कल्याण शहरातील अनेक जुन्या वाड्यांनी कात टाकलेली असताना भिडे वाडा त्यांच्या पूर्वजांचा इतिहास, संस्कृती, परंपरा जपत दिमाखात उभा आहे. भिडे वाडा टिळक चौकात भिडे गल्लीमध्ये आहे. ते नाव त्या वाड्यामुळेच गल्लीला पडले आहे. दुसरा तसा साठे वाडा जवळच आहे. ते दोन वाडेच जुन्या स्वरूपात कल्याणमध्ये शिल्लक राहिले आहेत. भिडे वाडा हा साधारण दीडशे वर्षांपूर्वीचा. त्या वाड्याचे निर्माते म्हणजे मूळ मालक गोविंद वासुदेव भिडे. त्यांनीच तो वाडा उभारला. त्यांचा मूळ व्यवसाय सावकारीचा, त्यांच्या भाताच्या गिरण्या होत्या. एकवीस खोल्यांचा असा तो दुमजली वाडा. त्या वाड्यात पंधरा कुटुंबे एकत्र नांदत. काळाच्या ओघात वाडे नष्ट झाले तशी एकत्र कुटुंबपद्धतही! सध्या त्या वाड्यात भिड्यांची सहावी पिढी नांदते – वसंत, मनीष आणि सौ. वैशाली भिडे.
वाड्याची कवाडे उघडून आतील हिरव्यागार अंगणात पाय ठेवताच नजरेसमोर येतात ती जुनी भात भरडण्याची छोटीमोठी जाती, मोठी दगडी उखळ आणि पाण्याची दोणी. मी वाड्यात शिरलो आणि दरवाज्यावर थाप दिली. काकू आत वर्तमानपत्र वाचत बसल्या होत्या. त्यांनी मला पाहताक्षणी ओळखले. “तू मागेही आला होतास ना वाडा पाहायला, तेव्हा पाहणे अर्धवट राहिले होते ना?” मी हो म्हटले,”ये बैस, आधी फराळ खा, पाणी पी. मग वाडा दाखवते.”
जुन्या लाकडी दादरावरून एक वजनदार लाकडी दरवाजा वरच्या दिशेने ढकलला जातो. मी जाऊन पोचलो वर माळ्यावर. त्या माळ्यावरील अनेक खोल्यांमध्ये अनेक जुनी भांडी, पितळी हांडे, मोठी मुसळे, ताकाचे भांडे आणि ताक घुसळण्याची भलीमोठी रवी पाहून थक्क झालो. प्राण्यांची जुनी सांबारशिंगे भिंतीत अडकवलेली, चिमणी (कंदील), विहिरीत पडलेली वस्तू काढण्यासाठी गळ, कारकुनी टेबल, छपरी पलंग, जमिनीवर बसण्याचे छोटेमोठे पाट, पाडव्याची गुढी उभारण्याची काठी, अंघोळीचे पाणी तापवण्याचा पितळी बंब, धान्य साठवण्याचा खडपा, भिंतीत कोरलेली कपाटे, माळ्यावरील अनेक खिडक्या आणि वाड्याच्या माळ्यावर पोटात असणारा अजून एक (पोट)माळा. त्याला पोटमाळा म्हणणे चुकीचे ठरेल कारण तो एवढा मोठा आहे, की त्यात शंभर ते दीडशे माणसे आरामात झोपू शकतील! अशा अनेक गोष्टी.
वाड्यात खोल्या बऱ्याच आहेत. विटाळशीची खोली, अडगळीची खोली, धान्य साठवण्याची खोली, बाळंतिणीची खोली… अशा वेगवेगळ्या कारणांसाठी त्या खोल्या वापरल्या जात. वाड्यात विहीरदेखील आहे, पण तेथे बरीच अडचण असल्यामुळे पाहता आली नाही. विशेष म्हणजे भिडे वाड्याने वाड्याच्या मागील बाजूचा मोठा सागवानी दरवाजा जपून ठेवला आहे! त्याजागी लोखंडी शटर बसवले गेले आहे. त्याचप्रमाणे मुख्य दरवाज्यामागे दरवाजा बंद करण्यासाठी साखळीची कडी आणि लांब सागवानी लाकडी अडसराची सोय केली आहे. म्हणजे दरवाजा डबल लॉक करण्याची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. भिडे मंडळी वाड्यातून ‘भिडे कॅटरिंग व्यवसाय’ चालवतात.
– चंदन विचारे
Last Updated on 08 Nov 2017