गंधर्व परंपरा

1
96
carasole

‘भूगंधर्व’ रहिमतखाँ

इसवी सन 1900 च्या सुमारास नेपाळ नरेशांनी नेपाळमध्ये खास संगीत महोत्सव आयोजित केला होता. बनारसहून आलेल्या एका अवलिया गायकाने तिथे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महोत्सवात जेव्हा त्याने आपले गाणे पेश केले, तेव्हा त्या गाण्यात खानदानी गायकी, मधुर-सुरेल आवाज आणि ग्वाल्हेर घराण्याच्या वैचित्र्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण तयार ताना ऐकून श्रोते दिङमूढ झाले. नेपाळच्या महाराजांकडून त्या गायकाला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला. ते होते ‘रहिमतखाँ’. तेथूनच पुढे लोक त्यांना ‘भूगंधर्व’ म्हणून ओळखू लागले.

भूगंधर्व हे ग्वाल्हेरचे दरबारी गायक हद्दुखाँसाहेब यांचे धाकटे पुत्र. त्यांचा जन्म ग्वाल्हेरला ऐश्वर्यसंपन्न घरात झाला. त्यांचे व्यक्तिमत्त्व लहानपणापासूनचे उत्तम खाणेपिणे, जोरकस व्यायाम आणि खानदानी संगीताची तालीम यांमुळे ऐन तारुण्यात भारदस्त व राजबिंडे दिसत असे. त्यांचे मोठे बंधू महंमदखाँ हेसुद्धा तसेच होते. परंतु नियती ऐश्वर्यवान माणसालासुद्धा कधी व कसे फटके देईल, ते सांगता येत नाही. त्यांचा राजाश्रय मोठा भाऊ, वडील आणि आई यांचे निधन पाठोपाठ झाल्याने तुटला. दु:खाचे डोंगर अचानक कोसळल्यामुळे रहिमतखाँ सैरभैर झाले व त्यांनी त्याच अवस्थेत ग्वाल्हेर सोडले. फिरत फिरत, ते बनारसला आले. तिथे त्यांना त्यांच्या वडिलांचा स्नेह असलेल्या ब्राम्हण भिक्षुकाकडे आसरा मिळाला. बनारसमध्ये त्यांची कोठीवरील गायक-वादकांशी मैत्री जमली. त्या मैत्रीतून त्यांना अफूचे व्यसन जडले. त्यांनी व्यसनाच्या धुंदीत एके दिवशी एका फकिराची छेडछाड केली. त्या फकिराने संतप्त होऊन त्यांना शाप दिला असे म्हणतात. तेव्हापासून त्यांची स्थिती भणंगासारखी झाली. सुदैवाने, त्याच सुमारास विष्णुपंत छत्रे त्यांची सर्कस घेऊन बनारसला आले होते. विष्णुपंत हे काही काळ हद्दुखाँसाहेबांकडे गाणे शिकले होते. त्यांच्या कानावर बातमी आली, की बनारसमध्ये एक अवलिया भिकारी आहे; जो उत्तम गातो. छत्रे यांनी कुतूहलापोटी त्या भिकाऱ्याचा शोध घेतला. तेव्हा ते हादरलेच. कारण तो भिकारी दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा गुरुबंधू रहिमतखाँ होता. विष्णुपंतांनी आनंदाने रहिमतखाँना मिठी मारली व ते प्रेमाने त्यांच्या निवासस्थानी त्यांना घेऊन आले.

त्यांनी रहिमतखाँसाहेबांना मोठ्या कष्टांनी व प्रयत्नांनी भरकटलेल्या अवस्थेतून बऱ्यापैकी पूर्वपदावर आणले. त्यांच्या प्रयत्नांमुळे संगीत रसिकांना भूगंधर्वांचे गाणे पुन्हा ऐकायला मिळू लागले. विष्णुपंत व त्यांचे बंधू गेल्यावर भूगंधर्व कुरुंदवाडकरांच्या आश्रयाला आले व तेथेच त्यांचे 1922 मध्ये निधन झाले. भूगंधर्वांच्या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे सुरेल, सहजसुंदर व तिन्ही सप्तकांत फिरणारी तान. ‘शुचिता व शास्त्रशुद्धता’ ही त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये. शारंगदेवाच्या ‘संगीत रत्नाकर’ या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे उत्तम गवयाची लक्षणे त्यांच्यात होती.

‘देवगंधर्व’ भास्करबुवा बखले

सूरश्री केसरबाई केरकर यांनी ज्यांचा उल्लेख ‘संगीतातील पुरुषोत्तम’ असा केला; संगीतसम्राट अल्लादियाखाँसाहेब ज्यांना ‘मैफल का शेर’ म्हणत; भूगंधर्व रहिमतखाँसाहेब ज्यांचे गाणे ऐकल्यावर म्हणाले होते, ‘ये तो हड्डी का गवय्या है, इसके गाने में कोरमे की खुशबू है, ये गाना सुननाही चाहिए’; ज्यांचे नाव निघताच त्या काळातील नामवंत गवई म्हणत, ‘पूरे दख्खन में ऐसा एक ही गवय्या है’;  त्या देवगंधर्व भास्करबुवा बखले यांच्याबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. उत्तर भारतातील शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताचे प्रकार महाराष्ट्रात घरोघरी नाट्यसंगीताच्या माध्यमातून पोचवण्यात ज्यांनी मोलाचे कार्य केले, त्यात बास्करबुवा बखले यांचे नाव अग्रस्थानी घ्यायला हवे. बुवांनी शास्त्रीय संगीतातील अप्रचलित आणि मुश्कील समजले जाणारे राग नाट्यसंगीताच्या रूपातून इतके लोकप्रिय केले, की ते ‘मुश्कील’ या सदरातून ‘मामुली’ या सदरात येऊन बसले. त्यांनी संगीत दिलेल्या ‘स्वयंवर’, ‘विद्याहरण’, ‘द्रौपदी’ आदी नाटकांतील पदे लोकप्रिय आहेत.

भास्करबुवांचा जन्म बडोदा संस्थानातील ‘कठोर’ या गावी इसवी सन 1869 मध्ये झाला. ‘कठोर’ या नावाप्रमाणेच बुवांनाही संगीताची सिद्धी साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले. बुवा लहान असताना ‘रामराज्यवियोग’ या नाटकात कैकेयीची भूमिका करत असत. ते त्या भूमिकेतील गात असलेल्या पदांमुळे खूप प्रसिद्धीस आले. एके दिवशी त्या नाटकाच्या प्रयोगाला प्रसिद्ध बीनकार बंदेलीखाँसाहेब हजर होते. बुवांचे कैकेयीच्या भूमिकेतील गाणे ऐकून खाँसाहेब इतके खुश झाले, की दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वत:च्या खर्चाने लहान भास्करचे गंडाबंधन केले व त्याला गाण्याची तालीमही चालू केली. पुढे निसर्गनियमानुसार बुवांचा आवाज फुटला व त्यामुळे त्यांना स्टेजवर गाता येईनासे झाले. त्याचा पिरणाम म्हणजे, कंपनीत बुवांना सगळे अपमानास्पद वागणूक देऊ लागले. एके दिवशी बुवा अपमान सहन न झाल्याने संतप्त होऊन नाटक कंपनी सोडून निघाले, ते परत ‘भास्करबुवा’ बनून येण्याच्या जिद्दीनेच. बुवांनी ती जिद्द खरी करून दाखवली. तो काळ होता कर्मठ सनातनी लोकांचा. अशा काळात मुसलमान गुरूंच्या घरी राहून विद्या मिळवणे किती कठीण असेल! परंतु भास्करबुवांनी त्यांच्या लीन, कष्टाळू स्वभावाने प्रत्येक गुरूचे मन जिंकले व अपार मेहनत करून गाण्यातील सिद्धी प्राप्त केली.

ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक फैज महंमदखाँसाहेब, आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गायक नत्थनखाँसाहेब व जयपूर घराण्याचे थोर गायक अल्लादियाखाँसाहेब अशा तीन गानमहर्षींकडून प्राप्त झालेली विद्या व बंदेअलिखाँसाहेब यांचा सहवास यामुळे तंतुवाद्याच्या अंगाने कसे गावे याचे झालेले संस्कार, या सर्वांतून बुवांनी त्यांची वेगळी गायनशैली निर्माण केली. पांडित्य, लालित्य आणि श्रोत्यांबद्दल अगत्य ही त्यांच्या गाण्याची व मैफलीची खास वैशिष्ट्ये होती. ते मैफलीचा आनंद प्रत्येक श्रोत्याला मिळावा म्हणून मैफलीचा रागरंग बघून फक्त शास्त्रीय संगीतावर चिकटून न राहता ठुमरी, नाट्यगीत, भजन; इतकेच काय, तर लावणीसुद्धा पेश करत असत. भास्करबुवांना त्या काळात पंजाब, काश्मीर आदी प्रांतांतून गाण्यासाठी निमंत्रणे येत असत. बुवांना जालंधर येथील महोत्सवात ‘देवगंधर्व’ ही पदवी बहाल करण्यात आली.

‘सवाई गंधर्व’ रामभाऊ कुंदगोळकर

‘नर करनी करे तो नर का नारायण हो जाए’ या म्हणीचे प्रतीक म्हणजे ‘सवाई गंधर्व’. सवाई गंधर्वांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर. त्यांचा जन्म 1886 मध्ये कुंदगोळ येथे झाला. रामभाऊंचा आवाज लहानपणी गोड व हलका होता. त्यांना व घरातील मंडळींना गाण्याची आवड होती. वडील स्वत: तबल्याची साथही करत असत. घरातील आर्थिक सुबत्ता व सर्वांना असलेली गाण्याची आवड या अनुकूल परिस्थितीमुळे लहानपणी रामभाऊंना कुंदगोळ येथे बळवंतराव कोल्हटकर यांच्याकडे गाणे शिकण्याची संधी मिळाली. त्यांना त्यात सुमारे पंच्याहत्तर ध्रुवपदे व पंचवीस तराणे मिळाले. रामभाऊंचे वडील मुळचे कुळकर्णी. त्यामुळे मुलाने जहागीरदारांकडील वहिवाटदारी व पाटीलकी पुढे सांभाळावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु रामभाऊंचा जीव गाण्यात अडकला होता. लहानपणी जरी त्यांचा आवाज गोड व हलका होता, तरी ते वयात आल्यावर त्यांचा आवाज फुटला व तो बोजड झाला. त्यावर उपाय म्हणजे, चांगल्या गुरूंकडून तालीम मिळणे हाच होता.

त्या सुमारास म. अब्दुल करीमखाँसाहेब मिरज येथे येऊन स्थायिक झाले. खाँसाहेबांचे गाणे सुरेल व भावनाप्रधान. रामभाऊंना खाँसाहेबांकडे शिकण्याची ओढ निर्माण झाली. तेव्हा मोठ्या प्रयत्नांती वडिलांचे मन वळवून रामभाऊ अब्दुल करीमखाँसाहेबांकडे गाणे शिकण्यास गेले. आवाज फुटल्यामुळे व बोजड झाल्यामुळे खाँसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊंनी त्यांचा स्वत:चा आवाज मोठ्या कष्टाने ताब्यात आणला. खाँसाहेबांकडे सुमारे सात-आठ वर्षे तालीम घेतल्यानंतर बीनच्या अंगाने कसे गावे याचे तंत्र रामभाऊंना अवगत झाले व त्यातून त्यांनी स्वत:ची विशेष आक्रमक गायकी बनवली. पुढे, सुमारे 1908 पासून, त्यांनी संगीत नाटकांमध्ये कामे केली. त्यांना ‘नाट्यकलासंगीत प्रवर्तक मंडळी’ या संस्थेतर्फे होणाऱ्या ‘सौभद्र’ नाटकातील सुभद्रेची भूमिका मिळाली. त्यांच्या सभ्य, सौम्य, प्रतिष्ठित व सुंदर व्यक्तिमत्त्वामुळे त्यांची सुभद्रेची भूमिका लोकप्रिय होऊ लागली. मुख्य म्हणजे त्यांचा गाण्याचा ढंगही वेगळा व प्रेक्षकांवर छाप पाडणारा असायचा. एके दिवशी अमरावतीला ‘सौभद्र’चा प्रयोग चालू असताना त्या प्रयोगाला हजर असलेले पुढारी व वऱ्हाडचे अनभिषिक्त राजे दादासाहेब खापर्डे यांनी रामभाऊंच्या भूमिकेवर व गाण्यावर खुश होऊन ‘हे तर सवाई गंधर्व’ असे उत्स्फूर्तपणे उद्गार काढले! तेव्हापासून लोक रामभाऊ कुंदगोळकरांना ‘सवाई गंधर्व’ या नावाने ओळखू लागले. सवाई गंधर्वांनी 1908 ते 1931 पर्यंत संगीत नाटकांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. ‘विनोद’ या नाटकातील त्यांचे वामनरावाचे काम; तसेच, ‘मिराबाई’ नाटकातील दयानंदाची भूमिका व ‘सुखसाधना भजना गणा’ हे पद खूप गाजले. त्यांनी नाट्यजीवनाला 1931 नंतर पूर्णविराम दिला. त्यानंतर ते फक्त खासगी बैठकीत गात असत.

‘बालगंधर्व’ नारायणराव राजहंस

भौतिकाच्या वाटेवर, काही जण आयुष्य ओढत जगतात, तर काही जण मानाच्या बिदागीचे रूपेरी बंदे रुपये खणखणून मोजून घ्यावेत तसे आयुष्याचे क्षण उंचीने जगून असामान्य ठरतात. त्या अलौकिक प्रतिभावंतांची भाष्यरेषा नियतीच जणू अधोरेखित करत असते. आणि असेच नियतीचे वरदान लाभलेले स्वरसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे बालगंधर्व! महाराष्ट्राच्या रंगभूमीला पडलेले व प्रत्यक्ष साकार झालेले एक सुंदर, सोनेरी, सुरेल स्वप्न. त्यांचा जन्म पुणे येथे 1888 मध्ये झाला. बालगंधर्वांचे वडील श्रीपादराव हे चित्रकार होते व ते सतारही वाजवायचे. त्यांचे दोन मामा नाटक कंपनीत होते. त्यांना कलेचा असा समृद्ध वारसा लाभला होता.

बालगंधर्वांच्या गाण्याची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्यांपैकी काही ठळक म्हणजे त्यांचे सुरावर व तालावर असलेले प्रभुत्व आणि गाण्यातील लडिवाळपणा. आकारयुक्त स्वरआलापीवर त्यांची हुकूमत होती. एखादे नाट्यपद ज्या रागावर आधारलेले असेल त्या रागाबाहेरील स्वर पदातील शब्दांच्या अर्थानुसार ते इतक्या बेमालूमपणे मिसळत, की त्या पदाची उंची कुठच्या कुठे जात असे, तीही रसभंग न होता. त्यांच्या त्या गानकौशल्यावर खुद्द अल्लादियाखाँसाहेबसुद्धा खुश व्हायचे व मनापासून त्यांच्या गाण्याला दाद द्यायचे. नाट्यपदांमध्ये ते वापरत असलेली ‘मूर्छना पद्धती’ ही त्यांची आणखी एक विशेषता. ती पद्धत महाराष्ट्रात सर्वप्रथम भास्करबुवांनी आणली असावी. कारण त्यापूर्वी त्या पद्धतीचा वापर कोणी केल्याचे ऐकिवात नाही.

बालगंधर्वांमुळे नाट्यसंगीत व त्या माध्यमातून शास्त्रीय संगीत महाराष्ट्रात घरोघरी जाऊन पोचले. भास्करबुवा, मास्तर कृष्णराव व बालगंधर्व या त्रयीचे महाराष्ट्रावर झालेले ते अनंत उपकार होत. संगीत क्षेत्रातील दिग्गजांनीही बालगंधर्वांच्या अद्वितिय प्रतिभेला मानाचा मुजरा केला आहे. त्याबद्दल एक किस्सा अतिशय सुंदर आहे.

त्या काळात मुंबईत बालीवाला थिएटरमध्ये म्युझिक कॉन्फरन्स होत. तशा एका सत्रात बालगंधर्व व बडे गुलाम अली खाँसाहेब यांचे गाणे आयोजित केले गेले होते. सुरुवातीला बालगंधर्व गायला बसले व त्या दिवशी त्यांनी देसी रागातील ‘म्हारे देरे आवो’ ही बंदीश सुमारे पाऊण तास अशी रंगून गायली, की त्यानंतर गायला बसणारे बडे गुलाम अली खाँसाहेब संयोजकांना म्हणाले, ‘इसके बाद मैं गा नही सकता | या एक तो शाम को गाऊंगा, नही तो कल सुबह गाऊंगा |’ गाण्याचा केवढा हा जबरदस्त प्रभाव! बालगंधर्व स्वत:ची शिष्य परंपरा करू शकले नाहीत. परंतु त्यांच्यानंतर त्यांच्या गाण्याची व गायकीची रसिकांना आठवण करून देणारे काही ज्येष्ठ कलाकार म्हणजे श्रीमती माणिक वर्मा, पं. रामभाऊ मराठे, पं. द.वि. काणेबुवा व पं. सुरेश हळदणकर हे होते.

‘स्वरराज छोटा गंधर्व’ सौदागर

संगीत रंगभूमीवरील एक ज्येष्ठ व श्रेष्ठ गायक-नायक छोटा गंधर्व यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त सत्कार सोहळा होता व त्या निमित्ताने ‘संगीत सौभद्र’चा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात अलोट गर्दी झाली होती. त्या प्रयोगानंतर स्वरराज छोटा गंधर्व संगीत रंगभूमीवरून निवृत्त होणार होते.

त्या दिवशीचा ‘सौभद्र’चा प्रयोग इतका रंगला, की पहाटे नाटक संपल्यानंतरही बराच वेळ रसिक आपापसांत गप्पा मारत होते व गतकाळातील स्वरराजांच्या नाट्यप्रयोगांबद्दल, त्यांच्या गाण्यांबद्दल आठवणी सांगत होते. ‘मानापमान’, ‘सौभद्र’, ‘मृच्छकटिक’चे रंगलेले नाट्यप्रयोग, … स्वरराजांनी घेतलेले वन्स मोअर… असे बरेच काही.

स्वरराजांचा जन्म कोरेगाव (सातारा) येथील एका कोष्टी कुटुंबातील. त्यांचे खरे नाव सौदागर. ते नाव त्यांच्या आईने कोल्हापुरातील ‘जोतिबा’ या दैवताच्या नावावरून ठेवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांना जन्मत:च एक दात होता! तेव्हा ते काही अशुभ तर नाही ना, या भीतीने त्यांच्या घरच्यांनी नाशिकच्या शंकराचार्यांची भेट घेतली. शंकराचार्यांनी त्यांची कुंडली बनवून ‘घाबरू नका, हा मुलगा पुढे खूप नाव कमावेल’ असे सांगितले. ते त्यांचे शब्द खरे ठरले. जात्याच आवाजाची देणगी, गाण्याकडे असलेली ओढ व घरची एकंदर परिस्थिती या सर्व गोष्टींमुळे स्वरराजांचा प्रवेश वयाच्या नवव्या वर्षीच ‘बालमोहन नाटक मंडळी’त झाला आणि तेथपासून स्वरराजांचे सांगीतिक आयुष्य व भरभराट चालू झाली ती आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकली. शंकराचार्यांनी त्यांचे गाणे त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी ऐकले व त्यांना ‘बालकिन्नर’ ही उपाधी दिली. पुढे अनंतराव गद्रे यांनी त्यांच्या ‘निर्भीड’ वृत्तपत्रात त्यांना ‘छोटा गंधर्व’ म्हणून संबोधले. तेथून पुढे महाराष्ट्रात ते छोटा गंधर्व या नावाने प्रसिद्ध झाले.

स्वरराजांना संगीत नाटकाच्या तालमीबरोबर शास्त्रीय संगीताची तालीम सुरुवातीला गोवित्रीकर मास्तर, नरहरीबुवा पाटणकर, बागलकोटकरबुवा यांच्याकडून मिळाली. पुढे, मोठे झाल्यावर त्यांना सवाई गंधर्व, मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा सहवास लाभला व त्यातून शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन लाभले. त्याच सुमारास त्यांना सिंदेखाँ नावाच्या एका अवलिया गायकाकडून कितीतरी दुर्मीळ राग व बंदिशी मिळाल्या. जयपूर घराण्याची तान गाता यावी यासाठी त्यांनी मुद्दाम कोल्हापूर येथे वास्तव्य केले व भूर्जीखाँसाहेबांकडून तालीम घेतली. ते सर्व करत असताना त्यांनी संगीत नाटकात भूमिका करून त्यांची लोकप्रियता कायम टिकवली. बालगंधर्वांच्या सहवासात असताना बालगंधर्वांनीसुद्धा त्यांचे गाणे ऐकून ‘छोटन्ना माझे गाणे पुढे तूच चालू ठेवशील’ असे आशीर्वादपर गौरवोद्गार काढले. ते अक्षरश: खरे ठरले.

दीनानाथांच्या गाण्यावरून स्फूर्ती घेऊन त्यांनी स्वत: बनवलेला राग ‘गुण कौशिक’ व त्यातील नाट्यपद ‘येतील कधी यदुवीर’ भल्या भल्या मान्यवरांची दाद घेऊन गेले. त्यांनी शास्त्रीय संगीतातही अनेक बंदिशी बांधल्या. अनेक अभंगांना सुंदर प्रासादिक चाली दिल्या. स्वरराजांनी संगीत रंगभूमीवरून निवृत्त झाल्यानंतर खासगी मैफलीतून रसिकांना त्यांच्या गाण्याचा आनंद शेवटपर्यंत दिला.

‘कुमार गंधर्व’ शिवपुत्र

काही कलाकारांना नियती जन्मत:च घडवून पाठवते. पं. कुमार गंधर्व यांच्या बाबतीत तसंच म्हटलं पाहिजे. स्वयंप्रज्ञा आणि सृजनशीलता यांचा सुरेख मिलाफ म्हणजे पं. कुमार गंधर्व. कुमारांच्या जीवनाचा प्रवास पाहिला तर ती गोष्ट मनोमन पटते. कुमारजींचा जन्म कर्नाटकातील. मूळ नाव शिवपुत्र. कुमारजींचे वडील थोडंफार गाणं शिकलेले होते. त्यांच्या घरात ग्रामोफोन होता व त्या काळातील काही मान्यवर कलाकारांच्या रेकॉर्ड्स होत्या. कुमारजी त्या रेकॉर्ड्स ऐकण्यात रंगून जात असत. एके दिवशी कुमारजींचे वडील गायला बसलेले असताना चिमुकले कुमार अचानक गाणं म्हणू लागले. ते बघून त्यांच्या वडिलांना व दोन भावांना आश्चर्य वाटले. कुमारांना त्यांनी उचलून दोन तंबोऱ्यांमध्ये बसवले व कुमारांनी त्या घरच्याच मैफलीत पहिल्यांदा स्वर लावला. कुमारजी ती आठवण सांगताना म्हणायचे, “घरातील मैफलीत सुरुवात केली ती बालगंधर्वांच्या ‘तात करी दुहिता विनाशा’ या पदाने. तेव्हापासून दोन तंबोरे माझी अखंड साथ करत आहेत.”

कुमारजींच्या वडिलांनी त्यांचा मुलगा गातो हे बघितल्यावर त्यांचे गावोगावी कार्यक्रम सुरू केले. लिंगायत संप्रदायाचे मुख्य गुरू शांतिवीरस्वामी यांचा एका गावात मुक्काम होता. त्यांनी कुमारजींचे गाणे ऐकले तेव्हा उत्स्फूर्तपणे उद्गार काढले, ‘अरे, हा तर गंधर्वच आहे. कुमार गंधर्व!’ त्या क्षणापासून लोक त्यांना कुमारगंधर्व या नावाने ओळखू लागले. पुढे, कुमारजी मुंबईला येऊन प्रो. बी. आर. देवधर मास्तरांकडे गाणं शिकू लागले व तिथंच ते लहानाचे मोठे झाले. गाणं शिकत असताना कुमारजींच्या अनेक ठिकाणी मैफली होऊ लागल्या व त्यांना म्युझिक कॉन्फरन्सची निमंत्रणं येऊ लागली. परंतु नियतीच्या मनात काही वेगळं होतं. कुमारजी 1950 च्या सुमारास फुफ्फुसाच्या क्षयरोगानं आजारी पडले. त्यातून बरे होण्यासाठी त्यांना कोरड्या हवेच्या ठिकाणी वास्तव्य करण्याची गरज होती. कुमारजींनी मध्यप्रदेशातील देवासला स्थलांतरित होण्याचं ठरवलं. तेथून त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीला वेगळी कलाटणी मिळाली. ते माळवा प्रांतातील लोकधुनांकडे आकर्षित झाले. लोकधुनांचा सखोल अभ्यास करून, त्यापासून स्फूर्ती घेऊन कुमारजींनी अकरा नवीन राग बांधले. सहेली तोडी, भवमत भैरव, बीहड भैरव, मालवती, लगनगंधार हे त्यांपैकी काही. त्यांनी बांधलेल्या अनेक बंदिशी व गायलेली निर्गुणी भजने हे संगीत क्षेत्राला मिळालेलं मोठं योगदान आहे. कुमारांच्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक स्वराचा अचूक लगाव आणि चपळ विजेसारखी व दाणेदार तान. ती भल्या भल्या गायकांनासुद्धा आश्चर्यचकित करते.

आजही कुमारांनी मैफलीत येऊन बसावं व त्यांच्या अमृतमय स्वरांनी सर्वांना तृप्त करावं असं त्यांच्या चाहत्यांना नक्कीच वाटत असणार. कुमारजींच्या शब्दांत सांगायचं, तर त्यांचे चाहते म्हणत असतील…

आवो रिझावो रिझावो रे
सुरन भेद प्रमाण सुनावो रे ||

 

‘महाराष्ट्र गंधर्व’ सुरेश हळदणकर

स्वरराज छोटा गंधर्व व पं. कुमार गंधर्व यांचे समकालीन असलेले परंतु फारसे परिचित नसलेले असे एक गंधर्व म्हणजे ‘महाराष्ट्र गंधर्व’ सुरेश हळदणकर. ते गोमांतकात जन्मले. गाणे शिकण्याच्या निमित्ताने पुण्यात आले. त्यांना पं. बापुराव केतकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. त्याच सुमारास गोविंदराव टेंब्यांकडून काही नाट्यपदांचीसुद्धा तालीम मिळाली. सुरेश हळदणकर हे मा. दीनानाथ, बालगंधर्व व मा. कृष्णराव यांना गुरुस्थानी मानत. दैवयोगाने, त्यांना सुरेल, बारीक परंतु धारदार आवाज प्राप्त झाल्याने त्यांच्या गाण्यात दीनानाथ मास्तरांच्या गाण्यातील तडफदारपणा व बालगंधर्वांच्या गाण्यातील लडिवाळपणा या दोन्ही गोष्टी साधता आल्या व त्यामुळे अनेक वर्षे संगीत रंगभूमीवरून व खासगी मैफलीतून ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. ‘होनाजी बाळा’ या नाटकातील त्यांची भूमिका व विशेष करून त्यातील ‘श्रीरंग कमलकांता’ हे त्यांचे पद गाजले.

एके दिवशी त्या नाटकाच्या प्रयोगाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रणेते प्र. के. अत्रे हजर होते. त्या दिवशी ‘श्रीरंगा कमलकांता’ हे त्यांचे पद इतके रंगले, की अत्रे मोहित होऊन अंक संपल्यावर रंगमंचावर आले व सर्व रसिकांच्या समोर पडदा उघडून त्यांनी सुरेश हळदणकरांना ‘महाराष्ट्र गंधर्व’ ही पदवी बहाल केली.

पुण्यातून मुंबईला आल्यावर हळदणकरांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण पं. मनहर बर्वे, पं. जगन्नाथबुवा पुरोहित, पं. गणपतराव देवासकर आदी संगीततज्ञांकडे झाले. पुढे ते प्रसिद्धीपासून दूर गेले. तरीसुद्धा त्या अगोदर अनेक वर्षे ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. त्यांनी गायलेल्या काही जुन्या रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. त्यांतील पदे उदाहरणार्थ, ‘विमल अधर निकटी’, ‘रघुराया गं माझा’, ‘श्रीरंगा कमलकांता’, ‘मानिली आपुली’, ‘सुरसुखकनी तू विमला’, ‘पद्ममनाथा नारायणा’ ही पदे ऐकल्यावर मनाची खात्री पटते, की त्यांना मिळालेली महाराष्ट्र गंधर्व ही उपाधी योग्य होती.

तर अशी ही गंधर्व परंपरा. कुमार गंधर्वांच्या चाहत्याने त्यांच्या मैफलीच्या आधी विचारले, “कुमारजी, तुमचे गाणे मी रेकॉर्ड केले तर चालेल का?” क्षणाचाही विलंब न लावता कुमारजी म्हणाले, “जरूर करा आणि जेवढ्या लोकांना देता येईल तेवढ्यांना द्या. माझे गाणे ऐकून किंवा चोरून जर उद्या एखादा कलाकार तयार झालाच, तर तो एक तर माझ्यापेक्षा चांगल्या दर्जाचा होईल किंवा कमी दर्जाचा होईल. पण कुमार गंधर्व निश्चित होणार नाही.” उद्या, या हिंदुस्थानात उत्तम कलाकार होतीलही; परंतु या गंधर्वांसारखे कोणीही होणार नाही. त्यांच्या सम तेच!

– डॉ. राम भास्कर नेने

(दिव्य मराठीच्या अंत:स्वर (2013) या दिवाळी अंकावरून)

About Post Author

1 COMMENT

  1. Cant understand why Suresh
    Cant understand why Suresh Haldankar lgged behind though he had good voice and also handsome In personality. He was looking delicate but his voice was quite sharp.

Comments are closed.