केजचे पहिले साहित्य संमेलन

0
32
बीडचे डॉ.सतीश सोळंके यांची मुलाखत घेताना प्रा. हनुमंत भोसले

– ईश्वर मुंडे

मोठ्या साहित्य संमेलनांत बहुसंख्य श्रोते वक्त्याला नावाने ओळखत असतात. गावागावातल्या साहित्य संमेलनांत मात्र बहुसंख्य श्रोते वक्त्याला व्यक्त्तीश: ओळखत असतात आणि वक्‍ताही बहुसंख्य श्रोत्यांना ओळखत असतो. परिस्थितीच्या या बदलामुळे तेथील संवादाचे स्वरूपही बदलत असते. समोर बसलेल्या ओळखीच्या श्रोत्यांसमोर थापा मारता येत नाहीत. उक्‍ती आणि कृती यांमध्ये संतुलन ठेवावे लागते. म्हणून गावपातळीवर होणारे उपक्रम अधिक महत्त्वाचे ठरतात. म्हणूनच केज येथे एप्रिलमध्ये झालेले साहित्य संमेलन वेगळ्या मोलाचे ठरले.
 

बीड जिल्ह् यातले केज गाव हे तालुक्याचे ठिकाण असले तरी बहुतेक लोक शेती करतात आणि कालपर्यंत तेथे ग्रामपंचायतच गावकारभार पाहत होती. अलिकडच्या काळात महाविद्यालय सुरू झाले. गावाला भूषण वाटावे अशी एकच गोष्ट, ती म्हणजे विधानसभा मतदारसंघाचे नाव या गावाच्या नावावर आहे. केज विधानसभा मतदार संघ; गावचा माणूस महाराष्ट्राचा सांस्कृतिक मंत्री झाला त्याला दशके लोटली! मात्र गावात, सांस्कृतिक वातावरण निर्माण व्हायला एप्रिल 2011 उजाडावे लागले.
 

गावच्या काही संवेदनशील लोकांनी मिळून मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा स्थापना केली. ईश्वर मुंडे यांनी पुढाकार घेतला. प्रसिध्द ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव कळंबला राहतात. केज आणि कळंब ही शेजार-शेजारची गावे. मध्ये आडवी मांजरा नदी. चंदंशिव यांचा अध्यक्षपदासाठी होकार मिळाला. त्यांच्या होकारामुळेच केजचे साहित्य संमेलन आकाराला आले. संमेलन साजरे करायला खर्च लागतो. गाव छोटे, व्यापारपेठ नाही, साहित्य चळवळीला पोषक वातावरण नाही, दानशूर लोक नाहीत, तरीही एकजिवाचे लोक एकत्र आले आणि त्यांनी साहित्य संमेलन यशस्वी रीत्या पार पाडले.
 

पहिल्या पिढीतील प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक त्र्यंबक असरडोहकर हे केज तालुक्यातले. त्यांचे नाव नगरीला देण्यात आले. प्रख्यात पखवाजवादक पद्मश्री कै. शंकरराव बापू आपेगावकर हेही याच तालुक्यातले. त्यांचे नाव मंचाला देण्यात आले.

मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि संत सहित्याचे अभ्यासक डॉ. दादा गोरे यांनी संमेलनाचे उदघाटन केले. त्यांनी त्यांच्या भाषणात आजच्या खेड्याचे विदारक चित्र मांडले. शहरात वृद्धाश्रम आहेत. खेड्यातील वृद्धांची स्थिती भीषण आहे असे सांगून त्यांनी ग्रामीण वृद्धांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव यांनी त्यांच्या भाषणात ग्रामीण साहित्याची भूमिका विस्ताराने विषद केली. त्याच्या पुष्ट्यर्थ ते म्हणाले, मराठीचा जन्मच मुळी बीड-उस्मानाबाद परिसरातील! आद्यकवी मुकुंदराज, स्वामी चक्रधर, दासोपंत यांचे दाखले देत त्यांनी साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस असला पाहिजे असे प्रतिपादन केले.
 

स्वागताध्यक्ष ईश्वर मुंडे यांनी प्रास्ताविक भाषण केले. मुनीरभाईने स्वागत गीत सादर केले. उदघाटन सोहळ्यात ‘शब्दांकुर’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेचे संपादन बी.जे.हिरवे यांनी केले. सय्यद वसियोद्दीन यांच्या ‘रानपाखरा’ व जनार्दन सोनवणे यांच्या ‘ग्लोबल वार्मिंग’ या कवितासंग्राहांचे प्रकाशनही संमेलनात पार पडले.
 

– ईश्वर मुंडे
संपर्क
09096688365

(या लेखामध्‍येआद्यकवी मुकुंदराज यांच्‍याबद्दलची लिंक द्यायची आहे. वाचकांकडे यांसदर्भातील माहिती उपलब्‍ध असल्‍यास त्‍यांनी thinkm2010@gmail.com या पत्‍त्‍यावर संपर्क साधावा.)

About Post Author