कहाणी – नैरोबीतील वटपौर्णिमेची

1
40
पूर्णा अधिकारी
पूर्णा अधिकारी

पूर्णा अधिकारी     १८ जून २००८… माझी पहिली वटपौर्णिमा… प्रणव १६ जूनला संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर, मी आईंना फोन लावला, “परवा, वटपौर्णिमेला काय आणि कसे करायचे?”

“तुला काही तिथे वड मिळायचा नाही… त्यामुळे तुला हौस असेल तर फक्त दिवसभराचा उपास केलास आणि दुस-या दिवशी सोडलास तरी चालेल…” आई म्हणाली.

“पण मिळाला वड तर काय करू?”

“तो कुंडीत अथवा पेल्यात उभा कर. त्यावर फुलांनी पाणी शिंपड. हळद, कुंकू, गंध वाहून पूजा कर आणि दो-या चे पाच पाच फेरे बांध.”

फोन ठेवल्यावर प्रणव म्हणाला, “मी इथे कुठे वड बघितलेला नाही. त्यामुळे तू फक्त उपास कर.”

मी म्हटले, “पण आपण शोधुया तर, उद्या संध्याकाळी बाहेर जाऊन…”

“ठीक आहे.”

प्रणव १७ तारखेला ऑफिसमधून घरी आल्यावर, लगेच, मी वड शोधायचा हट्ट धरला; पण प्रणव दमला असल्याने हट्ट सो़डून दिला. तेवढ्यात आठवले, की सपनाला फोन करून विचारावे – कुठे मिळतो का तो वड… सपना म्हणजे प्रणवच्या ऑफिसमधल्या मित्राची, सुमितची बायको. सुमित तिकडे टांझानियाला असतो, साईटवर आणि सपना इकडे, नैरोबीमध्ये सासू-सासरे व दोन पोरांबरोबर राहते. मराठी फॅमिली आहे. छान आहेत सगळे…सुमी-सपना यांच्याबरोबरच आम्ही नैवाशाला गेलो होतो… सुमित गेल्या किमान पंधरा वर्षांपासून इथे, केनियात आहेत – ‘केनियन सिटिझन विथ टांझानियन वर्क परमिट..’

सुमित-सपनाच्या लग्नाला मागच्याच महिन्यात दहा वर्षे झाली… तर मग लगेच सपनाला फोन लावला…  “उद्याचे काय गं? वड मिळतो का इथे?”

“नाही, इथे वड नाही मिळत… मी फक्त उपास करते आणि कहाणी वाचते…” तिच्याशी बोलता बोलताच मला अचानक डोळ्यांसमोर एक चित्र दिसले… राम मंदिराचे.. इथून जवळच आहे… जातो आम्ही कधी कधी तिथे.. चित्र नुसते राम मंदिराचे नाही तर मंदिराच्या समोर एक मोठे झाड दिसले… अगदी मंदिराच्या कन्स्ट्रक्शनमध्ये असल्यासारखे… जणू काही त्या झाडाभोवती, म्हणजे झाड तसेच ठेवून बाजूने कन्ट्रक्‍शन केले आहे असे. मी सपनाशी बोलता बोलताच प्रणवला विचारले, “ते राम मंदिरात आहे ते झाड कसले?” सपनाला वाटले, मी तिलाच विचारले…. तिचे उत्तर… “राम मंदिरात कसले झाड आहे, मला माहीत नाही… पिंपळाचे असेल कदाचित… दोन्ही झाडे जवळजवळ सारखी दिसतात ना.. पण मी काही इथे कुठे वड पाहिलेला नाही…पिंपळ असेल. “आता पिंपळाचे काय करू? पिंपळावर काय भूताला पूजायचंय…?”

पती प्रणव अधिकारी यांसोबत पूर्णा अधिकारी    झाले.. वड शोधायला जायचा विषय संपला. प्रणव म्हणाला, “उपास कर पाहिजे तर… दूधात ‘मिलो’ घालायचे नाही… पण दुपारसाठी साबुदाण्याची खिचडी कर, रात्री तुझ्यासाठी बटाट्याचा किस कर आणि माझ्यासाठी वरणभात..”

“ठीक आहे. पण मी कमीत कमी साडी नेशीन व लग्नातले मोठे मंगळसूत्र घालीन..” तो ‘हो’ म्हणाल्यावर लगेच मला उत्साह आला.. १८ तारखेचा दिवस उजाडला. प्रणव दूध-नाश्ता करून ऑफिसला गेल्यावर मी बॅगा उघड़ून साडी-दागिने काढले व स्नान करून साडी नेसायला घेतली…साडी नेसून तर दहा मिनिटांत झाली. पण खाली नि-या धरायला कोणीच नाही … काही केल्या खालच्या नि-या नीट बसेनात… आईची, रिनाची व प्राजक्तावहिनीची खूप आठवण आली. पण करणार काय? गुरुदेव दत्ताचा नामजप करत-करत नि-या वरपासून धरत-धरत हळुहळू खालपर्यंत दाबत गेले… अखेर, अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर त्या नीट बसल्या… हुश्श! पण इथे उकडत नसल्यामुळे आपण गेल्या पाऊण तासापासून साडीशी लढत आहोत हे अजिबात जाणवले नाही!…मग हिरव्या बांगड्यांच्या मध्ये माहेरच्यांनी केलेल्या सोन्याच्या बांगड्या व पुढे त्याच ‘सेट’मधले तोडे घातले… कानात ते लोंबकाळणारे कानातले घातले.. मोठे मंगळसूत्र आणि त्या दोन-एक सरी घातल्या.. आणि मग एकदम सण असल्यासारखे जाणवायला लागले.

देवांची पूजा रोजच्यासारखी केली. गणपतीला व दत्तालाच नमस्कार केला… वड तर नाही आहे पूजायला, तर तुम्हीच माझ्या सौभाग्याचे रक्षण करा व जन्मोजन्मी हाच पती मिळू द्या… माझी पूजा करून झाल्यावर ‘अॅग्नेस’ आली. मला साडीत बघून तिचा दारातच पुतळा झाला! तिने मोठ्याने ‘आ’ वासला व ती हसायला लागली… “You look smart….!!!” तिला सांगितले, की  फेस्टिवल आहे… मग नवीन जोमाने व उत्साहाने घर स्वच्छ केले.. एवढ्या सगळ्या कामाच्या रगाड्यात पण सतत मी उठते कशी, बसते कशी, चालते कशी हे ती निरखून बघत होती.

दुपारी प्रणव आला… “हे कोण आलंय आपल्या घरी?”

साबुदाण्याची खिचडी खाऊन झाल्यावर प्रणव म्हणाला, “चला, फोटो काढुयात.. कुठे काढायचा?”

“देवाजवळ..”

“O.K. दिवा लाव परत.”

माझे एकटीचे  दोन-तीन फोटो काढून झाल्यावर तो म्हणाला, “अॅग्नेसला सांग ना आपल्या दोघांचे काढायला.” तिने आमचे दोन फोटो काढले.. “बघुयात कसे येतात ते… manual कॅमेरा आहे ना… डेव्हलप केल्यावर कळेल… ”

प्रणव संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर मला साडीतच बघून गोंधळला…. “तू अजून साडीतच आहेस? बदलली नाहीस?”

“मला राम मंदिरात जायचंय. एकदा कन्फर्म करून घ्यायचंय ते कसले झाड आहे ते…”

“अरे बापरे!” तो खूप दमल्यासारखा दिसला… “आणि संध्याकाळचा ट्रॅफिकही खूप असतो रस्त्याला…”

“जाऊ दे.. राहू दे.. बदलते मी साडी…कंटाळला आहेस ना.. परत एवढ्या ट्रॅफिकमध्ये जायचं… राहू दे…”

“नको. चल, पटकन उजेड आहे तोपर्यंत जाऊन येऊ.. फक्त हे दागिने काढून ठेव सगळे..”

“O.K. मोठे मंगळसूत्रपण काढू?”

“नको. असू दे.. फक्त आत घालून ठेव. ते तोडे काढ आणि कानातले काढ.”

कानातले लोंबकळणारे फक्त काढून ठेवले… छोटे गोळे तसेच ठेवले कानात आणि निघालो… मंदिराच्या अंडरग्राऊंड पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क केली. चढून वर मंदिरात आलो.. तर कसले काय…. तिथे मला चित्रात दिसलेल्या ठिकाणी झाडच नव्हते. एकदम हिरमोड झाला…

आत जाऊन देवाचे दर्शन घेतले. प्रणव म्हणाला, “चल, प्रदक्षिणा घालुया…” तसे आम्ही त्‍या मंदिरात इतक्या वेळा आलो, पण कधी प्रदक्षिणा नव्हती घातली. कारण तिथे बरेच देव आहेत… शंकरसुद्धा.. तशी वेगवेगळी विभागणी केली आहे… पण मी नव्हती घातली कधी प्रदक्षिणा… चुकून शंकराला पूर्ण प्रदक्षिणा घातली गेली तर? पण आज प्रणव म्हणाला म्हणून त्याच्यापाठोपाठ प्रदक्षिणा मार्ग धरला आणि मागच्या खिडकीतून बाहेर वड दिसला!… तसा लहानसा.. पण बायकांनी पूजलेला. दोरे होते भरपूर त्याभोवती…”

प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरात बाहेर आलो. प्रणव म्हणाला, “जा, जाऊन ये. मी तोपर्यंत शूज घालतो आणि इथेच थांबतो तुझ्यासाठी…”

मी लगेच गेले तिकडे.. इतके प्रसन्न वाटले, पूजलेला वड बघून. मनापासून नमस्कार केला… त्या देवाचे आभार मानले, मला इथे खेचत घेऊन आल्याबद्दल…

एक बाई पूजा करत होती… ती हळद-कुंकू वगैरे सगळे घेऊन आली होती. तिने दोरा बांधायला सुरुवात केली होती… माझ्या मनात येऊन गेले, की तिला विचारावे की मी तू आणलेले हळद-कुंकू वाहू का म्हणून… तेवढ्यात ती मला बघून जागा द्यायला थोडी बाजूला झाली… कदाचित तिला वाटले असावे, की आपण हिच्या मध्ये तर येत नाही आहोत ना.. तिला म्हटले, “Its o.k. I didn’t bring anything. Wasn’t sure whether there is a vad over here.”

‘’Oh! Didn’t bring? Wait. I think I have an extra thread if u want to use…” ती हळद-कुंकवाच्या डब्यात शोधू लागली… तिने डब्यातून दो-याचा गोंडा काढून लगेच मला दिला व डब्याकडे हात दाखवत म्हणाली, “Use whatever you want..” मी हळदकुंकू वाहिले व वडाभोवती दो-याडचे पाच फेरे बांधले.. पिक्चरमध्ये दाखवतात ना अगदी तसे… आख्ख्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालून दोरा बांधला.. मनोमन, त्या वडाचे आणि परमेश्वराचे आभार मानले. मग तिने मला आरतीसुद्धा दिली. मला म्हणाली, “मी आरती करत आहे. तुला हवे तर हात लाव ताटलीला…” मग तिच्या बरोबरीने दिवासुद्धा ओवाळला.

पूजा करून झाल्यावर तिला सांगितले, की माझी ही पहिली वटपौर्णिमा आहे आणि मी अशी सहजच आले इथे, वड शोधत..मला माहीतच नव्हते, की इथे झाड आहे की नाही ते… आणि मग तिचे पण खूप आभार मानले, की “तुझ्यामुळे मला पूजा करता आली…”  तर ती म्हणाली, “अगं, खरं म्हणजे तू यायच्या आधी दुसरी एक बाई इकडे येऊन गेली आणि नुसतीच नमस्कार करत उभी राहिली, त्या कोप-यात.. माझ्या मनात येऊन गेले, की आपल्याकडे एक extra गोंडा आणि साहित्य आहे तर आपण ते तिला ऑफर करावे म्हणून.. पण मी तेव्हा काहीतरी करण्यात बिझी होते आणि माझे ते सगळे होईपर्यंत ती निघून गेली आणि तू आलीस…” मी म्हटले, “बघ, माझ्याच नशिबात होते ते…” ती म्हणाली, “हो खरंच, तू लकी आहेस…”

सगळे माझ्या साधनेचे फळ आहे! तो परमेश्वर मला खेचत त्या मंदिरात घेऊन गेला आणि त्यानेच माझ्याकडून पूजा करवून घेतली अशी माझी भावना झाली.

पूर्णा प्रणव अधिकारी
स्नेणहीदी, ता. माणगाव,
मु. पो. गोरेगाव, जि. रायगड,
पिन कोड – ४०२१०३
मोबाइल – ९७६४५८८२७०
इमेल – poornadhikari@gmail.com

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.