कोरीगड किल्ला

7
90
carasole

महाराष्ट्रातील किल्ले लक्षात घेतले तर काही ठरावीक गोष्टी, रचना प्रत्येक किल्ल्यांमध्ये आढळतात. सभोवताली किंवा दूरपर्यंत नजर ठेवता यावी यासाठी डोंगराच्या माथ्यावर किल्ल्याचे स्थान, चौफेर तटबंदी (बेलाग-उंच कडा असेल तर तटबंदी नाही), सहज न दिसणारं प्रवेशद्वार, तटबंदी किंवा दरवाजे ह्यांची एकामागोमाग उभारणी, किल्ल्यावर शे-पाचशे लोकांना वर्षभर पुरेल इतका पाण्याचा साठा (तलाव-विहीर किंवा पाण्याची टाकी), धान्याचा साठा करण्याची सोय, भक्कम-भव्य असे बुरुज, किल्ल्यावर देवतेचं मंदिर, मुख्य म्हणजे चोरवाटांचं अस्तित्व, दूर अंतरापर्यंत मारा करणा-या तोफा… इत्यादी. राज्यात स्वराज्यासाठी धडपड ही मुख्यतः सह्याद्री प्रांतात झाल्यानं अडीचशेपेक्षा जास्त किल्ले त्या भागात आढळतात.

नवख्या ट्रेकरला ट्रेकींगची सुरुवात कोरीगड किल्ल्याच्या भ्रमंतीनं करायला हरकत नाही. सहकुटुंब एक दिवसाची सहल म्हणूनसुद्धा कोरीगड हे उत्तम ठिकाण ठरू शकते.

तो लोणावळ्यापासून सुमारे बावीस किलोमीटरवर आहे. लोणवळा एस.टी.स्टँडला जात भांबुर्डे किंवा आंबवणे गावात जाणारी एस.टी. पकडायची. सहाराच्या प्रसिद्ध अॅम्बी-वॅली च्या पुढे किल्ला आहे.

‘सहारा’च्या कृपेनं इतकी वर्षं दगडानं भरलेला तो रस्ता अगदी गुळगुळीत झाला आहे. आजुबाजूला एवढी दाट झाडं की ऊन जमिनीला स्पर्श करणार नाही! मनसोक्त फोटो काढायचे आणि ठोकून द्यायचं की फोटो स्वित्झर्लडमधील आहेत! कोरीगडपर्यंतचा रस्ता एवढा चांगला आहे की अनेक जाहिरातपटांचे शुटिंग तिथंच झालं आहे.

निसर्गसौंदर्याचा आंनद घेत गिर्यारोहकानं पेठ शहापूर या गावात उतरायचं. (आंबवणे गाव एक किलोमीटर पुढे राहतं.)  तिथं रस्त्याच्या डावीकडे कोरीगड उभा आहे. कोरीगड उजवीकडे ठेवत मळलेली पायवाट तुडवायला सुरुवात की गिर्यारोहक पंधरा मिनिटांत किल्ल्याच्या खाली येऊन पोचतो. नजरेनं किल्ल्यावर जाणारी वाट हेरायची आणि चालायला सुरुवात करायची. किंवा पायवाट न सोडता चालत राहिलं, की तो किल्ला चढू लागतो. इथं एक गोम आहे. तो परिसर ‘सहारा’नं टेकओव्हर केला आहे. आपला मार्ग खरा तर ‘सहारा’च्या हद्दीतून जात असतो. कोणीतरी रखवालदार (खरं तर भैय्या) आपल्याला हटकू शकतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करून किल्ला चढत राहायचं.

दहा मिनिटांतच उजवीकडे काही गुहा आणि पाण्याच्या टाकी लागतात. गुहेत डोकावत, टाकीतील पाण्याच्या चवीचा (पाणी असल्यास) आस्वाद घेत, फोटो काढत वर चढायला सुरुवात करायची. रस्त्यापासून किल्ल्यावर किंवा किल्याच्या पायथ्यापासून किल्ल्यावर यायला अनुक्रमे तीस आणि पंधरा मिनिटं पुरतात. किल्ल्याचं सुस्थितीतील प्रवेशद्वार आणि तटबंदी बघितल्यावर किल्ल्यावर पोचण्याची उत्सुकता वाढू लागते.

किल्ले दर्शन

कोरीगड किल्ला तीन हजार फूट उंच आहे. किल्ल्याचा माथा म्हणजे एक विस्तृत पठार. ते शिवाजी पार्कपेक्षा जरा मोठं आहे. मात्र त्याला चौफेर तटबंदी आहे. तटबंदीकडे बघुन आश्चर्यचकित व्हायला होतं. तटबंदी आणि बुरुज बघत उजवीकडून चालत राहायचं. साधारण दहा मिनिटांत गिर्यारोहक किल्याच्या उजवीकडच्या कोपऱ्यात येऊन पोचतो. तिथून साधारण किल्ल्याचा घेर लक्षात येतो आणि किल्ल्यावरील ठिकाणंही स्पष्ट दिसतात. किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. त्या टोकाकडून थोडी लोकवस्ती असलेलं पेठ-शहापूर गाव दिसतं आणि लोणावळ्याहून वर आलेला रस्ताही दिसतो.

गडावर दोन तलाव आहेत. उन्हाळ्यात तलाव आटतात. तलावाच्या एका बाजूला घरांचे अवशेष आहेत. त्या तलावाच्या पार्श्वभूमीवर कोराई देवीचे मंदिर आहे. कोराई देवीची मूर्ती चार फूट उंचीची आहे. देवीने चार हातात त्रिशूळ, डमरू आणि गदा आदी शस्त्रे धारण केली आहेत. देवीच्या नावावरून किल्ल्याला कोराईगड असंही म्हणतात. किल्‍ल्‍याचं नाव कोरीगड असल्याची आणखी एक शक्यता आहे. लोणावळ्याच्या दक्षिणेस कोरबारसे मावळात एक वाट गेली आहे. त्‍या वाटेवरील आंबवणे गावच्या डोक्यावर कोरीगड हा किल्ला आहे. ‘सह्याद्री’कार स. आ. जोगळेकर म्हणतात, की ‘कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचे नाव. तेव्हा त्या कोरी लोकांचा गड तो कोरीगड आणि त्याचा मावळ तो कोरबारसे.’ किल्‍ल्‍याखाली असलेलं शहापूर गाव म्हणजे या गडाची एकेकाळी पेठ. त्यामुळेच त्याचा उल्‍लेख पेठ शहापूर असा होता आणि यामुळेच कोरीगडाला कुवारीगड, कोराईगडाच्या बरोबरीने शहागड असेही म्हणतात.

गडावर असलेलं कोराई देवीचं मंदिर पाच माणसांना आत बसता येईल एवढं छोटं आहे. मंदिरात जरा विश्रांती घ्यायची. मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे. मंदिराच्या मागे पाच – सहा तोफा बघायला मिळतात. त्यातील एक तोफ छानपैकी आधारावर उभी आहे. तिथूनच खाली अम्बी-वॅली मधील विविध बांधकामं दिसू लागतात. अम्बी-वॅलीतील छोटा तलाव, त्यावर असलेला प्रेक्षणीय पूल, विविध गार्डन, विविध रंगा-ढंगाची, आकाराची घरं (बंगले) दिसतात. त्यापलीकडे छोटा विमानतळही आहे. चार्टर प्लेन उतरवता येईल एवढा तो आहे. गंमत म्हणजे गडावरील तोफा त्या भागाकडे तोंड करुन उभ्या आहेत. गडावर सहा तोफा आहेत. त्यापैकी ११८ इंच लांबीची ‘लक्ष्मी’ ही सर्वात थोरली. तलावाच्या पुढे दोन गुहा आढळतात. विशेष म्हणजे शंख-गदा-चक्र धारण केलेली विष्णूची मूर्ती आढळते. सहसा गडावर शिवमंदिर, देवीचं मंदिर, फार तर गणेश मंदिर आढळतात. मात्र तेथील विष्णू मूर्तीचं अस्तित्व कुतूहल निर्माण करतं.

गडावरील एका प्राचीन खोदीव लेणीत गणेशाची स्थापना केली आहे. त्यामुळे या दरवाजाला गणेश दरवाजा असे नाव पडले. दरवाजाच्या कमानीलगत दोन्ही अंगांना फुलांची नक्षी कोरलेली. आतमध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या किंवा अलंगा. गणेश दरवाजा ओलांडून आत गेलं, की उत्तम तटबंदी आणि भरपूर सपाटी असलेला गड समोर येतो. याशिवाय गणेश आणि महादेवाचे देऊळही गडावर आहे. यातील महादेवाच्या मंदिरासमोर काही स्मारक शिल्पेही दिसतात. गडाची तटबंदी आजही बऱ्यापैकी शाबूत आहे. तिची लांबी दीड किलोमीटर एवढी असून त्‍यावरून गडाला फेरफटका मारता येतो. यातील पश्चिम तटावर काही ठिकाणी ओटे बांधलेले दिसतात. त्‍या तटातच अनेक ठिकाणी शौचकुपांची रचनाही केलेली आहे.

मंदिर आणि तोफा यांच्या पुढे मोठा बुरुज आहे. बुरुजाच्या बाजूने आंबवणे गावात जायला वाट आहे. साधारण अर्ध्या तासात आपल्याला गावात पोचता येते, मात्र त्या वाटेवर उतार जरा जास्त आहे. गडाच्या पायऱ्यांवर व काही ठिकाणी रात्री लायटिंग करण्याची सोय आहे, तिथूनंही अँम्बी-वॅलीचं सुंदर दर्शन होतं. पुढेही गडाची फेरी पूर्ण करत प्रवेश दरवाज्याच्या ठिकाणी येईपर्यंत सलग तटबंदी आहे. मधेच एखादी तोफही आढळते.

लोणावळ्यापासून निघुन गड बघेपर्यंत पाच तास सहज जातात. गडावर सावलीयोग्य एकही झाड नाही. त्यामुळे सूर्य सतत पाठराखण करत असतो. मात्र किल्ला उंचावर असल्यानं वातावरणात थंडावा असतो. तेव्हा भर मे महिन्यात तिथं गेलं तरी घाम येणार नाही.

कोरीगडवरुन आंबवणे गावाच्या पुढे रस्ता जातो तो तेलबैला आणि घनगड किल्ल्यांकडे. मध्ये डोंगररांग असल्यानं ते दिसत नाहीत. मात्र वातावरण स्वच्छ असेल तर माथेरान, प्रबळगड, कर्नाळा, माणिकगड तसंच ड्यूक्स नोज( नागफणी) आणि पवना धरणाजवळचे तुंग-तिकोना किल्ले दिसतात. कोरीगडावरून आजुबाजूचा कित्येक किलोमीटरचा प्रदेश सहज नजरेत भरतो.

कोरीगड किल्ला कधी बांधला ह्याची नोंद सापडत नाही. मात्र खोदीव लेण्‍यांकडे पाहता तो बराच प्राचीन असावा असा अंदाज बांधता येतो. तो कोळ्यांच्या ताब्यात असताना इसवी सन १४८६ मध्ये निजामशाहीने जिंकल्याची नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या चढाईत स्वराज्यात लोहगड, विसापूरसह कोरीगडही १६५७ मध्ये दाखल झाला. १७०० मध्ये पुन्हा मुघल राजवटीकडून पंत सचिवांनी हा गड स्वराज्यात आणला. त्यानंतर कोरीगडचा उल्लेख आढळतो तो थेट १८१८ या वर्षी. कोण्या कर्नल प्राथर या ब्रिटिश अधिकाऱ्यानं ११ मार्च १८१८ ला कोरीगडावर हल्ला केला. मात्र मराठ्यांच्या चिवट झुंजीमुळे त्याला यश येत नव्हते. तीन दिवसांच्‍या प्रखर लढ्यानंतर अखेर १४ मार्चला एक तोफेचा गोळा किल्ल्यावरील दारूसाठ्यावर पडत मोठा स्फोट झाला आणि किल्ला इंग्रजांच्या हाती पडला. तेव्हा मिळालेले कोराई देवीचे दागिने इंग्रजांनी मुंबईतील मुंबादेवीला दिल्याचा उल्लेख इतिहासात आहे. त्‍या वेळी त्‍या दागिन्‍यांची किंमत पन्‍नास पाऊंड होती असे म्‍हणतात.

अमित जोशी
९८३३२२४२८१
amitjoshi101@gmail.com
(सर्व फोटो अमित जोशी)

About Post Author

7 COMMENTS

 1. सौमित्र,

  सौमित्र,
  तुम्‍ही सुचवलेली दुरूस्‍ती लेखात करण्‍यात आली आहे. ‘थिंक महाराष्‍ट्र’ला तुमच्‍या प्रतिक्रिया यापुढेही मिळत राहोत.

 2. खुप छान माहिती..
  खुप छान माहिती..

 3. लोणावळ्याजवळच राजमाची गाव व
  लोणावळ्याजवळचे राजमाची गाव व किल्ला यावरही लेख यायला हवा. दोन जवळ जवळ किल्ले. चांगल्या परिस्थितीत आहेत. गावात वीज नाही पण रस्ते छान आहेत. राहण्याची सोय घराघरात होऊ शकते.

 4. थिंक महारष्ट्रला किती धनता
  ‘थिंक महाराष्‍ट्र’ला किती धन्यवाद द्यावे ते कमीच आहे. कोरीगडची माहिती अतिसुंदर वाटली. धन्यवाद.

 5. मी बरेच गडकोटावर गेलोय पण आज…
  मी बरेच गडकोटावर गेलोय पण आज पहील्यांदा कोरीगडावर गेलो.तेथे काम बघून मस्त वाटल.गडाची पुणरबांधणी पाहुन मन परत शिवकालीन युगात गेल खुप छान काम चालू आहे गडावर। ३/१२/२०२०

 6. पावसाळा सुरू असताना…
  पावसाळा सुरू असताना लोणावळ्यात जायचं आणि घाटात भिजत फिरायचं यापलीकडे त्या परिसरात बरंच काही आहे हे कळण्यासाठी आपल्यासारख्या फिरस्त्यांचे लेखन उपयुक्त आहे.

Comments are closed.