गडचिरोलीत सकारात्मकतेचा उदय

0
32
_Parag_Patadar_2.jpg

उदयच्या कामाची सुरूवात झाली ती गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून. मात्र उदयची धडपड ढोबळ प्रयत्नांच्या पुढे जात राहिली. तो त्याच्या मनाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना सामोरा जात राहिला. म्हणूनच त्याने अाणि त्याच्या मित्रांनी ‘अादर्श मित्र मंडळा’च्या माध्यमातून उभे केलेले काम गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळीपर्यंत जाऊन पोचले. त्यांची ती धडपड गडचिरोलीतील शाळा, विद्यार्थी, पोलिस, नक्षलवादी अशा विविध घटकांना कवेत घेऊन पुढे जात अाहे. उदय अाणि त्यांच्या मित्रांनी केलेली बदलाची सुरूवात हे त्यांच्यातील चांगुलपणाचे प्रतिक अाहे.

समाजाच्या अशा विविध कृतींतून अनुभवाला येणारा चांगुलपणा वेचणे अाणि ते सातत्याने समाजासमोर मांडणे हे ‘www.thinkmaharashtra.com’च्या उद्दीष्टांपैकी एक! सभोवताली असलेली तशी माणसे हेरून त्यांच्या कामाचा आढावा जगासमोर मांडण्याचे काम ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ 2010 सालापासून करत अाहे.

उदय जगताप हा पुण्यातील धनकवडी उपनगरात राहणारा तरुण. तो गणेश मंडळाचा कार्यकर्ता. त्याच्या लक्षात अाले, की गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचे काम मांडव टाकण्यापलिकडे नाही. त्यांच्या ठायी उर्जा अाहे, मात्र कामाला दिशा नाही. त्याने ती उर्जा सत्कारणी लावण्याच्या हेतूने गणपतीच्या देखाव्यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्याचा साधा प्रयत्न केला. एका संस्थेकडून त्या प्रयत्नाला बक्षीस दिले गेले. उदयला चांगले काम केले तर समाज दखल घेतो हे जाणवले. त्याची अाणि त्याच्या मित्रांची उमेद वाढली. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविषयी नकारात्मक भावना असण्याचे एक कारण म्हणजे मंडळातर्फे घेतली जाणारी वर्गणी. उदयच्या ‘आदर्श मित्र मंडळा’च्या तीस तरुण कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात कोणाकडूनही वर्गणी न घेण्याचा निर्णय घेण्यात अाला. त्या तीस तरूणांनी मंडळाचा खर्च भागवण्यासाठी अापापसात पैसे उभे करण्याचे ठरवले. मंडळ स्वावलंबनाने वर्षभर सामाजिक उपक्रम करत राहिले.

चांगली कृती माणसाला विधायक दृष्टी पुरवते. गणेश मंडळाच्या लहानलहान चांगल्या कामांमुळे उदयची दृष्टी हळुहळू विस्तारत गेली. त्याला वाट चुकलेले, गुन्हेगाराचा शिक्का माथी बसलेले तरूण खुणावू लागले. तसे तरूण शिक्षा भोगून अाल्यानंतर त्यांचे पुर्नवसन केले नाही तर पुन्हा नाईलाजास्तव गुन्हेगारीकडे वळतात, हे उदयने हेरले. त्याने तशा गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्याचे काम हाती घेतले. उदयने पुण्याच्या जेलमध्ये काम करण्याची परवानगी मिळवून अडीच हजार गुन्हेगारांशी संवाद साधला. त्यांच्यावर एक लघुपटदेखील बनवला. उदयने आणि त्याच्या मित्रांनी तशा सव्वीस गुन्हेगारांना नोकऱ्या मिळवून देत त्यांना मुख्य प्रवाहात आणले. उदयच्या कामाचा विशेष म्हणजे तो केवळ हाती घेतलेल्या विषयाला चिकटून राहत नाही. तर त्या विषयाच्या इतर धागेदोरेदेखील तो ध्यानी घेतो. म्हणूनच गुन्हेगारांबद्दल काम करताना त्याने त्यांच्या मुलांवरही कक्ष केंद्रीत केले. त्याने तशा पन्नास मुलांच्या शिक्षणाची सोय केली. ती मुले उरळीकांचन, सोलापूर अशा विविध परिसरांतील अाहेत. ती मदत करताना त्याने मुलांच्या अभ्यासात दरवर्षी केवळ पाच टक्क्यांची वाढ असावी अशी माफक अट ठेवली. ती पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच त्यापुढील वर्षी मदत केली जाते.

_Parag_Patadar_3.jpgत्यानंतर उदयच्या समोर अाला तो नक्षलवाद. नक्षलवादाचे धागेदोरे त्याच्या घराच्या उंबऱ्यापर्यंत, पुण्यापर्यंत येत आहेत असे त्याच्या लक्षात आले. त्याने विचार केला – नक्षलवादी चुकीच्या कामासाठी पुण्यात येत असतील तर त्याने स्वत: चांगल्या कामासाठी तेथे का जायचे नाही? त्याची सारी मांडणी या विचारावर झाली. तो व त्याचे साथीदार यांनी त्यांची कंबर साधारण तीन वर्षांपूर्वी हजारभर किलोमीटर अंतरावरील गडचिरोलीमध्ये जाण्यासाठी कसली. पहिला विरोध झाला तो पोलिसांकडून. ते म्हणाले, की त्यांच्यासोबत कोणतीही स्वयंसेवी संस्था काम करत नाही. तुम्ही पोलिसांसोबत आलात तर नक्षलवादी तुम्हालाच इन्फॉर्मर समजून मारून टाकतील! पण उदयने पोलिसांची पाठ सोडली नाही. अखेर, त्याला पोलिसांसोबत काम करण्यास परवानगी मिळाली.

उदयने गडचिरोलीत पहिला उपक्रम घेतला तो नक्षलवादाच्या लढाईत मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबासाठी. नक्षलवाद्यांच्या भीतीने कोणी त्या कुटुंबांना मदत करत नव्हते. त्या कुटुंबातील मुला-मुलींना शाळेसाठी कितीतरी किलोमीटर अंतर  जंगलातून चालत जावे लागे. उदयने त्या मुलामुलींना शिक्षणासाठी चपला, दप्तर आणि सायकल दिल्या. उदय म्हणतो, अापल्यासाठी ती साधी सायकल असली तरी तिथे त्या मुलांसाठी त्याचे महत्त्व चार चाकी गाडीएवढे अाहे. उदयचा तो साधा अाणि पहिलाच उपक्रम कमालीचा गाजला. त्यानंतर त्याने ‘अग्निपंख’ हा दुसरा उपक्रम तेथे राबवला. त्याने नक्षलपीडित, शहीद वीरपत्नी, शरणागत नक्षली यांना एका व्यासपीठावर आणले. त्याचे शरणागत नक्षलींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करावे हे उद्दिष्ट होते. सक्रिय नक्षलवादी ते सारे पाहून मुख्य प्रवाहात येतील अशी उदयला आशा होती. तशा अात्मसमर्पित नक्षलवाद्यांची प्राणहिता येथे उपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या परिसरात एकोणतीस घरांची वस्ती अाहे. त्या कुटुंबांतील मुलांसाठी उदयच्या मंडळाने ‘शातिनिकेतन’ नावाची शाळा सुरू केली अाहे. उदय अभिमानाने सांगतो, की जे लोक अातापर्यंत भारताचा झेंडा जाळून टाकत असत, त्याच लोकांनी स्वातंत्र्यदिनाला झेंडा फडकावला.

‘आदर्श मित्र मंडळा’ने नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तींच्या पन्नास मुलांच्या शिक्षणाची सोय केली. त्याहीपलिकडे जाऊन त्यांनी पोलिसांच्या चकमकीत मरण पावलेल्या नक्षलवाद्यांच्या मुलांचीदेखील तशीच काळजी घेतली. त्याकरता त्यांनी पोलिसांना सोबत घेतले. त्यातून नक्षलवाद्यांच्या मनातील पोलिसांबद्दलची कटुता कमी होऊ शकेल असा विश्वास उदय अाणि त्याच्या मित्रांना वाटतो.

_Parag_Patadar_4.jpgउदय एक थरारक अनुभव सांगताना म्हणतो, आम्हाला नक्षलवादाचा सामना करताना ते जीवावरचे काम आहे याची पूर्ण कल्पना होती. एकदा तर, एका गावात गेलेले असताना, आम्हाला मारण्यासाठी दहा-वीस फुटांवर नक्षलवादी एके-47 घेऊन उभे होते, पण आम्ही ‘त्यांनी मारले तरी चालेल, पण गावात वीज आणायचीच’ हे ठरवले होते. दरम्यान आम्ही तरूण चांगले काम करत आहोत हे त्यांच्या कानावर कोणातरी घातले म्हणून त्या दिवशी आमचा जीव वाचला आणि ते आम्हाला न मारता निघून गेले.

उदयने तेथील तेहतीस पोलीस स्टेशनांत ग्रंथालये सुरू केली. त्यांना आकाशदुर्बीण दिली. पुण्यातील तरुणांनी पुस्तकहंडीच्या माध्यमातून साडेतेरा हजार पुस्तके गडचिरोलीला भेट दिली. त्यामागे गावकरी अाणि मुले पुस्तकांच्या निमित्ताने पोलिसांच्या जवळ यावेत असा उद्देश होता. मात्र नक्षलवाद्यांच्या भीतीने ते शक्य झाले नाही. मात्र उदयचे प्रयत्न इतरांनाही प्रेरीत करत होते. तेथील पोलिस उपअधिक्षक सागरकवडे यांनी काही गावांमध्ये खाट लायब्ररी सुरू केली. एका खाटेवर काही पुस्तके टाकून ती गावात अाणून ठेवली जातात. ज्यांना हवी त्यांनी ती घेऊन जायची अाणि वाचून झाली की पुन्हा खाटेवर अाणून टाकायची. नक्षलवादाला वळसा घालून पुस्तके गावकऱ्यांपर्यंत पोचू लागली.

‘अादर्श मित्र मंडळा’ने दुर्गम भागातील शाळांमध्ये खेळाचे साहित्य आणि पुस्तके पोचवली. त्यानिमित्ताने त्यांना गावांची स्थिती कळी लागली. मग ज्या गावांत वीज नव्हती तिथे 2016 मध्ये पहिल्यांदा सोलर सिस्टमच्या माध्यमातून वीज पोचली. देशाला स्वातंत्र्य मिळूनही अंधारात असलेली ती गावे प्रथमच उजळली. बोलेपिल्ली, देवदा, हेतलकसा अशी गावे आनंदाने प्रकाशित झाली.

उदयच्या प्रयात्नांची कमाल म्हणजे त्याने शरण अालेल्या नक्षलवाद्यांच्या डोक्यावर अहिंसेचे प्रतीक असलेली गांधीटोपी अाणली. त्याने तेथील पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख अाणि पोलिस उपअधिक्षक सागरकवडे यांच्या मदतीने शरणार्थींना तीन महिने गांधीविचारांवर अाधारित समुपदेशन केले. त्यानंतर त्यांची गांधीविचारांवर आधारित अशी परीक्षा घेण्यात आली. छपन्न नक्षलवाद्यांनी गांधीविचारांची परीक्षा तीन वर्षांत दिली. अहिंसेला समर्थन देणारी त्यांची उत्तरे पाहून उदय अाणि इतर पोलिस अधिकारी भारावले. छत्तीसगढ सरकारने उदयच्या टीमला गडचिरोलीमधील मोठा बदल पाहून त्यांच्या येथे काम करण्यास बोलावले. ती चांगल्या कामाची मोठी पावती होती. नक्षलवादी भागात शाळाबाह्य मुलांचे प्रमाण मोठे आहे. ‘अादर्श मित्र मंडळा’ने तेथील काही शाळांमध्ये ई लर्निंगचे प्रयत्न केले. उदय म्हणतो, अाम्ही सर्व शाळांमध्ये काम करू शकत नव्हतो. मात्र अामच्या प्रयत्नांनी तेथील शिक्षक कार्यरत झाले. त्यांनी सर्व शाळांमध्ये ई-लर्निंगची व्यवस्था करण्यासाठी सरकारच्या मागे तगादा लावला. त्या शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोलीतील अनेक शाळांमध्ये ई-लर्निंगची व्यवस्था सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. महाराष्ट्र सरकारकडून गडचिरोलीतील विद्यार्थ्यांसाठी ‘महाराष्ट्र दर्शन’ हा उपक्रम राबवला जातो. ती मुले पुणे भेटीसाठी येतात तेव्हा उदय ते दोन दिवस त्यांच्यासोबत असतो. तो त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सकारात्मक व्यक्तींच्या भेटी अाणि त्यांची व्याख्याने अायोजित करतो. उदय म्हणतो, की नक्षलवाद्यांनी तेथील लोकांमध्ये सरकार अाणि इतर समाज यांच्याबद्दल जो  राग पेरला अाहे तो दूर होत असल्याचे त्या विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून जाणवते.

गडचिरोलीतील एका व्यक्तीचा मुलगा मरण पावला. त्याच्या वडीलांनी मुलाचे प्रेत खांद्यावर घेऊन पाच किलोमीटर अंतरावरील रुग्णालय गाठले. त्या घटनेचे मोठे पडसाद उमटले. ती घटना ऐकून उदय अाणि त्याचे मित्र व्यथित झाले. त्यांनी त्याच भागात दुचाकी अँब्युलन्सची कल्पना राबवली. त्या उपक्रमाचे उद्घाटन त्या मुलाच्या वडिलांच्या हस्ते करण्यात अाले. अादर्श मित्र मंडळा’ने तशा पाच अँब्युलन्स पुरवल्या अाहेत.

नक्षलग्रस्त भाग बदलू पाहत अाहे, हे सांगण्यासाठी सात हजार लोकांनी एकत्र येऊन शांततेचा संदेश द्यावा अशी कल्पना ‘अादर्श मित्र मंडळा’कडून अाखण्यात अाली. त्याला गडचिरोली पोलीस दलाने यथार्थ साथ दिली आणि 3 मार्च 2018 रोजी तो कार्यक्रम घडवण्यात अाला. ज्या गडचिरोलीवर नक्षलवादाचा काळा डाग अाहे, तेच गडचिरोली एकत्र जमून जगासमोर शांततेचा संदेश मांडत होते! त्या घटनेची दखल ‘गिनिज बुक अॉफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली.

उदयच्या गडचिरोलीतील अनुभवांवर अाधारित ‘गोंडवनाचा सांगावा’ अाणि ‘यारी भाईगिरी दुनियादारी’ ही दोन पुस्तके प्रसिद्ध झाली अाहेत. उदय अाणि त्याच्या मित्रांच्या त्या प्रयत्नांमागची चांगुलपणाची प्रेरणा फार महत्त्वाची आहे. उदय जगतापची ही कहाणी म्हणजे एका सामान्य कार्यकर्त्याचे सामाजिक भान विस्तारले की त्यातून किती मोठे अाणि महत्त्वाचे काम उभे राहते अाणि त्यातील बदलाची प्रक्रिया कशी घडू लागते याचे मूर्तीमंत उदाहरण अाहे.

उदय जगताप (आदर्श मित्र मंडळ) – 9822599132

(पूर्व प्रसिद्धी ‘रसिक पुरवणी’, २५ मार्च २०१८, दैनिक ‘दिव्य मराठी’)

– पराग पोतदार

About Post Author