क्रांतिस्थळ, शहीद आष्टी (Shahid Ashti)

‘आष्टी’ नावाची महाराष्ट्र राज्यात तीन-चार गावे आहेत. आमचे ‘आष्टी’ हे विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आहे. आमच्या आष्टी गावाला खास बिरुद लावले जाते ते म्हणजे ‘शहीद आष्टी’! शहीद आष्टी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे गाव आहे. 9 ऑगस्ट 1942 ला नागपंचमी होती. गांधीजींच्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देऊन आष्टीचे काही तरुण व मध्यमवयीन स्वातंत्र्य सैनिक पोलिस ठाण्याजवळ सत्याग्रहाला बसले होते.  सत्याग्रहींमध्ये हिंदू-मुस्लिम एकत्र होते. शांततेत सत्याग्रह सुरू असताना पोलिस अधिकाऱ्याने सत्याग्रहींवर बंदूक चालवण्याचे फर्मान सोडले. त्यात पाच सत्याग्रही मृत्युमुखी पडले. ती बातमी कळल्यावर गावातील लोक घरातील हातात मिळतील त्या वस्तू घेऊन पोलिस ठाण्यावर चालून गेले. त्यांनी इंग्रजांचे पोलिस ठाणे आणि त्यावरील ‘युनियन जॅक’ जाळला. त्या दिवसभर पोलिस ठाण्यावर युनियन जॅक नव्हे तर भारताचे प्रतिनिधीत्व करणारा झेंडा फडकत होता! त्या दिवसापुरते आष्टी हे गाव स्वतंत्र झाले होते!

आष्टीच्या क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या काही हवालदारांना दगडांनी ठेचून मारले. ते हातात लाठ्या, दगड घेऊन इंग्रजांवर तुटून पडले. त्या क्रांतिकारकांत गावातील नऊवारी लुगडे नेसलेल्या बायका होत्या. एक छोटी लढाई आष्टीवासीयांनी जिंकली होती ! पण… नंतर सुरू झाली भयंकर धरपकड. पोलिस घराघरांत घुसून  झडती घेऊ लागले; घरातील तरुणांपासून ते पौगंडावस्थेतील मुलांनादेखील उचलून अटक करू लागले. क्रांतिकारक जागोजागी लपले. माझे आजोबाही गव्हाच्या कुटारात लपले होते. त्या दिवशी गावात कोणीही जेवले नाही. देवाला नागपंचमीचा नैवेद्य दाखवला गेला नाही. भांड्यातील पुरणाची पोळी झालीच नाही. श्रावणातील धारा बरसत होत्या. कपिलेश्वराचा शंकर ध्यानमग्न होता, पण गावात क्रांतिकारकरूपी शंकर तांडव करत होता. श्रावणसरींसोबत रक्ताच्या धाराही जमिनीला भिजवत होत्या. इतकी प्रचंड रक्तक्रांती! ऑगस्ट महिन्यातील त्या ऐन पावसाळ्यात क्रांतीची मोठी ठिणगी पडून तिची ज्वाला झाली होती. आष्टी गावाचे नाव लंडनला राजमहालापर्यंत पोचले होते.

ती क्रांतिकारी घटना घडण्याच्या काही दिवसच आधी, आष्टीजवळील एका गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या भजनात गायले होते, ‘झाड झडूले शस्त्र बनेंगे, पत्थर सारे बम बनेंगे…’ त्यांच्या भजनाचा प्रत्यय काही दिवसांतच आला. महात्मा गांधीही त्या क्रांतीनंतर काही दिवसांनी आष्टीला आले होते. त्यांनी गावात भाषण केले होते. पुढे, पाच वर्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळाले.

आष्टी गावाचा स्वातंत्र्यसंग्राम लक्षात ठेवला गेला आणि आष्टी गावाला ‘शहीद आष्टी’ संबोधले जाऊ लागले. पण पुढे कोणीही आष्टी गावाची हवी तशी दखल घेतली नाही.

क्रांतिकारकांनी जाळलेल्या पोलीस ठाण्याच्या जागी ‘हुतात्मा राष्ट्रीय महाविद्यालय’ नावाचे पदवीपर्यंतचे शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. दरवर्षी 9 ऑगस्टला क्रांतिदिनानिमित्त तेथे कार्यक्रम होतो. शहीद झालेल्या क्रांतिकारकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहीद स्मारक उभारले गेले आहे. नदीचा पूल ओलांडून गावाची हद्द सुरू होताच आष्टीचे शहीद स्मारक दृष्टीस पडते. स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी गावातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी शहीद स्मारकापर्यंत येऊन थांबते. बँड पथकासह राष्ट्रगीत गाऊन विद्यार्थी शहीद स्मारकास वंदन करून सलामी देतात.

नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव येथून महामार्गापासून आत दहा किलोमीटरचा रस्ता आष्टीकडे जातो. चहुबाजूंनी टेकड्यांनी वेढलेले, समुद्रसपाटीपासून तीनशे मीटर उंचीवर असलेले, तालुका आणि तहसील असलेले आष्टी गाव वीस मिनिटांत येते. गावातील कोणत्याही घरातून उंचावरून बघितले, की गावाला सगळीकडून वेढलेल्या टेकड्या दिसतात. त्यांतील एक टेकडी विशेष आहे. गावात हिंदू, मुसलमान, शीख आणि जैन धर्मीय लोक राहतात. तसेच, मराठी, हिंदी, गुजराती, मारवाडी, सिंधी, उर्दू भाषा बोलल्या जातात. गावाची लोकसंख्या अकरा हजार आहे. सर्वेक्षणानुसार साक्षरतेचे प्रमाण ब्याऐंशी टक्के आहे.  गावात दोन ग्रामदैवते आहेत, तीही हिंदू आणि मुस्लिम यांची! तशी दोन स्थाने असलेले आष्टी हे गाव विशेष आहे. गावाच्या उत्तरेकडील हद्दीपाशी ती दोन विलक्षण देवस्थाने आहेत – एक आहे, निसर्गाच्या सान्निध्यातील शंकराचे ‘कपिलेश्वर मंदिर’ तर दुसरे आहे, कपिलेश्वरच्या कुरणाला, तलावाला लागूनच असलेल्या टेकडीवरील ‘पीरदर्गा’. आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आष्टी गावात स्पष्टपणे दिसते ती म्हणजे धार्मिक सलोखा. मोहरमच्या काळात मुस्लिम घरांत, मशिदीत ‘सवाऱ्या’ आणि ‘ताबूत’ तयार होतो, पण मुस्लिमांशी जुना सलोखा असलेल्या काही मराठी ब्राह्मण घरांतसुद्धा मोहरमच्या आधी सवारी, ताबूत स्थापन होतो. मुसलमान लोक येऊन तेथे त्यांची उपासना करतात. जसे गौरी-गणपतीला लोक दुरदुरून त्यांच्या घरी येतात, तसे काही मूळचे आष्टीबाहेर स्थायिक झालेले हिंदू लोक आष्टीला मोहरमसाठी येतात. मोहरमला गावातून मुस्लिम लोकांच्या सवारीसहित हिंदूंच्याही सवाऱ्या फिरतात. हिंदू लोकसुद्धा त्यांना नमस्कार करण्यास  जातात, नैवेद्य अर्पण करतात. हिंदू-मुसलमान दंगे देशात कित्येकदा झाले, पण आष्टी गावात वातावरण कधीही दूषित झालेले नाही.

आष्टीच्या उत्तरेकडील हद्दीपाशी टेकडीजवळ मोठा तलाव आहे. त्याची भिंत उंच आहे. तेथून नयनरम्य दृश्य दिसते. दुरून जंगलातून येणाऱ्या नदीचा प्रवाह, त्यापासून तयार झालेला तलाव, आजूबाजूला टेकड्या, विविध झाडांपासून तयार झालेले दाट जंगल, त्या भिंतीवरून दृष्टीस पडते.

खाली कुरणासारख्या मैदानात नयनरम्य परिसरातील, विविध वृक्षांच्या सान्निध्यातील ग्रामदैवत असलेले शंकराचे पुरातन मंदिर. तेथे कपिऋषी नामक साधुपुरुषाने साधना केली असे म्हणतात. महाराष्ट्रात कधी समुद्रातून सूर्य उगवताना दिसत नाही. पण आष्टी गावात या टेकडीपाशी पूर्वेकडे नैसर्गिक जलसाठा असताना त्या तलावातून सूर्योदय होताना दृश्य अप्रतिम असते. जणू जलतत्त्वातून पूर्व क्षितिजावरून अग्नीचा केशरी लोहगोल उगवत आहे. तो अनुभव आष्टीच्या तलावाच्या भिंतीवरून घेता येतो. खाली तलाव आणि त्याच्या शेवटच्या बिंदूवर टेकड्यांच्या आडून उगवणारे सूर्यबिंब. जणू जलामधून सूर्य न्हाऊन वर येतो. तेथील आसमंत कायम प्रसन्न असतो. भाग निसर्गरम्य असल्याने प्रातःकाळी विविध पक्ष्यांच्या आवाजाने, शंकराच्या मंदिरातील आरती व घंटानाद यांनी तो भाग अधिकच प्रसन्नता प्रदान करतो. गावातून दररोज येऊन कपिलेश्वराचे दर्शन घेणारे काही लोक आहेत. श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्र या दिवशी तेथे भक्तांची गर्दी असते. कपिलेश्वर स्थानाला लागूनच एका टेकडीवर पीर दर्गा आहे. ती जागा जागृत आहे असे लोक सांगतात.

आष्टी गावी ऑगस्ट क्रांती झाल्यावर, पोलिस स्थानक जाळल्यावर, इंग्रजांच्या हवालदारांना मारल्यावर चिडलेल्या इंग्रज अधिकाऱ्याने गाव नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधला. त्यासाठी बाहेरून खास तोफ मागवली गेली. ती तोफ पीर दर्गा टेकडीवर आणण्यात आली. उंचावरून तोफेद्वारे संपूर्ण गाव उद्ध्वस्त करण्याचा दिवस ठरला. दुसऱ्या दिवशी गावावर तोफ चालणार होती. गावकरी चिंतेत होते. काही तर गाव सोडण्याच्या विचारात होते. दिवस उजाडला तसा चमत्कार घडला; त्या अधिकाऱ्याने गाव नष्ट करण्याचा, तोफ चालवण्याचा निर्णय रद्द तर केलाच; शिवाय, तो सकाळी पीर टेकडी चढून दर्ग्यावर गेला आणि त्याने चादर चढवून माफी मागितली म्हणे! त्याला पीर बाबांचे दर्शन आदल्या रात्री स्वप्नात झाले आणि ते म्हणाले, की ‘या माझ्या आष्टीवर जर तू तोफ चालवलीस तर माझ्या दर्ग्यावर दिवा कोण लावणार, धूप कोण दाखवणार?’

पीर दर्ग्यावर उरूस अनेक वर्षांपासून भरतो. देशातील मोठमोठे कलावंत तेथे येऊन संगीत सेवा देतात. कव्वालीचे कार्यक्रम रात्रभर होतात. इंटरनेट, सोशल मीडियाच्या काळात यात्रा, मीना बाजार भरणे कमी झाले आहे. शिवाय, लोकांना यात्रेचे अप्रूप कमी वाटते. पण दरवर्षी मोहरम, ईदच्या काळात तेथे यात्रा भरते. गावात उत्सवाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. पीर दर्गा टेकडी दिव्यांनी सजवली जाते. लेझर लाईट शो होतात. टेकडीच्या खाली छोट्या-मोठ्या दुकानांची, खेळांची, खाण्यापिण्याची रेलचेल असते. गावात रोजगार येऊन गावातील पैसा गावातच राहतो.

गावात अजून एक विशेष गोष्ट आहे, की दक्षिणेकडून गावात येताना गावामधून जाणाऱ्या रस्त्यावर गाव संपेपर्यंत सर्व देवालये आहेत. सुरुवातीला लागते शहीद स्मारक. पुढे पुरातन मारुती मंदिर, पांडुरंग मंदिर, त्यानंतर साईबाबा मंदिर. साईबाबा मंदिरही पंचक्रोशीत प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. त्याचीही विशेष कहाणी आहे. पूर्वी ती जागा पडकी होती. तेथे कोणा अज्ञात योग्याची समाधी होती. लोकांना तेथे जाण्याची भीती वाटे. पुढे एका स्त्रीला स्वप्नसंकेत झाला. त्या कुटुंबाने तेथे साईबाबा मंदिर बांधले. संपूर्ण गावाने त्यांना सहकार्य केले. तेथे रोज शास्त्रोक्त पूजा होऊन दरवर्षी साई प्रकट- दिनानिमित्त मोठा उत्सव होतो.

मथुरेला कृष्ण जन्मभूमीवर कृष्ण मंदिर आणि मशीद एकमेकांना चिकटून आहेत. तीच परिस्थिती वाराणशीला काशी विश्वनाथ आणि मशीद यांच्याबाबत. अयोध्येतील परिस्थिती सगळ्यांना माहीत आहे. त्या सर्व जागा वादग्रस्त आहेत. आष्टीमध्येही तशीच एक विशेष जागा आहे. गावात जे श्रीराम मंदिर आहे त्याला लागून मशीद आहे. पण त्याबाबत कोठलाही वाद नाही. संध्याकाळी अजान आटोपली, की आरती सुरू होते. मग पुन्हा पावणेआठला अजान. कोठल्याही वादाशिवाय एकाच भिंतीला लागून राममंदिर आणि मशीद शेजारी असणे हे आष्टी गावाचे वैशिष्ट्य आहे. इंग्रजांच्या काळापासून असलेल्या काही पुरातन दगडी वास्तू व वाडे पाहण्यास मिळतात. तेथे स्वातंत्र्यपूर्व भारतात शिकार केलेल्या प्राण्यांची शिंगे, मुखवटे दिसतात.

गावाला राजकारणाची सशक्त बाजू आहे. काही पिढ्या परंपरेने काँग्रेस विचारधारेमधील आहेत. त्याशिवाय गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा कार्यरत असल्याने गावात संघाच्या विचारधारेचेही लोक राहतात.

आष्टी गावातून मध्यप्रदेशकडे महामार्ग जातो. त्यामुळे तेथून ट्रक्सची वाहतूक सुरू असते. आष्टीपासून दोन तासांवर असलेले मध्यप्रदेशातील प्रसिद्ध ‘सालबर्डी’ हे सातपुडा पर्वतमालेतील शंकराचे, नद्यांचा संगम असलेले अद्भुत ठिकाण आष्टीजवळील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

आष्टी येथे महाराष्ट्र सरकारच्या सिंचन प्रकल्पामध्ये 1963 मध्ये धरण बांधले गेले. त्या धरणाचे अधिकृत नाव ASHTI DAM D- 0333 आहे. ते धरण तेव्हाच्या एका नाल्यावर बांधले गेले. त्या नाल्याला नदीचे स्वरूप आले आहे. ते धरण मातीचे असून लांबी पाचशेएकोणनव्वद मीटर. खालील जमिनीपासून धरणाच्या भिंतीची उंची अठरा मीटर आहे. त्याची 1.71 एमसीएम इतकी पाणी साठवण्याची साधारण क्षमता आहे. ‘अपर वर्धा’ नावाचा धरण प्रकल्प आष्टीजवळ आहे. ते चौदा दरवाज्यांचे प्रचंड मोठे धरण आहे. ते मानवी कर्तृत्वाचे प्रतीक आहे. त्या प्रकल्पाद्वारे अमरावती जिल्ह्याला पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते.

आष्टी गावाबाहेरील भागात सगळ्यांच्या शेतजमिनी असून त्यात खरीप आणि रब्बी पिके घेतली जातात. सोयाबीन, गहू, तूर आणि कापूस ही तेथील प्रमुख पिके आहेत. संत्री, बोरे, पेरू यांच्याही बागा आहेत.

गावात पदवीपर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे. आष्टी हे पंचक्रोशीत खेड्यांतील विद्यार्थ्यांचे ‘एज्युकेशन हब’ आहे. बहुसंख्य विद्यार्थी आष्टीला शिकण्यास येतात. गावातील शाळा, कॉलेज, सार्वजनिक गणपती, दुर्गा देवी संघटना, शेती बी-बियाणे केंद्रे संपूर्ण गावाला एकसंध ठेवतात. शिवाय, आष्टी गावातील शिक्षणामुळे पंचक्रोशीतील खेडी-गावेही एकसंध राहतात. अशा प्रकारचे  महाराष्ट्रात फार क्वचित कोणाला माहीत असलेले, ज्वलंत ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले, धार्मिक-जातीय सलोखा-सौहार्दाचे प्रतीक, सुखसंपन्न असे हे आष्टी गाव आहे.

– अभिजित दिलीप पानसे, abhijeetpanse.1@gmail.com

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.