खिद्रापूरचे कोपेश्वर शिवमंदिर – शिल्पकृतींचा साक्षात्कार

carasole

कोल्हापूरनजीकचे खिद्रापूर येथील कोपेश्वर शिवमंदिर म्हणजे भारतातील श्रद्धा व शिल्प संस्कृतीचा उत्तम नमूना आहे. रामायण, महाभारत, भौगोलिक विश्वसंस्कृती, प्रेम, साहित्य, पर्यावरण, वन्यजीव, स्थापत्य शास्त्र अशा बहुअंगी विषयांना स्पर्श केलेली शिल्पे मंदिरात बघायला मिळतात.

शिलाहारांनी अनेक देवळे बांधली, त्यांतील अंबरनाथ, पेल्हार, वाळकेश्वर व कोल्हापूर येथील मंदिरे प्रसिद्ध आहेत. तसेच एक आहे खिद्रापूर शिवमंदिर. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर. तेथील प्राचीन वैभव सुस्थितीत आढळते.

ते कोल्हापूरच्या आग्नेयकडे येते. कोपेश्वर मंदिर बाराव्या शतकातील आहे. तेथील वास्तूशैलींवर विविध प्रभाव पाहायला मिळतो. चालुक्य वास्तुशैली ही त्या शैलीपैकी एक आहे. मंदिराचा एक भाग विधान (पद्धत) तारकाकृती आहे. शिखराचे बांधकाम अपुरेच आहे! त्याच्या अधिष्ठानावर देवतारूढ अशा हत्तींच्या पंचाण्णव मूर्ती खोदलेल्या आहेत. बाहेरच्या भिंतींवर शिल्पपट्टांत व तीरशिल्पांत अनेक मूर्ती आढळतात. त्या सर्व मूर्ती रेखीव व प्रमाणबद्ध आहेत. तेथील स्वर्गमंडपात अष्टद्विक्पालांच्या दांपत्य-मूर्ती आढळतात. मंदिराच्या भिंतींवरील विविध हावभावांतील आकर्षक मदनिकांच्या रेखीव शिल्पांतून तत्कालीन केश-वेषभूषा आणि अलंकार यांचे मनोज्ञ दर्शन घडते. त्या मूर्तिसंभारात स्त्री-पुरुष संबंधांची काही दृश्ये कोरण्यात आली आहेत. त्यामुळे दक्षिणेचे ‘छोटे खजुराहो’ असा त्याचा उल्लेख करतात. तेथे लागूनच दुसऱ्या ऋषभनाथ मंदिरातील श्रुतदेवतासुद्धा लक्षवेधक आहेत.

कोपेश्वर मंदिरात काही ठिकाणी हेमाडपंथी शैलीही पाहण्यास मिळते. हेमाडपंथी शैलीची मंदिरे जंगलात किंवा पठारावर, कोठेही आढळतात. नदीकाठी दोन दगडांच्यामध्ये आधार म्हणून खोबणी आणि कंगोरे यांचा वापर करून, इतर कोठलाही आधार न घेता, दगडांची कलात्मक रचना करून मंदिरे बांधण्याची कला हे त्या वास्तुविशारदांचे वैशिष्ट्य. मुख्य प्रवेशद्वारानंतर नगारखाना लागतो. प्रवेशद्वाराच्या भिंतींवरील दोन हत्ती पाहुण्यांचे स्वागत करत आहेत असे वाटते. प्रवेशद्वारातून एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकेल इतके ते अरूंद आहे.

मध्यवर्ती स्वर्गमंडपाला यज्ञमंडप असेही म्हटले जाते. एका मोठया, अखंड शिळेवर अठ्ठेचाळीस खांबांच्या आधाराने त्याचे गोल छत उभे केले आहे. छताखाली नऊ ग्रहांच्या नऊ कलाकृती आहेत. प्रत्येक खांबामधील कोरीव काम बघत राहवे असेच आहे. एका साच्यातून काढल्याप्रमाणे त्या कोरीव कामामध्ये एकसंधता, सुबकता आहे. दगडाची चकाकी व मऊपणा; तसेच, त्या खांबांवर आपले प्रतिबिंब उठावे अशी पारदर्शकता पाहून मन थक्क होऊन जाते. स्वर्गमंडपाचे छत होम-हवनाच्या समिधांचे धूर जावा या दृष्टीने उघडे ठेवले आहे. त्या छतामुळे किंवा त्या छिद्रामुळे या गावाचे नाव छिद्रापूर … त्याचा अपभ्रंश खिद्रापूर!

– विजयकुमार हरिश्चंद्रे

Last Updated On – 15th Nov 2016

About Post Author

Previous articleमंगळवेढ्यातील १४० वर्षांचे नगर वाचन मंदिर
Next articleगाविलगड – वैभवशाली बांधकामाचा बलदंड किल्‍ला
विजयकुमार हरिश्चंद्रे हे फोटोग्राफी करतात. त्‍यांना निसर्ग भटकंतीची आवड आहे. ते मंदिर संस्‍कृतीचे अभ्‍यासक आहेत. ते गेल्‍या एकवीस वर्षांपासून खंडोबा विषयावर संशोधन करत आहेत. त्‍यांनी मराठी चित्रपटांसाठी स्टील फोटोग्राफी केली आहे. हरिश्‍चंद्रे सह्याद्री खो-यात निसर्ग पर्यावरण रक्षणासाठी गेली नऊ वर्ष प्रयत्न करत आहेत. ते निसर्ग पूजेचा पुरस्‍कार करतात. ते अभिनय, पत्रकारिता आणि निवेदन अशा इतर क्षेत्रांतही मुशाफिरी करत असतात. त्‍यांना नाशिक येथील 'कलाभ्रमंती' संस्थेने 'चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने सन्मानित केले आहे. तसेच निवेदानाकरता त्‍यांना 'शब्दमित्र पुरस्कारा'ने गौरवण्‍यात आले आहे. त्‍यासोबत त्‍यांना 'शिघ्र कवी शाहीर सगनभाऊ पुरस्कार', सामाजिक सांस्कृतिक व शोध पत्रकारितेसाठी 'सेवा रत्न' अशा इतर पुस्कारांनी त्‍यांचा सन्‍मान करण्‍यात आला आहे. लेखकाचा दूरध्वनी 9822093048

2 COMMENTS

  1. अतिशय उपयुक्त माहिती.
    अतिशय उपयुक्त माहिती.

Comments are closed.