कलिंगाची लढाई : सम्राट अशोक (Ashoka’s Battle of kalinga)

0
68
कलिंगाची लढाई इसवी सनपूर्व 261 मध्ये झाली. ती लढाई अशोकाचा राज्याभिषेक झाल्यानंतर आठव्या वर्षी होऊन गेली. अशोकाच्या आयुष्यातील सर्वात दूरगामी परिणाम करणारी घटना कलिंगाच्या लढाईच्या स्वरूपात घडली. कलिंग नावाचे राज्य ओरिसा प्रांतातील समुद्रकिनारी त्या काळात होते. त्या राज्यातील लोक लढवय्ये होते. मौर्यांची सत्ता खंडप्राय देशावर होती. कलिंग देश नावाचे ते राज्यही जिंकावे ही महत्त्वांकांक्षा सम्राट अशोकाच्या मनात निर्माण झाली. कोठे अशोक सम्राट आणि कोठे ते अनामिक राज्य कलिंग, पण कलिंगचे सैनिक प्राणपणाने लढले. तेवढेच तेथील नागरिकसुद्धा लढले. कलिंग राज्याची प्रचंड प्राणहानी, वित्तहानी झाली. पूर्ण कलिंग उद्ध्वस्त झाले. दीड लाख सैन्य युद्धकैदी म्हणून मौर्य सम्राटाने बंदिस्त केले होते. लाखाच्या वर सैनिक मारले गेले. तो विध्वंस अशोकाच्या तेराव्या शिलालेखात वर्णलेला आहे. ती लढाई अशोकाच्या आयुष्यातीलच चिरस्मरणीय नव्हे; तर विश्वाच्या हृदयावर कोरली गेलेली आहे.
लढाई म्हटले तर जय पराजय ठरलेलाच; विध्वंस, वित्तहानी हेही अटळच असते; तसेच कलिंगाच्या लढाईत झाले. माणसे सामान्यत: शत्रुपक्षाच्या वित्तहानीमुळे, मनुष्यबळ हानीमुळे विजयी समजली जातात, त्यांचा अहंकार सुखावतो. पराक्रमाने छाती फुगून येते आणि यशाची नशा चढते. राजाला देश पादाक्रांत करण्याची इच्छा निर्माण होते. वाघाला जशी माणसाच्या रक्ताची चटक लागली की तो शिकार करत सुटतो, तसाच पराक्रमी राजा एका विजयानंतर अनेक विजय मिळवण्यासाठी लढत राहतो. पण त्याला अपवाद ठरले ते सम्राट अशोक. म्हणून त्या सम्राट अशोकाची चार सिंहांची राजमुद्रा व अशोकचक्र भारतीय राष्ट्रध्वजावर गर्वाने विराजमान झाले आहेत. तसेच, सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य प्रजासत्ताक भारताने स्वीकारले आहे.
सम्राट अशोक यांना युद्ध बघून यशाची धुंदी चढली नाही. ते सुखावले नाहीत. त्यांना त्या विध्वंसक परिस्थितीत लक्षावधी माणसे मारली गेली याचे दु:ख प्रचंड झाले. सम्राट अशोक कलिंगाच्या युद्धानंतर बौद्ध भंते उपगुप्त यांच्या संपर्कात आले. त्यांनी उपगुप्तांकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली; सशस्त्र युद्ध न करण्याचा निश्चय केला. त्यांनी मांसाहार वर्ज्य केला आणि राज्यामध्ये सुद्धा मांसाहार बंदी केली. तिसरी धम्म परिषद इसवी सनपूर्व 240 मध्ये पाटलीपुत्र नगरीत सम्राट अशोकाने आयोजित केली. धम्म परिषदेचे अध्यक्ष उपगुप्त होते. त्यांचाही उल्लेख अध्यक्ष म्हणून बौद्ध ग्रंथांतून येतो. बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार यांची योजना आखण्यात आली. त्यांनी भारतातील भौगोलिक प्रदेशात तसेच श्रीलंकेत आणि सुवर्णदेशातही धर्मप्रसार कार्य हाती घेतले. यवनदेशी महारक्षित यांनी धम्मप्रसाराचे कार्य हाती घेतले, तर श्रीलंकेस महेंद्र आणि संघमित्रा यांनी भेटी दिल्या, ब्रह्मदेशात सोन आणि उत्तर देशात धम्मप्रचारक पाठवण्यात आले. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सर्व ठिकाणी त्यांनी चैत्य निर्माण केले. त्यांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले. धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ठिकठिकाणी शिलालेख कोरले. स्तुपाकडे जाणाऱ्या वाटेने दोन्ही बाजूंनी झाडे लावली. विहिरी ठिकठिकाणी पाण्यासाठी खोदल्या. धर्मादाय दवाखाने सुरू केले. त्याने ते प्रजाजनांचे मालक नसून सेवक आहेत असे शिलालेखावर कोरले आहे. त्यामुळे प्रजेच्या मनात राजावर असीम श्रद्धा निर्माण झाली.
अशोकाचे मूल्यमापन करणारे प्राचीन भारतातील इतिहासलेखन करणाऱ्या सर्व इतिहासकारांनी एकमुखाने सम्राट अशोक हा जगातील सर्वश्रेष्ठ सम्राट म्हणून त्याला गौरवले आहे.

– रमाई मासिकातील (जून 2020) मजकूर
————————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here