कला साधना केंद्र आणि वाटेवरच्या काचा

4
60
carasole

अमोल चाफळकर हे सोलापूर येथील एक नामांकित आर्किटेक्ट. पण त्यांचे प्रेम इमारती बांधण्याइतके, किंबहुना काकणभर जास्तच चित्रांवर, शब्दांवर, सुरांवर आणि शिल्पांवर. त्यांच्या या प्रेमातूनच साकारले आहे ‘कला साधना केंद्र’. साधना म्हटल्यावर ती खडतर असणार, पण काळाच्या ओघात बदलणा-यास कलाव्यवहाराच्या रेट्यात ती ‘साधेना’शी होऊ लागली. सर्व कलांवर निःसीम प्रेम करणा-या एका संवदेनशील कलाकाराचे हे प्रांजळ अनुभवकथन. या कथनातून काही नवीन सुहृद जोडले गेले तर वाटेवरच्या काही काचा नक्कीच कमी होतील…

चित्र, शिल्प, नृत्य, साहित्य, संगीत, नाट्य, छायाचित्रण, चित्रपट, योग अशा सा-या कलांचा समावेश असलेल्या ‘जीवन-समृद्धी’ शिबिराची कल्पना पुढे आली तेव्हा मी आपणहून त्यात सामील झालो. दोन दिवसांचे पहिले शिबिर झाले ते नापासांच्या शाळेत. उद्देश होता मुलांना उमेद देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, मनावरचे दडपण कमी करून त्यांना मोकळे करणे. अपेक्षेप्रमाणे मुले खुलली, एकमेकांना मदत करत त्यांनी प्रत्येक कलेचा आनंद घेतला. आपल्याला हे सारे आवडतेय, करायला जमतेय, पुन्हा करावेसे वाटतेय असे त्यांनी सांगितलं. मुलांबरोबर आम्ही सा-या शिक्षक मंडळींनीही ते शिबिर खूप एन्जॉय केले. आम्हाला बरेच काही मिळाले. त्यासाठी तुम्ही इतका वेळ कसा काढलात? मला कोणीतरी विचारले.

हे विचारणे साहजिक होते. कारण माझी व्यावसायिक प्रतिमा एका बिझी आर्किटेक्टची आहे. खरे तर, तो व्यवसाय निवडण्यामागचे कारणही विविध कलांबद्दल असणारी आवड हेच होते. ‘वास्तुकला म्हणजे सर्व कलांची जननी’ असे मानले जाते. त्याचा अनुभव घेण्यासाठी मग सोलापूरहून मुंबई गाठली. अक्षरश:, तळ्यातून समुद्रात उडी मारल्यासारखे वाटले. हॉस्टेलवरच राहत असल्याने अभ्यासेतर अनेक गोष्टी करण्याची संधी मिळत गेली. तोपर्यंत चित्रकला आणि संगीत यांमध्ये थोडीफार गती असणारा मी खरा रमलो तो ‘नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’मध्ये. तेथे मला पहिल्यांदा साक्षात्कार झाला, की सगळ्या कला एकमेकांशी बांधलेल्या आहेत. एकमेकांच्या साहचर्याने त्या अधिक समृद्ध होतात, सगळ्या माणसांमध्ये सा-या कलांना प्रतिसाद देण्याची उपजत ओढ असते. कलांच्या आस्वादाने येणारी समृद्धी इतर कोणत्याही भौतिक सुखाच्या पलीकडची असते. जीवन जगण्याच्या अनेक त-हा आहेत, पण कलांच्या संगतीत जगलेले आयुष्य हे माणूसपणाच्या अधिक जवळचे आहे, असे मला वाटू लागले.

शिक्षण पूर्ण करून जेव्हा मी परत आलो तेव्हा वाटले, आपल्या गावात, सोलापुरात एनसीपीए का असू नये? येथे कलाकार मंडळी बरीच होती, पण त्यांचा एकमेकांशी संपर्क नव्हता. ती त्यांच्या त्यांच्या बेटांवर वावरत होती. नाट्यकर्मींना चित्रकलेचे भान नाही, चित्रकारांना कविता समजत नाही, कवींना चित्रपटांत रस नाही, गाणा-यांना शिल्पकलेशी देणेघेणे नाही, शिल्पकारांना वास्तुकला माहीत नाही. वाटले, या सगळ्यांना एकत्र आणता आले तर?

सोलापूरपासून दहा किलोमीटरवर ‘कवठे’ गावालगत आमचे वडिलोपार्जित शेत आहे. वडिलांनी परवानगी दिली, वास्तुविशारद पत्नी, सीमानेही उत्साहाने साथ दिली आणि २६ जानेवारी १९९३ रोजी ‘कला साधना केंद्रा’च्या पाया खोदाईला सुरुवात झाली. क्लायंटसाठी काम करताना, त्याच्या गरजेनुसार, अभिरुचीनुसार अनेक कलात्मक गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते. त्यामुळे कोणाचाही हस्तक्षेप असणार नाही असा एखादातरी प्रोजेक्ट करता यावा अशी सगळ्या आर्किटेक्ट्सची इच्छा असते. आमची ती इच्छा ‘कला साधना केंद्रा’च्या निमित्ताने पूर्ण झाली. नव्याण्णव फूट व्यासाचा जिओडेसिक डोम हळुहळू आकार घेत गेला.

नवीन व्यवसायाच्या सुरुवातीची धडपड एकीकडे तर दुसरीकडे सांस्कृतिक क्षेत्रातही आमची लुडबुड चालूच होती. माझी ‘गुलजार बोलतो त्याची कविता होते’ ही पुस्तिका प्रकाशित झाली होती. त्यावर आधारित कार्यक्रम गावोगावी होत होते. सीमाही लोकल टीव्ही चॅनेलच्या अनेक कार्यक्रमांत सहभागी होत होती. ‘कला साधना केंद्रा’च्या अॅम्फी थिएटरचा भाग पूर्ण झाला, तसे मग आम्ही मित्रांच्या सहकार्याने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले. कवितावाचन, चित्रकारांच्या कार्यशाळा, नाट्यशिबिरे, गाण्यांच्या मैफली, साहित्यिक गप्पा… असे बरेच काही. हितचिंतकांनी लेख लिहिले, केंद्राला प्रसिद्धी मिळू लागली. आमचा मुक्काम दर वीकएण्डला तेथेच असायचा. इमारतीचा खर्च जरी आम्ही चाफळकर करत असलो तरी कार्यक्रमांना लागणारा खर्च मात्र सारे मिळून गोळा करू लागलो. प्रायोजकही मिळवले. जेवढा लागेल तेवढाच पैसा जमवला आणि खर्चला. मित्रांनी ट्रस्ट स्थापन करून देणग्या गोळा करण्याचा सल्ला दिला, पण आर्थिक लाभासाठी म्हणून ‘केंद्र’ उभे केलेच नव्हते. शहराच्या गजबजाटापासून दूर, शांतपणे ज्यांना कोणत्याही कलेची साधना करायची आहे त्यांच्यासाठी ती जागा आहे. आम्ही तेथे कलाकारांच्या राहण्या-खाण्याचा, त्यांना लागणा-या साहित्याचाही खर्च करू लागलो. पैसे साठल्यावर संस्थांची कशी संस्थाने होतात आणि त्यांच्या उद्देशांपासून भरकटतात, ते आम्ही आजुबाजूला पाहत होतो. आम्ही त्या वाटेला गेलो नाही.

सोलापुरात कार्यक्रमानिमित्त कोणीही साहित्यिक, नाट्य-सिने कलावंत, गायकवादक मंडळी आली की त्यांना फावल्या वेळेत ‘केंद्रा’त आणून त्यांच्या बरोबर गप्पा मारणे, त्यांना केंद्राची माहिती देणे हा जणू शिरस्ता झाला. आलेली मंडळी कौतुक करत, प्रोत्साहन देत, छान अभिप्राय वगैरे लिहून देत. काही मात्र सावध करत, स्पष्ट बोलत-हल्ली कोणाला हवाय एकांत, कोण करतोय साधनाबिधना, कोणाला एवढा वेळ आहे, उगाच ही उठाठेव करू नका.

दुसरीकडे, आमची व्यावसायिक घोडदौड जोरात सुरू होती. आम्ही सोलापुरातील सर्वांत मोठी पोलिस हाऊसिंग स्कीम डिझाईन केली. आम्ही स्वत:साठी त्याच्या लगतच्या प्लॉटवर ऑफिस आणि घर बांधले. नाव दिले – ‘सृजन’. २००२ साली त्या वास्तूला, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस’चे सर्वोत्कृष्ट इमारतीचे पारितोषिक मिळाले आणि तो मोठा टर्निंग पॉइंट ठरला! त्यानंतर अनेक चांगले बिल्डिंग प्रोजेक्ट्स आमच्याकडे चालून आले. तशातच आम्ही काही मित्रांनी मिळून फिल्म सोसायटी आणि सांस्कृतिक व्यासपीठ सुरू केले. रीतसर वर्गणी घेऊन दर महिन्याला कार्यक्रम सुरू झाले. त्या सा-याचा परिणाम ‘कलासाधना केंद्रा’वर झाला. व्यक्तिश: आम्ही तेथे पूर्वीपेक्षा कमी वेळ देऊ लागलो, अर्थात आमचा वेळ देण्याचा फार प्रश्न नव्हता, कारण आमच्या मते, केंद्रासाठी अपेक्षित असणा-यात एका सृजनशील अवकाशाची बांधणी करून, वास्तुविशारद असण्याची आमची जबाबदारी आम्ही पार पाडली होती. आता अपेक्षित होता प्रत्यक्ष कलाकारांचा सहभाग! वेळोवेळी, सगळे एकत्र आल्यावर, आम्ही ती अपेक्षा त्यांच्यासमोर बोलूनही दाखवत असू. पण तसे झाले मात्र नाही. केंद्र नुसते दाखवणे आणि कौतुक करून घेणे याचाही कंटाळा येऊ लागला. नाही म्हणायला काही लेखकमंडळी काही काळासाठी तेथे राहून गेली. नंतर प्रकाशित झालेल्या पुस्तकांत त्यांनी केंद्राचा कृतज्ञतापूर्वक उल्लेखही केला. काही चित्रकारांनी त्यांच्या प्रदर्शनाचे काम तेथे राहून केले. जाताना आठवणीखातर काही चित्रे तेथेच ठेवली. शिल्पकार राहिले, लघुपट तयार केले गेले, पण त्या सा-यात सातत्य राहिले नाही. ते सारे आमच्या वैयक्तिक पुढाकारातून घडत गेले. आपण होऊन फार कमी गोष्टी घडल्या. नवीन हात पुढे आले नाहीत. इतक्या वर्षांनंतरही केंद्र त्याच्या स्वत:च्या पायावर उभे राहिलेले नाही.

मागील दहा वर्षांत आजूबाजूचे वातावरणही किती बदलले! डिजिटल बोर्ड्संनी शहराचा चेहरा विद्रूप, बीभत्स केला आहे. चित्रकार मंडळी प्रदर्शने भरवत नाहीत म्हणून सोलापुरातील एकमेव आर्टगॅलरी पाडून तेथे शॉपिंग कॉम्प्लेक्स होऊ घातले आहे. म्युझियम अनेक वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत नुसते पडून आहे. एकेकाळी नावाजलेल्या नाट्यसंस्था दुभंगल्या-काही बंद पडल्या. स्पर्धेसाठी होणारी नाटकेही निम्म्यावर आली. शास्त्रीय संगीताचे महोत्सव बंद पडले. नाट्यगृहात चांगली व्यावसायिक नाटके येणे थांबले. केवळ तमाशा आणि ऑर्केस्ट्राचे बोर्ड झळकू लागले. चित्रपटगृहांत मॉल घुसले. पुढा-यांनी त्यांची त्यांची सांस्कृतिक मंडळे काढून महोत्सव भरवायला सुरुवात केली. त्यात टीव्हीतील कलाकार येऊन हसवणुकीचे कार्यक्रम होऊ लागले. सोप्या छपाईतंत्रामुळे, सुमार दर्जाची भरमसाठ पुस्तके प्रकाशित होऊ लागली. मागोमाग पुरस्कारांची खिरापतही सुरू झाली. नाही म्हणायला चांगल्या कलावंतांना घेऊन ’सोलापूर महोत्सव’सारखा दर्जेदार सरकारी प्रयोगही झाला, पण तुरळक उपस्थितीमुळे बंद पडला. फुकट व्याख्यानांना मात्र अजूनही गर्दी होते. एकूणात, मनोरंजनाची अभिरुची बदलत गेली आहे. त्या सा-याचा परिणाम म्हणून की काय सीमाला वाटू लागले की केंद्रासाठी घेतलेले कष्ट, केलेला खर्च हा सारा वेडेपणा झाला! त्यापेक्षा कलाकारांना रोख पुरस्कार देणे जास्त सोयीचे झाले असते. हितसंबंध वाढले असते आणि प्रसिद्धी मिळाली असती ती वेगळीच. असो. पण एकूण वातावरण पूर्ण निराशाजनक आहे असे नाही. केंद्रापासून दहा किलोमीटरवर असणारे शहर आता पाच किलोमीटरवर येऊन पोचले आहे. समोर पक्की सडक झाली आहे. नुकती काही चित्रकार मंडळी काही महिन्यांसाठी केंद्रात राहून गेली. एक शिल्पकार राहतोय – तो जयपूरहून येणा-या संगमरवराची वाट पाहतोय. आजुबाजूच्या लहान गावांमधून होतकरू कलाकार केंद्राचा योग्य वापर करतील अशी आशा आहे. पण केंद्राबद्दल आस्था असणारे मित्र हळुहळू दुरावताना दिसताहेत आणि जबाबदारी घेऊन काही करण्यासाठी आपणहून कोणी पुढे येताना दिसत नाही किंवा आमच्यातील दोष दाखवून योग्य मार्ग दाखवणारेही कोणी भेटत नाहीत. कदाचित आमचे संघटन कौशल्य कमी पडत असेल किंवा आमच्या वाढलेल्या वयाचा परिणाम असेल.

केंद्राचे बांधकाम मात्र एका टप्प्यावर येऊन आता थांबले आहे. आपल्याभोवती वाढत जाणा-या सांस्कृतिक बकालतेला समाजाचा घटक म्हणून काही अंशी आपणही जबाबदार आहोत ही खंत डाचत राहते. म्हणूनच, मग जीवन-समृद्धी शिबिराची आखणी करताना मीही पुढाकार घेतला. आमचे पुढचे शिबिर ज्येष्ठ नागरिकांबरोबर असणार आहे.

लेखाचा शेवट ‘पण हेही नसे थोडके’ किंवा ’तरीही आम्ही खूप समाधानी आहोत’ असा सकारात्मक करावा असा प्रघात आहे खरा, व मी लेखनाच्या त्या टप्प्यावर आलोही आहे. पण लेखाचा शेवट तेथे करावा असे मला वाटत नाही. व्यावसायिक यशाच्या पाय-या चढताना आतून मी अस्वस्थ आहे. आमच्या कर्तृत्वाचा आलेख मांडण्यासाठी मी हा लेख लिहीत नाही. अन्यथा केंद्रात आलेल्या लहानमोठ्या कलाकारांची नावे, त्यांचे अभिप्राय लिहिता आले असते, झालेल्या कार्यक्रमांची जंत्री मांडता आली असती. वस्तुस्थितीकडे रोखून पाहताना डोळ्यांसमोर जे धुके दाटते, ते हटवण्याचा कोणीतरी उपाय सांगेल असे वाटते. समविचारी लोकांपर्यंत माझी तळमळ पोचेल असे वाटते, म्हणून हे लेखन.

सोलापूर रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या भैया चौकातून पुढे सलगर वस्तीमार्गे जेव्हा तुम्ही कवठ्याकडे निघाल तेव्हा आजुबाजूच्या दुष्काळी माळरानाची पिवळी धग न्याहाळताना दूरवर एक हिरवा ठिपका दिसेल. जवळ जाल तर झाडांच्या गर्दीत लपलेले ‘कला साधना केंद्र’ दिसेल. एखाद्या रानफुलासारखे, दुर्लक्षित, आडवाटेवर आलेले, कदाचित नको त्या ठिकाणी, कदाचित चुकीच्या काळात उमललेले. पण अजून ते कोमेजले नाही याचेच अप्रूप वाटते. दगड-विटांच्या गिलाव्याने न झाकलेल्या काही ओबडधोबड भिंती आहेत, त्यावर तोललेला फॅब्रिकेशनचा घुमट आहे. राहण्यासाठी दोन खोल्या आहेत, वाचनालय आहे. त्याखाली जमिनीत उतरणारे अॅम्फी थिएटर, ज्याच्या सगळ्यात वरच्या पायरीवर टागोरांचा पुतळा आहे – हनुवटीखाली हात ठेवून स्टेजकडे एकटक पाहणारा. या वास्तूच्या आजुबाजूला, थेट जमिनीतून उगवल्यासारख्या दगडावर कोरलेल्या काही मराठी कविता आहेत. त्यातील एक कविता मर्ढेकरांची आहे –

भरून येईल हृदय जेधवा
शरीर पिळुनी निघेल घाम
अन शब्दांच्या तोंडामध्ये
बसेल तुझा गच्च लगाम
काळ्यावरती जरा पांढरे
ह्या पाप्याच्या हातुन व्हावे
फक्त तेधवा : आणि एरव्ही
हेच पांढ-यावरती काळे!

– अमोल चाफळकर

About Post Author

4 COMMENTS

  1. माहीत नसलेली बरीच ठिकाण व
    माहित नसलेली बरीच ठिकाणं व कलाकारांची माहिती व ओळख मिळते. महाराष्र्ट किती सर्व बाबतीत मोठा आहे हे वाचून अभिमान वाटतो.

  2. लेखातून कलासाधना केंद्राच्या
    लेखातून कलासाधना केंद्राच्या अडचणी कळल्या, पण आजच्या माहितीयुगात योग्य गरजूंपर्यंत आपल्या केंद्राची माहिती सतत पोहोचण्याची गरज आहे असे वाटते. गुगलचा योग्य वापर करून देश तसेच जागतिक स्तरावर पोहोचणे आज सहज शक्य आहे. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा !!

  3. एका कलाप्रेमी ने कलेच्या
    एका कलाप्रेमी ने कलेच्या सेवेसाठी केलेली धडपड अशी वाया जाणार नाही . नक्कीच कालौघात लोकांना याचे महत्व पटेल – कारण हल्ली ” व्यक्त ” होण्यासाठी जागाच उरली नाहीये या भौतिक जगात . मात्र प्रचलित प्रथेनुसार याचा निदान तत्सम व्यासपीठावर प्रचार केल्यास तुम्हांला तुमचे प्रयोजन नक्कीच प्राप्त होईल !

Comments are closed.