भारतीय चित्रकला क्षेत्रावर 1900 ते 1970 पर्यंत ब्रिटिशांचा मोठा प्रभाव आहे. जे.जे.मध्ये जे अध्यापक-प्राध्यापक-संचालक होते, ते इंग्रजी होते. मुळात ब्रिटनमधील कला रेनेसान्स काळाने प्रभावित होती आणि ती कलामूल्ये इथे येऊन पोचत होती. कलेला दुसरी बाजू असते कारागिरीची, कौशल्याची. आपल्याकडे हे दोन्ही शब्द (कला व कौशल्य) फार ढोबळपणे वापरले जातात. कलेमध्ये प्रमुखत: अभिप्रेत असतो तो आशय. त्याला जर कौशल्य-कारागिरीची यथायोग्य जोड लाभली तर त्यामधून चांगली कलाकृती घडते.
ब्रिटिश चित्रकलेबरोबर आपल्याकडे त्यांची कौशल्ये व तंत्रेही आली. त्यांनी प्रभावित झालेल्या पिढयाही इकडे आहेत. चित्रकलेच्या क्षेत्रात एका बाजूला ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट’सारखे थोर कलाकार जसे घडले तसे एस.एम. पंडित, रघुवीर मुळगावकर वगैरे मंडळी त्यांच्या तंत्रांनी प्रभावित झाली व त्यांनी आपल्या पारंपरिक चित्रशैलीत ती तंत्रे अवलंबली- जाणीवपूर्वक किंवा अजाणता!
पारंपरिक भारतीय शैलीला आध्यात्मिक डूब आहे. अध्यात्मात स्वाभाविकपणे गूढता येते. मुळगावकरांच्या चित्रशैलीत ह्या दोन्ही गोष्टी प्रभावाने दिसतात व त्याचबरोबर त्यांच्या चित्रांना गोडवादेखील आहे. लयदार आकार व रेषा आणि आकर्षक रंगसंगती ह्यामुळे त्यांची चित्रे सर्वसामान्य रसिकांच्या मनात भरत. त्यांतील धुसर वातावरण व त्यामुळे निर्माण होणारा गूढ भाव त्या चित्रांत रसिकांचे लक्ष खिळवून ठेवत असे! रसिकांच्या मनातील श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादी पौराणिक पात्रांना चित्ररूप लाभल्यामुळे त्यांचे मन अधिकच प्रसन्न होत असे.
मुळगावकरांनी पौराणिकेतर म्हणजे एखादी सुंदर स्त्री अशी जी चित्रे काढली ती पाहिली तर ती ‘टाल्कम पावडर’च्या जाहिरातीतील वाटतील इतकी ती मनमोहक असत. म्हणजे पुन्हा कल्पनेतले वा स्वप्नातले जग. भारतीय कलापरंपरेत हा प्रवाहदेखील प्रबळ आहे. जे वास्तवात नाही अशी स्वप्न सृष्टी कलामाध्यमातून निर्माण करायची. हिंदी चित्रपट हे त्याचे मोठे उदाहरण. मुळगावकर त्या प्रभावकाळातच त्यांची चित्रे चितारत होते.
दलाल ह्या प्रतिभावंत चित्रकाराने ह्या भारतीय परंपरेला, कुणालाही न दुखावता छेद दिला व स्वतंत्र चित्रे निर्माण केली. त्यांनी निव्वळ रंग, रेषा व पोत; तसेच, विषयांस अनुरूप सादरीकरणावर जोर दिला.
येथे दोन चित्रकारांची तुलना उगाच करणे चुकीचे ठरेल, कारण दोघांनी चाळीस-पन्नास वर्षांच्या कलासाधनेत एक गोष्ट प्रामाणिकपणे केली व ती म्हणजे आपापल्या स्वत:च्या कलाविष्कारात सातत्य व दर्जा कायम ठेवणे. त्यामुळे दोघांची चित्रे आजदेखील मोहात पाडतात.
‘स्पुम्याटो’ म्हणजे धुसर कडा. ह्या युरोपातील रेनेसान्स काळातील चित्रकौशल्याचा वापर मुळगावकरांनी अध्यात्माचा मुलामा देण्यासाठी वापरला! वास्तविक, स्पुम्याटो हा दोन वस्तूंमधील वातावरण पकडण्याचा एक प्रयत्न होता. परंतु मुळगावकरांना देव अथवा चमत्कार चित्ररूपांत दाखवण्यास धुसर वातावरणाचा प्रभावी उपयोग झाला. ‘स्पुम्याटो’ ह्या तंत्राचे उत्तम स्पष्टीकरण दीपक घारे ह्यांनी त्यांच्या लिआनार्दो दा न्हिंची या इटालियन चित्रकारावरील ताज्या पुस्तकात दिले आहे. वास्तव व कल्पनाविलास ह्या वेगळया अनुभूती आहेत. ‘मेक बिलिव्ह वर्ल्ड’ नावाची मानसिक स्थिती बालचित्रकलेतून दिसते. त्याचेच हे एक ‘ऍडल्ट’ कलारूप आहे.
मुळगावकरांनी अमूर्त देवांना चेहेरे दिले. म्हणजे त्यातून अतृप्त मनांस मूर्तस्वरूपात देव भेटल्याची तृप्तता मिळाली. मुळगावकर हे एक माध्यम ठरले. राजा रविवर्म्याने ह्याची सुरुवात केली. परंतु त्याने पौराणिक व्यक्तिरेखांचे उदात्तीकरण न करता वास्तव स्वरूपात ते मांडले. त्याकरता युरोपीयन वास्तव चित्रशैलीचा उपयोग केला. ‘जिवंत’ चित्र वाटणे हे मनाच्या स्थितीप्रमाणेच ‘कला’ असली तर शक्य होते.
– रंजन जोशी