कसाबचे स्थानिक साथीदार कोण?

0
32

अजमल कसाबला यथाकाल फाशी देतीलही. तो एक उपचार आहे. भारतदेश न्यायाने चालतो हे जगाला कळवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेचा उपचार सुरू करण्यात आला. त्या औपचारिकतेची सांगता कसाबच्या फाशीने होईल. त्यामुळे लोकांचे समाधान झाले असेही जाहीर होईल. कसाब आणि त्याच्या साथीदारांनी २६/११ ला भारतावर जो हल्ला केला त्यात मृत्यू पावलेल्यांना न्याय मिळाला अशी भावना सर्वत्र आहे. पण जरा मागे जाऊन त्या तीन दिवसांतला क्षोभ आठवला तर हे समाधान आणि मनाची शांतता तकलुपी वाटत नाही का?


अतिरेक्यांचे आणि नक्षलवाद्यांचे वारंवार होणारे हल्ले जीवन अधिकाधिक असुरक्षित बनवत आहेत. त्यामुळे माणसे हतबल होऊन त्यांचा जगण्यावरचा विश्वास गमावून बसत आहेत आणि त्यामुळेच स्थायी स्वरूपाच्या मानवी संस्कृतीच्या विकासाला आळा बसला आहे. हा चिंतेचा मुद्दा आहे. सरकारने बंदोबस्त व सुरक्षितता कितीही वाढवली तरी माणसाची सांस्कृतिकता कशी जपली जाणार हा खरा प्रश्न आहे. या कामी पुढाकार समाजाचा हवा. पाकिस्तानही अतिरेक्यांची फॅक्टरी आहे असे नुसते नमुद करून चालणार नाही. आपल्या समाजात आजुबाजूला सहज नजर टाकली तर इथे भारतातदेखील
त्या फॅक्ट-या निर्माण होऊ शकतील अशी स्थिती आहे, सहज म्हणून रात्री नऊच्या बेताला मध्य रेल्वेच्या सी.एस.टी. स्थानकावर सोळा-सतरा नंबरच्या प्लॅटफॉर्मवर बिहारकडे जाणा-या गाड्या लागणार असतात, त्यांचे निरीक्षण करावे. ते जमणारे लोक, विशेषत: तरूण पाहिले की अंगावर काटा येतो. मनात वाटते, की गाव सोडून आलेल्या या तरुणांनी करायचे काय आणि त्यांचे समाजाने करायचे काय? तरुणांचे असे असंघटित पुंजके ठिकठिकाणी दिसतात, तेव्हा या तरुणांना दिशा सुचवणारी कोणतीही शक्ती अथवा प्रेरणा देशात नाही याची प्रखर जाणीव होते.


कसाबला फाशी देण्यापेक्षाही महत्त्वाच्या अशा या मुद्यावर जगजागृती घडून यायला हवी. अन्यथा पाकिस्तानात आहे तसे स्फोटक वातावरण या देशात ठिकठिकाणी दबल्या अवस्थेत आहे; तेथेही स्फोट घडून येऊ शकतात असे जाणवेल.


कसाबबद्दलच्या निर्णयाने संतुष्ट झालेल्या आपणा सर्वांकडून एक मुद्दा विसरला जातोय. तो म्हणजे कसाब आणि टोळीला स्थानिक मदत कोणी केली? या संबंधात पकडलेल्या दोघांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. पोलिसांवर अपू-या तपासाबद्दल ताशेरेही मारले. परंतु एवढा मोठा हल्ला अतिरेक्यांना मुंबईतून मदत मिळाली असल्याशिवाय घडून येणे शक्य नाही. पोलिस तो तपास करू शकलेले नाहीत. कसाबने केलेला गुन्हा जनतेसमोर उघड घडून आला होता. त्याला कागदोपत्री पुराव्यांचा आधार देण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे श्रेय कोणी किती घ्यायचे हे ठऱवताना कटामागचा धगधगता निखारा विझवता आलेला नाही, याची जाणीव पोलिसांनी व त्यांच्यापेक्षाही जनतेने ठेवलेली बरी!

– राजेंद्र शिंदे

About Post Author

Previous articleस्वस्तात हृदय शस्त्रक्रिया
Next article‘सदाशिव’ त्रिमुखी मूर्ती
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.