कल्याणच्या तटबंदीचे अवशेष

शिवाजी महाराजांनी सागरी सत्तेचा पाया प्रथम कल्याण बंदरात १६५८ मध्ये घातला. त्या बंदराला कल्याणची खाडी म्हणून ओळखले जाते, पण कल्याण पूर्वी प्रसिद्ध होते ते, बंदर आणि बाजारपेठ म्हणून. मुसलमान राजवट आणि पेशवे राजवट कल्याणात असताना मुस्लिम वाडे, हिंदू वाडे, धार्मिक स्थळे (मंदिर, मशिदी) विहिरी, तळी; तसेच, ब्रिटिश राजवटीत चर्च अशा वास्तू बांधल्या गेल्या. तोच आज कल्याणचा ऐतिहासिक वारसा ठरलेला आहे. त्यात एक विशेष म्हणजे संपूर्ण कल्याणला तटबंदी बांधण्यात आली होती. परकीय आक्रमणांपासून गावाचे संरक्षण हाच तटबंदीचा हेतू होता. तटबंदीचा काहीसा भाग अस्तित्वात आहे. मात्र तोही दुर्लक्षित आहे. ना पालिकेचे, ना नागरिकांचे त्या वारसावस्तूबद्दल कुतूहल आहे.

तटबंदी1630-1695 च्या काळात बांधण्यात आली. ती दगडी बांधकामातील होती. कल्याणमधील मुसलमान कारकिर्दीत, शहाजहान यांच्या काळात त्यांचे मंत्री नवाब महातबरखान यांनी त्या तटबंदीचे बांधकाम सुरू केले आणि ते औरंगजेबाच्या काळात पूर्ण झाले. ती दोन हजार एकशेचोवीस वार लांबीची व चार ते सहा फूट रुंदीची भिंत खंदकाने संरक्षित होती. खंदक तेहतीस फूट रुंद व वीस फूट खोल होता. तटबंदीच्या तटाला अकरा बुरुज आणि चार दरवाजे होते. पैकी मोठे बुरुज चार व लहान सात होते. त्या तटाच्या आत सुमारे सत्तर एकराचा गावाचा परिसर होता. कल्याण गावाचे स्वरूप साधारण किल्ला, तटावरील गाव व किल्ल्याबाहेरील पेठ इतकेच होते. मुख्य बुरुजांपैकी उत्तर पूर्वेस एक, पूर्वेला मध्यावर दुसरा, तिसरा दक्षिण पूर्वेला तर चौथा किल्ल्याच्या उतारावर होता. गांधार, बंदर, पनवेल आणि दिल्ली असे चार दरवाजे. त्यांपैकी काहीही शिल्लक नाही.

तटबंदीची पूर्व आणि दक्षिण बाजू इंग्रजांच्या काळात, 1865 मध्ये पाडली आणि रस्ता बनवला. तर पश्चिमेकडील तटबंदी पडल्यावर तिचे दगड कल्याण आणि ठाणे शहरांमधील घरांचा पाया व घर बांधण्यासाठी कस्टम अधिकाऱ्यांनी नेले.      

कल्याणचा विस्तार आता भरमसाठ वाढला आहे. परंतु कल्याणच्या लालचौकी परिसरात दरवाजा आणि बुरुज यांसारखा भाग रायते येथील ‘अश्वमेध प्रतिष्ठान’च्या तरुणांच्या निदर्शनास आला असून प्रतिष्ठानचे तरुण त्याची स्वच्छता व निगा गेली तीन वर्षें राखत आहेत. एक बुरुज आणि दरवाजा तेथे स्पष्ट दिसतो. त्या आधारे, ती तटबंदीच असल्याचे ‘अश्वमेध प्रतिष्ठान’चे म्हणणे आहे. तटबंदीचे अजून काही अवशेष कल्याण परिसरात सापडतील असे तेथील इतिहास संशोधकांचे मत आहे. वेळीच, त्या ऐतिहासिक वास्तूचे जतन होणे गरजेचे आहे.

राम नामदेव सुरोशी 9220489579, ramsuroshi214@gmail.com

About Post Author

3 COMMENTS

 1. आपण नमूद केलेली तटबंदीची…
  आपण नमूद केलेली तटबंदीची मापे, निर्मितीचा काळ, इत्यादी माहितीचा संदर्भ कोणत्या कागदपत्रात अथवा अस्सल ऐतिहासिक साधनात आला आहे?
  कृपया त्याची माहिती मिळेल का?

 2. प्रवीण कदम सर,
  ‘कल्याणच्या…

  प्रवीण कदम सर,
  ‘कल्याणच्या तटबंदीचे अवशेष’ या लेखात जी माहिती मी त्यात टाकली आहे ती अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांतून आलेली असून त्यापैकी १८८२ च्या ब्रिटिश शासनाच्या दार्शनिकेतील (गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी) माहितीशी पडताळून संपादित केलेली आहे.

Comments are closed.