गझल : क्षुद्र, निरुपयोगी निकष नकोत आता

gazal shudra niupayogi nahi

चंद्रशेखर सानेकर, सदानंद डबीर या कवीद्वयींच्या गझल विषयक मतांत नवीन असे काहीच नाही. अक्षयकुमार काळे, श्रीरंग संगोराम यांच्या लेखनात आणि माझ्याही काही लेखांत हे विचार थोड्याफार फरकाने आलेच आहेत. ग्रामीण गझलबाबत बोलायचे तर –

*आता शिक्षणाच्या प्रसारामुळे समग्र साहित्यसर्जनच महानगरातून लहान गावांकडे, खेड्यांकडे वळत आहे.

*त्वरित तंत्र अवगत करण्याची क्षमता आमच्या पिढीपेक्षा नव्या पिढीत अधिक आहे. कवी नसलेली व्यक्तीही त्या विधेत, मनात येईल ते विचार छंदोबद्ध करून तिला गझल संबोधू शकतो.

*गझल या विधेच्या सृझनाचे आकर्षण कवी नसलेल्या रसिक मनासही आहे. त्यामुळे तेही उर्दूचे शेर चोरी करून मराठीत रचतात.

*गझलकार हा मूलत: उत्तम कवी असावा हा निकष या पिढीने कालबाह्य ठरवला असावा.

* ‘भोगा हुआ यथार्थ’ मांडणे एवढेच तत्त्व लक्षात ठेवून बहुतांश गझलरचना घडतात असे दिसते. 

*गझलेला विषयाचे बंधन नसले तरी, ती एक तहजीब म्हणजे संस्कृती मानली जाते. तिच्यात अर्वाच्य शब्द, बीभत्स कल्पना अभिप्रेत नाहीत. गझलला ‘उर्दू शायरीची अब्रू’ असे म्हटले जाते. पण काळानुरूप संकेत ही पाळण्याची परंपरा खंडित झाली आहे.

*गझलेत कवीने त्याचे विचार, कल्पना काव्यात्मक शैलीत मांडणे, जेणेकरून वाचक-श्रोत्यांच्या मन-बुद्धीचा ती ठाव घेऊ शकेल, हा विचारही मागे पडला आहे.

*ग्रामीण विषयाचे बाहुल्य स्वाभाविक आहे, कारण गझलसर्जनाचा ओघ तेथूनच येतो आहे. गझल तंत्र शिकवणारे गझलचे बाह्यांग शिकवतात. ते स्वतःच अंतरंग म्हणजे तगज्जुल (हिंदी, मराठीत गझलीयत) बाबत कदाचित अनभिज्ञ असतात.

*तगज्जुल म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून संस्कृत काव्यज्ञांनी नमूद केलेले काव्यगुण होत.

*संप्रेषणीयता हा गझलचा महत्व्कपूर्ण गुण होय. ध्वनि सिध्दांत, सांकेतिकता ह्याही अपेक्षित आहेत. पण अमूर्त प्रतीके, रूपके, दृष्टांत इत्यादी वापरूनही शेराचे अंतरंग उलगडत नसेल तर मग त्यातील छंद, रदीफ-काफिया, अन् शब्दलालित्याचे कौतुक करायचे काय?

*ग्रामीण समस्यांचे गझलेत इमोशनल ब्लैकमेलिंग करणे हे मंचीय गझलेत प्रकर्षाने जाणवते. तो हमखास दाद घेण्याचा उपाय आहे, हे ग्रामीण भागातून आलेल्या रचनाकारांना कळले आहे. मंचीय गझल ही परफॉर्मिंग आर्ट झालेली आहे. तिला दाद घेण्यासाठी इमोशनली ब्लॅकमेल करणारे विषयच हवे असतात.

*साधारणतः अशा गझलांचे स्वरूप लाऊड असते अन् त्या गझलपेक्षा ‘हजल’या संज्ञेत मोडतात.

*माझ्या मते वाड्मयीन वा वैचारिक गझलचे स्थान वाड्मयीन मासिकातच आहे. त्या दीर्घजीवी असूनही मंचीय क्वचित बनू शकतात. मंचीय गझलच्या श्रोत्यांना बुद्धीला ताण देऊन शेर समजावून घेण्याची सहसा इच्छाच नसते. त्यांना विरोधाभास असलेले सटाइरिकल शेर भावतात.

*दार्शनिक गझल शाश्वत राहते, हा विचार मी पंधरा वर्षापूर्वी मांडला आहे. पण अनेकांना त्यांचेच शेर गुणात्मक दृष्टीने शाश्वत आहेत (इतर कोणाचे नाहीत.) संख्यात्मक वाढ इतरांच्या गझलेत झाली,(माझ्या गझलेत झाली तरी ती तिचा उच्च दर्जा राखून आहे) असे आभास होताना दिसतात.

*आजही चाळिशीच्या आतील वीस टक्के गझलकार, भट यांच्या नंतरच्या पिढीतील ज्येष्ठ गझलकांराहून उजवी गझल लिहीत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांचे अनेक शेर भट यांच्या शेरांशी स्पर्धा करतात.

*केवळ आकृतिबंधाच्या तंत्राचे अनाकलन, वृत्त-छंदाचे अज्ञान आहे म्हणून काव्य समीक्षक गझल-काव्याची उपेक्षा करत आहेत असे नव्हे तर, अमूर्त कवितेबाबत ते झसे अमूर्त शब्दच्छल करू शकतात तसे गझलसमीक्षेत करता येणार नाही ही भीती आहे.

*काफियात यमकाचा अंतर्भाव होतोच, पण त्याव्यतिरिक्तही काय आहे ते पाहू. उदाहरणार्थ आज, साज, बाज, लाज, माज इत्यादी शब्दांत ‘ज’ हा वर्ण कॉमन आहे तो ‘हर्फे-रवी’ संबोधला जातो. त्या शब्दांची लय ‘गा ल’( म्हणजे गुरु वर्ण व लघु वर्ण) या समग्र शब्दांतील आ, सा, बा, ला, मा, इत्यादी वर्णांचा स्वर ‘आ’ (स्+आ=सा, ब्+आ=बा, ल्+आ=ला, म्+आ=मा) येथे ‘आ’ हा स्वर ‘अलामत’ आहे. त्याचप्रमाणे – मोर, चोर, जोर, पोर इत्यादी शब्दांत ‘र’ हर्फे रवी आहे व ‘ओ’ हा स्वर अलामत आहे. मूल, फूल, डूल, चूल इत्यादी शब्दांत ‘ल’ हर्फे रवी व ‘ऊ’हा स्वर अलामत आहे. फेक, शेक, केक, लेक इ. शब्दांत ‘क’ हर्फे रवी असून ‘ऐ/ए’ हा स्वर अलामत आहे. ‘इ’, ‘उ’ ची अलामत इथे, तिथे, कुठे, मुलें इत्यादी शब्दांत दिसेल. ‘अ’ ची अलामत उर्दूत ग्राह्य नाही. वरील समग्र शब्दांची लघु-गुरु लय ‘गा ल’ अशीच आहे. मग हर्फे रवी मतल्यातील दोन्ही चरणांत ‘र’ असेल तर नंतरच्या शेरात ‘र’च यायला हवा हा आग्रह व्यर्थ व अनाकलनीय आहे. त्यामुळे ग़ज़लचे क्षेत्र मर्यादित होते. मतल्यात काफियाचे शब्द झर माप, शाप असेल तर अन्य शेरांत वाफ आला तर हरकत काय? जाण, प्राण, त्राण नंतर शान, भान आले तर गेयतेत बाधा येत नाही. हास, भास, रास इत्यादी शब्दांनंतर नाश, पाश आल्याने शेराची/गझलची लय यत्किंचितही बिघडत नाही. ‘स्वरांचा काफिया’? काफिया हा स्वरांचाच असतो. अशी स्वतंत्र संकल्पनाच उर्दू छंद शास्त्रात नाही. माझ्यापाशी भारत व पाकिस्तान यांतील उर्दू-फारसी छंदशास्त्रावरील पन्नास ग्रंथ आहेत. ती संज्ञा कोठेच नमूद नाही. स्वरसाम्यता (सौती हमआहंगी) हीच काफियाची रूह म्हणजे आत्मा आहे. उर्दू छंदशास्त्रही स्वरानुगामीच आहे, त्यामुळे ते लवचीकही आहे. स-श-ष, प-फ, न-ण, ब-भ इत्यादी समोच्चारी भासणारे शब्द आपण हर्फे रवीत ग्राह्य तर करावेच पण अलामततील (अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ,औ) स्वरांचे अन्य शब्दही (व्यंजन+स्वर) मतल्यानुसार नसेल तरीही अनिवार्य असल्यास वापरावे. मतल्यात काफिया आले, झाले असेल तर अन्य शेरांत गाते, वाहे, काटे, यारे इत्यादी काफिये आक्षेपार्ह ठरवून गझल विधा संकुचित करू नये. येथे गा गा ही लय व अलामत सांभाळली आहे. मतल्यात हर्फे रवी ‘ले’ आहे, म्हणून इतर शेरात तोच हवा, हा नियम हास्यास्पद तर आहेच पण त्यामुळे गझल विधेचा कृत्रिमपणा सिध्द करण्यास समीक्षकांना वाव मिळतो. 

मला ज्येष्ठ गझलकार संगीता जोशीं यांचा फोन आला होता. ‘चक्र, पत्र ‘हे काफिये ग्राह्य धरावे का? हा चर्चेचा विषय होता. मी बाराखडीच्या बाहेरचा विचार मांडतोय, पटले तर गझलेचे क्षेत्र विस्तृत करता येईल व कृत्रिमतेच्या आरोपाचे खंडनही बरेच होईल. या दोन्ही शब्दांत ‘र’ हा हर्फे रवी योग्यच आहे. राहता राहिली अलामत ती चूक कारण ‘अ’ ची आहे? पण चक्र मधे क चा भार च वर पडतो, पत्र मधे त चा भार प वर पडतो. म्हणजे त्या शब्दांची लय गा ल अशी आहे व त्याचमुळे त्यांत स्वरसाम्यता आहे (सौती हमआहंगी). गेयतेत बाधा येतच नाही. मग अलामतकरता अडून न राहता आपण हवे तर दुय्यम दर्जाचा मध्यम काफिया म्हणून यास स्वीकारूया. त्याने मराठी काफियाची संपदा समृद्ध होईल. ही अनाग्राही सूचना आहे. गझलचा कॅनव्हास विस्तृत करायचा असेल तर या क्षुद्र निरुपयोगी निकषांचा अट्टाहास सोडायला हवा. अशी गझल रदीफयुक्त (मुरद्दफ) असेल तर गझलेतील संगीतात्मकता अबाधित राहील. गझल विधा आक्षेपार्ह ठरत आली (डॉ.कलीमुद्दीन अहमद : उर्दू शायरी पर एक नजर) ती ‘काफिया’तील या जाचक निर्बंधांमुळे. त्याचमुळे गझल मर्यादित काफियात साकारत राहते व गझलकार एकमेकांच्या जमीनीवर हात मारत राहतात; आपली चोरी केल्याचे आरोप एकमेकांवर करत असतात. या कूपमंडूक डबक्यातून बाहेर पडायचे असेल तर काफिया म्हणजे स्वरसाम्यता हे जाणून घ्यायला हवे. कालानुसार फुटकळ जाचक निकष त्यागायला हवे. मी देखील गझलेच्या तंत्रनिष्ठतेबाबत अत्याधिक आग्रही ऐंशीच्या दशकात होतो. पण जसजसे उर्दू गझल, अरूज यांवरील पुस्तके वाचनात आली तेव्हा तेथील अनेक निकष लावून मराठी गझल रचताना कृत्रिमतेची कास धरली जात आहे असे जाणवू लागले. आपण मराठी यमकाप्रमाणे आ, ई, ऊ, ऐ, ओ इत्यादी स्वरांच्या अलामतीऐवजी गुरू वर्ण हाही निकष ग्रहण केला तर गेयतेत न्यूनता न येता काफियाचे विश्व विस्तृत होईल अन् दुस-याच्या केवळ तांत्रिक चुका शोधण्यापेक्षा त्यातील तगज्जुलचा मागोवा घेणे जास्त सुसंस्कृतपणाचे ठरेल. 

– राम पंडित ‘पद्मानन्दन’ dr.rampandit@gmail.com

About Post Author