‘काशीची कत्तल!’ आणि ब्रिटिशांचे चातुर्य

0
62
_kashichi_kattal

भारतीय मनाला कत्तल आणि काशी (सध्याचे वाराणसी) या शब्दांचे नाते सहसा चालणार नाही; मात्र तसे ते आले होते आणि तेही जवळ जवळ एकशेवीस वर्षांपूर्वी! महाराष्ट्र साहित्य परिषदेने जतन केलेल्या दुर्मीळ ग्रंथांच्या यादीवर नजर टाकली तेव्हा ते कळून आले आणि आश्चर्याचा धक्का बसला! असे धक्के जुन्या ग्रंथसंपदेकडे बघताना आणि ती पुस्तके वाचताना अनेकदा बसतात. संदर्भित पुस्तकाचे लेखक आहेत अनंत नारायण भागवत. त्यांनी स्वतःच ‘काशीची कत्तल’ हे पुस्तक 1906 साली प्रकाशित केले. पुस्तक आहे अवघे छप्पन पृष्ठांचे. त्याची किंमत पंचवीस पैसे त्या वेळेस (1906)  ठेवली होती. तशी नोंद दर्शनी पानावर हाताने केलेली आढळते (जुना रुपया चलनात होता. तेव्हा मूळ किंमत चार आणे असावी). पुस्तकात हकिगत सांगितली आहे, ती अयोध्येचा पदभ्रष्ट राजा आणि ईस्ट इंडिया कंपनीची फौज यांच्यात अल्पकाळ झालेल्या लढाईची. परंतु लेखकाने तेवढी हकीगत फक्त सांगितली असती तर लेखनाला ऐतिहासिक कथा असे स्वरूप आले असते. मात्र ते पुस्तक एका ऐतिहासिक पुस्तकमालेचा भाग आहे असे पुस्तकाच्या प्रत्येक पानावर लिहिलेल्या शीर्षकातून दिसते. त्यामुळे इंग्रजांनी अयोध्या राज्याच्या मुस्लिम राजाला पदच्युत केले. त्यांनी दोन भावांतील/दोन वारसांतील सत्तालोभाचा फायदा उठवला. अखेर, त्यांपैकी एका भावाने बंडखोरीचा प्रयत्न केला. त्याला काही प्रमाणात यश आलेही. परंतु लढाईत मोठा मनुष्यसंहार झाला. अशी ती हकिगत आहे. काशी अयोध्येच्या ताब्यात नव्हती, पण अयोध्येच्या नबाबाचा भाऊ काशीला राहत होता.

मात्र, खुद्द अयोध्या संस्थान ताब्यात घेण्याअगोदर ईस्ट इंडिया कंपनीची कार्यपद्धत ही सर्वसामान्यपणे भारतातील विविध जातींच्या व्यापाऱ्यांच्या कार्यपद्धतीशी मिळतीजुळती होती; हिंदुस्थानातील विविध राज्यांतील राज्यांनी त्यांच्याकडे त्यांचे कौटुंबिक प्रश्न ब्रिटिशांकडे नेण्याची चूक केली आणि कंपनीने त्याचा फायदा घेत तिच्या अमलाखाली हिंदुस्थानचा मोठा हिस्सा आणला त्याचे थोडक्यात वर्णन पुस्तकात येते. ‘मग त्यांचा व्यापार लहान लहान राजेरजवाडे यांच्याशी सुरू झाला. शेवटी, त्या सर्वांचे धनकोश जगतशेटाप्रमाणे तोलण्याचे पूर्ण सामर्थ्य त्यांच्या अंगी आले. तेव्हा ते स्वतःच्या तागडीत राजेरजवाड्यांचे धनकोशच काय पण लहानमोठी राज्येही तोलू लागले. राज्यव्यवहार करणारे राजेरजवाडे त्यांच्याकडे जात, ते त्यांची स्वतःची काही अडचणींतून सुटका करून घेण्याच्या उद्देशाने. त्याचा फायदा घेऊन ती व्यापारी जगतशेट टोळी केवळ त्यांच्या राज्याची किंमत करून थांबली नाही, तर तो राजा त्या राज्यावर राहण्यास लायक आहे की नाही हेही ठरवू लागली. ईस्ट इंडिया कंपनी  ही राजे राजवाड्यांचे आर्थिक व्यवहार पाहू लागली व पेशवाईत जसे अनेक सावकार पेशव्यांना कर्ज देण्याइतके धनवान आणि सत्ताधीशांना कर्ज दिल्यामुळे वजनदार झाले होते; तशीच, ईस्ट इंडिया कंपनीसुद्धा वजनदार झाली होती. भागवत यांनी तसे साम्य तपशिलाने दाखवले आहे.

अयोध्येच्या संस्थानचा मुस्लिम राजा परलोकवासी झाल्यावर त्याच्या जागी इंग्रजांनी वारस कसा ठरवला त्याचे वर्णन भागवत यांनी रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देण्याच्या त्यांच्या खास शैलीत केले आहे. त्यानंतर गादीवरील एका वारसाच्या जागी दुसरा वारस कसा आणला, बदललेल्या वारसाने इंग्रज सरकारविरुद्ध बंड करण्याचा बेत कसा आखला याची सविस्तर हकिगत त्यांच्या शब्दांतच वाचण्यासारखी आहे. अयोध्येचा वारस बदलला गेला तो अंतर्गत भांडणामुळे आणि नव्या नबाबाच्या व्यसनीपणामुळे. भागवत त्याची माहिती देऊन एक निरीक्षण नोंदवतात – ‘काही दिवस गादीवर बसल्यावर सरळ मार्गाने चालून स्वतःचे स्थान स्थिर करून घेणे हे अयोध्येचा नबाब झाल्यावर त्याचे पहिले कर्तव्य होते. चैन, ऐषआराम, व्यसने या गोष्टी मागाहून. पण त्याच्या कारकिर्दीत अगदी थोड्या अवकाशात जे पहिले ते शेवटचे व शेवटचे ते पहिले कर्तव्य झाले.’ ‘डावलल्या गेलेल्या वारसदाराने दरबारातील असंतुष्ट आणि हकालपट्टी झालेल्या सरदारांना हाताशी घेऊन, नव्या नबाबाच्या औरसपणाबद्दल असलेल्या शंकांचा उघड उच्चार केला आणि वारस नियुक्त केल्यास कंपनीला मोठी खंडणी देऊ असे मान्य करून अयोध्येचे सिंहासन पदरी पाडून घेतले.’ तसेच, पहिल्या वारसदाराने कंपनीविरुद्ध बंड उभारले ते लाहोरच्या झेमनशाह याच्या मदतीने. ते बंड करणाऱ्याने कोणत्या प्रकारे _east_india_companyहल्ला चढवण्याचा प्रयत्न केला त्याचे तपशीलवार वर्णन हा या लेखनातील ऐतिहासिक असा भाग म्हणता येईल. एका छोट्या १७९९ साली घडलेल्या आणि फसलेल्या प्रकरणाची हकिगत एखाद्या माणसाने घटना घडल्यानंतर शंभर वर्षांनी का सांगावी हा प्रश्न पडू शकतो. पण त्या प्रश्नाचे उत्तर प्रश्नातच आहे.

पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा भारतात स्वयंशासनाची मागणी वेगवेगळ्या छटांसह जोरात मांडली जात होती. त्यामागे, स्वातंत्र्याची ऊर्मी हा भाग होताच; पण त्याचबरोबर, आपले प्रश्न तिसऱ्या माणसाकडे नेले, की नुकसान कसे होते याची जाणीव झाली होती हे सुद्धा होते. त्यामुळेच भागवत यांनी सुरुवातीला एक विधान केले आहे – दोघांत तंटा लागला म्हणजे त्याचा निकाल आपापसांत तडजोडीने करण्याचे तत्त्व हिंदुस्तानच्या हवेला मानवेनासे झाले आहे. निकालासाठी तिसऱ्याकडे जाणे वाईट नाही, पण तो तंटा आपल्यापैकी चार शहाण्या गृहस्थांपाशी नेणे ही जास्त शहाणपणाची गोष्ट असून ती पूर्वीची पद्धत हिंदुस्तानातील मंडळींना रुचेनाशी झाली आहे. जे आपल्या जातीचे नाहीत, धर्माचे नाहीत, ज्यांना आपले आचार, विचार रिवाज माहीत नाहीत अशा परक्या लोकांकडे तंटे नेण्याची गोडी लागली आहे. स्वातंत्र्यलढ्यात स्वयंशासनाची मागणी किती विविध प्रकारे होत होती याचा हे छोटे पुस्तक म्हणजे आरसा आहे.

पुस्तकाची जी प्रत ‘मसाप’ने डिजिटलाईज केली आहे त्याच्या पहिल्या पानावर डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी, पुणे १८९४ असा शिक्का आहे.

– मुकुंद वझे 9820946547
vazemukund@yahoo.com

About Post Author