केसकर आणि क्रिकेट

0
37

मूर्खपणाच्या आणि चुकीच्या म्हणाव्यात अशा भाकितांचा शोध घेऊ लागलो, तेव्हा मला माझ्या आवडत्या क्षेत्राच्या संदर्भातही काही गमतीदार पुरावे हाती लागले. उदाहरणार्थ – बी.व्ही. केसकर हे व्यक्तिमत्त्व भारतात एकेकाळी उच्च व प्रतिष्ठेच्या स्थानावर होते. त्यांनी 1946 मध्ये ‘ब्लिट्झ’ या इंग्रजी नियतकालिकात लिहिले होते.’भारतातून ब्रिटिश लोक निघून गेले तर त्यांच्याबरोबर त्यांचा क्रिकेट हा खेळही जाईल !’

फ्रान्समध्ये शिक्षण घेतलेल्या केसकर यांना असे वाटत होते, की ‘क्रिकेट या खेळाची संस्कृती आणि त्याचा आत्मा ब्रिटनमध्ये आहे. याचे कारण त्यासाठी आवश्यक असलेले विशिष्ट हवामान आणि विशिष्ट सामाजिक जीवनपद्धत हे केवळ ब्रिटनमध्ये आहे. तेथे सभ्य आणि कुलीन लोक क्रिकेट खेळतात आणि भारतात तो खेळ केवळ श्रीमंत, उच्चभ्रू, राजे-महाराजे यांनाच परवडणारा आहे.’ त्या खेळाचे भारतातील अस्तित्व हे एक प्रकारच्या गुलामगिरीचे द्योतक आहे, असेही केसकर या राष्ट्रवाद्याचे मत होते. ब्रिटिश सभ्यतेचे अंध अनुकरण करणे आणि त्यांच्या आवडी-निवडी व प्राधान्यक्रम यांनुसार ‘जण्टलमन’ बनण्याचा प्रयत्न करणे ही प्रवृत्ती आपल्या देशाला घातक आहे, असेही त्यांचे मत होते.

केसकर यांचे असे आकलन होते, की भारतातील हवामानाला आणि लवकरच स्वतंत्र होणाऱ्या व लोकशाहीचे वारे संचारलेल्या भारतीय मानसिकतेला क्रिकेट हा खेळ मानवणार नाही. त्यांना अशीही खात्री होती, की क्रिकेटची जागा फुटबॉल व अँथलेटिक्स हे कमी खर्चिक आणि अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेऊ शकणारे खेळ लवकरच घेतील. त्यांनी विशेष जोर देऊन हे नोंदवून ठेवले आहे, की क्रिकेट हा असा खेळ आहे, की जो केवळ ब्रिटिश संस्कृती, इंग्रजी भाषा आणि इंग्रजी सत्ता असेल तरच टिकाव धरू शकेल. म्हणजे भारतातून ब्रिटिश सत्ता हद्दपार झाल्याचा धक्का क्रिकेट या खेळाला पचवता येणार नाही आणि मग तो खेळही येथे तग धरून राहू शकणार नाही. आणि एकदा का ब्रिटिश सत्ता कोसळली, की त्या खेळाचे (प्रतिष्ठेचे) स्थानच नाहीसे होईल, मग तो खेळ हळूहळू हद्दपार होईल.’

केसकर हे गृहस्थ पूर्वग्रहदूषित नव्हते. त्यांची ही ठाम मते त्यांच्या अभ्यासावर व आकलनावर आधारित होती. त्यांनी तिरस्कार केला, तुच्छ लेखले अशी क्रिकेट ही एकमेव लोकप्रिय चीज नव्हती. ते भारताच्या माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री झाले, तेव्हा त्यांनी ऑल इंडिया रेडिओवरून चित्रपट संगीत वाजवण्यास बंदी आणली होती आणि रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये हार्मोनियम वाजवण्यास (शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमातही) मनाई केली. त्यांच्या त्या धोरणांना नंतर दारूण अपयश पाहवे लागले. नंतरच्या काळात तर बहुतांश लोक रेडिओचा वापर करू लागले ते केवळ, विविध भारतीवरून ऐकवल्या जाणाऱ्या चित्रपट संगीतासाठी ! आणि अर्थातच, भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये हार्मोनियमचे स्थान रेडिओवरही अढळ राहिले.

क्रिकेटवर बंदी आणण्याचे अधिकार केसकर यांच्याकडे नव्हते, पण त्यांना असा ठाम विश्‍वास होता, की ब्रिटिश मालक गेले की त्यांचे अपत्य असलेला क्रिकेट हा खेळही भारतभूमीवरून नाहीसा होईल. केसकर /exच्या त्या शब्दांची स्मृती जागवणे आपल्या हिताचेच ठरेल, कारण आता भारत हा जागतिक क्रिकेटचे केंद्र बनला आहे. क्रिकेटचे मूळ आणि कूळ जरी ब्रिटिश असले तरी विविध कारणांमुळे तो खेळ भारतीय समाजजीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्याचे एक कारण शरीरसौष्ठवापेक्षा तंत्रावर पकड असण्याची गरज. दुसरे कारण त्या खेळातील विविध अभिनयमुद्रा प्रेक्षकांना मोठ्या समूहाने आणि अधिक एकाग्रतेने सहभागी होण्यास प्रवृत्त करतात. परिणामी, वस्तुस्थिती अशी बनली आहे, की क्रिकेट हा खेळ राष्ट्रवादी भावनांची निर्मिती करण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. आणि हीसुद्धा वस्तुस्थिती आहे की, क्रिकेट हा भारतातील असा एकमेव खेळ आहे जो सातत्याने जगज्जेते खेळाडू व जगज्जेता संघ निर्माण करत आला आहे.

(अनुवाद : विनोद शिरसाट)

रामचंद्र गुहा

(साधना, 14ऑक्टोबर 2017 वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

—————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here