कलेचा वारसा – काळा घोडा महोत्सव (Kala Ghoda Festival)

के. दुभाष रस्त्यावर ‘काळा घोडा कला महोत्सव’ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात साजरा करण्यास 1998 पासून सुरुवात झाली. महोत्सवाच्या नावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पोर्तुगीजांनी बॉम्बे कॅसलभोवती तटबंदी साधारणतः पंधराव्या शतकात बांधली. तेव्हापासून त्या छोटेखानी वसाहतीला बॉम्बे फोर्ट असे म्हणून ओळखले जाते. तो काळ किल्ल्यांचा व त्यामार्फत भूप्रदेशाच्या संरक्षणाचा होता. पोर्तुगीजांना भय फ्रेंच व डच आक्रमणाचे होते. मुंबईच्या इतिहासातील 1856 ते 1947 पर्यंतचा काळ ब्रिटिश राजवटीचा मानला जातो. तटबंदी 1865 मध्ये पाडण्यात आली. लायन गेटसमोरील रस्ता (रॅम्पार्ट रोड) म्हणजे सध्याचा के. दुभाष रोड हा तटबंदीचा हिस्सा होता. रॅम्पार्ट म्हणजे तटबंदी. के. दुभाष रोड व महात्मा गांधी रोड (एस्प्लनेड रोड) यांना जोडणाऱ्या मोकळ्या जागेला सुभाषचंद्र बोस चौक असे नाव आहे. किंग एडवर्ड यांचा (सातवा) काळसर रंगातील अश्वारूढ पुतळा त्याच जागेत एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून जवळजवळ शंभर वर्षें होता.

किंग एडवर्ड (सातवा) हा भारतास भेट देणारा पहिला ब्रिटिश राजा होय. राजाच्या भारतभेटीचे औचित्य साधून अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून या लोकहितवादी बगदादी ज्यू व्यापाऱ्याने राजांच्या सन्मानार्थ अश्वारूढ पुतळा बनवून शहर प्रशासनास भेट देण्याचे ठरवले. तो पुतळा लंडन येथील प्रसिद्ध शिल्पकार जोसेफ एडगर बोईम यांनी ब्राँझ धातूपासून बनवला होता. तो पुतळा दगडी शिल्पासमान दिसावा म्हणून त्याला दगडी रंगासारखी काळसर झळाळी दिली गेली होती. पुतळ्यासाठी फ्लोरा-फाउंटन व वेलिंग्टन कारंजे या स्मारकाच्या मध्यावरील जागा निवडली गेली होती.

भव्य दगडी चबुतऱ्यावरील तेरा फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी 1879 मध्ये केले होते. चौथऱ्याच्या पटलावर सर बार्टल फ्रियर, अल्बर्ट ससून, फिलीप वूडहाउस, डोसाभाई फ्रामजी, लॉर्ड नॉर्थ ब्रुक; तसेच, बडोदा, कच्छ, म्हैसूर व कोल्हापूर या संस्थानांचे संस्थानिक इत्यादींच्या प्रतिमा आढळतात. रुबाबदार पुतळ्यामुळे परिसरातील इमारती व वातावरण यांना भारदस्तपणा लाभला होता. ते दृश्य जनमानसाला आकर्षित करणारे होते. मुंबईतील एतद्देशीय श्रमजीवी वर्गाला विदेशी राजाचे नाव उच्चारण्यास कठीण जात असे. त्यांनी ‘रंग ओळख’ हा सोपा पर्याय निवडला! त्यांनी ‘काळा घोडा’ असे एतद्देशीय नाव त्या पुतळ्यास दिले व तेच रूढ झाले. स्वातंत्र्यकाळात मूळ घोड्यासह मालकाला त्या जागेवरून हटवले गेले, तरीही पुतळ्याचा रंग व घोड्याची प्रतिमा मात्र जनमानसाच्या मनात टिकून राहिली आहे!

मुंबईतील सौंदर्यपूर्ण इमारतींचे योग्य मूल्यमापन व जतन व्हावे या उद्देशाने काही कला-संवेदनशील मंडळींनी एकत्र येऊन 30 ऑक्टोबर 1998 रोजी ‘काळा घोडा असोसिएशन’ची स्थापना केली. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आर्किटेक्ट अल्फाज मिलर यांच्या कल्पनेला श्रीहरी भोसले या शिल्पकाराने आकार दिला. नव्या प्रतिमेतील घोडा तेथे 2017 मध्ये प्रस्थापित करण्यात आला. घोडा पुनर्प्रस्थापनेचा हेतू साध्य झाला, प्रतिमेची उणीव भरून निघाली; पण अप्रतिम कलेचा नमुना असलेल्या मूळ शिल्पाला हटवून नेमके काय मिळवले, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो! मूळ पुतळ्याच्या जागेवर ‘पे अँड पार्क’चा बोर्ड ठेवला आहे. वाहनतळाचे आकारमान वाढवण्यासाठी केवढी मोठी किंमत मोजावी लागली! दिवसेंदिवस मुंबई शहर भरकटत चालले आहे. आम्ही मुंबईतील पुरातन इमारतींच्या जतनाची योग्य वेळ केव्हाच गमावून बसलो आहोत. करोडो रुपयांच्या निधीतून पुनरुज्जीवित केलेले फ्लोरा-फाउंटन कारंजे दोनच दिवसांत बंद पडले, हे त्याचे ज्वलंत उदाहरण होय!

काळा घोडा असोसिएशनतर्फे 1999 पासून दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात के. दुभाष रस्त्यावर ‘काळा घोडा कला महोत्सव’ साजरा करण्यास सुरुवात झाली. महोत्सवात पुस्तके, हस्तकला, स्वदेशी वस्त्रे, विविध धातूंच्या मूर्ती; तसेच, नैसर्गिक साहित्यापासून बनवलेल्या वस्तूंची विक्री करणारे स्टॉल्स असतात. स्टँडअप कॉमेडी, थिएटर, नागरी स्थापत्यकला, दृश्यकला इत्यादी कलांचे प्रयोग व प्रदर्शने असतात. विविध विषयांवर आधारित कार्यशाळांमधून कला-संवाद साधला जातो. ते महोत्सवी वातावरण, काही काळ का होईना, भान विसरायला लावते हा अनुभव आहे. तो रस्ता हाच कला महोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. वर्षभर एकाकीपणाला कंटाळलेला के. दुभाष रोड कलामहोत्सवी आठवड्यात निरनिराळ्या कलाकृती व रंगीबेरंगी वेश परिधान केलेल्या मित्रांच्या गर्दीत स्वतःला हरवून घेतो! महोत्सवातील कलाकृती सामाजिक संदेश सांगण्याचा प्रयत्न म्हणून मांडलेल्या असतात. अशा कलाकृती समजून घेण्यात स्वारस्य नसलेल्या बहुतांश मंडळींना कलाकृतीसोबत सेल्फी काढण्याचे व सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे वेड असते.

महोत्सवात वेळोवेळी अनेक क्लिष्ट नागरी प्रश्न कलात्मक दृष्टिकोनातून मांडून संदेश देण्याचे काम केले गेले आहे. त्यात वृक्षांची कत्तल, ‘Tree 60 degees’, ‘ I need some air,’ ‘Currency to Country’, शिडीवरील कावळ्यांची शाळा, धाग्यांनी वेढलेले वटवृक्ष, सायकल चलाव, मुंबईचा डबेवाला, भ्रष्टाचार, प्रदूषण आदी प्रश्नांचा समावेश होता. कोरुगेटेड पेपर, लाकूड, लोखंड इत्यादी साहित्य वापरून कलाकृती बनवल्या जातात. ‘हँड पेंटिंग’मधील प्रतीकात्मक काळा घोडा हे सर्वांचे एका वर्षी आकर्षण होते.

कला महोत्सवाचे 2019 साली विसावे वर्ष साजरे झाले. सादरीकरणात कालमंडळामधून (Wrapping time) ‘काळा घोडा’ची कारकीर्द दर्शवली आहे. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती वर्षाचे निमित्त साधून त्यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शन महोत्सवात मांडण्यात आले होते. महोत्सवाच्या परिसरात प्रवेश करताना आकाशाकडे झेप घेणारा पंखरूपी बहुमुखी घोडा लक्ष वेधून घेई. काली-पिली टॅक्सीचे अंतरंग पाहण्यास मिळाले. रंगीबेरंगी धाग्याने लपेटलेल्या वृक्षाला ‘कल्पतरू’ असे नाव दिले गेले होते. ‘मेरिटाइम हिस्ट्री सोसायटी’ने सादर केलेली वेळदर्शक गोदावरी ‘घंटा’, ‘बॉम्बे टाइम्स’ने मांडलेला ‘Flirt with your city’, ‘माय मुंबई’ने मांडलेला ‘City authors stories write,’ ‘Chariot of horses’ अशा स्टॉल्सवरील सादरीकरणातून आधुनिक कलेतील बदल दिसून आले. वर्कशॉप, फिल्म स्क्रीनिंग, चित्रशाळा, कला-वास्तुकला या विषयांवरील संवाद वगैरे गोष्टींसाठी परिसरातील इमारतींचा उपयोग केला जातो. संगीत, वाद्यसादरीकरण बागेत केले जाते. के. दुभाष हा रस्ता महोत्सवाचा केंद्रबिंदू असला, तरी आजूबाजूचे स्थापत्य खऱ्या अर्थाने थ्री-डी रूप घेते. थोडक्यात, कला, संगीत व स्थापत्य कलेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करणारा महोत्सव म्हणजे काळा घोडा महोत्सव!

– चंद्रशेखर बुरांडे 9819225101, fifthwall123@gmail.com

(‘बाईट्स ऑफ इंडिया’वरून उद्धृत, संस्कारित- संपादित)

About Post Author