कोरोना – चीनचे कारस्थान?(Corona – China’s Conspiracy)

1
22

कोरोना चीनमध्ये उद्भवला, जगभर पसरला, आता स्थिरावला. म्हणजे त्यामुळे देशोदेशांची जी अवस्था झालेली आहे, ती अटळ आहे; त्या देशांचा विचार व कारवाई ती अवस्था कशी सांभाळायची, अधिक बिघडू द्यायची नाही हे सर्व देशांनी स्वीकारले आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनताही स्थिरावत आहे. कोरोनावर औषध निघेल तेव्हाच जगाची या आजारातून सुटका होणार आहे. त्यामुळे जगाची सारी भिस्त वैज्ञानिकांवर आहे.

          दरम्यान, हे संकट उद्भवले त्यामागे कोणाचा हात आहे? निसर्ग-पर्यावरणाची गेल्या काही दशकांत झालेली हानी हे त्याचे सोपे उत्तर झाले. त्यासाठी विकासवाद्यांना दोषी ठरवता येते, परंतु त्यामुळे प्रश्न सुटत नाही.  
          कोरोना व्हायरस हे चीनचे कारस्थान आहे, चीनने तो जाणीवपूर्वक जगभर पसरवला, त्या रोगामुळे युरोप-अमेरिकेत जसा हाहाकार माजला तसा तो रोग चीनमध्ये पसरला नाही, तेवढी जीवितहानी तेथे झाली नाही – त्याबाबतही कमी-जास्त-अफाट आकडे प्रसृत होत राहिले. त्यामुळे कोरोना हे चीनचे कारस्थान असावे का? या दृष्टीने जगात सर्वत्र चर्चा सुरू झाली. मुंबई-महाराष्ट्रातही तळच्या वर्गापासून उच्चभ्रू लोकांपर्यंत सर्वत्र तोच विषय बोलण्याचा व कुजबुजीचा बनला. त्याची कडी गेल्या आठवड्यात झाली. ‘द ओरिजिन ऑफ व्हायरस’ नावाची ‘डॉक्युमेंटरी कम मूव्ही’ गेल्या आठवड्यात सर्वत्र प्रसृत झाली, ऑस्ट्रेलियातील एका वर्तमानपत्राने चीनवर आरोपपत्र जगजाहीर ठेवले – त्यास चीनच्या परराष्ट्र खात्याने उत्तरे दिली, त्यांचाही समाचार वर्तमानपत्राने घेतला, अमेरिका-ऑस्ट्रेलिया व भारत येथील व्यक्ती अथवा संस्था यांनी चीनवर कोरोनासाठी अब्जावधी रुपयांच्या नुकसानभरपाईच्या फिर्यादी गुदरल्या आहेत. हे सारे गेल्या आठ-दहा दिवसांत जगासमोर आले, सर्वत्र पसरले गेले. चीन देश मात्र जगभरच्या विचारी जगात अशी खळबळ माजली असताना शांत होता! शांत आहे आणि देशोदेशीची सरकारे कोरोनावर मात करण्याच्या लढाईत गुंतली आहेत. 
          अमित वाईकर हा मराठीपुरता चीनमधील माहितीदूत आहे. त्याच्यापुढे ही सर्व हकिगत ठेवली. तेव्हा तो म्हणाला, की ते चीनबद्दलचे गैरसमज! आत्ताच बघा चीनच्या सर्व शहरांत कोरोनाची लागण झाली, कोरोनाचे मृत्यू झाले ते आकडे येथील मिडीयात प्रसिद्ध झाले परंतु जगात मात्र वुहानबद्दलच बोलले गेले. अशा अंशतः माहितीमुळे गैरसमज तयार होतात आणि वाढतात. मी चीनचा वकील नव्हे, परंतु मला गेल्या दहा वर्षांत चीन बऱ्यापैकी जवळून पाहण्यास मिळाला आहे. मी चीनमध्ये सर्वत्र फिरत असतो. तेथे लपवाछपवी आहे असे जाणवत नाही. मी पुनःपुन्हा हेच सांगेन, की तेथील लोकांचा सरकारवर देवाइतका विश्वास आहे. तो गेल्या साठ-सत्तर वर्षांत तसा घडवून घेण्यात आला आहे. चिनी लोकांना जनता म्हणून जगाचे काहीही पडलेले नाही. जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ते युरोप-अमेरिकेतील मृत्यूचे तांडव पाहून-वाचून हळहळतात. तरुणवर्ग त्यांच्या जीवनात मग्न असतो. रोगाची चीनमध्ये सुरुवात झाली, तेव्हा जगाने त्याची फिकीर केली नाही, मग चीनने जगाची का चिंता करावी? असा त्यांचा सवाल असतो. शेजाऱ्याचे घर जळते तेव्हा …तसा तो प्रकार आहे.
          अमित यास चीनचे हे कारस्थान आहे असे प्रसृत होण्याचे आणखी एक कारण वाटते. तो म्हणतो, की हिटलरचा प्रोपागंडा जसा प्रसिद्ध आहे, तशी माओची ‘वॉर ऑफ टंग’ थिअरी चीनमध्ये ग्राह्य मानली जाते. म्हणजे देशावर कोणी एक शाब्दिक आघात केला तर देशाने त्यावर त्या प्रकारचे चार संभाव्य आघात पसरून द्यायचे आणि विरोधकाच्या/शत्रूच्या मनात गोंधळ निर्माण करायचा – येथेही चीनने तसेच तंत्र वापरले आहे, स्वतः काही न बोलता वेगवेगळे प्रवाद पसरवून दिले आहेत. खुद्द चीनमध्ये असा प्रवाद आहे, की अमेरिकन सैन्यदलाच्या तुकडीने ते चीनमध्ये नोव्हेंबरात आले असताना या रोगाचे बीज पसरवून दिले! चीनमध्ये त्या वेळी ‘वॉर गेम्स’ झाले व त्यांत पाच देशांच्या सैन्यदलांनी भाग घेतला होता.
          सार्स, मॅड काऊ या रोगांच्या साथी गेल्या पंधरा-वीस वर्षांत आल्या व गेल्या. त्या वेळीही असे आरोप-प्रत्यारोप झाले. कोरोनामध्ये संसर्ग फार भेदक व व्यापकही आहे. त्यामुळे या वेळेची टीका अधिक बोचरी व लागट असणार. महत्त्वाचे आहे, की कोरोनानंतरचे जग कसे असणार आहे? अमितच्या मते, जग एकत्र येणार की दूर जाणार हा खरा प्रश्न आहे. जगातील देश एकेकटे झाले, ‘ग्लोबल’ वातावरण दशक-दोन दशकांसाठी संपले तरी चीनचे नुकसान नाही, जगाचे विशेषत: गरीब देशांचे मात्र फार नुकसान होऊ शकते. चीन जसा ग्लोबलायझेशनच्या आधी कोशात होता तसा तो एका सेकंदात जाऊ शकतो. तेथील सर्व बंधने पुन्हा येऊ शकतात; खरे तर, ती जनतेने स्वेच्छेनेच सध्याही स्वतःवर लादून घेतली आहेत. चिनी लोक काही प्रमाणात एक दिशेने चालणारे आहेत. ते बहुअंगी विचार करू शकत नाहीत. त्यांना अस्मिता/अहंकार मात्र फार आहेत. ते दुखावले गेले तर ते उसळून उठतात, पण तसे त्यांच्या चेहऱ्यावर दिसणार मात्र नाही. ते शब्दांचा प्रहार सरळ करत नाहीत, शालजोडीतील शब्दांमधून मारतात. चिनी जनता कम्युनिस्ट राजवटीपासून श्रेणीबद्ध आहे, हुकुमाची ताबेदार आहे. तेथील राजकीय नेते जो निर्णय करतात तो जनता निमूट मान्य करते.
          अमित यांच्या मते, जग विभक्त झाले तर ते आणखी छोटे होईल, पंधरा वीस वर्षे मागे जाईल. ‘युनो’, ‘हू’ या संघटनांना सध्याच फार प्रभावी स्थान नाही. विभक्त परिस्थितीत त्यांचे अस्तित्वच संपून जाईल. चीनला जर असे विभक्त, छोटे जग हवे असते तर त्यांनी केव्हाच हात वर केले असते.
          जगात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्यामागील सत्य कधीच बाहेर येत नाही. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की भारताने कोरोना संकटाचे इष्टापत्तीत रूपांतर करून घेतले पाहिजे. जगभर जर चीनबद्दल संशय निर्माण झाला आहे तर भारत हे जगाचे आकर्षणकेंद्र बनू शकते. मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कारकिर्दीत पहिल्या दोन वर्षांत जगभर दौरे करून खूप मोठी सदिच्छा निर्माण केली होती. मंगोलियापासून चीन-अमेरिकेपर्यंत त्यांच्याविषयी सद्भाव तयार झाला होता. परंतु नंतर ते देशांतर्गत घडामोडींत अधिक गुंतून गेले. त्यांनी देशांतर्गत हुरुप कायम ठेवलाच पाहिजे, त्यासाठी विकासात्मक योग्य धोरणे आखली पाहिजेत; त्याचबरोबर परदेशांना भारताकडे खेचून घेतले पाहिजे. हीच ती वेळ आहे. भारताकडे जी आध्यात्मिक, भावनात्मक शक्ती आहे ती चीनसहित अन्य कोणत्याही देशाकडे नाही. तो ही भारताच्या बाजूने अधिकचा मुद्दा आहे.
अमित वाईकर +8613918228393 wa_amit@hotmail.com
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
———————————————————————————————————————–
[youtube=https://www.youtube.com/watch?v=Gdd7dtDaYmM&w=320&h=266][youtube=https://www.youtube.com/watch?v=O1NGzmDVWxA&w=320&h=266]

—————————————————————————————————

 

About Post Author

Previous articleकोरोना – चीनची मात; भारतास संधी! (Corona- India’s Opportunity)
Next articleडबीर यांची गझलगाथा (Dabir – Marathi Gazal Writer)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

1 COMMENT

  1. सरकारवर देवा इतका विश्वास ठेवणारी जनता धन्य आहे.आपल्याकडे टाळेबंदी बाबतच्या सरकारच्या सुचनांचे तंतोतंत पालन केले तरी खूप ! अनुराधा म्हात्रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here