी महत्त्वाच्या नसतात.

पाटणकरांच्या घरी सारंगी, मेंडोलीन, सतार, व्‍हायोलिन, तंबोरा यांसारखी अनेक वाद्ये पाहायला मिळतात.चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे उदाहरण बोलके आहे. त्यांनी १९१३ साली ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला चित्रपट बनवला. त्यानंतर त्यांनी एकोणचाळीस चित्रपट विविध पौराणिक व सामाजिक विषयांवर बनवले. १९२० साली सरदारगृह ते चौपाटी अशी लोकमान्य टिळकांची अंत्ययात्रा निघाली होती. यावर त्यांनी माहितीपट तयार केला. पण, तरीही त्यांना व्यवसायाचे गणित जमले असे म्हणता येणार नाही. मिथिलेश पाटणकर यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी पहिल्या अल्बमसाठी (ध्वनिफित) संगीत दिग्दर्शन केले. त्याचे नाव होते ‘बहरू कळीयांसी आला.’ तो ज्ञानेश्वरीमधील ओवीचा भाग असून त्याचा अर्थ लहान कळीला बहर आला असा होता. यामध्ये कविवर्य ग्रेस यांची एक रचना असून बाकीच्या रचना ग. दि. माडगूळकर , सुरेश अत्रे यांच्या आहेत. या ध्वनिफितीमधील गाणी सुरेश वाडकर, अनिरुद्ध जोशी, मृदुला दाढे-जोशी यांनी गायल्या आहेत. मिथिलेश पाटणकर यांनी १९९४ साली ‘पांडुरंग पांडुरंग’ या भक्तिगीताच्या ध्वनिफितीला संगीत दिग्दर्शन केले.

राजश्री प्रॉडक्शन या व्यावसायिक कंपनीकडून कॉलेज जीवनावर आधारित ‘कॉलेज के दिन’ आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ या हिंदी पॉप अल्बमसाठी त्यांना संगीत दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये सोनाली वाजपेयी, मनोहर शेट्टी या गायकांनी गाणी म्हटली आहेत. या अल्बमनंतर पुढची पायरी म्हणजे चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन. मिथिलेश पाटणकरला २००६ साली ‘बेभान’ या मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. लगेच २००८ साली ‘रंगीबेरंगी’ व ‘दु:खाचे श्वापद’ या चित्रपटांना संगीत दिले. गुणी कलावंताला कलेची वेगवेगळी दारे खुणावत असतात. मिथिलेशने ‘मिथविन’ या फ्युजन बॅंडचे संगीत दिग्दर्शन व सादरीकरण केले. त्याने पूर्णवेळ संगीत दिग्दर्शन, संयोजन, पार्श्वगायन व पार्श्वसंगीत अशा विविध प्रकारांत आपल्या प्रतिभेचे आविष्कार सादर केले. इतकेच नव्हे तर नितीन देसाई यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या चित्रपटात त्याने एक गाणे गायले आहे. तसेच ‘उंच माझा झोका’ या मराठी मालिकेला पार्श्वसंगीत देत आहे. मराठीतील प्रसिद्ध कवी आणि संगीतकार संदीप खरे व सलील कुलकर्णी यांच्या सर्व म्युझिक अल्बमला संगीत संयोजन केले आहे. तो म्हणतो, ‘‘माझे यामध्ये पाच गुरू आहेत. पंडित गजाननराव जोशी यांचा मुलगा नारायण जोशी व मधुकर जोशी यांच्याकडे शास्त्रीय गाण्याचा रियाझ केला. व्हॉयलीन किरण फाळके यांजकडून आत्मसात केले. की-बोर्ड, मेंडोलीन व इतर वाद्ये वडिलांकडून शिकलो.’’ मिथिलेश यांनी एक वर्ष हिंदीतील प्रसिद्ध गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांच्याकडे संगीत संयोजनाचे काम केले. अशाप्रकारे संगीतक्षेत्रात विविध लोकांकडून अनुभव घेऊन ते आता स्वत: संगीत दिग्दर्शन करीत आहे.

२०११ साली ‘आवाज महाराष्ट्राचा’ या आशा भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली ई.टी.व्ही.ने केलेल्या ‘रिअॅलिटी शो’साठी (सव्वीस एपिसोड आणि फायनल) यासाठी संगीत संयोजनाची संधी मिळाली. अशा तरुण व उदयोन्मुख संगीतकाराशी गप्पा मारल्या की कळते त्याचे भविष्य उज्ज्वल आहे.

इंदुमती पाटणकर या शास्त्रीय गायिकेपासून चाललेला संगीताचा वारसा अशाप्रकारे प्रत्येक नवीन पिढीत पाझरत आहे असे दिसते.

विश्वास पाटणकर,
vishwaspatankar261951@gmai.com

मिथिलेश पाटणकर
mithileshpatankar@gmail.com

– प्रभाकर भिडे

About Post Author

2 COMMENTS

  1. लेख आवडला.चार पिढ् यांचा
    लेख आवडला.चार पिढ् यांचा वारसा बहरत रहावा ही शुभेच्छा

  2. खरोखर हा सांगितीक प्रवास
    खरोखर हा सांगितीक प्रवास प्रेरणादाई आहे़

Comments are closed.