कुमार शिराळकर – महाराष्ट्राचे चे गव्हेरा

कुमार शिराळकर या डाव्या विचारांच्या तरुण तडफदार कार्यकर्त्याबाबत दोन लेख आहेत. पहिला शहादा–धुळे येथील श्रीनिवास नांदेडकर व वसंतराव पाटील या कार्यकर्त्याचा व दुसरा मुंबईतील विदुषी छाया दातार यांचा.

कॉम्रेड कुमार शिराळकर हे सांगली जिल्ह्यातील मिरजेचे. त्यांचा जन्म 10 जानेवारी 1942 रोजी मिरज येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णाजी व आईचे नाव मधुरा. कुमार शिराळकर यांचे पहिली ते मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मिरज येथेच झाले. त्यांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग (सांगली) येथून बी.ई. (मेकॅनिकल) ही पदवी घेतली. त्यांना आय.आय.टी. प्रवेश प्रक्रियेत प्रथम क्रमांक मिळाला, परंतु त्यांचे तेथे शिक्षण झाले नाही. त्यांनी घरच्या जबाबदारीमुळे नोकरी करण्याचे ठरवले. त्यांनी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे ‘नॅशनल मशिन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’त नोकरी (1966 ते 1970) करत असताना बाबा आमटे व युक्रांद यांनी आयोजित केलेल्या ‘श्रम संस्कार शिबिरा’त भाग घेतला. त्यांचा तेथे बाबा आमटे यांच्याशी संबंध आला.

त्यांच्या आईचे वडील नारायण हरी आपटे (कोरगावकर) हे प्रसिद्ध लेखक होते. कुमार शिराळकर नेहमी आजोळी असत. व्ही.शांताराम यांनी आजोबांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर ‘कुंकू’ नावाचा चित्रपट निर्माण केला होता. कुमार शिराळकर यांनी आजोबा व बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेतली. बाबा आमटे यांच्याकडून त्यांना आदिवासी समाजाच्या जीवनाबद्दल माहिती मिळाली. कुमार व त्यांचे मित्र यांनी बस्तर आणि चंद्रपूर भागात आदिवासी जीवनाचा अभ्यास करण्याकरता जंगलातून पायी प्रवास केला. त्या भागामध्ये नक्षलवादी चळवळ होती. परंतु कुमार व त्यांचे मित्र हे हिंसक मार्गाने क्रांती घडवून आणणे या विचाराच्या विरूद्ध होते. कुमार त्याच भटकंतीच्या ओघात सातपुड्यातील शहादा भागात येऊन पोचले. त्यांना तेथे जणू उद्दिष्ट सापडले ! तेथे आदिवासींची होणारी पिळवणूक, स्त्रियांवरील अन्याय-अत्याचार पाहून त्यांनी त्या भागात, शहादा परिसरातच काम करण्याचा निर्णय घेतला. आजोबा नारायण हरी आपटे यांनी कुमार यांच्या कामाला प्रोत्साहन दिले.

अंबरसिंग महाराज यांचा आदिवासींचा संघर्ष शहाद्यामध्ये त्या सुमारास (1971) सुरू होता. त्याला ‘माणूस’सारख्या नियतकालिकातून प्रसिद्धी मिळत होती. सर्वोदय मंडळ, अंबरसिंग महाराज, आदिवासी भिल्ल सेवा मंडळ, लाल निशाण पक्ष यांनी संयुक्त रीत्या भूमुक्ती मेळावा आयोजित करून युवकांना शहाद्याच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. मेळाव्यास कुमार शिराळकर, दीनानाथ मनोहर, प्रकाश सामंत, विजय कान्हेरे, सुधीर बेडेकर, छाया दातार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच, वाहरू सोनवणे, जयसिंग माळी, तुळशी परब, प्रदीप मोरे असे काही कार्यकर्ते गावागावातून चळवळ आधीच करत होते. त्यांना ‘मागोवा’ या मासिकाचा (संपादक- सुधीर बेडेकर) पाठिंबा असे. ‘मागोवा’ ग्रूप आणीबाणीमध्ये 1975 साली विसर्जित झाला. कुमार शिराळकर आणीबाणीच्या वेळेस भूमिगत झाले. ‘मागोवा’ कार्यकर्ते ‘ग्राम स्वराज्य समिती श्रमिक संघटने’च्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहिले.

कुमार शिराळकर यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी गटात प्रवेश 1982 मध्ये केला. त्यांच्यासह जयसिंग माळी, नथ्थू साळवे, रवींद्र मोकाशी, प्रदीप मोरे, जीवन पाटील, प्रशांत सामंत, भुरीबाई शेमळे, तापीबाई माळी, सखुबाई वळवी, इंदिराबाई चव्हाण, मंगल चव्हाण, नारायण ठाकरे व इतर कार्यकर्ते होते. त्यांनी शहादा तालुक्यात अन्याय व पिळवणूक या विरूद्ध मोठे वादळ निर्माण केले. त्यामुळे शेल्टी या तापी नदीकाठच्या गावात हत्याकांड घडले. कुमार शिराळकर व त्यांचे सहकारी यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले.

कुमार शिराळकर यांचे लढे शोषणाविरूद्ध, अन्यायाविरूद्ध चालूच राहिले. धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार भाई मदाने हेदेखील त्या चळवळीचे सहानुभुतीदार होते. दिवसेंदिवस आंदोलन, लढे तीव्र होत गेले. कुमार शिराळकर यांचा मार्क्सवादाचा अभ्यास गाढा होता. ते मार्क्सवादी विचार प्रत्यक्ष आचरणात आणत होते. तसेच, कष्टकऱ्यांचा नेता विधानसभेत जावा म्हणून त्यांनी त्यांच्या चळवळीतील जयसिंग माळी, भुरीबाई शेमळे यांना विधानसभेची उमेदवारी दिली. परंतु त्यांना निवडणुकीत अपयश आले.

कुमार शिराळकर यांचे कार्य व अभ्यास यामुळे त्यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मध्यवर्ती कमिटी (सेंट्रल कमिटी)मध्ये निवड झाली. मार्क्सवादी घटनेप्रमाणे ती सर्वोच्च कमिटी असते. ती कमिटी ध्येयधोरण ठरवत असते. कुमार शिराळकर यांनी बुद्धिमान व अभ्यासू पुढारी अशी मान्यता प्राप्त केली. त्यांची तुलना चे गव्हेरा यांच्याशी केली जाई. चे गव्हेरा यांनी अमेरिका खंडातील क्युबा या छोट्या देशाच्या क्रांतीमध्ये मुख्य भूमिका वठवली होती, पण ते स्वतः सत्तेपासून अलिप्त राहिले. चे गव्हेरा हे क्युबाचे नव्हते तरी त्यांनी त्या क्रांतीमध्ये मदत केली. ते युरोपातून क्युबात आले व त्यांनी क्रांतिकार्यात भाग घेतला. त्यांना ‘क्युबाच्या क्रांतीचा ब्रेन’ समजत. कुमार शिराळकर हेही खानदेशचे नव्हते तरी त्यांनी खानदेशात जाऊन आदिवासींमध्ये धनदांडग्या शेतकऱ्यांच्या विरूद्ध लढा उभा केला आणि शेतमजुरांमध्ये जागृती निर्माण केली. त्यामुळे धनदांडग्या शेतकऱ्यांचा वचक दूर झाला. त्यामुळेच ते शेतमजूर व कष्टकरी या सर्वहारा वर्गाचे नेते झाले. म्हणून त्यांची तुलना चे गव्हेरा यांच्याशी केली जाई. कुमार शिराळकर पुढेही कधी सत्तेत राहिले नाहीत. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सेंट्रल कमिटीचे सभासद होते, तरीही शहादा-नंदुरबारचे आदिवासी यांच्यामध्येच राहिले. ते पक्षकार्याला सेंट्रल कमिटी सदस्य म्हणून वेळ देऊ शकत नाहीत असे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी पक्षाचा त्याग केला आणि ते दरा-धडगावसारख्या आदिवासी भागात राहून शेवटपर्यंत आदिवासींचे काम करत राहिले. त्यांचा शेवट तेथेच झाला !

अशा त्या लढवय्या क्रांतिकारकाचे निधन 2 ऑक्टोबर 2022 रोजी नाशिक येथे झाले.

– वसंतराव पाटील 8975186203
(‘युगांतर’वरून उद्धृत)

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here