कोकण्यांचा सखा, भाऊचा धक्का

0
34

भाऊचा धक्का हा गिरगाव आणि गिरणगाव भागांतील कोकणी माणसांचा जिवाचा सखा, कारण भाऊचा धक्का त्यांना कुलाबा, रत्नागिरी आणि गोव्यातील त्यांच्या मूळगावी अलगद आणि अल्प खर्चात पोचवत असे. त्याकाळी हातावर पोट भरणारा कोकणी मुंबईकर जसा केविलवाणा तसाच भाऊचा धक्काही आज बापुडवाणा भासतो. कारण कोकणच्या बोटींची जागा एस.टी.च्या रातराण्या, खासगी बस आणि कोकण रेल्वे यांनी त्याच क्रमाने घेतली. कोकणच्या बोटींना गि-हाईक राहिले नाही. भाऊच्या धक्क्यावरून भरतीओहोटीचे वेळापत्रक सांभाळत रेवसकडे लाँच सुटत असतात. त्यांनाही गेटवे-मांडवा या दिवसभर चालू असणा-या लाँचसेवेची स्पर्धा आहे.

विसाव्या शतकाच्या मध्यकाळातील भाऊचा धक्का आणि त्याचा परिसर अजून डोळ्यांसमोर तरळला, की गरीब कोकणी माणसांच्या गोंधळाच्या प्रवासाच्या स्मृती जाग्या होतात. तेव्हा भाऊचा धक्का होता कर्नाटक बंदरच्या कडेला. चिंचोळा, प्रवाशांच्या सोयीसुविधांचा अभाव. मुंबईच्या पूर्व किना-याच्या टोकाला असल्यामुळे तेथे पोचण्यासाठी कोठलेही सार्वजनिक वाहन नसे.

रेवस आणि उरणहून रात्री नऊ वाजता शेवटच्या लाँचेस आल्या की सुस्त झालेला भाऊचा धक्का दुस-या दिवशी तांबडे फुटण्याच्या आधीच खडबडून जागा होई, तो प्रवाशांच्या झुंडी धडकल्यामुळे. मध्यमवर्गीय कोकणवासीयांच्या गच्च भरलेल्या व्हिक्टोरिया (मुंबईतील टांगा) टपटपत भाऊच्या धक्क्यावर अवतरत असत. निम्न वर्गातील कोकणी प्रवासी, कुटुंबाच्या लटांबरासह डोक्यावर बोजी घेऊन डॉकयार्ड रोड स्टेशनपासून भाऊच्या धक्क्यावर पोचत असत. त्यांना गावी जाण्याच्या आनंदात व्हिक्टोरियाच्या घोड्यांच्या मलमुत्राचाही मागमूस नसे. मध्येच एखादी खाजगी मोटार झकपक कपड्यांतील प्रवाशांना धक्क्यावर सोडत असे. तेव्हा बापुडवाणा प्रवासी ओळखत असे, की ‘हे गोयकरच असा!’

‘निर्गमन (departure)’ या फलकाभोवती प्रवाशांची झुंबड उडे. तेथे मालवणी-कोकणींत संवाद झडत, ते मोठे गंमतीदार असत. ‘विष्ण्या लेका, टाळी दे. वेंगुर्ला लाईनला 'रोहिदास'  लागल्ये.’ ‘मग काय तुमची यात्रा आता मस्त. काय चालत्ये रे 'रोहिदास'? दिवस मावळण्याच्या आत तुम्ही वेंगुर्ल्यास.’ विष्ण्याचा प्रतिसाद. ‘पण आमच्या रत्नागिरीस कोठली लागल्ये बघ की बाप्या.’ ‘रत्नागिरी लाईनला अं अं 'लीलावती’' बापू.  ‘च्यामरी ते डबडं आमच्या वाट्याला! नशीबच फुटको रे आमचो. चला आता संध्याकाळबेरी नुसता पाळणा.’ विष्ण्याचा खेद. "‘रामदास' कोठे रे असा?" "‘रामदास' गोवा लाईन." ‘इचिभन, त्या गोयकरांचे लाड बी.एस.एन. करत्ये ते समजेना’ ‘… आणि अॅन्थुनी?’ ‘… दाभोळ – वा मज्जा’ नवख्या प्रवाशाला तो संवाद अनभिज्ञ वाटे. मात्र त्यातून रोहिदास, रामदास, लीलावती, अॅन्थनी ही बोटींची नावे आहेत इतपत ज्ञान त्याला होई.

पूर्व किना-यावर तांबडे फुटले, की आदल्या दिवशी गेलेल्या बोटी परतीचा प्रवास करून भाऊच्या धक्क्याकडे येऊ लागलेल्या असत. धक्क्यावर गर्दी केलेल्या लाल डगलेवाल्या हमालांची जाड दोरखंड घेऊन पुढे सरकण्यासाठी घाई उडालेली असे. बोट आडवी होऊन धक्क्याला समांतर आली, की ते जाडजूड दोरखंड बोटीच्या डेकवर फेकले जात असे. तोंडात चिरूट धरलेला शुभ्र सुटातील गोवेकर कॅप्टन ‘आरी मार आरी मार’ अशी अनाकलनीय ऑर्डर देऊन बोट धक्क्याला चिकटवत असे. दोरखंडाचे टोक दगडी कॅप्स्टनला अडकावले, की ते डेकवर फेकले जात असे. बोटीवरील खलाशी दोरखंड खेचून बोट धक्क्याच्या अंगलट आणतो तोवर गँगवेची शिडी लावण्याची धडपड. ती जागेवर बसण्याअगोदर हमाल हनुमान उडी मारून आलेल्या प्रवाशांचा ताबा घेत. कोकणी प्रवासी गबाळ्या चेह-याने, समुद्र प्रवासात उलट्या करून वैतागलेल्या अवस्थेत, लाल मातीने रापलेल्या कपड्यांत मुंबईभूमीवर पाऊल टाकण्यास धडपडत असे. सोबत ढीगभर वळकट्या, आंबे, फणसांची पोती, घरच्या केरसुण्या हे लटांबर उचलून उतरताना तो आणखी केविलवाणा दिसे. तरीही गावची ताजी हवा खाऊन सुस्तावलेला कोकण्या अर्थार्जनासाठी मुंबईत पुन्हा विरून जात असे.

विमानतळ काय, कुठल्याही टर्मिनसवर न दिसणारे भाऊच्या धक्क्यावरील ते अनोखे दृश्य. भाऊच्या धक्क्यावरून चार रुट्सवर बोटी सुटत असत. रेवस लाईनची बोट सकाळी 6:30 वाजता, दाभोळ लाईन सकाळी 8:00 वाजता, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लाईन 10:00 आणि गोवा लाईनची बोट 11:00 . साबरमती नावाची मोठी बोट आठवड्यातून एकच दिवस कराचीकडे जात असे.

बॉम्बे सेंट्रल, व्ही.टी. या रेल्वे टर्मिनल्सच्या आंग्ल नावांत भाऊचा धक्का हे मराठमोळे नाव मराठी माणसाला मोहरून टाकत असे. तरीही धक्क्याला नाव मिळालेला हा भाऊ कोण? … ब्रिटिश राजवटीत कुलाब्याच्या गनफॅक्टरीत लक्ष्मण (भाऊ) अजिंक्य हा कारकून होता. कॅप्टन रसेल हा त्याचा बॉस. त्याच्या विभागात एकदा एका मराठी कामगाराने चोरी केली. त्याला लष्करी कायद्यानुसार फटक्यांची शिक्षा सुनावली गेली. सर्वांसमक्ष फटके मिळाले तर त्या गरीब कामगाराची बदनामी होईल, त्यामुळे अजिंक्यने रसेलकडे त्याच्या वतीने क्षमायाचना केली. स्वत: ब्रिटिश देशाभिमानी असलेल्या कॅप्टन रसेलला हिंदुस्थानी स्वदेशाभिमानी लक्ष्मण अजिंक्यचा अभिमान वाटला. त्याने शिक्षा रद्द करून लक्ष्मणला आदराने मिठी मारली आणि त्याला ‘यु आर माय ब्रदर’ असे म्हणून गौरवोद्गार काढले. तेव्हापासून लक्ष्मणला ‘भाऊ’ हे नाव चिकटले.

कॅप्टन रसेलने ‘भाऊ’मधील हुशारी पाहून त्याला व्यापारी क्षेत्रात उतरण्यास उत्तेजन दिले. मुंबईत असलेली डबकी आणि सांडपाणी तलाव मुंबईच्या कच-याने बुजवण्याचे काम त्याकाळी सुरू होते. भाऊला त्या कामाचे कंत्राट मिळाले. बॉससंबंधीची कृतज्ञता म्हणून त्याने त्याच्या कंपनीचे नाव ‘भाऊ रसेल आणि कंपनी’ असे ठेवले. कंपनी मुंबईच्या पूर्व किना-यावर भरणी घालून कर्नाक बंदर आणि क्लेअर बंदर उभारणीचे कामही ती करत होती. भाऊला मातीतून संपत्ती लाभली ती ही अशी. तोपर्यंत कोकणातून मुंबईला येणारी प्रवासी जहाजे समुद्रात लांब नांगर टाकत व प्रवाशांना बोजे-लटांबरे सांभाळत पडावाने, चिखला-माखलात पाय तुडवत किना-यावर उतरावे लागे. ते हाल पाहून भाऊ गलबलून जात असे. ज्या कर्नाक बंदरचे काम ते करत, तेथेच कोकण लाईनच्या बोटींसाठी धक्का बांधणे अशक्य नाही असे त्याच्या लक्षात आले. त्याने ‘ब्रिटिश शासन’ आणि ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’ यांच्यापुढे ती कल्पना मांडली आणि त्याचा खर्च भाऊकडून होईल या अटीवर अनुमती मिळवली. भाऊने सरकारी कंत्राटातून मिळवलेला गडगंज पैसा त्या कामात ओतला आणि तो धक्का 1862 साली तयार झाला. त्याला भाऊच्या स्मरणार्थ बीपीटीने भाऊचा धक्का हे नामाभिमान केले. तेव्हापासून गेली दीडशे वर्षे मुंबईच्या नावासह मराठीपण जपणारा भाऊचा धक्का कोकणी मुंबईकरांची सेवा करत आहे.

धक्क्यालगतची जागा सुक्या गोदीसाठी बीपीटीला आवश्यक होती, तेव्हा धक्का काहीसा दक्षिणेकडे माझगाव डॉकपाशी नव्याने उभारण्यात आला तो 1970 साली. धक्का आधुनिक स्वरूपात उभा राहिला तरी त्याचे नाव कायम ठेवण्यात आले ‘भाऊचा धक्का’.

भाऊच्या धक्क्याला पुन्हा उर्जितावस्था येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र रस्ते वाहतूक विकास प्राधिकरणाने मुंबईच्या पूर्व किना-यावरून बेलापूर आणि मांडवा येथपर्यंत आधुनिक जलवाहतूक सुरू करण्याची तयारी चालवली आहे. त्यात ‘रोल ऑन, रोल ऑफ’ म्हणजे बोटीवर गाडी चढवा आणि त्या बंदरांवर उतरल्यावर तीच पुढे चालवा असे योजले आहे. ती योजना साकारली तर भाऊचा धक्का पुन्हा गजबजेल. सध्यादेखील रेवस-अलिबागकडचे लोक दुचाकीसह लाँचवर चढतात, तिकडे उतरतात, अष्टागारात कामाप्रमाणे मनसोक्त फिरतात व पुन्हा दुस-या दिवशी मुंबईत हजर होतात.

– मधुसूदन फाटक

About Post Author